ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
जेव्हा निर्माते स्वतः विचारतात ‘पिक्चर कैसी हैं….?’
शम्मी कपूर, संजीवकुमार, झीनत अमान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ईगल फिल्म या बॅनरखाली निर्माण झालेला एफ. सी. मेहरा निर्मित आणि शम्मी कपूर दिग्दर्शित ‘मनोरंजन’ (१९७४) हा चित्रपट मिनर्व्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता तेव्हाची माझी वेगळी आठवण. (Memories of old movie theatres)
साठीच्या दशकात ‘याssssssहू’ अशी रुपेरी पडद्यावर आरोळी ठोकत आपल्या पडद्यावर नायिकांसोबत अनेक चित्रपटात धसमुसळा प्रणय करणारा ‘नायक’ शम्मी कपूर आता वयपरत्वे एकीकडे चरित्र भूमिका, तर दुसरीकडे चित्रपट दिग्दर्शनात उतरला आहे म्हणून मिनर्व्हा थिएटरवर या पिक्चरचे डेकोरेशन आणि काचेआडची शोकार्ड पाहायला गेलो. चित्रपट संस्कृतीची आणखीन एक वेगळी ओळख झाल्याचा तो क्षण.
त्या काळात दक्षिण मुंबईतील अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृहांवरील नवीन चित्रपटाचे पोस्टर डेकोरेशन पाहण्याची एक संस्कृती होती अथवा क्रेझ होती. अशा अनेक प्रकारच्या लहान मोठ्या गोष्टींनी आपल्या देशात चित्रपट रुजवला/वाढवला/पसरला. मी स्वतः सत्तरच्या दशकात याच कल्चरचा एक अगदी छोटासा का होईना पण भाग होतो. त्यात नेमका काय आनंद मिळायचा हे आज सांगता येणार नाही. काही गोष्टींचा आनंद फक्त अनुभवायचा असतो. पण अशीही एक गोष्ट चित्रपट पब्लिक कल्चरमध्ये होती.
अशा सवयीनुसार पहिल्या दिवशी सहा वाजताच्या सुमारास मिनर्व्हा थिएटरवर गेलो असता अपेक्षेप्रमाणे हार घातलेला ‘हाऊसफुल्ल’चा फलक होता. थिएटर डेकोरेशन आणि बाहेरच्या बाजूला लावलेली शो कार्ड्स बघत असतानाच ‘फस्ट डे फर्स्ट शो’ सुटला आणि चेहरा पडलेल्या अवस्थेत प्रेक्षक बाहेर पडताना दिसले. अशातच बाहेर उजव्या आणि डाव्या बाजूला काही अंतरावर दोघे तिघे जण बाहेर पडत असलेल्यांना विचारत होती, “पिक्चर कैसी हैं… कैसी लगी पिक्चर….” आणि या प्रश्नांवर उत्तरं मिळत होती, “बेक्कार है…. बोअर करती है…. शम्मी कपूर सटीया गया है…. झीनत अमानने तो पुरा एक्पोज किया है…”
माझ्यासाठी हा अनुभव नवीन होता. अशा पब्लिक काॅमेन्टसप्रमाणे ‘मनोरंजन’ फ्लाॅप झाला आणि तीन दिवसांतच त्याची करंट बुकिंगची खिडकी उघडली आणि मग चारच आठवड्यात चित्रपटाने गाशा गुंडाळला. ज्युबिलीच्या काळात चारच आठवडे मुक्काम म्हणजे एखादा क्रिकेट संघ वीस षटकात अडिचशे धावा कुटत असताना महत्त्वाचा फलंदाज चारच धावांवर बाद होणं. तरी बरं एफ. सी. मेहरा आणि शम्मी कपूर या मिनर्व्हा थिएटरचे मालक होते. पण पब्लिकच्या कौलपुढे मालक तरी काय करणार? चित्रपटांच्या जगात ‘पब्लिक कौल’ सर्वात महत्त्वाचा. त्याला आजच्या काळातील उत्पन्नाचे खरे / खोटे आकडेही बदलू शकत नाहीत. (Memories of old movie theatres)
या प्रत्यक्ष अनुभवापर्यंत मी तेव्हाच्या वृत्तपत्र, सप्ताहिकांत अनेकदा वाचलं होतं की, राज कपूर अभिनित आणि दिग्दर्शित सर्वकालीन बहुचर्चित ‘मेरा नाम जोकर’ (१९७० या चित्रपटाचा नाॅव्हेल्टी थिएटरमधील पहिला शो सुटल्यावर बाहेर पडताना पब्लिकने प्रचंड ‘हुर्ये’ उडवली आणि मग ‘जोकर पडला..पडला’ अशी जोरदार आवई उठवली. इतकंच नाही तर, सेकंड शोची अनेक तिकिटं जाणीवपूर्वक स्वस्तात विकून चित्रपट पडला यावर शिक्कामोर्तब केले वगैरे वगैरे. चित्रपट पाडण्याच्या ‘अनधिकृत’ पध्दती यावर पुन्हा कधी तरी लिहिनच, पण ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ पाहून बाहेर पडलेल्या पब्लिकला ‘पिक्चर कैसी हैं’ हे विचारणेही भारी रंजक आहे.
मीही त्यानंतर काही मोठ्या चित्रपटांच्या वेळी अशी ‘टेस्ट’ घेतली. सुदैवाने गिरगावात राहत असल्याने त्या काळातील मेन थिएटर फंडा परिचित होता. मग कधी अलंकार थिएटरला मुकद्दर का सिकंदर, लावारीसच्या वेळी, कधी मिनर्व्हा थिएटरवर शोले, आझाद, शानच्या वेळी, कधी नाॅव्हेल्टी थिएटरवर मेहबूबा, क्रोधीच्या वेळी, तर कधी शालिमार थिएटरवर पापी चित्रपटाच्या वेळी असा पहिला शो संपायच्या वेळी गेलो आणि उगाच आपलं चार पाच जणांना विचारलं, “पिक्चर कैसी लगी?” (Memories of old movie theatres)
तेव्हा मी हे का करायचो हे नेमके सांगता येणार नाही. ‘स्टाॅलचा मी हुकमी पब्लिक’ असल्याने कदाचित ही गोष्ट माझ्यात रुजली असेल. पण कालांतराने चॅनलच्या युगात विशेषतः न्यूज चॅनल अशा पध्दतीने ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ पाहून बाहेर पडत असलेल्या पब्लिकला काॅमेन्टस विचारु लागली आणि त्याच्या न्यूज होऊ लागल्या तेव्हा मला वाटू लागले. आपण हे तर ‘पब्लिक’ म्हणून केले. याचाच अर्थ पत्रकार होण्यासाठी लागणारे कौशल्य आणि गुण माझ्यात अगोदरपासूनच होते. एक प्रकारची माझ्यात दूरदृष्टीच होती. मी मिडियात आल्यावर ‘पिक्चर कैसी हैं’ हे कसे अनुभवले? आता या ‘खेळाची दुसरी बाजू’ पाहू लागलो.
अमिताभ बच्चनची जबरा भूमिका असलेल्या प्रयाग राज दिग्दर्शित ‘गिरफ्तार’ (१९८५) चित्रपटाचे आम्हा सिनेपत्रकाराना इंपिरियल थिएटरचे बाल्कनीचे तिकीट दिले होते. आम आदमीसोबत आम्ही हा चित्रपट पाहून समिक्षा करावी असा सरळ हिशोब होता. तोच योग्य असतो. आता मी समिक्षक असलो, तरी अशा पध्दतीने हाऊसफुल्ल गर्दीत चित्रपट एन्जाॅय करायला मला आवडत होतं. तीच माझी सवय होती. (Memories of old movie theatres)
‘गिरफ्तार’ संपला. बाल्कनीच्या बाहेर पडलो तोच निर्माता एस. रामनाथन ‘कैसी हैं पिक्चर’ अथवा ‘पिक्चर कैसी लगी’ असे जमेल तेवढ्यांना विचारत होते. माझ्यासाठी हा अनुभव अगदी वेगळा होता. ज्याचा चित्रपट तोच आपल्या चित्रपटाचा ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’चा पब्लिक रिपोर्ट जाणून घेण्यास असा उत्सुक आहे हे विशेषच होतं. आणि ‘चित्रपट बरा आहे’ अशी प्रतिक्रिया आल्यामुळे एस. रामनाथन खुलले होते. पब्लिकसोबत आम्ही समिक्षकही याच शोला आहोत, हे त्यांना माहीत होतं की नाही याची कल्पना नाही. पण आपल्या चित्रपटाच्या भवितव्याबद्दल ते जागरुक दिसले.
सिनेमाच्या जगात असेही काही घडत असतं याची मला कल्पना आल्यानं मी आता एखाद्या चित्रपटाचा मिनी थिएटरमध्ये आम्हा सिनेपत्रकारांसाठी वेगळा शो न करता आम्हाला ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’च्या वेळी पब्लिकसोबत चित्रपट बघताना मी जागरुक राहू लागलो. पुन्हा पुन्हा असा अनुभव येत राहिल याची मला खात्री वाटू लागली. आणि ‘गंगा जमुना सरस्वती’ (१९८८) या चित्रपटाच्या वेळी मेट्रो थिएटरमध्ये असा अनुभव आला. एस. रामनाथन निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन मनमोहन देसाईंचे होते. ‘अमर अकबर ‘ॲन्थनी’पासून मनजी आणि अमिताभ बच्चन हिट जोडी. मनाजींनी पडद्यावर कितीही अतिरंजितपणा अथवा अतिशयोक्ती केली तरी अमिताभमुळे ते पाहणे सुसह्य व्हायचे. पण यावेळी ‘कुछ तो गडबड हुई है’, असं अगोदरपासूनच फिल्मी वातावरण होतं. मनजनींनी तर आपल्या दिग्दर्शनातील हा शेवटचा चित्रपट अशी अगोदरच घोषणा केली होती. चित्रपट पूर्ण होऊन पडद्यावर येईपर्यंत का कोण जाणे चित्रपटाबद्दल फारसं आशादायक वातावरण नव्हतं. म्हणूनच की काय आम्हा सिनेपत्रकारांसाठी मेट्रो थिएटरमध्ये पब्लिकसोबत ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’चं तिकीट दिलं. चित्रपटामध्ये कुठेच ‘मनजी टच’ दिसत नव्हता. आणि मध्यंतरमध्ये चक्क मनजी आपला मुलगा केतन देसाईसोबत आम्हा सिनेपत्रकाराना आवर्जून भेटायला आले. तेव्हा त्यांना तेच जाणून घ्यायचं होतं, “पिक्चर कैसी हैं….” अर्थात त्यांना उत्तर देण्यापेक्षा फक्त हाय हॅलो करणं आणि समोसा खाणं जास्त महत्त्वाचं होतं. (Memories of old movie theatres)
ऋषि कपूर दिग्दर्शित ‘आ अब लौट चले’ (१९९९) चित्रपटाच्या वेळीही आम्हा सिनेपत्रकाराना मिनर्व्हा थिएटरची पहिल्या दिवसाची, पहिल्या खेळाची पब्लिकसोबतची बाल्कनीची तिकिटं दिली होती आणि मध्यंतरमध्ये चक्क शशी कपूर आपल्या पुतण्याच्या पिक्चरवर पब्लिक कसे रिॲक्ट होतंय हे पाहायला आला होता, हे तो मिनर्व्हात ऑफिसबाहेर येताच लक्षात आले. यावेळी तो आम्हा समीक्षकांना भेटला तेव्हा त्याला ‘पिक्चर कैसी हैं…?’ याचाच ‘फर्स्ट हॅन्ड रिपोर्ट’ हवा होता.
पूर्वी असे नवीन चित्रपटाचे मेन थिएटर आणि तेथील पहिल्या शोच्या वेळचा पब्लिक रिपोर्ट हा एक प्रकारचा बॅरोमिटर होता. तेव्हाची ती रुळलेली, रुजलेली आणि महत्त्वाचं म्हणजे विश्वासाची अशी ‘फिल्मी संस्कृती’ होती आणि त्यात तत्थ होतं. तुम्ही चित्रपती व्ही. शांताराम यांचे ‘शांतारामा’ हे आत्मचरित्र वाचलं, तर लक्षात येईल की, ते स्वतः पन्नास साठच्या दशकात आपला चित्रपट प्रदर्शित केलेल्या मेन थिएटरवर पहिल्या खेळाला आवर्जून हजर राहून प्रेक्षकांना आपला चित्रपट आवडतोय की नाही, त्यांना एखादे दृश्य कंटाळवाणे वाटतंय का, याचा अंदाज घेत, त्या गोष्टी जाणून घेत. व्ही शांताराम यांच्या चौफेर यशात हाही गुण महत्वाचा. (Memories of old movie theatres)
कालांतराने मेन थिएटरवरचा हा फंडा हळूहळू मागे पडत गेला आणि जुहूच्या चंदन टाॅकीजचा पहिल्या दिवसाच्या तीनही खेळाचा पब्लिक रिपोर्ट आता बॅरोमिटर होत गेला. ज्याचा चित्रपट त्याचे निर्माते, दिग्दर्शक आणि त्यांची टीम आता एकत्र येऊन चित्रपट पाहू लागली. आणि त्या शोचा पब्लिक रिस्पॉन्सवरुन आता अंदाज बांधला जाऊ लागला.
=========
हे देखील वाचा – जेव्हा इंग्रजी चित्रपटांचे थिएटर असणाऱ्या मेट्रो थिएटरमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित होतो…
=========
नवीन शतकाच्या पहिल्या दशकात मल्टीप्लेक्स कल्चर आले आणि ‘पिक्चर कैसी हैं ‘ हे विचारणेही हरवले. अचानक लुप्त झाले. पूर्वी सिनेमा पाहून थिएटरबाहेर पडणारा रसिक स्वतःपुरता म्हणा अथवा आपल्या मित्र वा कुटुंबात कळत नकळतपणे व्यक्त व्हायचाच आणि त्यातच जर कोणी विचारलं, “कैसी हैं पिक्चर….”. आता सुपरहिट चित्रपट संपून बाहेर पडत असलेल्या रसिकांना मोबाईल महत्त्वाचा वाटतो, कार पार्किंगमध्ये जाणं महत्त्वाचं वाटतं.
या सगळ्याचे कारण म्हणजे, आता चित्रपट पडद्यावर ठेवूनच रसिक बाहेर पडत आपापल्या कामाला लागतात. वाटलंच तर सोशल मिडियात पोस्ट लिहितात. ‘पिक्चर कैसी हैं…?’ असं आता कोणी विचारत नाही. खुद्द चित्रपटवाल्यांनाही त्याच्याशी फारसं घेणं देणं दिसत नाही. कारण, पहिला दिवस संपतोय तोच पहिल्या दिवशी किती कोटी कमावले याची बातमी द्यायची घाई असते. त्या मोठ्या आकड्यात ‘पिक्चर कैसी हैं…?’चा टच नाही, आपुलकी नाही अथवा उत्सुकताही नाही.