लिबर्टी थिएटर: मदर इंडियाच्या प्रिमिअरला देव आनंद सिनेमाची तिकीटे ब्लॅकमध्ये विकतोय अशी…
एखाद्या चित्रपटगृहाची ओळख होण्याची आपल्याही वयाची एक वेळ असते. माझी पिढी शालेय वयात असताना राजेश खन्नाची भारी क्रेझ होती आणि सहकुटुंबपणे हातात हात घालून सिनेमा पाहायला जाण्याची सामाजिक, सांस्कृतिक प्रथा होती. अशातच राजेश खन्ना आणि मुमताज यांची भूमिका असलेला ‘अपना देश’ (१९७१) सुपर हिट गर्दीत सुरु होता आणि आपणही हा सिनेमा पाहायला हवा अशी अनेक मध्यमवर्गीय कुटुंबाप्रमाणे आमच्याही कुटुंबात चर्चा सुरु झाली. (Memories of Liberty Cinema)
त्या काळात मनात आले आणि लगेचच गेलो, असे होत नसे. एक सिनेमा पाहून झाल्यावर किमान तीन आठवड्यांचा कालावधी गेल्यावर आणखीन एक सिनेमा पाहिला जाई. तो कोणता बघायचा हे ठरवण्यात बराच खल होई आणि एकदा का ठरले की, तो कधी पाहायचा वगैरे गोष्टी असत. त्या काळात एकूणच संथगतीने जगणे होते आणि कोणता सिनेमा पाहायचा याचा निर्णयही संथगतीने होई. अशातच ठरले की, लिबर्टी थिएटरमध्ये ‘अपना देश’ पाहायचा. ते नेमके कुठे आहे या प्रश्नाचे उत्तर पालकांकडेच होते.
धोबीतलावच्या मेट्रो थिएटरकडून आपण मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाकडे जाताना डाव्या बाजूच्या मध्येच एका गल्लीत आहे, असे समजले आणि ते कधी एकदा पाहतोय असे झाले. ते वयच तसे होते. तेव्हाचे वातावरण तसे होते.
यावेळी लिबर्टी थिएटरशी झालेली जुजबी अथवा सर्वसाधारण ओळख कालांतराने अतिशय मोठ्याच नात्याची ठरली. याची दोन महत्त्वाची कारणे. एक म्हणजे, काही पिक्चर या लिबर्टीतच पाहायचा आनंद घेणे स्वाभाविक होते आणि दुसरे म्हणजे, लिबर्टीच्याच इमारतीत अगदी वरच्या मजल्यावर असलेले मोजक्या तीसेक प्रशस्त सीटसचे मिनी थिएटर. अशा या दोन्हींतून मी अनेक चित्रपट पाहिले, अनेक अनुभव घेतले, अनेक आठवणीही आहेत. (Memories of Liberty Cinema)
शाळा काॅलेजमध्ये असताना या लिबर्टीत जाताना स्टाॅलचे म्हणजेच पडद्यासमोरच्या पहिल्या चार रांगाचे दोन रुपये आणि वीस पैसे असे असलेले तिकीट परवडत होते. देव आनंद अभिनित, निर्मित व दिग्दर्शित ‘देस परदेस’ (१९७७) असाच पाहिला होता. लिबर्टीचा एकूणच थाटमाट, त्याचा प्रशस्त लूक, मुख्य पडद्यावरचा झगमगीत पडदा, हळुवार म्युझिक, पूर्ण वातानुकूलित वातावरण (त्या काळात एखादे थिएटर वातानुकूलित असणे हे विशेष उल्लेखनीय होते. याचे कारण म्हणजे, तशी सुविधा नसलेली अनेक एकपडदा चित्रपटगृह कार्यरत होती आणि कोणाचीही तक्रारही नव्हती), विशिष्ट पद्धतीचे लाकडी डेकोरेशन ही ठळक वैशिष्ट्य होती.
मिडियात आल्यावर लिबर्टीसोबत दुतर्फा प्रवास सुरु होताना ते अधिकाधिक जवळचे होत गेले. येथे प्रदर्शित झालेल्या काही सिनेमांचे आम्हा समिक्षकांसाठी एखाद्या मिनी थिएटरमध्ये वेगळे प्रेस शोज करण्याऐवजी या लिबर्टीचीच अन्य प्रेक्षकांसोबतची (क्षमता १२०० सीटस) आम्हास तिकीटे दिली आणि काही वेगळे अनुभव घेतले. एक चांगली आठवण, राजश्री प्राॅडक्सन्सच्या सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित ‘हम आपके है कौन’ (१९९४) ची.
एक उत्तम व्यावसायिक रणनीती म्हणून प्रत्येक शहरातील एकमेव थिएटरमध्ये ‘हम आपके….’ रिलीज केला होता. मुंबईतील लिबर्टी सिनेमागृहात तो अतिशय थाटात रिलीज झाला. मला आठवतंय, आम्हा समीक्षकांना पहिल्या दिवसाची सेकंड शोची तिकीटे दिली होती. त्यावरची साडेपाचची वेळ वाचूनच हा चित्रपट खूपच मोठा आहे, हे लक्षात आले. लिबर्टीवर पोहचलो आणि माझ्या जुन्या सवयीनुसार आगाऊ तिकीट विक्रीचा चार्ट पाहायला गेलो आणि चढे तिकीट दर वाचून हबकलोच. (Memories of Liberty Cinema)
सोमवार ते शुक्रवार ड्रेस सर्कल पन्नास रुपये (१३० सीटस),. बाल्कनी चाळीस रुपये (२५७ सीटस), अप्पर स्टाॅल वीस रुपये (७४१ सीटस) आणि लोअर स्टाॅल दहा रुपये (६८ सीटस). त्या काळात हे दर जास्त वाटत. तर शनिवार व रविवारचे दर त्याहीपेक्षा भारी. ड्रेस सर्कल शंभर रुपये (पहिल्यांदाच सिनेमाचे तिकीट दर तीन आकडी), बाल्कनी ७५ रुपये, अप्पर स्टाॅल ३५ रुपये आणि लोअर स्टाॅल १५ रुपये. (बाल्कनीतील पुढील भागाच्या सीटस म्हणजे ड्रेस सर्कल हे आजच्या मल्टीप्लेक्स पिढीला सांगायला हवे.)
‘हम आपके….’ सिनेमाच्या लिबर्टीमधील अनेक आठवणी आहेत. संपूर्ण लिबर्टी छान डेकोरेटीव्ह केले होते. एकदमच ‘फिल गुड’ होता. आतमध्ये शिरताच चित्रपटाशी संबंधित अनेक वस्तूंची (ओपन बॅक चोली वगैरे) विक्री होत होती. आणखीन एक म्हणजे चित्रपटाला दोन मध्यंतरं होती. ही आमच्यासाठी बातमीच होती. तीनच दिवसात एक गाणे आणि काही प्रसंग कमी करुन एकच मध्यंतर करण्यात आले. “दीदी तेरा देवर दीवाना…” हे नृत्य गीत संगीत सुरु होताच पडद्याभोवती लायटींग लागले आणि संपूर्ण थिएटरमधले वातावरण बदलून गेले. जवळपास बाराशे आसन क्षमता असलेल्या या हाॅलमध्ये आम्ही पन्नासएक समिक्षक बाल्कनीत असू. क्षणभर माझ्यातील समीक्षक बाजूला झाला आणि हे वातावरण मी अनुभवले.
लिबर्टीत ‘हम आपके…’ने तब्बल १०२ आठवड्यांचा मुक्काम केला. ख्यातनाम चित्रकार एम. एफ. हुसैन यांनी लिबर्टीत हा चित्रपट एक्केचाळीस वेळा पाहिला. तशी त्यानी दिलेली मुलाखत भारी गाजली. माधुरीही त्यामुळे इम्प्रेस झाली. विशेष म्हणजे या चित्रपटाला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने येथेच पुन्हा खास प्रीमियर शोचे आयोजन केले असता तेव्हा माधुरी दीक्षित व सलमान खान आले होते आणि जुन्या आठवणीत रमले होते. तोच थाटामाट होता. लिबर्टी आणि ‘हम आपके….’ हे कायमस्वरुपी घट्ट नाते आहे. या सिनेमाचे ८४७ दिवसांत येथे २३४१ खेळ झाले. विक्रम झाला. (Memories of Liberty Cinema)
असे हे लिबर्टी थिएटर. क्लासिक आणि स्टायलिश. २१ मार्च १९४९ रोजी याचे उद्घाटन झाले. मरीन लाईन्स, चर्चगेट, मरीन ड्राईव्ह, कुलाबा येथील श्रीमंत रसिकांना आपलेसे वाटेल अशीच याची रचना आणि वातावरण. पहिला सिनेमा मेहबूब खान दिग्दर्शित ‘अंदाज’ याच्या प्रीमियरने लिबर्टीचे उदघाटन झाले. याचे मालक हबिब हुसेन यांनी ‘लिबर्टी’ असे नाव दिले. त्यांचे पुत्र नझिर यांनी लिबर्टीचा अनेक वर्षे कारभार सांभाळला. विशेष म्हणजे, David vinnels आणि Brent skelly या लेखकांनी ‘बाॅलीवूड शो प्लेस: सिनेमा थिएटर इन इंडिया’ या पुस्तकात लिबर्टीची दखल घेतलेय.
लिबर्टीची वैशिष्ट्ये अनेक. मेहबूब खान दिग्दर्शित ‘मदर इंडिया’ (१९५७) येथेच प्रदर्शित होताना दिग्दर्शक विजय आनंदने याच चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये, “देव आनंद सिनेमाची तिकीटे ब्लॅकमध्ये विकतोय” अशी काही दृश्ये अतिशय चतुराईने ‘काला बाजार’ (१९६०) या चित्रपटासाठी चित्रीत केली, असा संदर्भ सापडतो.
१९५० सालच्या भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील हे एक केंद्र होते. इटालियन फिल्म ‘बायसिकल थीब्ज’चा शो येथेच रंगला. १९६२ चा पहिला महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सव याच लिबर्टीत अतिशय भावपूर्ण वातावरणात पार पडला. चित्रपती व्ही. शांताराम यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. विशेष म्हणजे, प्रादेशिक भाषेतील चित्रपट पारितोषिके देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.
लिबर्टीचे एकूणच कल्चर पाहता तेथे मराठी चित्रपट प्रदर्शित होणे तसे दुर्मिळच. सत्तरच्या दशकात शिरोमणी चित्र या बॅनरच्या ‘ऑलराऊंडर’ सुषमा शिरोमणी अभिनित दत्ता केशव दिग्दर्शित ‘भिंगरी’ (१९७७), विनायक सरवस्ते निर्मित व मधुकर पाठक दिग्दर्शित ‘चांदोबा चांदोबा भागलास का?’ ( १९७८), कमलाकर तोरणे दिग्दर्शित ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ (१९७७) हे चित्रपट लिबर्टीत झळकले. हिंदीच्या (अधूनमधून इंग्लिश फिल्म) अशा लिबर्टीत मराठी चित्रपट ही बातमीच! (Memories of Liberty Cinema)
लिबर्टीतील काही महत्त्वाचे हिंदी चित्रपट सांगायला हवेतच. अमानुष, आशीर्वाद, मि. रोमिओ, रानी और लालपरी, इम्तिहान, अजनबी, जीवन ज्योती, आई मिलन की बेला, अदालत, सूर्यवंशी, उस पार, उपकार, पहेचान, छोटी बहू, महाचोर, देस परदेस, आयना, कभी खुशी कभी गम, कुछ कुछ होता है, दिल तो पागल है, रिफ्यूजी, मोहब्बते वगैरे वगैरे. मेन थिएटर असल्याने ही नावे वैशिष्ट्यपूर्ण. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का, नव्वदच्या दशकात हिंदी चित्रपटाने चकाचक मनोरंजन असे वळण घेतले आणि याच काळात समाजातील नवश्रीमंत आणि उच्चभ्रू वर्गाच्या प्रमाणात वाढ झाली आणि आता हा क्लास हिंदी चित्रपटाचा आधारस्तंभ ठरु लागला याला लिबर्टी थिएटर एक साक्षीदार/साथीदार/भागिदार आहे. चित्रपटगृहाचा इतिहास लिहिताना हा पैलू महत्त्वपूर्ण. (Memories of Liberty Cinema)
लिबर्टीत पूर्वीपासून मॅटीनी शोची प्रथा होती. कधी जुने तर कधी नवीन सिनेमा मॅटीनीला येत. ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यू आता है’ मी येथेच मॅटीनी शोला पाहिला. आजूबाजूला सगळेच बुध्दीवादी आणि त्यात मी एकटाच टाळ्या वाजवत सिनेमा एन्जाॅय करणारा. समांतर अथवा न्यू वेव्ह चित्रपटांसाठी लिबर्टी मॅटीनी परफेक्ट होते. ‘तेरे प्यार मे’ वगैरे मसालेदार मनोरंजक चित्रपटही येथेच मॅटीनी शोला होते. दक्षिण मुंबईतील काॅलेज स्टुडन्सना हे थिएटर आपलेसे होते.
तुम्ही फरहान अख्तर दिग्दर्शित ‘दिल चाहता है’ (२००१) मधील सैफ अली खान आणि सोनाली कुलकर्णी याच लिबर्टीत सिनेमा पाहायला जाता आणि “वो लडकी है कहा” गीत सुरु होते. लिबर्टीचा विषय विस्तार असा बहुस्तरीय आहे. रंगीत आहे.
लिबर्टीचे अतिशय प्रशस्त सीटसचे मिनी थिएटर हा स्वतंत्र विषय आहे. अनेक मराठी चित्रपटाचे प्रेस शोज मी येथे अनुभवलेत. हा शो संपल्यावर जवळच्याच वेस्ट एन्ड हाॅटेलमध्ये पार्टी हे समीकरण घट्ट होते. महेश कोठारेशी माझी पहिली भेट येथीलच ‘चांदणे शिंपीत जा’ या चित्रपटाच्या प्रेस शोच्या वेळी झाली. त्या काळात महेश कोठारेच्या दादरच्या घरी येत असलेल्या नवशक्ती दैनिकात मी चित्रपट परीक्षण करीत होतो. खऱ्या अर्थाने असलेले हे मिनी थिएटर अगदी अलिकडेच बंद पडले. वाईट वाटले. माझ्या कारकिर्दीत लिबर्टी मिनी थिएटरचा वाटा नक्कीच आहे. (Memories of Liberty Cinema)
लिबर्टीच्या मेन थिएटरची इमारतही सध्या शांत शांत उभी आहे. तो पूर्वीचा थाटामाट, फिल गुड वातावरण हरवलेय, हे तेथे गेल्यावर लक्षात येते आणि माझे मन फ्लॅशबॅकमध्ये जाते….विशेषत: आता तेथील शो बंद झाले आहेत आणि एक उदास वातावरण निर्माण झाले असताना तर येथील जुन्या आठवणी हाच मनाला सुखावणारा आधार ठरतोय. अधूनमधून येथे एखादा चित्रपट अथवा वेबसिरिजचे शूटिंग होते तेव्हा गजबजाट असतो इतकेच. पण निस्तेज शोकेस आणि थिएटरचा पोस्टररहित चेहरा हे पाहताना ‘गेले ते दिन गेले’ याची जाणीव होते…