Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

इंग्रजी चित्रपटांच्या विचित्र हिंदी नावांचे अलेक्झांड्रा थिएटर
थिएटर (पूर्वीचा उच्चार थेटर) नाव घेताचक्षणी अथवा आठवताक्षणीच त्याचे संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचे कल्चर डोळ्यासमोर येणे हे तर जुन्या एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्सचे अगदी वेगळेपण आणि खास वैशिष्ट्य. प्रत्येक थिएटर एकापेक्षा वेगळे. बघा आठवून. अलेक्झांड्रा थिएटरची ओळख आणि संस्कृती अगदी भन्नाट आणि खरोखरच जगावेगळी. अगदी अनोखी. (Alexandra theatre Mumbai)
एव्हाना जुन्या पिढीतील चित्रपट रसिक फ्लॅशबॅकमध्ये गेले असतील आणि त्यांच्या चेहर्यावर छान स्मितहास्य आलेही असेल. आजच्या डिजिटल युगातील चित्रपट रसिकांना मात्र हा अनोखा ‘स्पाॅट’ नेमका कुठे होता, हे सांगायलाच हवे. हो, आता होताच म्हणायला हवे. कारण हे थिएटर २०११ साली बंद पडले. पण त्याची शंभर वर्षे जुनी इमारत आजही आपल्या जुन्या खाणाखुणा घेऊन उभी आहे.
दक्षिण मध्य मुंबईतील नागपाडा काॅर्नरवरचे हे जुन्या काळातील चित्रपट रसिकांचे हमखास लक्ष वेधणारे असे थिएटर; नागपाडा, कामाठीपुरा, आग्रीपाडा, मुंबई सेंट्रल अशा अतिशय दाट वस्तीच्या गजबजलेल्या अशा भागातील मध्यभागी असणारे हे थिएटर. याच्या एका बाजूला रेड लाईट एरिया. हे सांगणं अत्यंत महत्त्वाचं कारण यावरून पूर्वीचा चित्रपटगृहांचा जन्म सर्वस्तरीय होता हे लक्षात येते. सामाजिकदृष्ट्या ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ती दुर्दैवाने दुर्लक्षित केली जाते.
उच्चमध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू वर्ग या थिएटरपासून कायमच लांब राहिला. आपण येथे चित्रपट पाहायला येतो, असे सांगणे त्याना कायमच डाऊन मार्केट वाटले असावे. मात्र या वर्गाला या थिएटरच्या कल्चरबद्दल कायमच कुतूहल वाटत असे. अनेक वर्षे इंग्लिश मिडियातून या थिएटरवर सतत काही ना काही लिहून येत असे, हे या थिएटरचे यशच. या अलेक्झांड्रा थिएटरची ‘विशेष दखल’ घेण्याची ठळक कारणे म्हणजे, येथे प्रामुख्याने हाॅलिवूडचे बी आणि सी ग्रेड चित्रपटाचे हिंदीत काही वेगळेच नामकरण करुन ते प्रदर्शित होत आणि ते हिंदीतील नाव वाचण्यातही एक प्रकारचे मनोरंजन असे. (चित्रपट म्हटलं की अशा अगणित आणि त्यात काही अजब गोष्टी आहेत हे मी उगाच सांगत नाही. माझ्यासारख्या चित्रपट व्यसनींनी ते अनुभवलयं.) (Alexandra theatre Mumbai)

काही उदाहरणे अशी, हिचकाॅकच्या ‘द 39 स्टेप्स’ या चित्रपटाचे हिंदीत नामांतरण केले होते, ‘एक कम चालीस लंबे’. तर ‘डबल इम्पॅक्ट’चे – ‘राम और श्याम’, ‘ब्रूस द लिजंड्स’चे – ‘दादो का दादा ब्रूसली’ आणखीन काही ‘भाषांतरीत’ नावे सांगायची तर, मेरा जिस्म मेरा बदन’, अपनी मुर्गी को रखना संभाल, निक्कमा किया इस दिल ने, अंगूर का दाना हू मै, जवानी जानेमन हसीन दिलरुबा असे अगदी काहीही हिंदीत नामकरण करणे ही या थिएटरची खास ओळख. म्हटलं ना, प्रत्येक थिएटरची आपली एक ओळख असतेच असते. आणि फक्त तेवढे नाव वाचण्यासाठीही ‘अलेक्झांड्रा’चा अनेकजण फेरफटका मारत.
अशाच एका विदेशी चित्रपटाचे नाव ‘बच्चे तो बच्चे बाप रे बाप’. अधूनमधून येथे ॲक्शनपॅक्ड मसालेदार देमार हिंदी पिक्चर, भोजपुरी पिक्चरही रिलीज होत. अगदीच क्वचितच येथे ‘परिंदा’, ‘जो जिता वो सिकंदर’ सारखे चित्रपट रिपिट रनला प्रदर्शित झालेच, तर ते तीन अथवा चार दिवसांसाठीच असत. अन्यथा येथील धमाकेदार चित्रपट कोणताही असो, त्यात काही वेगळेपण, दिग्दर्शकाचा टच, प्रतिकात्मक दृश्य, क्लासिक कॅमेरा वर्क अशा गोष्टींची अपेक्षा कधीच कोणी ठेवली नाही. (Alexandra theatre Mumbai)
विशेष म्हणजे, बी आणि सी ग्रेड विदेशी चित्रपट इंग्लिश भाषेतच रिलीज होत आणि भाषा समजायला हवी असे काही नव्हतेच. असे विदेशी चित्रपट हिंदीत डब करण्याचे फॅड खूप नंतर आले. ते पूर्वी असते तर अलेक्झांड्रा आणखीन हाऊसफुल्ल गर्दीत चालले असते. पण अनेकाना इंग्लिश भाषा समजत नव्हती तरी दृशांतून चित्रपट समजत होते, हे तर अलेक्झांड्राचे देणे.
माझी या ‘अलेक्झांड्रा’ थिएटरची ओळख कशी झाली? ते राॅक्सी, ऑपेरा हाऊस, अलंकार, मिनर्व्हा, नाॅव्हेल्टी वगैरेसारखे मेन थिएटर अजिबात नव्हतेच. आमच्या गिरगावातील मध्यमवर्गीय कुटुंबात या थिएटरवर गप्पा होत नसत. इतकेच नव्हे तर, या थिएटरमध्ये चित्रपट पाहायला जाऊया असा घरात विषय नसे. याचे कारण म्हणजे, तिकडचे विदेशी चित्रपट पाहण्यापेक्षा इराॅस, रिगल, स्टर्लिंगचे इंग्लिश चित्रपट पाहूया अशा गप्पा होत.

मी अलेक्झांड्रा थिएटर सर्वप्रथम बेस्ट बसमधून पहिले. लालबागच्या सार्वजनिक गणेशोत्सवातील गणेश मूर्ती आणि देखावे पाहण्यासाठी सहकुटुंबाने जाण्याची खूप जुनी परंपरा आहे. मीही ती अनुभवलेय. त्यात ६५ आणि ६९ या क्रमांकाच्या बसने लालबागला ये जा करताना या थिएटरवर हमखास नजर पडायची. अगदी जुन्या वळणातील थिएटर असले तरी त्यावरचे विदेशी चित्रपटाचे पोस्टर आणि त्याच्या नावाचे अजब हिंदीकरण हे गमतीदार वाटे.
बराच काळ अलेक्झांड्रा इतकेच माहीत होते. बारावीला असताना मला ‘महाराष्ट्र काॅलेज सेंटर’ आले आणि ते नेमके याच थिएटरसमोर. हा एक छान योगायोग होता आणि शेवटचा पेपर हाेताच याच अलेक्झांड्राचा पहिला अनुभव घेतला. चित्रपटाचे नाव होते, ‘कमीने मै तुझे जिंदा नहीं छोडूंगा’. तुम्हाला लगेच धर्मेंद्र आठवला असेल. पण हा चित्रपट त्याचा नव्हता. असाच कोणतातरी ‘परदेशी’ चित्रपट होता. पण वार्षिक परीक्षा संपल्यावर आणि समोरच थिएटर असल्याने अधिक तपशील कशाला हवे होते?)अप्पर स्टाॅलचे एक रुपया पासष्ट पैशाचे तिकीट काढून आम्ही मित्र आत शिरलो ते एक भन्नाट अनुभव घ्यायला. (Alexandra theatre Mumbai)
त्या काळात सीटवर बसल्या बसल्या अगदी हक्काने पडद्यावरच्या हीरोला वगैरे एखाद्याने ओरडून सल्ला देणे नेहमीचेच (अशाच पब्लिकने आपल्या देशात पडद्यावरचा चित्रपट वाढवला. कदाचित ते तर्कसंगत नसलेही. पण तेच सत्य होते.) येथे फायटिंग (त्या काळातील प्रचलित शब्द) सीनला पब्लिकमधून मार सालेको… येथपर्यंत ठीक हो, पण तोंडानेही ढिश्यूम्म ढिश्यूम्म करायचं? अर्थात याचा अर्थ चित्रपटाशी एकरुप होणे असाही असू शकते. एखादा सीन लांबलाच तर ‘पिक्चर आगे करो’ टाईप एखादा सल्लाही येत असे. (तोपर्यंत व्हिडिओ कॅसेटचे युग आले नव्हते तरी असा सल्ला). ॲक्शन सीनला टाळ्या आणि शिट्ट्यांनी थिएटर दणाणून जात असे. अलेक्झांड्राचा हा माझा पहिला शो देखील असाच रोमांचक होता. त्यावेळीच अधूनमधून अशाच धमाल अनुभवासाठी येथे यायला हरकत नाही, हे ठरवून टाकले. प्रत्येक वेळेस ‘हा चित्रपट आपल्याला काय देतोय’ याचसाठी आतूर असायला हवे असे नाही. कधी कधी पब्लिक आपल्याला कोणता अनुभव देतोय यासाठीही थिएटरमध्ये जायला हवे. (एका मराठी वृत्तपत्राची एक प्रतिनिधी काही वर्षांपूर्वी याच एकूण अनुभवासाठी येथे गेली असे तिने आवर्जून लिहिले होते.)
आजच्या बदामी, गुलाबी, मल्टीकलर मल्टीप्लेक्सच्या काळात १४ सप्टेंबर १९२१ रोजी उदघाटन झालेले हे अलेक्झांड्रा सिनेमा थिएटरचे कल्चर विचित्र वाटेल. पण आतमध्ये वेगळालीच जाणीव, पब्लिक तिकीट काढताक्षणीच पडद्याशी जोडला जायचा. टाळ्या शिट्ट्यांची धमाल असायची. गिरगावातून ६५ वा ६९ नंची बस पकडून तेथे जाताना काेणी पाहत नाही ना, याची काळजी मात्र घ्यायचो. काही वर्षांपूर्वी टाइम्सची ‘Alexandra cinema takes on new role as mosque’ ही बातमी वाचताना फ्लॅश बॅकमध्ये गेलाे. अलेक्झांड्रा थिएटरबद्दल माझे कुतूहल कायम राहिले.

फार पूर्वी या थिएटरचे मालक होते, अब्दुल्ली युसूफ अली… तर ख्यातनाम चित्रकार एफ. एम. हुसैन यांनी एकेकाळी याच अलेक्झांड्राची पोस्टर रंगवली आहेत हे विशेष. गोल देवळाजवळच्या मोती सिनेमासमोरच्या गल्लीत हुसेनचा तो स्टुडिओ होता, असे अधिक शोध घेतला असता समजले. या थिएटरच्या बाजूने दोन मिनिटांवरील कामाठीपुराच्या गल्लीतल्या फुटपाथवर भल्या पहाटे प्रत्येक शुक्रवारी चोर बाजारटाईप बाजार भरायचा. अक्षरशः चोरीचा माल. इथे जुन्या रेकॉर्डस एक-दोन रुपयात मिळायच्या. साठ सत्तरच्या दशकात एक दोन रुपये फार कमी नव्हतेच. त्या काळात लाऊडस्पीकरचा धंदा करणारे हे त्यांचं गिर्हाईक. दिवस उजाडला की हे विक्रेते निघायचे. (Alexandra theatre Mumbai)
=======
हे देखील वाचा – फर्स्ट डे फर्स्ट शोचा तो थिएटरबाहेरचा माहौल…
=======
कालांतराने अनेक एकपडदा चित्रपटगृह एकेक करीत बंद झाली. अनेकांच्या तर मूळ खाणाखुणा फक्त मागच्या पिढीतील चित्रपट रसिकांनाच माहित आहेत. अलेक्झांड्राची मूळ वास्तू आजही उभी आहे. पण शो केव्हाच थांबला आहे. माझ्यासारखेच अनेक चित्रपट व्यसनी आजही तेथून बेस्ट बसने (आता ६५ नंबरची बस बंद झालेय) हटकून अलेक्झांड्रा थिएटरवर हमखास नजर टाकतोच. ती आमच्या पिढीची सवय होती, गरज होती. एखाद्या विदेशी चित्रपटाचे हिंदीतील नामकरण आम्हाला काही वेगळाच आनंद देई. आजही तसेच काही नजरेत पडेल असे वाटते, पण तसे होत नाही. आज हे थिएटर सुरु असते, तर त्याचे वय १०१ वर्षांचे असते. आज येथील पडद्यावर खेळ होत नसला, तरी ही इमारत १०१ वर्षांची आहे. जुन्या मुंबईवर फोकस टाकताना हा संदर्भ खूपच महत्त्वाचा आहे.