स्त्रीप्रधान, कौटुंबिक मालिकांच्या गर्दीत ‘न’ हरवलेली वादळवाट!
त्या काळात स्त्री प्रधान आणि कौटुंबिक मालिकांची चलती होती. अगदी हिंदी वाहिन्या असोत किंवा प्रादेशिक बहुतांश मालिका याच प्रकारातल्या होत्या. झी मराठीवरील (तेव्हा अल्फा मराठी) आभाळमाया, अवंतिका यासारख्या मालिकांच्या यशाने तर, इ टीव्ही मराठीवरील (आता कलर्स मराठी) ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेच्या लोकप्रियतेमुळे याच थाटणीच्या मालिका मोठ्या प्रमाणावर येऊ लागल्या होत्या आणि त्या लोकांच्या पसंतीसही उतरत होत्या. अशा काळात पत्रकारिता, समाजकारण या विषयांवर आधारित एक मालिका झी मराठीवर प्रदर्शित झाली आणि जनसामान्यांमध्ये प्रचंड लोकप्रियही झाली. या मालिकेचं नाव होतं ‘वादळवाट’.
स्त्रीप्रधान, कौटुंबिक मालिका म्हणजे हुकमी एक्का हा संदर्भ बदलायला लावला तो ‘वादळवाट’ या मालिकेने. स्त्रीप्रधान मालिका टीआरपी खेचत असताना त्या स्पर्धेत ही वेगळ्या विषयावर आधारित मालिका तेवढ्याच ताकतीने उभी राहिली. सशक्त कथानक आणि तगडी स्टारकास्ट ही या मालिकेची जमेची बाजू होती. अरुण नलावडे, शरद पोंक्षे, अविनाश नारकर, आनंद अभ्यंकर या त्या काळातल्या लोकप्रिय नायकांसोबतच सुबोध भावे, अदिती सारंगधर, लोकेश गुप्ते, प्रसाद ओक, उमेश कामत, नीलम शिर्के, चिन्मय मांडलेकर, क्षिती जोग, श्वेता शिंदे, संतोष जुवेकर असे अनेक उभरते कलाकारही या मालिकेत होते. (Marathi serial Vadalvat)
‘वादळवाट’ मालिका सुरु झाली तेव्हा पत्रकारिता या विषयावर आधारित तशा बऱ्याच मालिका येऊन गेल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करायला हवा तो रिपोर्टर, शांती, दामिनी, इ. मालिकांचा. पण या सगळ्या मालिका पत्रकाराचं आयुष्य, त्याची आव्हाने अशा वैयक्तिक गोष्टी मांडणाऱ्या होत्या. वादळवाट इथे वेगळी ठरली. या मालिकेमध्ये दोन वृत्तपत्रांच्या व्यवसायिक स्पर्धेची, नैतिक मूल्यांची आणि आदर्श तत्त्वांची कहाणी दाखवण्यात आली होती.
आबा चौधरी (अरुण नलावडे) आणि देवराम खंडागळे (शरद पोंक्षे) या दोघांमध्ये व्यवसायिक स्पर्धा आणि मतभेत असतात. आबा चौधरी अत्यंत प्रामाणिक आणि नैतिक मूल्य जपणारे, तर देवराम खंडागळे अगदी त्याविरुद्ध. आबा चौधरींची तीन मुले, पत्नी त्यांनी सांभाळलेला मुलगा आणि पुतणी रमा असा मोठा परिवार असतो. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आबांच्या आदर्श तत्त्वांवर चालत असते. मालिकेमध्ये अनेक उपकथानकं दाखवण्यात आली आहेत. प्रत्येक उपकथानक वास्तववादी वाटतं. यामुळे कुठेही मालिका भरकटत नाही. (Marathi serial Vadalvat)
दोन वृत्तपत्रांमधील व्यावसायिक स्पर्धा याच्या जोडीने वर्तमानपत्राच्या ऑफिसमधलं वातावरण, न्यूज चॅनेल्सच्या रिपोर्टर्सची ब्रेकिंग न्यूजसाठी होणारी धावपळ, कोर्ट केस, इ अशा अनेक गोष्टी यामध्ये दाखवण्यात आल्या होत्या. याच्या जोडीलाच कौटुंबिक समस्या, प्रेमकहाणी, वैयक्तिक आयुष्यातल्या समस्या या गोष्टींचा मसालाही अगदी प्रमाणात वापरल्यामुळे मालिका कुठेही कंटाळवाणी झाली नाही.
त्याकाळातल्या इतर मालिकांमध्ये दाखवण्यात येणारी ‘लेडी व्हिलन’ ही संकल्पना या मालिकेत अजिबात दाखवण्यात आली नव्हती. नाही म्हणायला आबासाहेबांची सून विशाखा (नीलम शिर्के) ही व्यक्तिरेखा काहीशी ‘ग्रे शेड व्यक्तिरेखा’ होती. ही व्यक्तिरेखा धड सकारात्मकही नव्हती आणि नकरात्मकही. आबासाहेबांच्या आदर्शवादी कुटुंबातली सर्वसामान्य विचारांची एक व्यक्तिरेखा असंच या व्यक्तिरेखेचं वर्णन करावं लागेल. (Marathi serial Vadalvat)
शरद पोंक्षे यांनी देवराम खंडागळे ही भूमिका अत्यंत उत्तम पद्धतीने साकारली आहे. काहीशा विनोदी ढंगाचा आणि खुनशी वृत्तीचा व्हिलन प्रचंड लोकप्रिय झाला. मालिकेमध्ये प्रभाकर फणशीकर यांचीही छोटीशी भूमिका होती. अरुण नलावडे यांच्या अभिनयाबद्दल काय बोलणार? नामवंत कलाकारांच्या भूमिका सरस होत्याच आणि त्यात काही विशेष नाही, पण या मालिकेमधील नवख्या कलाकारांनीही आपल्या अभिनय क्षमतेची चुणूक दाखवली आणि इंडस्ट्रीला कित्येक गुणी कलाकार मिळाले.
============
हे देखील वाचा – अवंतिका: एका छोट्या कथेची प्रदीर्घ चाललेली मालिका
============
झी मराठीवर २००३ ते २००७ या काळामध्ये ही मालिका प्रसारित करण्यात आली होती. या काळात मालिकेमध्ये कोणत्याही कारणाने ‘लीप’ दाखवण्यात आला नाही, की टीआरपी वाढवायला कोणाचा मृत्यूही दाखवला नाही. तसंच मालिकेमधील ‘श्रावणी’ ही व्यक्तिरेखा वगळता कोणत्याही मुख्य व्यक्तिरेखेसाठी कलाकारही बदलले नाहीत. (Marathi serial Vadalvat)
शेवटी आवर्जून उल्लेख करायलाच हवा तो मालिकेच्या शीर्षक गीताचा. देवकी पंडित यांनी गायलेलं मालिकेचं शीर्षक गीत “थोडी सागर निळाई…” कमालीचं लोकप्रिय झालं होतं. आजही हे गाणं अनेकांच्या मोबाईलची रिंगटोन आहे. मालिका तर लोकप्रिय होतीच. पण त्याहीपेक्षा जास्त लोकप्रियता मिळाली ती मालिकेच्या शीर्षकगीताला. एका मालिकेचं शीर्षकगीत मालिका संपल्यानंतर १५ वर्षांनंतरही तेवढंच लोकप्रिय आहे, ही खरोखरच कौतुकाची गोष्ट आहे. ठराविक साच्यातल्या आणि ‘टिपिकल’ कथानकांमध्ये हरवलेल्या मालिकांच्या जमान्यात रसिक प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे ती वादळवाट सारख्या वेगळ्या विषयाच्या दर्जेदार मालिकांची!