ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
रेसकोर्सच्या दुनियेशी जवळचा संबंध असणाऱ्या डायना थिएटरच्या रंजक आठवणी
जवळपास प्रत्येक एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्सचे स्वत:चे असे व्यक्तिमत्व, वैशिष्ट्य, ओळख आणि खासियत असते. एकासारखे दुसरे नाही. तेच महत्त्वाचे असते. असे आपण मल्टीप्लेक्सबद्दल बोलू शकतो का? (Memories of Diana Theatre)
अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्स एकेक करीत बंद झाली, पण त्यांच्या आठवणी आम्हा चित्रपट रसिकांच्या मनावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. असेच एक ‘आठवणीतील थिएटर’ ताडदेव, बाॅम्बे सेन्ट्रल परिसरातील डायना टाॅकीज. ते कायमच ‘एक आठवड्यासाठी’ जुने चित्रपट प्रदर्शित करणारे थिएटर म्हणून ओळखले गेले. त्यामुळेच ‘मेन थिएटर’ अशी त्याला कधी ओळख मिळाली नाही. एखाद्या थिएटरचे असेही वेगळेपण असू शकते. पण अनेक जुने चित्रपट पाहून बॅकलाॅग भरण्यासाठी आणि अनेक चित्रपट पुन्हा पुन्हा एन्जाॅय करण्यासाठी ‘डायना’ कायमच मला आपलेसे वाटे आणि यासाठी हक्काचेही!
डायनाकडे माझी पावले काहीशी उशीराच वळली. आज लहानपणापासूनच हातातील मोबाईलवर अनेक प्रकारचे मनोरंजन पाहायला मिळते. पूर्वी असे आणि इतके स्वातंत्र्य नव्हते. ‘सातच्या आत घरात’ अशा सामाजिक कौटुंबिक वातावरणात वाढलेल्या साठच्या दशकात जन्माला आलेल्या माझ्या पिढीला शालेय वयात पालक ठरवतील तेच नाटक, चित्रपट, सर्कस पाहायला, त्यांचाच हात धरुन जायची छान प्रथा होती.
कुटुंबासह पहावेत असे चित्रपट, नाटके तेव्हा मोठ्या प्रमाणावर बनत असत. अहो, इतकेच नव्हे तर, ‘फक्त प्रौढांसाठी’ असलेल्या चित्रपटाची पोस्टर आमच्या नजरेस पडू नयेत म्हणून केवढी तरी काळजी घेतली जात असे. अशा परिस्थितीत सहकुटुंब ताडदेवच्या गंगा अथवा जमुना थिएटरमध्ये एखादा चित्रपट पाहायला जाताना जवळच्याच या डायना थिएटरवर हमखास नजर पडायची आणि कुठल्यातरी जुन्या चित्रपटाचे पोस्टर दिसल्यावर ‘हा कोणता चित्रपट’ असा प्रश्न मनात येत असे. माझ्या जाग्या होत असलेल्या कुतूहलाला मग वडिलांकडून माहिती मिळे. हा विश्वजीतचा जुना चित्रपट ‘शरारत’, हा विनोद खन्नाचा पहिला चित्रपट ‘मन का मीत’; त्यात तो व्हीलन आहे, वगैरे वगैरे.
का कोण जाणे, पण असे जुने चित्रपट दाखवायला पालक नेत नसत. इतकेच नव्हे तर, त्या काळात मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबात दीड दोन महिन्यांनी एकदा चित्रपट (अनेकदा मराठीच), एखादे नाटक दाखवायची पध्दत होती. मी काॅलेजमध्ये शिकत असताना मित्रांसोबत चित्रपट पाहायला जाऊ लागलो, तेही घरी सांगून जायचो. (आजची डिजिटल पिढी या सगळ्याबाबत नशीबवान म्हणायची का?) आणि अशातच एकदा डायना टाॅकीजमध्ये बी. आर. चोप्रा दिग्दर्शित रहस्यरंजक ‘धुंद’ चित्रपट पाहायला गेलो आणि या थिएटरची जवळून ओळख झाली. (Memories of Diana Theatre)
‘धुंद’ रिपिट रनला रिलीज झाला होता. पण पहिल्याच सीनला एकजण ओरडला, “नवीन निश्चल खुनी असतो.” सिनेमाचा शेवट असा सुरुवातीलाच समजल्याने खरे तर रसभंग व्हायला हवा. पण अशी गोष्ट न ऐकल्यासारखी करत चित्रपट पाहण्याचे कसब माझ्याकडे होते. डायनाला मग ‘रुप तेरा मस्ताना’ (जितेंद्र आणि मुमताज दोघांचाही डबल रोल), ‘आमने सामने’ (शशी कपूरचा डबल रोल आणि मोहक मादक शर्मिला टागोर), ‘प्राण जाए पर वचन न जाए’ (सुनील दत्तची डाकूची भूमिका आणि रेखाचा बोल्ड लूक). असे याच कल्चरचे अनेक चित्रपट येथे रिपिट रनला रिलीज होताच पब्लिकसोबत एन्जाॅय केले. या थिएटरला एकदम ‘फिट्ट’ असेच हे चित्रपट होते.
अतिशय जुन्या पठडीतील थिएटर. वातानुकूलित व्यवस्था नाही. तशी ती त्या काळात अनेक थिएटर्सना नसली, तरी एकदा का चित्रपट सुरु झाला की, जाणवत नसे. येथे आगाऊ तिकीट विक्रीची पध्दतच नाही. (सगळा मामला करंट बुकिंगचा. म्हणजेच शोच्या वेळी तिकीटे मिळणार.) विशेष म्हणजे, महिला व मुलांना अगोदर तिकीट देणार. महिला आपल्या पतीचे तिकीट काढू शकत होत्या. थिएटरमध्ये स्त्रिया व मुलांना अगोदर प्रवेश. म्हणजेच दरजावरील गर्दीचा, कधी लठ्ठालठ्ठीचा त्यांना त्रास होऊ नये. (Memories of Diana Theatre)
सत्तरच्या दशकात डायना टाॅकीजचे तिकीट दर ऐकून तुम्हाला कमालीचे आश्चर्य वाटेल. स्टाॅल पासष्ट पैसे, अप्पर स्टाॅल एक रुपया पाच पैसे, फस्ट क्लास एक रुपया पासष्ट पैसे आणि बाल्कनी दोन रुपये वीस पैसे. आकडे ऐकून तुम्ही कमालीचे आश्चर्यचकित झाला असाल. पण त्या काळात मला यातील अप्पर स्टाॅलचे तिकीट परवडत असे. कारण खिशात तेवढेच सुट्टे पैसे असत. त्यात आपण जुने चित्रपट पाहतोय हेच केवढे तरी आनंद देणारे. प्रत्येक पिढीत हे असे जुने चित्रपट पाहण्याची वृत्ती आणि दृष्टी असतेच. काळ जस जसा पुढे जात राहतो तसा ‘आजचा चित्रपट’ कालांतराने कालचा होतो.
डायना थिएटरमध्ये स्टाॅलच्या पहिल्या चार रांगांच्या तिकीटावर नंबर नसे. तुम्हाला वाटेल किती छान. पण जाळीच्या दरवाज्याला सगळे पब्लिक खेटून चिकटून उभे राही आणि मग एकदा का खडखडाट करीत दरवाजा उघडला की, लठ्ठालठ्ठी करीत आत शिरताच मिळेल ती जागा पकडायची. फार पूर्वी येथे बाकडी होती. पाठी टेकायला काही नव्हतेच. कालांतराने सुधारीत बाकडी आली. त्याला पाठीशी टेकायला आणि हात ठेवायची सोय होती. अप्पर स्टाॅलपासून खुर्च्या होत्या. मात्र पंखे एवढे उंचीवर की, वारा कुठे जातोय असा प्रश्न पडावा. (Memories of Diana Theatre)
हे सगळेच स्वीकारत अथवा विसरत पडद्याशी एकरुप होण्याचे कर्तव्य पब्लिकने नेहमीच पार पाडले. ‘चित्रपट कसा पहावा’ हा धडा अशा परिस्थितीत मिळतो आणि तेच चांगले आहे. महत्त्वाचे असते ते आजूबाजूचे वातावरण विसरत पडद्याशी एकरुप होणे. मी आवर्जून डायना टाॅकीजमध्ये हरखून गेलो. मिडियात मी मुरत जाताना याच डायना टाॅकीजचा इतिहास जाणून घ्यावेसे वाटले. ऐशीच्या दशकात मिडियात आलेल्या माझ्या पिढीला पूर्वी काय घडले, हे जाणून घेण्यात विशेष रस होता. मी फिल्डवर्कवर भर देत ते जाणून घेतले.
डायना थिएटरचा इतिहास खूपच रंजक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील १९४२ सालची ही गोष्ट आहे. एका उद्योगपतीला घोड्याच्या रेसचा भारी शौक. एकदा त्याला जबरा जॅकपाॅट लागला आणि त्याने एकदम दोन थिएटर्स बांधली. नावे ठेवताना त्याने रेसमधील घोड्यांची नावे ठेवली. एक हे डायना आणि दुसरे डोंगरी भागात डर्बी. त्या काळातील स्टंटपट येथे रिलीज होऊ लागले. (Memories of Diana Theatre)
हाताने अथवा तलवारीने बेदम मारहाण असणारे चित्रपट येथे रिलीज होऊ लागल्याने या थिएटरची ओळख तशीच होत गेली. सुरुवातीच्या काळात येथे रविवारी सकाळी हाॅलिवूडचे मारधाडपट रिलीज होत. अशा चित्रपटांची भाषा (अर्थात फाड फाड इंग्रजी) समजली नाही तरी चालते. ही देखील एक पब्लिक संस्कृती.
साठच्या दशकात दारासिंगचे अनेक देमार स्टंटपट येथे फस्ट रनला रिलीज होत. किंगकाॅन्ग, फौलाद, सॅमसन, आया तुफान, राका, लुटेरा, डंका, तुफान वगैरे वगैरे. या पिक्चरमध्ये तर्क वगैरे काही नसे फक्त उघड्या निधड्या छातीने दारासिंग भीमपराक्रम करताना टाळ्या – शिट्ट्या वाजवायच्या आणि मुमताज नायिका असेल, तर तिच्या एन्ट्रीला कोपर्यातून एक जोरदार शिट्टी हमखास.
=====
हे देखील वाचा – थिएटरमध्ये चित्रपट चालू असताना जेव्हा अचानक फिल्म तुटते तेव्हा …
=====
कालांतराने मुंबईसह राज्यातील आणि देशभरातील अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्स बंद होत जाताना डायना टाॅकीज कधी बंद झाले, हे समजलेच नाही. ताडदेव परिसरात गेल्यावर डायनाची पडकी इमारत पाहिली, की धस्स व्हायचे. कायमच गर्दीच्या वेढ्यात वावरायची सवय असलेल्या या वास्तूला असे शांत राहताना कसे वाटत असेल, असा प्रश्न मला पडू लागला. अर्थात उत्तराची काही शक्यताच नव्हती. (Memories of Diana Theatre)
आता राहिल्या फक्त आठवणी. आवाज करणारा जाळीचा दरवाजा. आणि पडद्यावरच्या चित्रपटाशी कनेक्ट राहून अगदी ‘द एन्ड ‘पर्यंत टाळ्याच टाळ्या, शिट्या, हंशा, कधी एखादा रिमार्क, तर कधी पडद्यावरच्या हिरोला फुकटचा सल्ला….ते दिवस वेगळेच होते. ती वेगळीच थिएटर्स आणि त्याच्या पब्लिकची संस्कृती!
1 Comment
Excellent write up. Nostalgic feel.