मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
इंग्रजी सिनेमांचं सुटाबुटातील रिगल थिएटर
प्रत्येक काळात मुंबईतील तर झालेच, पण देशातील विविध भागातील पालक आपल्या पाल्याला मुंबईतील ‘भारताचे प्रवेशद्वार’ अर्थात गेट वे ऑफ इंडिया पाहण्यास आणणारच, मुंबई दर्शनची पिकनिकही येथे येतेच. इंग्रजकालीन महत्त्वाचे ऐतिहासिक स्थळ. लहानपणी आम्हा भावंडांनाही आमचे आई बाबा येथे एखाद्या संध्याकाळी फिरायला आणत तेव्हा म्युझियमला ६५ अथवा ६९ क्रमांकाच्या बेस्ट बसने उतरल्यावर समोरच्या इंग्रजी चित्रपटाच्या पोस्टरकडे हमखास लक्ष जाई आणि मग समजले, हे मुव्ही थिएटर आहे. नाव ‘रिगल’. (Memories of Regal Cinema, Mumbai)
कधीही गेट वे ऑफ इंडियाला फिरायला जावे तर रिगलला इंग्रजी पिक्चर लागलेला असे. थिएटरभोवतीचे वातावरण हायफाय. जवळपास सगळेच चित्रपट रसिक कडक इस्त्रीचे कपडे परिधान केलेले. आमच्या गिरगावातील खोताची वाडीच्या समोरच्याच मॅजेस्टीक आणि जवळच्याच सेन्ट्रल थिएटरबाहेरचे वातावरण मोकळेढाकळे आणि ‘सिनेमा एन्जाॅय करायला आलोय आम्ही’ असे चेहर्यावर भाव असलेले हे पाहायची मला सवय होती. पण रिगल म्हणजे, परीक्षेत पहिला नंबर काढणाऱ्या वर्गातील मुलासारखे टीपटाॅप आणि मला मात्र शाळेत अभ्यासात इंग्लिशमध्ये चाळीस गुण मिळाले तरी भारी वाटे. (त्या काळात एसएसीला पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांला पासष्ट सत्तर टक्के मिळत. सहज माहितीसाठी हो.)
एकतर तेवढ्या बळावर रिगलचा हायफाय इंग्रजी चित्रपट पाहायला न्या, अशी पालकांना सांगण्याची हिंमत नव्हतीच. आपण अभ्यासाव्यतिरिक्त काय वाचतोय, काय गातोय, काय ऐकतोय, कुठे जातोय, शाळेतील मित्र कोण आहेत हे सगळे पालकांना सांगण्याचे ते संस्कारक्षम दिवस होते. काॅलेजला गेल्यावर ती बंधने कमी होत जात
शाळेत असतानाच कमाल अमरोही दिग्दर्शित ‘पाकिजा’ (अशोककुमार, मीनाकुमारी व राजकुमार) मेन थिएटर मराठा मंदिरसह रिगल, सुरेश प्राॅडक्सन्सचा ‘प्रेम नगर’ (राजेश खन्ना व हेमा मालिनी) मेन थिएटर ड्रीमलॅन्डसह रिगल, बासू भट्टाचार्य दिग्दर्शित ‘आविष्कार’ (राजेश खन्ना व शर्मिला टागोर) मेन थिएटर नाॅव्हेल्टीसह रिलीज झाला आणि थिएटर ओळखीचे होईलसे वाटले.
काॅलेजमध्ये असताना बी. आर. चोप्रा दिग्दर्शित बहुचर्चित ‘इन्साफ का तराजू’ (१९८०) पाहायला जायची पहिली संधी मिळाली. रिगलला जातोय म्हणून चपलांऐवजी बूट घालून जायला हवे याकडे लक्ष दिले. त्यामुळे सिनेमात काहीही फरक पडणार नव्हता. राज बब्बर, झीनत अमान आणि मग पद्मिनी कोल्हापूरे यांच्यावर रोजच्याच शोप्रमाणेच रुपेरी अन्याय करणार होता आणि मग चोप्रांच्या दिग्दर्शनीय शैलीतील उलटसुलट दावे प्रतिदावे, डायलॉग असलेला कोर्टरुम ड्रामा असणारच होता. सिनेमा फारच गाजत होते. कुठे कुठे काय काय छापून येई आणि सिनेमा न्यूजमध्ये राही. (आजच्या युगात सिनेमा रिलीज झाला रे झाला की, अनेकदा तरी पब्लिसिटी गायब होते तो विषयच वेगळा.)
इंग्रजी पिक्चरचे थिएटर म्हणजे तिकीट भारीच असणार हे गृहीत धरूनच खिशात आठ आणे जास्त ठेवले. बसचे तिकीट दहा पैसे होते. आणि त्या काळात सुपर हिट पिक्चरचे पंधरा आठवडे झाल्यावर करंट बुकिंगला त्याची तिकीटे मिळत. या अशा सगळ्याचे भान ठेवून पूर्वी सिनेमे पाहिले गेले म्हणून आपल्या देशात चित्रपट खोलवर रुजला. गोष्ट छोटी वाटते पण मोठी आहे. (Memories of Regal Cinema Mumbai)
रिगलचा उच्चभ्रू रसिक वर्ग एखाद्या डायलॉगला टाळ्या मारत असेल ना? माझ्यासारख्या मनमोहन देसाईंचे मसालेदार मनोरंजक चित्रपट एन्जाॅय करुन वाढलेल्याने टाळ्या मारल्या तर चालतील ना? मध्यंतरमध्ये थिएटरबाहेर येऊन दहा पैशाचा वडापाव घेता येईल की, आतमध्ये महागडे वेफर्स फक्त पाहून गप्प राहायचे? त्या काळात अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्स अतिपरिचित झाली असतानाच अशा अपरिचित थिएटरमध्ये जाताना अनेक प्रश्न मनात येणारच. प्रेक्षक असाच घडत असतो. त्याला कसलेही लेक्चर द्यावे लागत नाही.
रिगलवर पोहचलो तेव्हा तिकीट खिडकीवर इंग्लिश बोलून तिकीट घ्यायचे काय हा प्रश्न बोटाने एक असे म्हटल्यावर सुटला. बुकिंग क्लर्क अतिशय सुटाबुटात होताच, पण डोअर्स किपरही सुटाबुटात. आवडलं. भारी वाटले. मला वातावरण नवखे. अतिशय टापटीप असे थिएटर. मुख्य पडद्यावर एक छानसे महागडे आणि स्टाईलीश देखणे कव्हर. त्यामुळेच ते कधी वर जातेय याची उत्सुकता. आजूबाजूला भिंतीवर छान डेकोरेशन. एकूणच रुबाबदार रुपडे. पदोपदी ‘हे इंग्रजी सिनेमाचे थिएटर आहे’ याची जाणीव वाढत होती. अशा पाॅश थिएटरची बाल्कनीही अशीच साॅलीड असणार हे नक्कीच. अखेर पडदा वर गेला आणि स्लाईड सुरु झाल्या त्या इंग्रजीत…. असो. काही जाहिरातपट आणि भारतीय समाचार चित्र (तेही इंग्रजीतील) संपल्यावर मेन सिनेमा सुरु होताच मी पडद्याशी जोडलो गेलो. आणखीन एका थिएटरशी असा परिचय झाला. ते महत्त्वाचे.
रिगलमध्ये पूर्वी हिंदी चित्रपट क्वचितच रिलीज होत. पण ते वैशिष्ट्यपूर्ण असत. सत्यजित राय दिग्दर्शित एकमेव हिंदी चित्रपट ‘शतरंज के खिलाडी’ याच रिगलमध्ये रिलीज व्हावा म्हणून या चित्रपटाचे निर्माते सुरेश जिंदाल यांनी विशेष प्रयत्न केल्याचे वृत्त होते. या चित्रपटाला प्रामुख्याने दक्षिण मुंबईतील एलिट क्लास येईल असाच त्यामागचा विचार आणि विश्वास यात दिसतोय. शशी कपूर व शर्मिला टागोर यांच्या भुमिका असलेला मिडिया आणि राजकारण यांच्यातील नाट्यपूर्ण नातेसंबंधावरचा ‘न्यू दिल्ली टाईम्स’ येथेच मी अनुभवला. ‘आज की आवाज’ वगैरे काही हिंदी चित्रपट रिगलला सूट झाले. थिएटरचे व्यक्तिमत्व आणि चित्रपटाचे स्वरुप यांचा मेळ घातला जाण्याचे ते युग होते. (Memories of Regal Cinema Mumbai)
असे हे इंग्रजकालीन सिंगल स्क्रीन थिएटर. देशातील पहिले वातानुकूलित थिएटर हे सर्वात मोठे वैशिष्ट्य. ऑक्टोबर १९३३ रोजी सुरु झाले. पहिला चित्रपट लाॅरेन अँड हार्डी यांचा ‘द डेव्हिल ब्रदर्स’ थिएटरची मालकी फ्रामजी सिधवा यांची. ते डेकोरेटीव्ह बांधले, चार्ल्स स्टीव्हन्स यांनी. एव्हाना आपल्या देशात चित्रपट बोलायला सुरुवात होवून जेमतेम दोन वर्षे झाली होती. (आपला पहिला हिंदी बोलपट अर्देशीर इराणी दिग्दर्शित ‘आलम आरा’ हा १९३२ साली आला).
कुलाब्यातील थिएटर म्हटल्यावर जशी ऐटीत पर्सनॅलिटी हवे तसेच हे. सुरुवातीस काही मूकपटही रिलीज झाले आणि विदेशी सिनेमांना भरपूर स्कोप मिळाला आणि मग ती खासियतच झाली. अनेक वर्षे येथे वाॅर्नर ब्रदर्स, मेट्रो गोल्डविन मेयर, ट्वेन्थी सेंन्चुरी फाॅक्स या कंपनीचे विदेशी पिक्चर प्रदर्शित होत होते.
फार पूर्वी एकादा बिमल राॅय दिग्दर्शित ‘देवदास’ (१९५८) येथे प्रदर्शित झाल्याचा संदर्भ मिळाला. दिलीप कुमार, वैजयंतीमाला, सुचित्रा सेन यांच्या भूमिका असलेला हा ‘देवदास’ गाजला. कालांतराने रिचर्ड अटनबरो दिग्दर्शित बहुचर्चित चरित्रपट ‘गांधी’ (१९८३) ची इंग्रजी आवृत्ती येथेच सत्तर एमएम स्वरुपात प्रदर्शित झाली आणि उत्तम प्रतिसाद मिळवला. अमोल पालेकर यांचा रहस्यरंजक असा विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित ‘खामोश’ असे काही हिंदी चित्रपट येथे अधूनमधून येत. फार पूर्वी एकदा येथे फिल्म फेअर पुरस्कार सोहळा रंगला. तर २०१५ आणि २०१६ अशी दोन वर्षे येथे ‘मामी’ चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला. एव्हाना पारंपरिक अशी सिंगल स्क्रीन थिएटर्सची आणि मेन थिएटरची संस्कृती कालबाह्य होत गेल्याने रिगलवरची गर्दी दुर्मिळ होत गेली. (Memories of Regal Cinema, Mumbai)
===============
हे ही वाचा: स्वस्तिक सिनेमा – जुन्या काळातील ‘बाल्कनी’ नसलेलं एकमेव थिएटर
सिनेमाच्या खेळांच्या ‘वेळे’च्या आठवणी
=================
अधूनमधून रिगल थिएटर बंद झाल्याची बातमी येते. या सिंगल स्क्रीन थिएटरचे बाह्यरुपडं कायम ठेवून अंतर्गत रचनेत बदल करुन त्यात दोन स्क्रीन करायचीय अशी बातमी असते इतकेच. जवळपास नव्वद वर्षे जुनी तरी मजबूत अशी रिगलची इमारत अतिशय मोक्याच्या ठिकाणी आहेच. पण जुन्या मुंबईची ओळखही आहे.