गंगा जमुना टॉकीज: इथे मराठी चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मोठी बातमी झाली होती कारण …
जुन्या पिढीतील चित्रपट रसिकांना छोट्या छोट्या गोष्टीत खूपच मोठा आनंद मिळायचा आणि अशा फिल्म वेड्यांनीच आपल्या देशात चित्रपट संस्कृती रुजवली. आपल्या विभागात अथवा जवळपास एखादे नवीन थिएटर सुरू होतंय याचाही आनंद होत असे. म्हणजेच चित्रपट पाहायची आणखीन एक झक्कास संधी मिळणार, असे वाटे. (Memories of Ganga Jamuna Talkies)
दक्षिण मुंबईतील ताडदेव नाक्याजवळ ‘गंगा आणि जमुना’ अशी जुळी थिएटर सुरू झाली असाच आनंद झाला होता. १९७२ सालची सुरुवातच अशा आनंदाच्या सकारात्मक बातमीने झाली. गिरगावपासून हाजी अलीपर्यंतच्या चित्रपट रसिकांकडून या जुळ्या थिएटरचे नक्कीच स्वागत होणार, हे अगदी स्पष्ट होते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, एका ठिकाणी तिकीट मिळाले नाही, तर लगोलग बाजूलाच पर्याय उपलब्ध होणार होता.
राजेश खन्नाच्या क्रेझने झपाटून टाकलेला तो काळ होता. गंगा आणि जमुनाचा उद्घाटनाचा चित्रपट होता, दुलाल गुहा दिग्दर्शित ‘दुश्मन’. प्रदर्शनाची तारीख ७ जानेवारी १९७२. चित्रपटात मीना कुमारी, राजेश खन्ना, मुमताज, नाना पळशीकर वगैरे वगैरे. चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच त्यातील गाणी जबरा हिट झालेली. आनंद बक्षी यांच्या गीतांना लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे जनसामान्यांपर्यंत सहज पोहचणारे संगीत. अशा फूल्ल टू सकारात्मक वातावरणात ‘दुश्मन’च्या प्रीमियरने गंगा जमुना या चकचकीत जुळ्या थिएटर्सचे दिलीपकुमारच्या शुभ हस्ते ग्लॅमरस उदघाटन झाले. (Memories of Ganga Jamuna Talkies)
‘दुश्मन’चे निर्माते प्रेमजी हे दिलीपकुमारचे सेक्रेटरी होते आणि या चित्रपटात राजेश खन्नाला नायक म्हणून घेण्याचे दिलीपकुमारनेच सुचवले होते. प्रीमियरला राजेश खन्ना आणि मुमताजही होतेच. बरेच दिवस या प्रीमियरची चर्चा रंगली. पुढच्याच शुक्रवारी म्हणजेच १४ जानेवारीला यातील जमुना थिएटरमध्ये देव आनंदचा ‘हरे राम हरे कृष्ण’ दणक्यात रिलीज झाला. ‘दम मारो दम’ या बोल्ड गाण्याची तुफान लोकप्रियता, वादळी चर्चा आणि झीनत अमानचा मोकळा ढाकळा अभिनय ही केमिस्ट्री! चित्रपट हमखास हीट हे सांगायला ज्योतिषाची गरज नव्हतीच.
गंमत म्हणजे गंगा थिएटरमधील ‘दुश्मन’ आणि त्याच्या पुढच्याच आठवड्यातील ‘हरे राम हरे कृष्ण’ चित्रपटातही मुमताज नायिकेच्या भूमिकेत होती. दोन्ही चित्रपट लागोपाठच्या आठवड्यात रौप्य महोत्सवी ठरले. नवीन थिएटरचे असे अगदी भारी आणि कायमच लक्षात राहील असे हे उद्घाटन. ते दिवसच मनोरंजक चित्रपटाने मंतरलेले होते.
अशा जुळ्या थिएटर्सवरचे डेकोरेशन पाहणे, एन्जाॅय करणे म्हणजे जणू एका चित्रपटाच्या तिकीटात आणखीन एका चित्रपटाचे भले मोठे डेकोरेशन फ्री. मी हे भरपूर एन्जाॅय केले. त्या काळात फक्त चित्रपट बघायलाच थिएटर्सवर जायचे एवढेच होत नसे. तो एक प्रकारचा सोहळाच असे. (Memories of Ganga Jamuna Talkies)
ते दिवस मेन थिएटरला हिट चित्रपट पंचवीस वा पन्नास आठवड्यांचा मुक्काम करण्याचे होते. अमिताभचे गंगा की सौगंध, मिस्टर नटवरलाल, कालिया, खुद्दार, सुहाग, दोस्ताना, डाॅन हे सगळेच याच गंगा अथवा जमुनामध्ये सिल्हर ज्युबिली हिट झाले. अमिताभ बच्चनसाठी एकदम ‘ओक्के ओक्के’ थिएटर होते. फक्त ‘नास्तिक’ अपयशी ठरला. सुभाष घईच्या दिग्दर्शन पदार्पणातील ‘कालीचरण’ आणि ‘कर्ज’, दिग्दर्शक अनिल शर्माचा पहिला चित्रपट ‘श्रध्दांजली’, जॅकी श्राॅफला स्टार करणारा ‘हीरो’, संजय दत्तचा पहिला चित्रपट ‘राॅकी’ (या ‘राॅकी’चा प्रीमियर मेट्रो थिएटरला झाला इतकेच), मनमोहन देसाईंचा ‘धरमवीर’, राजेश खन्नाचा छैला बाबू, अमरदीप, रणधीर कपूरचा ‘जवानी दीवानी’ हे सगळे हिट याच गंगा अथवा जमुनाचे, तर समझौता, प्रतिज्ञा, अनामिका, आज की ताजा खबर, अनोखी अदा, उमर कैद, झील के उस पार, जिंदगी (उन पाऊस या चित्रपटाची रिमेक), चिन्नाप्पा देवरचा ‘जानवर और इन्सान’ वगैरेनी शंभर दिवसाचे यश संपादले.
अर्थात काही चित्रपट फ्लाॅपही झाले. असित सेन दिग्दर्शित आणि दिलीपकुमारच्या तिहेरी भूमिकेतील ‘बैराग’, आर. के. फिल्मचा बीवी ओ बीवी, सुभाष घईचा ‘गौतम गोविंदा’, संजय दत्तचा ‘मेरा फैसला’ तसेच अन्य चित्रपटांमध्ये गंगा तेरा पानी अमृत, जोरो, अंजान राहे, आवारा बाप, लाव्हा, सलमा, दो झूठ, धोती लोटा और चौपाटी, सरकारी मेहमान, वगैरे फार फार काळ टिकले नाहीत .शक्यतो यशस्वी चित्रपटाच्या आठवणी ठेवाव्यात. कधी गंगाला हाऊस फुल्लचा फलक दिसला की जमुनाचा आधार वाटायचा. अगदी सुरुवातीला येथे स्टाॅलचे तिकीट एक रुपया पासष्ट पैसे असे होते हे आठवतेय. नंतर ते वाढत वाढत गेले. बाल्कनी चार रुपये चाळीस पैसे असे झाले. (Memories of Ganga Jamuna Talkies)
प्रत्येक जुन्या एकपडदा थिएटरची काही वैशिष्ट्ये असतात. त्याची स्वतःची आपली एक ओळख असते. या जुळ्या थिएटर्सचे आणखीन वैशिष्ट्य म्हणजे राजश्री प्राॅडक्सन्सचे ‘दुल्हन वही जो पिया मन भाये’, ‘अखियो के झरोखो से’ यांनी मॅटीनी शोला प्रत्येकी तब्बल पन्नास आठवड्यांचा मुक्काम केला. राजश्री प्राॅडक्शनचा चित्रपट हमखास कौटुंबिक आणि त्याचा सहकुटुंब प्रेक्षक यामुळे या थिएटर्सवर फॅमिली वातावरण असायचे. नवकेतन फिल्मच्या ‘जान हाजिर है’ या चित्रपटाने जमुनामध्ये मॅटीनी शोला तब्बल पंचाहत्तर आठवडे मुक्काम केल्याचे आठवतयं. कधीही या जुळ्या थिएटरमध्ये दुपारच्या शोला जावे, तर मॅटीनीला एखादा चित्रपट उत्तम यश मिळवतोय असे चित्र पाहायची सवय झाली.
मेहमूदच्या धमाल भूमिकेतील ‘सबसे बडा रुपया’ चित्रपटाने येथेच मॅटीनी शोला ज्युबिली हिट यश संपादले. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, सुभाष घईने करियरच्या सुरुवातीला ‘गुमराह’ नावाच्या चित्रपटात भूमिका केली होती. रिना रॉय त्याची नायिका होती. एकदा या गंगा जमुना थिएटरवर गेलो असता या चित्रपटाची काचेमधील शोकार्ड पाहून आश्चर्याचा धक्का बसला, पण एक नवीन माहिती मिळाल्याचा आनंदही झाला. आज ही माहिती मला अशी उपयोगी पडतेय. (Memories of Ganga Jamuna Talkies)
हा तसा मिश्र लोकवस्तीचा परीसर. त्यामुळे येथे मराठी चित्रपट प्रदर्शित होणे अपेक्षित नव्हेतच. (त्या काळात मराठी चित्रपटाची हुकमी थिएटर होती आणि ती पुरेशी होती हे तेव्हाच्या अनेक यशस्वी चित्रपटाने सिध्द होते.) गंगा थिएटरला अरुण कर्नाटकी दिग्दर्शित ‘जवळ ये लाजू नको’ (१९७७) हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. तेव्हा ही मात्र बातमी झाली. या चित्रपटात अशोक सराफ, उषा नाईक, गणपत पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
कालांतराने अनेक जुन्या थिएटर्सकडे रसिकांनी पाठ फिरवली तेव्हा येथे सी ग्रेड चित्रपट रिलीज करणे हाच पर्याय उपलब्ध असे. अशाने थिएटरपासून नियमित प्रेक्षक आणखीन दुरावत गेला आणि मग ते थिएटरच बंद झाले. (Memories of Ganga Jamuna Talkies)
अनेक जुन्या थिएटर्सच्या फक्त आठवणी असतानाच त्यात आणखीन काही भर पडली आहे आणि आता तर असेच एखादे जुने एकपडदा थिएटर बंद पडण्याची बातमीही सवयीची झाली आहे. गंगा आणि जमुना थिएटर्सची भव्य इमारत अनेक वर्षे धूळ खात उभी होती. तेथून जाताना जुने दिवस आठवणे स्वाभाविक होतेच. आणि मग एक दिवस ही इमारतच पाडली जाऊ लागली… आता तेथे जुळे थिएटर असल्याच्या कोणत्याच खुणा नाहीत. ज्या आहेत त्या येथे अनेक पिक्चर एन्जाॅय केल्याच्या आठवणी…
===========
हे देखील वाचा – ‘मॅटीनी शो’चे कल्चर पुन्हा येईल का?
===========
आमच्यासाठी सिनेमा थिएटर म्हणजे फक्त आणि फक्त एक इमारत नव्हे, तर एक भावविश्व आहे, स्वप्नपूर्णतेची हमी आहे. आम्ही चित्रपट आणि थिएटर दोन्ही डोक्यावर घेऊन वाटचाल करत आहोत, त्यात गंगा आणि जमुना ही जुळी थिएटर नक्कीच आहेत.
1 Comment
मला या अशा सिंगल स्क्रीन थिएटर वरील लेख वाचायला खूप आवडतात दिलीप.