ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
एडवर्ड थिएटरच्या वरच्या बाल्कनीची तिकीटे महिला प्रेक्षकांना दिली जात नसत कारण…
एखाद्या ‘सिनेमा टाॅकीज’ची ओळख होण्याचे चित्रपट रसिकाचेही एक वय असे. साठच्या दशकात जन्माला आलेली माझी पिढी सत्तरच्या दशकातील उत्तरार्धात, विशेषत: काॅलेजच्या काळात मित्रांसोबत सिनेमा पाहताना नेहमीच्या परिचित थिएटरपेक्षा आणखीन काही थिएटरकडे पावले वळू लागली आणि त्याला कारण होते, काॅलेजच्या कॅन्टीनमध्ये एक कटींग चायमध्ये गप्पांच्या फडात येणारे जुने सिनेमा आणि त्यातील गाणी. (Memories of Edward Theatre)
त्या काळात मॅटीनी शोचे कल्चर अंगवळणी पडले होतेच, तरी जुने पिक्चर हमखास पाहायला मिळतील असा एखादा ‘स्पाॅट’ आहे, ही अशी शोधाची जननी स्वस्थ बसू देत नव्हतीच आणि अशातच समजले, धोबीतलावच्या एडवर्डला प्रत्येक शुक्रवारी जुना सिनेमा रिलीज होतो, आठवडाभर मुक्कामाला असतो. तर मग चला, आजचे शेवटचे लेक्चर बंक करुन एडवर्डला!
मला आठवतंय, बी. आर. फिल्मचा बी. आर. चोप्रा दिग्दर्शित ‘हमराज’ (१९६७) रिपिट रनला आला होता. सुनील दत्त, विम्मी, मुमताज आणि राजकुमार, अन्वर हुसैन यांच्या भूमिका असलेला रहस्यरंजक म्युझिकल हिट सिनेमा. सिनेमाची सुरुवातच ‘ये नीले गगन के तले….’ या गाण्याने. राजकुमार आणि विमी वेगवेगळ्या ड्रेसमध्ये पडद्यावर येत राहतात आणि बॅकग्राऊंडला गाणे सुरु असते. सिनेमा सुरु असतानाच आमच्यावरही आणखीन एक बाल्कनी आहे आणि तेथून राजकुमारच्या डायलॉगला हमखास टाळ्या येताहेत हे लक्षात आले. तात्पर्य, एडवर्ड थिएटरची ओळख वाढत होती. तेथील वातावरण आता जाणवू लागले होते.
मल्टीप्लेक्स युगातील चित्रपट रसिकांना ‘बाल्कनी म्हणजे काय’, हे अनुभवायला मिळत नसल्याने त्याची माहिती असण्याची शक्यता कमी. तेथे अशा दोन बाल्कनीचा फंडा तो काय, असा प्रश्न आलाच. गिरगावातील ऑपेरा हाऊस थिएटरमध्ये दोन बाल्कनी आणि बाॅक्स असा थाट अनुभवला होता तशाच दोन बाल्कनी एडवर्ड थिएटरला असल्याची जणू ज्ञानात भर पडली. आपण येथे कधीही आलो तरी अगदीच वरच्या नव्हे, तर ‘मधल्या बाल्कनी’चेच तिकीट काढायचे हे ठरवूनच टाकले आणि मग अनेक जुने चित्रपट हमखास पाहण्याचे हुकमी स्पाॅट म्हणजे, एडवर्ड हे समीकरण घट्ट केले. त्यात ते गिरगावलगतच. त्यामुळे जाणे येणे सोप्पे.
आत्ताच वर्षभरापूर्वीच एका अगदी वेगळ्या कारणास्तव एडवर्डला गेलो आणि फ्लॅशबॅकमध्ये रमलो. मुंबईतील अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृहांच्या वाटचालीचा सखोल वेध घेत असलेल्या अशा दीपक सकपाळ निर्मित आणि सुरेश शेलार दिग्दर्शित ‘स्टाॅल अप्पर स्टाॅल बाल्कनी’ अशा जुन्या आठवणी जाग्या करीत असलेल्या माहितीपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने येथे जाण्याचा योग आला.
दिग्दर्शक मधुर भंडारकरने यासाठी अगदी आवर्जून खारपासून एडवर्ड थिएटरला येणे, ऐशीच्या दशकात येथे आपण अनेक चित्रपट एन्जाॅय केले होते; या आठवणी काढणे त्याने पसंत केले. अगदी प्रोजेक्शन रुमलाही त्याने भेट दिली. माझ्या रुपाने चित्रपट रसिक बोलता झाला, तर मधुर भंडारकरच्या रुपाने वास्तववादी दिग्दर्शक बोलता झाला. हा वेगळा माहितीपट निर्मितीच्या अंतिम टप्प्यात आहे. यानिमित्ताने जुन्या काळातील चित्रपटगृहाचे जतन होईल आणि व्हायलाही हवे.
‘टाॅकीजची गोष्ट’ हा चित्रपट संस्कृतीतील सर्वात महत्त्वाचा घटक. चित्रपट चांगला आहे की वाईट या इतकाच हा चित्रपट कुठे बरे प्रदर्शित झाला होता, यालाही एकेकाळी महत्त्व होते. एक विशेष गोष्ट म्हणजे, एडवर्डच्या या भेटीत पडद्यामागून तळघरात जाण्याचा योग आला तेव्हा तेथील तळघरातून वर येण्यासाठी असलेली छोटी लिफ्ट दिसली. काही समजले काय? हे फार पूर्वी नाटकाचे थिएटर होते आणि एखाद्या नाटकात एखादे पात्र असे खालून स्टेजवर एन्ट्री घेई . मूळचे नाटक, वाद्यवृंद, जादुचे प्रयोग होणारी थिएटर्स मग सिनेमाची झाल्याचे हे एक उदाहरण. ऑपेरा हाऊसही असेच होते. (Memories of Edward Theatre)
पिकेट रोडच्या मारुती मंदिरच्या अगदी हाकेच्या अंतरावर एडवर्ड असल्याने शनिवारी सिनेमाला जाणे झालेच, तर मारुतीला तेल घालणे आलेच आणि सिनेमा संपल्यावर एडवर्डच्या शेजारच्या गल्लीतून कयानी बेकरीत चहा आणि बुन मस्कावर अथवा खारी बिस्किटवर ताव मारत पाहिलेल्या सिनेमावर मित्रांसोबत होणारी चर्चा अथवा वाद….माझ्यातील समिक्षक यातूनच घडला असावा आणि एकदा असा जुन्या सिनेमाचा म्हणा अथवा माझी मागची पिढी ज्या सिनेमावर मनसोक्त बोलत असे तो सिनेमा पाहण्याचे द्वार एडवर्डच्या रुपाने उघडले. काही नावे सांगतोच –
माझ्या आवडत्या दिग्दर्शकांतील एक मनमोहन देसाईंचा ‘ब्लफमास्टर’ (त्यात आमच्या गिरगावातील ठाकूरव्दार, मंगल वाडी, बोरभाट लेन येथे चित्रित झालेल्या ‘गोविंदा आला रे आला..’ या गाण्यावर शम्मी कपूर बेभान होउन नाचलेला), देव आनंद एके देव आनंदचा ‘हीरा पन्ना’, असाच एक अतिशय आवडता दिग्दर्शक विजय आनंदचा ‘छुपा रुस्तम’, रामानंद सागर यांचा धमाकेदार ‘चरस’ (याच्या नावाला ऐनवेळेस सेन्सॉरने हरकत घेतली होती हे प्रकरण खूप गाजले होते), नंदाने धाडसी व्यक्तिरेखा साकारलेला ‘नया नशा’ हे सिनेमे एडवर्डला एन्जाॅय केले. दिवसा चार खेळ असा हुकमी फंडा असल्याने आपण कोणत्या शोला जायचे ते आपण ठरवायचे इतकेच. त्या काळात एकदा आवडलेला सिनेमा कितीही वेळा पाहायचे जणू फॅड होते. ती गरज पूर्ण करायला एडवर्ड उत्तम आधार होते.
कालांतराने एडवर्डचा इतिहास जाणून घेताना रंजक गोष्टी समजल्या. १९२० सालापासून तेथे चित्रपट रिलीज होत असून त्या एडवर्डचे हे १०२ वर्ष सुरु आहे. एखाद्या चित्रपटगृहाने शंभरी ओलांडूनही कार्यरत असावे हे विशेष उल्लेखनीय आहे. मात्र एडवर्डचा प्रवास आता फक्त आणि फक्त ‘स्टाॅलच्या पब्लिक’पुरताच आहे. पब्लिकच येत नाहीत म्हणून दोन्ही बाल्कनीचे दरवाजे बंद. म्हणजेच तेथून रिकाम्या खुर्च्या चित्रपट पाहतात. सिनेमालाही हरवल्यासारखे वाटत असेल हो! पडद्यावरचा सिनेमाही पब्लिकला पाहत असतोच.
एडवर्ड थिएटर म्हणताच मुंबईतील जुन्या पिढीतील सिनेरसिकांना ती इमारत पटकन लक्षात आली असणारच. प्रत्येक सिंगल स्क्रीन थिएटरला स्वतःचे आपले व्यक्तीमत्व होते, तसे ते इंग्रजकालीन एडवर्डलाही आहे. (Memories of Edward Theatre)
गिरगावात लहानपणापासून राहिल्याने अनेकांनी दक्षिण मुंबईतील अशा अनेक थिएटरमध्ये अगणित सिनेमे एन्जाॅय केले. अनेक जुने सिनेमे पाहायची ‘सोनेरी/रुपेरी/चंदेरी’ संधी म्हणजे एडवर्ड थिएटर हे अनेकांच्या मनावर बिंबले. कधी जुन्या पिढीतील रसिकांकडून अगदी जुन्या चित्रपटाची माहिती मिळे, तर कधी ‘रसरंग’, ‘चित्रानंद’, ‘चित्ररंग’, ‘मयूरपंख’ या साप्ताहिकात फ्लॅशबॅक, गुजरा हुआ जमाना, वो दिन याद करो, कहां गये वो दिन अशा सदरातून जुन्या हिंदी चित्रपटांची माहिती मिळे आणि प्रत्येक रविवारी संध्याकाळी मुंबई दूरदर्शनवर एक चित्रपट पाहायला मिळे. गिरगावातून सर्वच बेस्ट बस एडवर्ड थिएटरवरुनच जात त्यामुळे ‘सिनेमा पाहायला जाताना’ अनावश्यक धडपडची गरजेचे नसे. काय दिवस होते हो ते!
एडवर्डच्या इतिहासात एक भारी गोष्ट घडलीय. सतराम रोहरा निर्मित बहुचर्चित ‘जय संतोषी माॅ’ या पौराणिक चित्रपटाने येथे खणखणीत पन्नास आठवड्यांचा मुक्काम केला. त्यावेळचे थिएटरवरचे डेकोरेशनही भन्नाट होते. आशिष कुमार, कानन कौशल (खरे नाव इंदुमती पैगणकर), अनिता गुहा यांना थिएटर डेकोरेशवर इतके आणि असे फूटेज कधीच मिळाले नसेल.
विशेषतः प्रत्येक शुक्रवारी संतोषी माचे सगळेच्या सगळे शो हमखास हाऊसफुल्ल होणारच हे ठरलेले. अगदी काही भाविक शुक्रवारीच हा चित्रपट पाहायला येत आणि येताना हार घेऊन येत. तर काही प्रेक्षक हा चित्रपट पाहायला जाताना थिएटरबाहेर चपला काढत. श्रद्धा म्हणतात ती हीच असते. या सगळ्या बातम्या कानावर येत. एडवर्डला जास्त आठवडे मुक्काम केलेला हा सिनेमा. या सिनेमाने सगळेच सामाजिक सांस्कृतिक वातावरण ढवळून काढले. थिएटरला जणू भक्ती स्थळाचे भारावलेले स्वरुप आले होते. एडवर्डला ‘सोलह शुक्रवार’ असे पौराणिक चित्रपट, चालबाज (खूपच जुना दारासिंगचा), रोड टू सिक्कीम (देवकुमार हीरो होता) असे स्टंटपट अधूनमधून फर्स्ट रनला रिलीज होत अन्यथा जुने सिनेमा हीच याची खासियत.
एडवर्डला लाकडी खुर्च्या हे आणि एक वैशिष्ट्य. आणि स्टाॅल, ड्रेस सर्कल, फर्स्ट क्लास (अथवा ऑर्केस्ट्रा…. होय असाच उल्लेख) असे तीन प्रकार. महत्त्वाचे म्हणजे दोन बाल्कनी असलेले हे वेगळे थिएटर. या थिएटरच्या पाॅलिसीनुसार अगदी वरच्या बाल्कनीची तिकीटे महिला प्रेक्षकांना दिली जात नसत. याचे कारण म्हणजे जिने चढताना अथवा उतरताना साडी अथवा दुप्पट्टा यामुळे महिला प्रेक्षकांना त्रास होऊ नये. आणि थिएटरने हे कायमच जपले. (Memories of Edward Theatre)
सेन्सॉर सर्टिफिकेटस पडद्यावर दिसले तरी थिएटरभर हमखास शिट्टी पडे; हीरोच्या एन्ट्रीला तर हमखास! सत्तरच्या दशकात एडवर्डला तिकीट एक रुपया पाच पैसे होते, मग एक रुपया पासष्ट पैसे झाले. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक पिढीला मागील काळातील सिनेमांचे कुतूहल असतेच, ते पूर्ण करण्याच्या पध्दती बदलत गेल्या.
एडवर्डचा मूळ मालक फाळणीनंतर पाकिस्तानात गेल्याने बिजन भरुचा आणि त्यांची जर्मन पत्नी गभरुचा यांनी या थिएटरची व्यवस्था पाहिली. त्यांच्यानंतर पूनावाला नावाची व्यक्ती होती, मग आणखीन कोणी. हे होतच असते. अगदी सुरुवातीला येथे विदेशी लघुपट, मग इंग्रजी सिनेमेही रिलीज होत. मग हिंदी सिनेमांची निर्मिती वाढल्याने त्यांना सातत्याने स्कोप मिळाला. अनेक वर्षे रविवारी सकाळी ‘बी ग्रेड इंग्रजी सिनेमा’ प्रदर्शित होत. ज्या इंग्रजी सिनेमानं रिगल, इराॅस, न्यू एम्पायरला स्थान नसे ते येथे येत.
====================
हे ही वाचा: जेव्हा निर्माते स्वतः विचारतात ‘पिक्चर कैसी हैं….?’
थिएटरमध्ये चित्रपट चालू असताना जेव्हा अचानक फिल्म तुटते तेव्हा …
=====================
एडवर्डला सिनेमांची चित्रीकरणंही शूटींगही झाली आहेत. एक विशेष उदाहरण, कृष्णा शहाच्या ‘सिनेमा सिनेमा’ ( १९७९) या सिनेमाचे! भारतीय चित्रपटाचा रुपेरी पडद्यावरील इतिहास हे या सिनेमाचे मध्यवर्ती सूत्र. विविध वयोगटातील प्रेक्षक चित्रपट पाहताहेत आणि हा इतिहास पडद्यावर साकारला जातोय अशी याची मांडणी करताना याच एडवर्डमध्ये हाऊसफुल्ल गर्दीतील पब्लिक पडद्यावरील दृश्य अथवा संवादाने शेरेबाजी करतात असा झक्कास प्रकार आहे. सिनेमाची सुरुवातच एडवर्ड थिएटरच्या दर्शनाने होते. अशा थीमसाठी एडवर्डची निवड अगदी परफेक्ट.
एडवर्ड दक्षिण मुंबईत मध्यभागी असल्याने गिरगाव, मरीन लाईन्स, मुंबादेवी, काळबादेवी,धोबीतलाव, महम्मद अली रोड अशा सगळ्यानाच सोयीचे आणि स्वस्त. मल्टीप्लेक्सच्या युगात अनेक जुनी सिंगल स्क्रीन थिएटर्स बंद होत चालली आहेत, तर काही अजूनही टिकून आहेत. एडवर्ड त्यापैकीच एक. या एडवर्डने तब्बल शंभर वर्षे सिनेरसिकांचे मनोरंजन केले. (Memories of Edward Theatre)
===============
हे ही वाचा: थिएटर्सही मिळतील, फक्त मकरंद अनासपुरे यांनी सुचवलेल्या प्रभावी तोडग्याचा विचार व्हायला हवा…
‘या’ गोष्टीमुळे काजोलने केले होते आईसोबत भांडण; दोन आठवडे धरला होता अबोला..
================
एडवर्ड जुन्या मुंबईची आणि थिएटर संस्कृतीची एक ओळख आहे. माझ्यासारख्याने एडवर्डचा अनुभव घेतला आहे. सिनेमा पाहता पाहता थिएटरची ओळख करून घेणे, त्याची खासियत जाणून घेणे ही माझी हौस. पडद्यावर सिनेमा ठेवून बाहेर पडायचे, हे माझ्या पिढीने कधीच स्वीकारले नाही आणि कधी कुठे कोणता सिनेमा पाहिला हे विसरलो नाही. टाॅकीजची गोष्ट अशी नेहमीच बहुस्तरीय आणि छोट्या छोट्या गोष्टीत रंग असणारी असते.