‘मॅटीनी शो’चे कल्चर पुन्हा येईल का?
‘मॅटीनी शो’ असे म्हणताक्षणीच पन्नाशी साठीपार रसिकांची एक पिढी एव्हाना जुन्या आठवणीत, आपल्या काॅलेज जीवनाच्या ‘तरुण’ आठवणीत नक्कीच गेली असेल आणि सिंगल स्क्रीन थिएटर चित्रपटगृहात मॅटीनी शोला ‘एन्जाॅय’ केलेले चित्रपटही आठवले असतील. ते खरे ‘सिनेमाचे’ दिवस होते अशीही भावना एव्हाना जागी झाली असेल. (Memories of Matinee Show Culture)
आजच्या ग्लोबल युगातील ‘मल्टीप्लेक्स’ पिढीला मात्र हे मॅटीनी शोचे कल्चर म्हणजे नेमके काय, याची कल्पना नसावी. कधी कधी गप्पांच्या ओघात पालकांकडून त्यांना या ‘सकाळच्या खेळा’च्या काही गोष्टी समजल्या असतीलच. पण ज्यांनी प्रत्यक्ष पूर्वी मॅटीनी शो एन्जाॅय केलेत त्यांना मात्र आता राहिल्या फक्त त्या आठवणी एवढेच म्हणावे लागत असेल. हा एक प्रकारचा फ्लॅशबॅक!
आमच्या गिरगाव ग्रॅन्ट रोड परिसरातील ‘ड्रीमलॅन्ड थिएटर’च्या समोर दक्षिण मुंबईतील जवळपास सगळ्या थिएटरच्या मॅटीनी शोची पोस्टर लागण्याची झक्कास परंपरा होती. त्या काळातील माझ्यासारखे फिल्म दिवाने शुक्रवारी सकाळी लवकर जाऊन सुपरपासून अलंकारपर्यंत कोणता जुना चित्रपट मॅटीनी शोला रिलीज झालाय हे पाहायची आणि मग आपापल्या गल्लीत अशाच फिल्म वेड्यांना त्याचा तपशील देत. एक प्रकारची ही जनसेवाच होती आणि त्यात हौस मौज होती. तेच ते मॅटीनी शोचे कल्चर पुन्हा एकदा यायलाच हवे असे वाटते. असं झालं, तर आजही ते लोकप्रिय होईल कारण आपल्याकडे जुन्या चित्रपटांची जबरदस्त क्रेझ आहे. ती कधीच ओसरणार नाही. पूर्वी काय घडलं हे जाणून घेणे मानवी स्वभावच तर आहे. (Memories of Matinee Show Culture)
आता आजची मल्टीप्लेक्समध्ये ‘चौवीस तास’ सिनेमा प्रदर्शन सुरु असते. सकाळचा पहिला खेळ सकाळी साडेआठ अथवा नऊ वाजता (काॅलेज स्टुडन्ससाठी तो फेव्हरेट आहे), तर काही मल्टीप्लेक्समध्ये रात्री एक ते दीड वाजताही शो असतो. (यामुळे दिवसाचा वेळ वाचतो म्हणे.) त्याला ‘मिडनाईट मॅटीनी शो’ असे म्हणतात आणि युरोपमधील हे कल्चर दहा बारा वर्षांपूर्वीच आपल्याकडे आले तेव्हा रात्री अकराचा खेळ शेवटचा होता. पण सध्या झपाट्याने जीवनशैली बदलतेय. मुंबई ही चौवीस तास जागी असणारी आर्थिक राजधानी आहे.
आजच्या ‘पाॅपकाॅर्न’ पिढीला जुन्या मॅटीनी शोची संकल्पना समजावून सांगणे गरजेचे आहे. फार पूर्वी मुंबई, पुणे अशा अनेक शहरात दिवसा नियमित तीन खेळ याप्रमाणे चित्रपट प्रदर्शित होत. कित्येक चित्रपट मेन थिएटरला चक्क पंचवीस/पन्नास आठवडे, तर काही शंभर आठवड्याचे यश संपादत. एकदा आवडलेला चित्रपट अनेक फिल्म दीवाने पुन्हा पुन्हा पाहत, त्यामुळेच त्या काळात लोकप्रिय चित्रपट जोरात चालत. पण एकदा थिएटरवरुन उतरलेला चित्रपट पुन्हा पाहायचा झाला तर? साठच्या दशकात मध्यमवर्गीयांच्या घरात रेडिओ आणला तरी चाळीत साखर वाटली जात असे, दूरचित्रवाणी येण्यापूर्वीचा तो काळ होता. अशातच हे ‘मॅटीनी शो’चे कल्चर आले आणि पटकन रुजलेदेखील. ते जास्त महत्त्वाचे आहे. (Memories of Matinee Show Culture)
सकाळी साडेअकरा अथवा बारा वाजताचा शो हा ‘मॅटीनी शो’ म्हणून गणला गेला. त्यात जुने चित्रपट पुन्हा कमी तिकीट दरात या सकाळच्या खेळास रिलीज होत. देव आनंद आणि शम्मी कपूर यांचे अनेक जुने चित्रपट असे पुन्हा पुन्हा सकाळच्या खेळास रिलीज होऊ लागले. ते ‘म्युझिकल हिट’ असल्याने त्यांना पसंती मिळाली. देव आनंदचे तर अनेक चित्रपट पहिल्या वेळी फारसे यश मिळवत नसत, पण त्या चित्रपटाची गाणी प्रचंड लोकप्रिय असल्याने ते चित्रपट मॅटीनी शोला तुफान गर्दी खेचत. शम्मी कपूरचे म्युझिकल हिट चित्रपट तर पहिल्या रनलाच ज्युबिली यश संपादत आणि ते मॅटीनी शोला पुन्हा एन्जाॅय करण्यात विशेष आनंद मिळे
याप्रमाणेच रहस्यमय चित्रपट (बीस साल बाद, महल, कोहरा, गुमनाम, मेरा साया, तिसरी मंझिल वगैरे) आणि विदेशी चित्रपट यावर मॅटीनी शोचे कल्चर विशेष रुजले. मी याच प्रकारे माझी जुने चित्रपट पाहण्याची हौस फिटवली. विशेषतः माझ्या अगोदरच्या पिढीने पाहिलेले अनेक चित्रपट माझ्या पिढीला पाहायचे उत्तम माध्यम म्हणजे मॅटीनी शो होते. मी तर एक प्रकारचा बॅकलाॅग भरुन काढला.
अर्थात हे मॅटीनी शो फक्त एक आठवड्यापुरते रिलीज होत आणि त्यातच त्या चित्रपटांबाबत विलक्षण ओढ असे. त्या आठवड्यात तो चित्रपट पाहून घेण्यात थ्रील वाटे. एखाद्या जुन्या चित्रपटाला मॅटीनी शोला दुसरा आठवडा लाभणे कौतुकाचे असे. त्या काळात दिलीपकुमार, देव आनंद आणि राज कपूर यांची जबरदस्त क्रेझ असल्याने त्यांच्या अनेक चित्रपटांना पुन्हा पुन्हा रसिकांसमोर येण्यासाठी मॅटीनी शोचा मोठाच आधार मिळाला आणि त्या चित्रपटांना रिपिट व्हॅल्यू येऊन त्यांचा बिझनेस वाढला. या तिघांचाही चाहतावर्ग प्रचंड असल्याने त्यांचे चित्रपट मॅटीनी शो रविवारी हाऊसफुल्ल होत असत. (Memories of Matinee Show Culture)
मॅटीनी शोच्या या लोकप्रिय कल्चरची काॅलेज स्टुडन्समध्ये ‘जबरा क्रेझ’ होती. माझ्यासारखे अनेकजण आपले लेक्चर बुडवून मॅटीनी शोला जाऊन बसत. त्यातून आमचे आणि असेच अनेक युवकांचे ग्रुप्स जमले, काहींची प्रेम प्रकरणे या मॅटीनी शोमध्येच रुजली. रविवारचा मॅटीनी शो पाहून मग बाहेरच जेवायचे हेदेखील या काळात रुजले. चित्रपट संस्कृतीमधील हे असे आजूबाजूचे घटक खूप महत्त्वाचे आहेत.
या मस्त रुळलेल्या, फुललेल्या, स्थिरावलेल्या ‘मॅटीनी शो कल्चर’मध्ये एखादे नवीन पाऊल पडले नसते तर नवलच होते. ते पाऊल टाकले राजश्री प्राॅडक्सन्सच्या ताराचंद बडजात्या यांनी! त्यांनी आपला सुधेन्दु राॅय दिग्दर्शित ‘जीवन मृत्यू’ (१९७०) हा नवीन चित्रपट अलंकार थिएटरमध्ये थेट मॅटीनी शोला रिलीज केला आणि तब्बल १०१ आठवड्याचे यश मिळवले. यावरून मॅटीनी शोचा ‘क्राउड’ किती मोठा होता हे अधोरेखित होते. (Memories of Matinee Show Culture)
मॅटीनी शोला चार प्रकारचे चित्रपट रिलीज होऊ लागले.
१. जुने चित्रपट – राजेन्द्रकुमार, सुनील दत्त, राजकुमार, मनोजकुमार अशांचे जुने चित्रपट मॅटीनी शोमुळे पुढील पिढीला पाहायला मिळू लागले.
२ नवीन चित्रपट – नवीन चक्क मॅटीनी शोला रिलीज होऊ लागले आणि एक ट्रेंड सेट झाला. विशेष म्हणजे या मॅटीनी शोला नवीन चित्रपटांना ज्युबिली यश मिळाल्याने अधिक प्रमाणात नवीन चित्रपट मॅटीनी शोला रिलीज होऊ लागले. सिनेमावाल्याना यशाचे असे फंडे हवेच असतात राजश्री प्राॅडक्सन्सच्या वितरण विभागाने गंगा आणि जमुना या जुळ्या थिएटरमध्ये दुल्हन वही जो पिया मन भाये, अखियोंके झरोखोसे, पहेली वगैरे अनेक चित्रपट मॅटीनी शोला रिलीज करीत आपली वेगळी ओळख आणि हुकमी प्रेक्षकवर्ग पक्का केला.
३ नियमित खेळावरुन मॅटीनी शोला सिनेमा शिफ्ट करणे – गंगा थिएटरवरुन ‘इन्कार’, ‘सुपर टाॅकीजला मॅटीनी शोला शिफ्ट केला आणि जोरदार चालला. तेच लिबर्टी थिएटरवरचा ‘इम्तिहान’ नाझ थिएटरला शिफ्ट केला आणि त्यानेही भरपूर यश मिळवले. तात्पर्य, मॅटीनी शोच्या मूळ कल्चरला थोडा थोडा धक्का बसू लागला होता. माझ्यासारखे अनेक रसिक तर नियमित खेळाचा चित्रपट मॅटीनी शोला कधी बरे येतोय याचीही वाट पाहत. कारण तो कमी पैशात पाहायला मिळे. तरी स्वस्तिक, इंपिरियल अशा काही थिएटरमध्ये कायमच जुने चित्रपट मॅटीनी शोला रिलीज होत राहिले.
४. समांतर अथवा नवप्रवाहातील चित्रपट: या चित्रपटांना मॅटीनी शोचा मोठाच आधार मिळाला. मृणाल सेन दिग्दर्शित ‘भुवन शोम’ (१९६९) या चित्रपटाने ड्रीमलॅन्ड थिएटरमध्ये मॅटीनी शोला ‘ज्युबिली हिट’ यश मिळवले आणि या चित्रपटाचा प्रवाह निर्माण झाला. या नवप्रवाहातील चित्रपटालाही पन्नास वर्षे पूर्ण झाली. मुजफ्फर अली दिग्दर्शित ‘गमन’ ( मराठा मंदिर मॅटीनी शो), सईद मिर्झा दिग्दर्शित ‘ अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यू आता है’ (लिबर्टी मॅटीनी) असे नवप्रवाहातील अनेक चित्रपट मॅटीनी शोला रिलीज होत राहिले. या चित्रपटांचा रसिकवर्ग तसा चोखंदळ तरी मर्यादित असल्याने मॅटीनी शो कल्चरला ते साजेसे ठरले. मेट्रो थिएटरमध्ये कधी समातंर (निशांत) तर कधी व्यावसायिक (सनम तेरी कसम, मनपसंत ) असे चित्रपट मॅटीनी शोला रिलीज होत राहिले आणि तेथे अनेक चित्रपटांना यश लाभले.
मॅटीनी शोची अशी वैशिष्ट्ये अनेक. अर्थात, एव्हाना दूरदर्शनवर प्रत्येक रविवारी जुन्या हिंदी चित्रपटाचा खेळ होऊ लागल्याने मॅटीनी शो कल्चरला कुठे तरी धक्का बसायला लागला होता. पण मॅटीनी शोचा मूड/माहौल/मानसिकता/ कल्चर काही वेगळेच असायचे. ज्यांनी ते अनुभवले आहे त्यांना ते दिवस आठवत असतीलच. (Memories of Matinee Show Culture)
आपल्या देशात रंगीत दूरदर्शन व व्हिडिओ आला (१९८२) आणि मग ‘मॅटीनी शो कल्चर’ मागे पडत गेले. उपग्रह वाहिनीच्या आगमनाने तर मॅटीनी शोची गरजच नाहिशी झाली. कॅसेट रुपाने आणि मग एखाद्या मनोरंजन उपग्रह वाहिनीवर जुने चित्रपट पाहायला मिळू लागले आणि थिएटरमध्ये मॅटीनी शो रिलीज करण्याची गरजच संपत गेली. नवीन शतकात मल्टीप्लेक्स युग आले आणि तेथे जुने चित्रपट ही संकल्पनाच नाहिशी झाली. त्याचे महत्त्व वाटेनासे झाले. मल्टीप्लेक्सने चकाचकपणा आणला, पण चित्रपट संस्कृती बदलली. (Memories of Matinee Show Culture)
पण तरी जुने चित्रपट पुन्हा रिलीज व्हावेत. त्यांना आजही उत्तम प्रतिसाद मिळेल हे निश्चित. धोबीतलावच्या एडवर्ड थिएटरमध्ये असेच अनेक हिंदी, तर लालबागच्या भारतमाता चित्रपटगृहात दादा कोंडके यांच्या अनेक जुन्या चित्रपटांचे पुन्हा पुन्हा प्रदर्शन होत असतेच आणि विशेष म्हणजे त्याला रिस्पॉन्स मिळतोय. म्हणजेच जुने चित्रपट पाहण्यास जुनी/मधली आणि आजची पिढी उत्सुक आहे हे दिसतेय.
दादा कोंडके यांचे सत्तरच्या दशकातील सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, तुमचं आमचं जमलं, रामराम गंगाराम, सासरचं धोतर वगैरे वगैरे धमाल चित्रपट भारतमाता चित्रपटगृहात अनेकदा रिलीज होताहेत आणि चांगले व्यावसायिक यश मिळवताहेत. याचाच अर्थ मराठीतील अनेक जुने चित्रपट असे पुन्हा पुन्हा पाहण्यास उत्सुक असलेला एक मोठा प्रेक्षक वर्ग आहे.
चित्रपती व्ही शांताराम, भालजी पेंढारकर, राजा परांजपे, अनंत माने, राजा ठाकूर त्याचप्रमाणे राजदत्त, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, पुरुषोत्तम बेर्डे, स्मिता तळवळकर यांचे किती तरी जुने चित्रपट पुन्हा रिलीज केल्यास त्यांना नक्कीच प्रतिसाद मिळेलच. या चित्रपटाचे आशय आणि गीत संगीत यांच्यामुळे हे चित्रपट पुढील पिढीला माहिती झाले आहेत आणि त्यांनाही ते पहावेसे वाटतात.
किरण शांताराम निर्मित आणि सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘अशी ही बनवाबनवी’ आणि विजय कोंडके दिग्दर्शित ‘माहेरची साडी’ हे तीस वर्षापूर्वीचे सुपरहिट चित्रपट अनेकदा उपग्रह वाहिनीवर प्रक्षेपित होतात, तरी प्रत्येकवेळी त्यांना उत्तम टीआरपी मिळतो. हिंदी चित्रपटसृष्टीतील राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, जितेंद्र, धर्मेंद्र यांच्या जुन्या लोकप्रिय चित्रपटांना पाहण्यास उत्सुक असलेला एक मोठा रसिकवर्ग आहे, ते नक्कीच यांच्या जुन्या चित्रपटांना मल्टीप्लेक्समध्ये पाहणे पसंत करतील.
========
हे देखील वाचा – स्वस्तिक सिनेमा – जुन्या काळातील ‘बाल्कनी’ नसलेलं एकमेव थिएटर
========
मॅटीनी शोसाठी वेगळे जोरदार प्रमोशन करावे लागत नाही. हे चित्रपट सतत चर्चेत असतात. काही निमित्ताने मिडिया त्यांची दखल घेत असतेच आणि अशा वेळी ते चित्रपट पाहायला मिळाले, तर रसिकांना नक्कीच आवडेल. एकदा सुपर हिट ठरलेला चित्रपट हा सर्वकालीन यशस्वी असतो. ते एक प्रकारचे ‘फिक्स्ड् डिपाॅझिट’ आहे. त्यावरचे व्याज घेत राहायचे. एवीतेवी मल्टीप्लेक्समध्ये चार पाच स्क्रीन आणि दिवसरात्र शो सुरु असतात. त्यातील एक हुकमी शो अशा जुन्या चित्रपटांना असू देत. चित्रपट प्रेक्षक संस्कृती वाढवण्यासाठी ते खूपच उपयुक्त ठरेल हे नक्कीच. (Memories of Matinee Show Culture)
नवीन चित्रपटाबरोबरच जुने चित्रपटही रिलीज होत राहिले तर त्याचे सामाजिक (जुनी आणि नवीन पिढीने एकाच वेळेस चित्रपट पाहिल्यास त्यावर थोडी फार का होईना पण चर्चा होईल), सांस्कृतिक (रसिकांमध्ये जुने चित्रपट पाहायची वृत्ती वाढेल) आणि आर्थिक (गल्ला पेटीवर कमाई होत राहिल) फायदे आहेतच.