Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : ‘हे’ मराठी कलाकार झळकणार…९०० कोटींच्या ‘रामायणा’त!

Filmistan Studio : फिल्मीस्तान स्टुडिओत डोकावताना…..

Rinku Rajguru : “आपलं मुळ कधी विसरु नये”; २० वर्षांनी

Ramayana : “काही गोष्टी शब्दांत मांडण्यापलिकडे असतात”;आलिया झाली भावूक!

Aamir Khan च्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर छप्पर

‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम Akshaya Naik चा दमदार कमबॅक; ‘या’

“वारी म्हणजे चालण्याची नाही…आत्म्याला भिडणारी एक यात्रा”; अभिनेता Amit Bhanushali

आषाढी एकादशीच्या दिवशी रंगणार ‘Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar’चा महाअंतिम

Life In A Metro : अनुराग बासू यांना ‘या’ कलाकाराने

Kishore Kumar यांनी गायलेले गाणे काढून तिथे शब्बीर कुमारचे गाणे

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

थिएटरला गर्दीचा वेढा….

 थिएटरला गर्दीचा वेढा….
टॉकीजची गोष्ट

थिएटरला गर्दीचा वेढा….

by दिलीप ठाकूर 27/05/2022

जुन्या सिनेमा टाॅकीजचे फोटो सोशल मिडियावर पाहताना दोन गोष्टी तुमचं लक्ष वेधून घेत असतील. एक म्हणजे, थिएटर डेकोरेशन आणि दुसरं म्हणजे त्या थिएटरला पडलेला गर्दीचा वेढा. पब्लिकला थिएटरमध्ये घेण्यापूर्वीची प्रचंड गर्दी दिसते. मग एकदा का थिएटरचे मेन गेट उघडले की अक्षरशः झुंडीच्या झुंडीने प्रेक्षक आत शिरल्यावर बाहेर सामसूम होत असेल. असं तुम्हाला वाटेल पण त्यामध्ये पूर्ण तत्थ नाही. (Single Screen Theaters)

अहो, त्या काळात पिक्चर सुरु झाला तरी ‘एक्ट्रा तिकीट’ मिळेल या आशेने अनेक रसिक थिएटरबाहेर थांबत अथवा घुटमळत. आणि अनेकदा ते मिळायचेही! काही फिल्म दीवाने ॲडव्हास बुकिंगला एक दोन  तिकिटे जास्त काढून ठेवत आणि ऐन शोच्या वेळी अशा इच्छुकाला त्याच भावात देत. आपण हाऊसफुल्ल गर्दीचा फायदा उठवत अधिक दराने तिकीट देऊया असे त्यांच्या मनात येत नसे, तर तेव्हा काळाबाजारात अर्थात ब्लॅक मार्केटमध्ये तिकीटे विकणारी जमात वेगळी होती. ती याच गर्दीत ‘बोलो बाल्कनी साडेपाच का सात रुपये’ अथवा यापेक्षा जास्त भावात तिकिटं विकत. 

या सगळ्याच्या गर्दीचे उत्फूर्त वातावरण एक वेगळा अनुभव होता. मी सत्तरच्या दशकात दक्षिण मुंबईतील अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्सबाहेरच्या अशाच गर्दीचा एक भाग होतो. त्या काळात माझ्यासारखे अनेक फिल्म दीवाने चक्क या गर्दीत काही काळ वावरण्याचाही आनंद घेत असत. प्रत्येक वेळी पिक्चर पाहायला थिएटरवर गेलेच पाहिजे, असा त्या काळात नियम नव्हता. ही गर्दी एक प्रकारचे टाॅनिक ठरे. 

थिएटरला गर्दीचा वेढा हा सिनेमा संस्कृतीचा एक महत्त्वाचा फंडा आहे. पण आज तो कालबाह्य झाला आहे. कितीही चकाचक असले तरी आणि शोची वेळ सकाळपासून मध्यरात्रीपर्यंतची कोणतीही असली तरी मल्टीप्लेक्सला सिनेमाला गेल्यावर खरंच तेथे ‘हाऊसफुल्ल’ चा फिल येतो का?

एखादा ‘धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे’ वगळता आता तर ‘पहिले तीनच दिवस’ म्हणजे शुक्रवार, शनिवार आणि रविवार पिक्चर हाऊसफुल्ल असतो. सोमवारपासून गर्दी चक्क ओसरायला लागते. अन्यथा  फक्त आणि फक्त मोठ्या चित्रपटानाच दोन तीन आठवडे हाऊसफुल्ल गर्दी असते. (ताजी उदाहरणे आर आर, पुष्पा, केजीएफ २, भुल भुलय्या २). अन्यथा अनेक चित्रपटांना अगदी शुक्रवारी सकाळी नऊच्या शोपासूनच जेमतेम प्रेक्षक असतात. तरीही अनेक सिनेमा कसे कोण जाणे पण दोनशे तिनशे कोटींचा व्यवसाय कसा करतात.

सत्तरच्या दशकात ‘आठवड्यामागून आठवडे’ सिनेमा थिएटरवरचा तो हार घातलेला ‘हाऊस फुल्ल’चा अभिमान व्यक्त करणारा हुकमी फलक आजही माझ्या डोळ्यासमोर येतो. काय भारी वाटायचं हो! त्या वातावरणातच हा पिक्चर नक्की आवडणार, याची खात्री होत वाटत असे.  

या दशकाची सुरुवात राजेश खन्नाच्या जबरा क्रेझने झाली आणि मग अमिताभ बच्चनची ‘अँग्री यंग मॅन’ची पाॅवरफुल इमेज फोफावली. राजेश खन्नाची क्रेझ तर वय वर्षे सात ते सत्तरच्या वयोगटातील प्रेक्षकांना आपलीशी करणारी. म्हणूनच तर त्याचे तब्बल पंधरा सतरा सिनेमा ओळीने रौप्यमहोत्सवी यश संपादण्यासाठीच जणू प्रदर्शित झाले. 

बहारो के सपने, आराधना, दो रास्ते, इत्तेफाक, खामोशी, आनंद, सच्चा झूठा, अमर प्रेम, आन मिलो सजना, द ट्रेन, हाथी मेरे साथी, मर्यादा, अपना देश, कटी पतंग, अंदाज, बंधन….. मग अजनबी, रोटी, प्रेम नगर, आप की कसम हे सिनेमे अनेक आठवडे हाऊसफुल्ल.  हाच तो काळ होता, सिनेमा रसिक आगाऊ तिकीट विक्रीलाही लांबलचक रांगेत उभे राहण्यातही आनंद मानत. मी देखिल आनंदाने राहायचो. अनेक आठवडे तेव्हा हे लोकप्रिय सिनेमा हाऊस फुल्ल गर्दीत एन्जाॅय केले जात. 

अमिताभ बच्चनचा झंझावातही असाच जबरदस्त. जंजीर (अमिताभ बच्चन या नावाला वजन आले), नमक हराम (हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा राजेश खन्नाचा होता, प्रेक्षकांनी तो पाहिल्यावर अमिताभ बच्चनचा झाला. सिनेमाची दुनिया आणि यश असंच चमत्कारिक आहे… यशाने नाण्याची बाजू बदलू शकते. मूल्य वाढू शकते.), जंजीर, दीवार, शोले, कभी कभी, हेरा फेरी, त्रिशूल, मुकद्दर का सिकंदर, डाॅन, कस्मे वादे, गंगा की सौगंध, खून पसिना, लावारिस, नमक हलाल, कुली, मर्द… पुन्हा पुन्हा चित्रपटगृहावर हाऊस फुल्लचा हुकमी फलक कायम! अशा गोष्टीतही या स्टार्सचे फॅन्स आनंद मानत. थिएटरला गर्दीचा वेढा हा देशाच्या विविध भागातील रियालिटी शो होता. 

रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ (रिलीज १५ ऑगस्ट १९७५) ची यशोगाथा सांगायला हवीच. माझे शालेय वय होते. मिनर्व्हा ‘शोले’ सिनेमाचे मेन थिएटर होते. दिवसा तीन खेळ यानुसार हा सिनेमा ३१ ऑगस्ट १९७८ पर्यंत रोजच हाऊस फुल्ल गर्दीत भरभरुन चालला. कधीही मिनर्व्हावर जावे तर ॲडव्हास बुकिंगचा चार्ट फुल्ल आणि अर्थातच तो शोदेखिल हाऊसफुल्ल. जणू हा फलक फिक्स बसवला होता आणि मिनर्व्हाच्या व्यक्तीमत्वाचा एक भाग झाला होता. 

१ सप्टेंबर रोजी त्याच मिनर्व्हात मॅटीनी शोला हा सिनेमा शिफ्ट केला आणि तेथेही आणखीन दोन वर्षे या चित्रपटाने “हाऊस फुल्ल” यश संपादले. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, पण मिनर्व्हातच किमान पंचवीस वेळा ‘शोले’ पाहणारे अनेक ‘फिल्म दीवाने’ आहेत. इतकंच नव्हे तर, गावावरुन आलेल्या नातेवाईक अथवा पाहुण्यांना खास मिनर्व्हात नेऊन सत्तर एम एम आणि स्टीरिओफोनिक साऊंडमधला ‘शोले’ दाखवणे सामाजिक आणि कौटुंबिक कार्य असे. चित्रपटाशी समाज कशा पद्धतीने जोडला गेला आहे याचे हे उत्तम उदाहरण आहे. एखादा सिनेमा लोकप्रिय ठरतो तेव्हा त्यासह अनेक गोष्टी येतात. रसिकांच्या पुढील पिढीसह त्या रंगतदार गोष्टी आणखीन पुढील पिढीत जात असतात. अनेक चित्रपटांचा असा प्रवास सुरु आहे. (Single Screen Theaters)

त्याकाळात जवळपास सत्तर टक्के सिनेमा यशस्वी होत. विलक्षण सुगीचे दिवस होते ते. कधी संपतील असे वाटत नव्हते. हाऊसफुल्लच्या फलकावर धूळ बसत नव्हती. तोही सतत फ्रेश राहायचा. फ्लाॅप्स चित्रपटांनाही पहिले तीन दिवस थिएटरला गर्दीचा वेढा आणि हाऊसफुल्लचा फलक लाभे. ‘फस्ट डे फर्स्ट शो’चा पब्लिक रिपोर्ट नरम आला की गर्दी ओसरायची. आता अनेक चित्रपटाना पहिल्या दिवशीही पब्लिक नसते इतका आणि असा बेदम मार खातात. आता एस्क्ट्राॅ तिकीट संस्कृतीही लोप पावलीय. एकूणच जीवनशैलीत ‘आपल्यापुरतेच पहावे’ अशी वृत्ती मुरल्याने कोण कशाला जास्तीचे तिकीट काढेल? 

सिनेमा थिएटरवरचा तिकीटाचा काळाबाजारही कालबाह्य झाला आहे. मल्टीप्लेक्सचे दरच इतके आणि असे महागडे आहेत की, पुन्हा जास्त पैसे का द्या? ऑनलाईन बुकिंग असल्याने हल्ली तिकीट खिडकीवर जायची वेळ येत नाही आणि आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला थिएटरवरचा ब्लॅक मार्केटवाला गरजेचा वाटत नाही. (Single Screen Theaters)

कोणाकडे तरी त्याच पिक्चरचे ‘एक्स्ट्राॅ तिकीट’ मिळण्याची जबरी आशा आजच्या काळात नाही. असे काही असते अथवा होते, हे त्यांना माहीत नाही अथवा ते माहिती असणं गरजेचं वाटत नाही. यात समाजातील परोपकारी वृत्ती होती आणि त्याच आशेवर अनेक जण विचारत, एक्स्ट्राॅ है क्या? हीदेखील एक छान संस्कृती होती. 

थिएटरला आलोय तर पिक्चर पाहिल्याशिवाय घरी जाणं या फिल्म वेड्या देशात सहन तरी होईल का? ही पूर्वीची हुकमी संस्कृती आणि मूळ तिकीट दराच्या दुप्पट तिप्पट दरात तिकीट विकत घेणारा वर्ग होता. आणि ब्लॅकमध्ये तिकीटे विकून गब्बर झालेले बरेच जण त्या काळात होते. ती एक समांतर अशी तिकीट विक्री व्यवस्था होती. 

‘शोले’च्या वेळेस मिनर्व्हा चित्रपटगृहावर ब्लॅकमध्ये तिकीटे विकणारे श्रीमंत झाल्याची कथा दंतकथा प्रचलित आहे. अशी तिकीटे विकून आपल्या गावी काही ब्लॅकवाल्यांनी बंगला बांधला. कोणी हाॅटेल टाकले, तर कोणी आणखीन काही केलं. हे सगळं त्या थिएटरवरच्या गर्दीने दिलं. तो वेढा ही तेव्हाची सिनेमा सुपरहिट असल्याची हुकमी खूण होती. (Single Screen Theaters)

आपल्या देशात अशाच थिएटरला गर्दीचा वेढा घातलेल्या वेड्यांनी सिनेमा जगवला, वाढवला, रुजवला. त्यातच थिएटर डेकोरेशन पाहण्यात एक वेगळाच आनंद घेणारे असत. हाऊस फुल्ल गर्दीत सुरु असलेला सिनेमा आपण इतक्यात पाहू शकत नाही. किमान थिएटर डेकोरेशन तरी पाहूया असं त्यांना होई. मी देखिल तेव्हा असं करायचो आणि आमच्या खोताची वाडीतील मित्रांसह ऑपेरा हाऊस, इंपिरियल, ड्रीमलॅन्ड, नाझ, मिनर्व्हा इत्यादी थिएटरवरचे डेकोरेशन पाह्यला जाई.  

काही फिल्म दीवाने नेमक्या सिनेमा शोच्या वेळी गर्दीत उभे राहून ते डेकोरेशन पाहण्यात रस घेत. त्या काळाच्या आठवणी कायमच जपून ठेवलेले सिनेमा रसिक खूप आहेत. ते एव्हाना फ्लॅशबॅकमध्ये गेलेही असतील आणि त्या काळात सिनेमाची गर्दीही कशी एन्जाॅय करायचो या आठवणीत रमले असतील. (Single Screen Theaters)

पूर्वीच्या थिएटरबाहेरच्या हुकमी गर्दीत अनेक प्रकारचे रसिक असत आणि तेव्हाची तीदेखिल एक सिनेमा संस्कृती होती. त्या काळातील ते सिंगल स्क्रीन थिएटर्सला गर्दीचा प्रचंड गराडा पडलेले फोटो आज कमालीचे दुर्मिळ वाटतात, ही गर्दी खरी आहे, हे फोटोही खरेच आहेत, हे आजच्या डिजिटल पिढीला अजिबात खरे वाटणारे नाही. पण तोच अस्सल रियालिटी शो होता. ते फोटो खूप मोठे सत्य सांगताहेत. त्या काळाचा तो भक्कम पुरावा आहे. त्याच विलक्षण गर्दीतून धक्का देत अथवा घेता थिएटरमध्ये शिरण्यात एक प्रकारचे थ्रील असे, रोमांचक वाटे. तेथूनच ‘मनातल्या मनात’ सिनेमा सुरु झालेला असे. प्रत्यक्ष पडद्यावरचा सिनेमा मग सुरु होई…

======

हे देखील वाचा – एकेकाळी परकं वाटणाऱ्या इराॅस थिएटरशी असं जुळलं जवळचं नातं 

======

१९८२ साली देशात रंगीत दूरदर्शन व व्हिडिओ आला आणि सिनेमा थिएटरच्या गर्दीला गळती लागायला सुरुवात झाली. पूर्वीच्या त्या थिएटरबाहेरच्या हुकमी गर्दीत कष्टकरी, श्रमजीवी, कामगार वर्ग, स्वप्नाळू महाविद्यालयीन विद्यार्थी, आशावादी यांचा भरणा अधिक असे. सिनेमा पाहायचा तर गर्दीत आणि गर्दीसोबत हीच तेव्हाची जणू विचारसरणी होती. त्यात भावना होत्या, बांधिलकी होती आणि स्वप्नेही होतीच! 

सगळी सुखं दुःख विसरुन पडद्यावरच्या सिनेमात तेव्हा गुंतत गुरफटत जाणं जणू आयुष्याचा एक भाग होता आणि तेव्हा पारंपरिक मसालेदार मनोरंजक सिनेमा ती भावनिक मानसिक गरज पूर्ण करीत. त्याची सुरुवात थिएटरला पडलेल्या गर्दीच्या वेढ्यात आपणही एक आहोत, या आनंदाने होई. कोणी त्याला सिनेमा वेड्यांचा वेढा असेही म्हणतील त्यात गैर काहीच नाही.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Bollywood Celebrity Entertainment
Previous post
Next post

1 Comment

  • Shirish Waghmode says:
    27/05/2022 at 9:29 pm

    आठवणींचा श्रावण बरसू लागला.12 चा शो हाऊसफुल झाला तर दोन वीर खिडकी चं रक्षण(आरक्षण) करत थांबयचे,आणि बाकी आळीपाळीने जेऊन खाऊन यायचे,—-आणि 3 चा शो बघून घरी जायचे .

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.