असंभव: प्राईम टाईमला प्रसारित झालेली गूढ, रहस्यमय मालिका
साधारणतः रात्रीची आठ / साडेआठची वेळ ही प्राईम टाइम समजली जाते. या वेळेत सर्वच चॅनेल्स त्यांच्या ‘बेस्ट’ मालिका प्रसारित करत असतात. सर्वसामान्यपणे याच वेळात टीव्हीवरच्या मालिका मोठ्या प्रमाणावर बघितल्या जातात. त्यामुळे ‘प्राईम टाइम’मध्ये बहुतांश वेळा कौटुंबिक किंवा बिग बजेट मालिका प्रसारित केल्या जातात. तर गूढ, रहस्यमय किंवा भयकथा असणाऱ्या मालिका या रात्री दहाच्या दरम्यान प्रसारित केल्या जातात. परंतु या संकल्पनेला छेद दिला तो झी मराठीने आणि ती मालिका होती ‘असंभव (Asambhav’)
२००७ साली आलेली ‘असंभव’ ही मालिका गूढ, रहस्यमय प्रकारातली मालिका होती. ही मालिका दररोज रात्री ८.३० वाजता प्रसारित केली जात असे. अशा विषयांवर आधारित मालिकेला ‘प्राईम टाइम’ द्यायचा चॅनेलचा निर्णय मालिकेने सार्थ ठरवला. मालिकेने अगदी पहिल्या भागापासूनच रसिकांच्या मनावर घेतलेली पकड अगदी शेवटपर्यंत कायम ठेवली होती.
पुर्नजन्मावर याआधारित या मालिकेमध्ये सुरुवातीच्या काही भागांपासूनच एकामागून एक घटना घडत जातात. या घटना का घडतात, त्यामागे नक्की काय रहस्य असेल, याचा अंदाज लावेपर्यंत अचानक दुसरीच एखादी घटना समोर येते. अशी एकामागून एक वाढत जाणारी रहस्यांची श्रुंखला अलगद उलगडून दाखवण्यात आल्यामुळे प्रेक्षक मालिकेमध्ये अधिकच गुंतत गेले. याचं क्रेडिट अर्थातच दिग्दर्शक सतीश राजवाडे यांना जातं. त्यांच्या दिग्दर्शनाला तोड नाही. (Marathi serial Asambhav)
आदिनाथ शास्त्री (उमेश कामत) आणि सुलेखा (नीलम शिर्के) या दोघांचं एकमेकांवर प्रेम असतं. त्यांचा साखरपुडाही झालेला असतो. लग्नांनंतर दोघंजण ‘यु एस’ला जाऊन सेटल होणार असतात. परंतु कामासाठी कोकणात गेलेल्या आदीनाथची गावातल्या एका मुलीशी -शुभ्राशी (मानसी साळवी) भेट होते. एका वेगळ्याच आंतरिक ओढीने दोघं बेचैन होतात आणि लग्नाचा निर्णय घेतात. ही दोघंजण असा निर्णय का घेतात याचं स्पष्टीकरण दोघांजवळही नसतं. लग्न करून आदी शुभ्राला मुंबईला घेऊन येतो. सहाजिकच सुलेखाची खूप चिडचिड होते. लग्नानंतर दोघं जेव्हा आदीच्या मूळ घरी म्हणजे वसईला जातात तेव्हा तिथल्या वाड्यामध्ये अनेक गूढ गोष्टी घडू लागतात. आदीच्या आजोबांची व्यक्तिरेखा, त्यांचं वागणं मनात अनेक प्रश्न निर्माण करते.
वाडा, वाड्यामधली रहस्य, आदी -शुभ्राचं अचानक झालेलं लग्न, सुलेखाचं विचित्र वागणं या साऱ्यांच गूढ उलगडेपर्यंत नवनवीन रहस्य समोर येत जातात. यामुळेच मालिका अखेरपर्यंत आपला टीआरपी टिकवून ठेवण्यात यशस्वी झाली होती. मालिकेचं शीर्षक गीतही लोकप्रिय झालं होतं. मालिकेमध्ये आनंद अभ्यंकर, प्रदीप वेलणकर, इला भाटे, सुलेखा तळवलकर, सागर टाळशीकर, अजय पुरकर, अमित खोपकर, सुनील बर्वे, सतीश राजवाडे, शर्वाणी पाटणकर, सुहास भालेकर आदी कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. (Marathi serial Asambhav)
वादळवाट नंतर पुन्हा एकदा उमेश कामत आणि नीलम शिर्के ही जोडी जमणार असं वाटत असतानाच मालिकेने अचानक टर्न घेतला आणि उमेश कामत – मानसी साळवी ही फ्रेश जोडी समोर आली. ही जोडी प्रेक्षकांना आवडायलाही लागली होती. परंतु काही कारणांनी मानसी साळवीने मालिका सोडली आणि तिच्या जागी उर्मिला कानेटकरची वर्णी लागली. मालिकेमध्ये चक्क मुख्य नायिका बदलली. पण हा बदलही प्रेक्षकांनी स्वीकारला या नव्या जोडीलाही तेवढंच प्रेम दिलं. याचं कारण म्हणजे मालिकेचं उत्कंठावर्धक कथानक आणि दिग्दर्शन.
मालिकेमध्ये सर्वाचेच अभिनय उत्तम होते. पण विशेष उल्लेख करायला हवा तो नीलम शिर्के या अभिनेत्रीचा. सुलेखा आणि इंदुमती या दोन्ही भूमिका तिने अगदी अप्रतिमरित्या सादर केल्या आहेत. सध्या ही गुणी अभिनेत्री मनोरंजनाच्या दुनियेपासून दूर असली तरी आजही प्रेक्षक तिला विसरलेले नाहीत. या मालिकेला सलग दोन वर्ष (२००७ आणि २००८) झी मराठीचं सर्वोत्कृष्ट मालिका, तर नीलम शिर्केला सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिका, तर आनंद अभ्यंकर यांना सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखेचा पुरस्कार मिळाला होता. या मालिकेचा नंतर बंगाली (असंभब) आणि कन्नड (असंभव) या दोन्ही भाषांमध्ये रिमेक करण्यात आला. (Marathi serial Asambhav)
=========
हे देखील वाचा – जस्सी जैसी कोई नही: एका कुरूप मुलीची हटके कहाणी
=========
आठवणींच्या मालिका या सदरासाठी सुचविण्यात आलेल्या मालिकांमध्ये या मालिकेचं नाव अनेक वाचकांनी सुचवलं होतं. आजही ही मालिका अनेकांची आवडती मालिका आहे. ही मालिका झी ५ या ओटीटीवर अथवा यु ट्यूब वर बघता येईल.