‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
सिनेमाच्या खेळांच्या ‘वेळे’च्या आठवणी
आपली ‘सिनेमा प्रेक्षक संस्कृती’ खूप जगावेगळी आहे, असे मी कायमच अभिमानाने सांगतो. आपल्याला आपल्याकडे अनेक प्रादेशिक भाषेत आणि हिंदीत निर्माण होत असलेल्या चित्रपटाचे विशेष कौतुक हवेच. कारण ते आपल्याकडील बहुसांस्कृतिक, सामाजिक वातावरणातून वाटचाल करतेय. आता हेच बघा ना, तुम्ही पूर्वी एखाद्या तालुक्याच्या ठिकाणच्या अथवा अगदी गावातल्या सिनेमा थिएटरमध्ये रात्रीचा शो पाहायला गेला असाल, तर तुमची एक आठवण नक्कीच असेल. सिनेमाचा क्लायमॅक्स जस जसा जवळ येत असतो तेव्हा सिनेमा संपल्यावर घरी जायला टमटम (सहा सीटची रिक्षा) मिळेल काय, हा विचार डोक्यात येत असे. स्वत:ची सायकल अथवा स्कूटर असेल, तर असा प्रश्न पडत नसे. पण तसे नसेल तर? (Memories of Movie showtime)
याच गोष्टीला ‘दुसरी बाजू’ही आहेच. ती म्हणजे, प्रेक्षकांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामीण भागातील थिएटरवले रात्रीचा खेळ बारापूर्वीच संपेल याची काळजी घेत. पण समजा, सिनेमाच त्यापेक्षाही जास्त लांबीचा असेल तर? तर ते बिनदिक्कतपणे ‘आपल्या अधिकारात त्यातील काही दृश्य चक्क कापत असत.
आमिर खान निर्मित आणि आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’ सिनेमाला अशीच कात्री लावण्यात आली आणि रात्री बारा वाजता ‘शेवटचा खेळ’ संपेल हे पाहिले. इतकेच नव्हे तर, या सिनेमाच्या एकूणच लांबीमुळे माझ्या टाॅकीजमध्ये दिवसा चार शो बसत नव्हते, पण आम्हीच काही दृश्ये कापल्याने ते शक्य झाले, असे चक्क असाच एक ग्रामीण भागातील थेटरवाला त्या काळात नाझ चित्रपटगृहाच्या इमारतीतील एका वितरकाच्या कार्यालयात मला भेटला असता ‘जणू काही यात आश्चर्य वाटण्याजोगे’ काहीच नाही अशा पध्दतीने मला सांगत होता आणि आपल्याकडील ‘थिएटर संस्कृती’चा आणखीन एक झक्कास प्रत्यय आला. गोष्ट छोटी वाटते, पण महत्त्वाची आहे.
असे काही ऐकले की, माझे कुतूहल वाढते. आणि मग काही गोष्टी जाणून घ्याव्याशा वाटतात. मग समजले की, ती दीर्घकालीन परंपराच आहे. नेहमीपेक्षा जास्त लांबीचे चित्रपट हे शहरातील थिएटर संस्कृतीत ठीक आहे, पण शहरापासून दूर दूर गेलो तर, त्याच चित्रपटाची लांबी कमी कमी होत जाते कारण ‘दिवसा चार खेळ आणि वेळ’ सांभाळायची असते. (Memories of Movie showtime)
मल्टीप्लेक्स युगापूर्वीची आपल्या देशातील चित्रपटाच्या खेळाची हुकमी वेळ काय होती? तर साडेअकरा (अथवा बारा), तीन, सहा आणि नऊ (अथवा साडेनऊ) वाजता. काही थिएटरमध्ये सकाळी साडेअकराचा खेळ मॅटीनी शो असे. (जुने चित्रपट प्रदर्शित करण्याची परंपरा. त्यात नवीन चित्रपटही प्रदर्शित होऊ लागले.) आणि तीन, सहा, नऊ असे दिवसा तीन खेळ हे दीर्घकालीन रुटीन होते. मी तीनच्या शोला जातोय, मी लास्ट शो पहिला असे बोलण्याची सामाजिक सांस्कृतिक परंपराच होती. एखाद्या थिएटरमध्ये एकच चित्रपट चारही खेळासाठी असेल, तर ‘दिवसा चार खेळ’ असे एवढेच दिले जात असे.
राज कपूर अभिनित, निर्मित व दिग्दर्शित ‘संगम’ (१९६४) सिनेमाची लांबी जास्त आहे आणि म्हणूनच त्याला दोन मध्यंतर आहेत असे ‘संगम’च्या पूर्वप्रसिध्दीतच स्पष्ट दिसू लागताच त्याच्या शोच्या वेळा कशा बरे असतील, याबाबत कुतूहल निर्माण झाले होते आणि मग त्याच्या रिलीजच्या वेळी समजले की, दक्षिण मुंबईतील अप्सरा थिएटरचे उदघाटन ‘संगम’ने होत असून, शोच्या वेळा आहेत, दहा, दुपारी साडेतीन आणि रात्री आठ वाजता. सिनेमा चार तासांचा असल्याने या वेळा अगदी स्वाभाविक होत्याच. (Memories of Movie showtime)
भायखळ्याच्या जयहिंद टाॅकीजमध्ये दिवसा चार खेळ अशी प्रथा असल्याने तेथे ‘संगम’साठी वेळा होत्या, सकाळी पावणेआठ, दुपारी बारा वाजता, मग सव्वाचार वाजता आणि रात्री नऊ वाजता. आणि एकदा हे वेळेचे गणित समजले, सिनेमा पब्लिकला आवडला आणि मग ‘संगम’ पाहायला जाण्याची वेळ पब्लिकच्या मनात ‘सेट’ झाली. यश बरेच काही घडवते ते हे असेही.
अशा मोठ्या लांबीच्या चित्रपटांबाबत असे नेहमीच घडते. सहज उदाहरण म्हणून ही बघा, ‘सूरज’, मेन थिएटर नाॅव्हेल्टीत दुपारी दोन, संध्याकाळी साडेपाच आणि रात्री साडेनऊ, बी. आर. चोप्रा दिग्दर्शित ‘दास्तान’, नाॅव्हेल्टीत पावणेदोन, साडेपाच आणि नऊ, तर रेक्स आणि लोटसमध्ये सकाळी साडेदहा, दुपारी दोन वाजता, संध्याकाळी साडेपाच आणि रात्री नऊ वाजता. असे दिवसा चार खेळ. राज कपूर दिग्दर्शित ‘बाॅबी’. मेट्रोत दुपारी सव्वादोन, सायंकाळी पावणेसहा आणि रात्री सव्वानऊ. रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ मिनर्व्हात दुपारी दीड, संध्याकाळी पावणेसहा आणि रात्री नऊ वीस. प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘मुक्कदर का सिकंदर’ अलंकारला दोन, पावणेसहा आणि सव्वानऊ. रिचर्ड अटनबरो दिग्दर्शित ‘गांधी’ रिगलमध्ये इंग्रजीत बारा, सव्वाचार आणि साडेआठ वाजता, तीनच खेळ, तर हिंदीत प्लाझा थिएटरमध्ये सकाळी दहा, दुपारी पावणेदोन, संध्याकाळी साडेपाच आणि रात्री सव्वानऊ.
यावरुन तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेलच की, वीसपेक्षा जास्त रिळाच्या चित्रपटाच्या खेळाच्या वेळा या अशा नेहमीची चौकट मोडणाऱ्या असत. राज कपूर दिग्दर्शित ‘मेरा नाम जोकर’, रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शान’, सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित ‘हम आपके है कौन’, आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’, करण जोहर दिग्दर्शित ‘कभी खुशी कभी गम’ या सिनेमांच्या वेळीही शोची वेळेची खेळी अशीच होती. (Memories of Movie showtime)
‘मेरा नाम जोकर’ तर दोन मध्यंतरसह पडद्यावर आला आणि त्याच्या वेळा त्यानुसार होत्या. पण फर्स्ट डे फर्स्ट शोपासूनच ‘जोकर पडला पडला’ अशी हाकाटी दिल्याने तो बराचसा कापून एका मध्यंतरचा करण्यात आला.
तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण त्या काळात अशा पध्दतीने ‘सिनेमाच्या शोची वेळ’ नेहमीपेक्षा वेगळी असेल तर, आपल्याला जास्त मोठा चित्रपट पाहायचाय, अशी एक प्रकारची मानसिकता तयार होई आणि अशी काय बरे थीम असेल, असे आपल्याला काय काय बरे पाहायला मिळणार, याबाबत उत्सुकता वाढे. एक प्रकारे ते गरजेही असते. ते दिवसच वेगळे होते.
शोची वेळ हा मुद्दा अनेक लहान मोठ्या गोष्टीना जन्म देणारी असे. त्यात पुन्हा दुपारचा खेळ दोन वाजता असेल तर, आपोआपच मॅटीनी शोची वेळ अकराची करावी लागे. या सगळ्यात काय व्हायचे माहितेय? मॅटीनी शो साडेअकराचा, पहिला खेळ तीनचा, दुसरा सहाचा आणि रात्रीचा साडेनऊचा असे सरावाचे टाईम टेबल पक्के असणाऱ्या रसिक प्रेक्षकांची अनेकदा तरी चित्रपटाची सुरुवातच चुकत असे अथवा त्यांना हा चित्रपट नंतर बघू असा तात्काळ निर्णय घेत अन्य थिएटरवर जावे लागत असे. (Memories of Movie showtime)
चित्रपती व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘चानी’च्या जाहिरातीत अगदी ठळकपणे दिले होते, “वेळेपूर्वी या, अगोदर आलेल्यांना डिस्टर्ब करु नका.” इराॅसमध्ये या चित्रपटासाठी शोची वेळ होती, साडेबारा, साडेतीन, साडेसहा आणि साडेनऊ.
अशा या चित्रपटाच्या खेळाची वेळ या संस्कृतीत ‘मेरी आवाज सुनो’च्या वेळी नियमित शोमध्ये भर पडली. एका दक्षिण भारतीय प्रादेशिक भाषेतील चित्रपटाचा रिमेक असलेल्या या चित्रपटात प्रचंड हिंसा असल्याच्या कारणास्तव त्यावर बंदी येणार अशा बातमीने वादळ निर्माण केले आणि याचाच व्यावसायिक फायदा उठविण्यासाठी या चित्रपटाचे शो वाढवताना सकाळी नऊचा ‘जादा खेळ’ लावला गेला. मी स्वत: मिनर्व्हात असा सकाळी नऊ वाजताच्या शोला गेलो. बंदी आलीच, तर पाहायचा राहून जाईल याची भीती वाटत होती हो आणि मग मी हा चित्रपट पाहिलंय असा भाव खात गिरगावात फिरलो.
मध्य आणि उत्तर भारतातील अनेक छोट्या शहरात अनेक मोठ्या चित्रपटांचे राऊंड शो होत. ते रुजलेच होते. विशेषत: ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’चा पब्लिक रिपोर्ट भारी आला रे आला की थिएटरवर गर्दी उसळे आणि कुठे जमलचं तर, रात्री बाराचा अथवा सकाळी सहा वाजल्यापासून शो सुरु. कधी एकदा हा सुपर हिट सिनेमा पाहतोय अशी जबरा वातावरण निर्मिती व्हायची. आपल्या देशात चित्रपट फक्त पडद्यावर राहत नाहीत याचाच हा सज्जड पुरावाच जणू.
विजय कोंडके निर्मित व दिग्दर्शित ‘माहेरची साडी’च्या बाबतीतही पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी हेच घडले. एक शो संपतोय तोच पुढचा असा फंडा आणि अशा क्रेझच्या चौकटीतील बातम्या सिनेमाला आणखीन चर्चेत ठेवत आणि ते योग्यच असते. सिनेमा रिलीज झाल्यावर त्याची जास्त ‘जोरशोरसे’ प्रसिध्दी व्हायला हवी हे सर्वकालीन सत्य आजची चित्रपटसृष्टी जवळपास विसरलीय. (Memories of Movie showtime)
मल्टीप्लेक्स युगात सकाळपासूनच शो सुरु होतात आणि रात्री उशीरापर्यंत असतात. पण त्यातले ‘फर्स्ट शो फर्स्ट शो’चे वातावरण, त्यातले थ्रील आणि शोच्या वेळेतील धक्के हे सगळेच हरवले आहेत. कोणत्याही वेळेचा शो पाहिला तरी काय फरक पडतोय अशा गोष्टीपर्यंत येऊन पोहचलोय.
===============
हे ही वाचा: अर्चना जोगळेकरच्या बाबतीत घडला होता ‘हा’ दुर्दैवी प्रसंग
गंगा जमुना टॉकीज: इथे मराठी चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मोठी बातमी झाली होती कारण …
================
सिनेमाची वेळ काय होती आणि आता काय वेळ आली असे तर नव्हे ना? फिल्मवाल्यांच्या भाषेत सांगायचे तर सिनेमा हिट असेल, तर बोलणार ‘टाईम अच्छा चल रहा है’ आणि सिनेमाला पब्लिकने नाकारले, तर त्यांचे ठरलेले असते, ‘बुरा टाईम चल रहा है…..’ असे काहीही असले तरी कोणावर कशी वेळ आणायची हे पब्लिकच्या हातात असते.