प्रेक्षकांची नस ओळखणारा अवलिया – दादा
साधारण त्यावेळचा काळ होता तो १९७० चा जेव्हा खऱ्या अर्थाने मराठी इंडस्ट्रीला एक चेंज मिळाला. दादांच्या (Dada Kondke) रुपाने. म्हणजे आपल्याकडे व्ही. शांताराम, मा. विनायक, भालजी पेंढारकर, बाबूराव पेंटर आदी रथी-महारथींनी चित्रपटाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. प्रभात फिल्म कंपनीचे चित्रपटही लोकांना आवडत होते. सामाजिक आशय, तत्कालीन चालीरीती लक्षात घेऊन सिनेमाची निर्मिती होत होती. यात कुंकू, शेजारी, माणूस, संत तुकाराम आदी चित्रपटांची भर पडत होती. लोकांनाही ते सिनेमे आवडत होतेच. पण बदल ही एक सातत्याने घडणारी गोष्ट आहे, असं म्हणतात आणि तसं झालं.
१८७० च्या शेवटाला दादा कोंडके सिनेसृष्टीत आले. त्या आधी ते नाट्यसृष्टीत होते. तिथून मराठी सिनेमाने आपली कूस बदलली. तिथून मराठीत ग्रामीण चित्रपट सुरू झाले. त्याचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो तो दादा कोंडके यांचा सोंगाड्या.
या चित्रपटानं महाराष्ट्राच्या अनेक शहरांमध्ये तुफान यश मिळवलं. खरंतर या सिनेमाने राज्यातलं सिनेमाचं संपूर्ण वातावरण बदलून गेलं. सगळीकडे हवा होती ती फक्त दादांची आणि त्यांच्या गाण्यांची. दादांनी मराठी सिनेमाचं सगळं व्याकरणच बदलून टाकलं. दादांचा नायक येण्यापूर्वी मराठीत कसे हिरो होते? तर ते मर्दानी छातीचे.. फेटा घालून मिशीवर ताव मारणारे असे होते… मग काय.. पाखरू कुनीकडं उडतंय म्हणायचं.. असं हळूच विचारणारे होते. पण दादांच्या सिनेमातल्या नायकाने ही व्याख्या बदलली. (Memories of Dada Kondke)
अत्यंत बावळट दिसणारा.. अघळपघळ कपडे घालणारा.. पण भाबडा नायक दादांनी लोकांना दिला. दादांचं हे रूप लोकांना कमालीचं भावलं. दादा आपल्या सिनेमातून ज्या काही गमतीजमती करत होते त्या सगळ्या लोकांना जणू हव्या होत्या. त्यांच्या चित्रपटांनी महाराष्ट्रातल्या एका खूप मोठ्या जनवर्गाला आपलंसं केलं. दादांच्या प्रत्येक सिनेमाला हक्काचा प्रेक्षक होता. पांडू हवालदार, तुमचं आमचं जमलं, ह्योच नवरा पाहिजे, आली अंगावर, मुका घ्या मुका, सासरचं धोतर असे एकापेक्षा एक सिनेमे दिले आणि लोकांनी ते तुफान चालवले.
दादांच्या सिनेमाची जादू अशी की, आजही मुंबई-कोल्हापूरसह अनेक थिएटरमध्ये चालणारा सिनेमा नसेल, तर दादांचा सिनेमा काढून लावला जातो आणि तो आजही चालतो. अर्थात याला एक दुसरी आणि दुखरी बाजूही आहे. म्हणजे दादांनी जे सिनेमे बनवले त्यात त्यांनी मराठी भाषेचा यथेच्छ मोकळा उपयोग करून घेतला. विशेषत: द्वयर्थी संवादांचा. प्रत्येक सिनेमात हा वापर असे. लोकांना हा प्रकार आवडतोय म्हटल्यावर दादांनी तो प्रकार वापरलाच. पण नंतर नंतर हा प्रकार जरा जास्त होऊ लागल्याचा आरोपही त्यांच्यावर होतो. अर्थात आरोप म्हणजे ही काही कायदेशीर बाब नव्हती. शेवटी कलेचाच प्रकार तो.. (Memories of Dada Kondke)
दादा मात्र आपण बनवत असलेल्या सिनेमांवर ठाम होते. ते सिनेमा बनवत होते आणि लोक तो सिनेमा चालवत होते. यावर एकदा दादांनाच थेट प्रश्न विचारला गेला होता. प्रश्न साधाच होता की, तुमच्या यशस्वी वाटचालीचं गमक काय? यावर दादांचं उत्तर होतं, “पूर्वीच्या काळी मा. विनायक सिनेमे बनवत होते. त्याकाळचे अनेक दिग्दर्शक सिनेमे फार उत्तम बनवत होते. पण त्याचे विषय ठरलेले होते. त्यात समाजकारण होतं. उपरोध होता. टिपीकल पांढरपेशा लोकांसाठी ते सिनेमे बनले. त्यामुळे हे सिनेमे मुंबई-पुण्याबाहेर गेले नाहीत. राजा परांजपे यांनीही खूप चांगले सिनेमे काढले पण ते कर्ज बाजारी झाले. मी खेडोपाड्यातल्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून सिनेमे बनवले. दर दहा मिनिटांनी प्रेक्षक पोट धरून हसला पाहिजे. सिनेमातला एखादा विनोद, एखादं गाणं बघायला प्रेक्षक पुन्हा पुन्हा थिएटरमध्ये येतात. त्यांना डोळ्यासमोर ठेवून मी सिनेमा एडिट करतो.”
किती महत्वाचं निरिक्षण आहे हे. आता खेडोपाड्यातल्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून सिनेमा बनवणं हे काही खायचं काम नाही. आता पुढचा प्रश्न असा येतो की, दादांना गावागावांतल्या लोकांची ही नस कशी काय माहीती होती? याचं उत्तर त्यांनी केलेल्या नाटकात दडलं आहे. दादांचं ‘विच्छा माझी पुरी करा’ हे नाटक तुफान चाललं होतं. दादा हे नाटक घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यात जात होते. तिथे त्यांना तुफान प्रतिसाद मिळत होता. तेव्हाही महाराष्ट्राच्या राजकारणात काही घडामोड घडली की ती या नाटकात दादा घ्यायचे आणि तुफान हशा पिकायचा. हा प्रकार लोकांना नवा होता. म्हणून लोकांना काय आवडतं हे त्यांना माहीत होतं. नाटक करताना दादांनी जी काही प्रेक्षकांबद्दलची गणितं मांडली होती तीच त्यांना सिनेमा करताना कामी आली होती. (Memories of Dada Kondke)
दादांच्या कामातलं कन्व्हिक्शन कमाल होतं. म्हणून सेन्सॉरच्या कात्रीतून त्यांचे सिनेमे सुटायचे. एकदा ‘बोट लावीन तिथे गुदगुल्या’ या सिनेमाचा सेन्सॉर चालू होता. त्या सेन्सॉरच्या समितीमध्ये कवियित्री शांता शेळकेही होत्या. बाईंनी, “ढगाला लागली कळ..” या गाण्यातल्या, “सशाला बीळ कोणी दाखवा..” या ओळीमधल्या ‘बीळ’ या शब्दाला आक्षेप घेतला. शांताबाई म्हणाल्या, “तो शब्द बदला.” दादा म्हणाले, “अहो बाई.. ससा बिळातच राहातो. तिथे गुहा, घर, जंगल असा कोणताही शब्द बसत नाही.” पण बाईंना हे काही पटेना. बाईंचा आग्रह होता शब्द बदलाच.
मग दादांनी कमाल केली. त्यांनी लगेच संदर्भ सांगत बाईंनाच एक प्रश्न केला. ते म्हणाले, तुम्ही घरकुल सिनेमासाठी गाणी केलीत. त्यातलं हाऊस नंबर फिफ्टी फोर.. बांबूच्या वनात.. हे गाणं तुम्ही लिहिलंत. यात बांबूच्या घरात राहायला हवे.. बांबूवर बसायला हवे.. असे शब्द आहेत. तुम्हाला या ओळी अश्लील वाटल्या नाहीत का? यावर शांताबाई काहीही बोलू शकल्या नाहीत आणि सिनेमा पास झाला. अर्थात दादा कोंडके आणि शांताबाई ही फार मोठी माणसं. दादा स्वत: शांताबाईंच्या लिखाणाचे फॅन होते. पण शेवटी इथे प्रश्न सिनेमाचा होता. (Memories of Dada Kondke)
==========
हे देखील वाचा – दिलीप प्रभावळकर – कमालीचा ‘सेन्स ऑफ ह्युमर’ असलेले मिश्किल अभिनेते
==========
तर असे होते दादा. लोकांवर प्रेम करणारे.. प्रेक्षकांचा आदर राखणारे आणि आपण जे काही करतो आहोत त्याचं पूर्णत: समर्थन करणारे. महाराष्ट्रात सिनेसंस्कृती रुजवण्यात दादांचा मोठा हातभार आहे तो त्यासाठीच. खरंतर दादांवर जेवढं लिहावं तेवढं कमी आहे. पण या एक दोन गोष्टींमधून दादांचं व्यक्तीमत्व समोर आलं असणार यात काही शंका नाही. दादांच्या जयंती निमित्त त्यांना त्रिवार वंदन.