स्वस्तिक सिनेमा – जुन्या काळातील ‘बाल्कनी’ नसलेलं एकमेव थिएटर
गजबजलेल्या वस्तीत एखादे टुमदार, शांत, आखीव रेखीव, जुन्या वास्तू कलेची छान ओळख करुन देणारे असे चित्रपटगृह म्हणजे स्वस्तिक. नावातच एक पारंपरिक लूक सुचित होतो. सिनेमा संस्कृतीतील हाही एक महत्वाचा घटक. दक्षिण मुंबईतील अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्सपैकी स्वस्तिक हे एक. काही वर्षांपूर्वी या थिएटरवरही ‘पडदा’ पडला. (Memories of Swastik Cinema)
गिरगाव, खेतवाडी, ऑपेरा हाऊस, डाॅ. भडकमकर मार्ग, ग्रॅन्ट रोड या परिसरातील पन्नाशी/ साठी ओलांडलेल्या चित्रपट रसिकांच्या डोळ्यासमोर एव्हाना ‘स्वस्तिक सिनेमा’ची इमारत आली असेलच. या परिसरात इम्पिरियल थिएटर, नाझ आणि स्वस्तिक सिनेमा हे सख्खे शेजारी. एका बाजूला जवळच ड्रीमलॅन्ड थिएटर, तसेच नाॅव्हेल्टी, अप्सरा, मिनर्व्हा, शालिमार, सुपर थिएटर तर, दुसरीकडे पहावे तर ऑपेरा हाऊस, राॅक्सी, सेन्ट्रल (फार पूर्वी मॅजेस्टिक सिनेमा) म्हणजे ‘सिनेमा पाहायची चंगळ’ होती. मेन थिएटरच्या अतिशय खोलवर रुजलेल्या परंपरेतील ही थिएटर्स. यात दक्षिण मुंबईतील आणखीन अनेक पडदा थिएटरचा समावेश होतो. हा सगळा परिसर ‘सिनेमामय’!
मला ‘स्वस्तिक सिनेमा’ सर्वप्रथम माहित झाला तो ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘आनंद’ (१९७१) या चित्रपटाने. सत्तरच्या दशकात शाळा आणि मग काॅलेजमध्ये असलेल्या माझ्या पिढीला राजेश खन्नाने एकेक करत अशा आणखी चित्रपटगृहात पहिलं पाऊल टाकण्याची संधी दिली. असेही त्याचं एक देणं. त्या काळात ‘थिएटरला जायचं आणि सिनेमा पाहून घरी यायचं’ इतकंच काही ‘पडद्याशी नातं’ नव्हतं (जे आज मल्टीप्लेक्स युगात आहे) तर, त्या थिएटरशीही ओळख होई, मग ती वाढत जाई, हळूहळू तेथे कोणत्या स्वरुपाचे चित्रपट पाहायला हवेत याचं समीकरण तयार होई. प्रत्येक सिंगल स्क्रीन थिएटर्सचे व्यक्तिमत्व, तेथील माहौल, तेथील डेकोरेशनची पध्दत वेगळी आहे, हे लक्षात येई आणि मग त्यानुसार तेथे जाणं होई. (Memories of Swastik Cinema)
स्वस्तिकच्या पडद्यावर ‘आनंद’ची थीम जास्तच अस्वस्थ करणारी. “जिंदगी और मौत उपरवाले के हाथ मे है जहा पना, जिसे ना हम बदल सकते ना…” असा जगण्याचं वास्तव सांगणारा राजेश खन्नाचा भेदक संवाद असो अथवा “जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नाही..” असं त्याचं भावपूर्ण सांगणं असो, स्वस्तिकचा पडदाच जणू बोलतोय असं वाटे. चित्रपटगृहाच्या व्यक्तीमत्वाशी चित्रपटाचे व्यक्तीमत्व एकरुप होणं, हे त्याकाळाचं वैशिष्ट्य होतं. स्वस्तिक थिएटरमध्ये आनंद हे समीकरण म्हणूनच जास्त गडद होत गेलं आणि ‘आनंद’ अनुभवायचा तो स्वस्तिकमध्येच असं काहीसं झालं.
मुख्य गेटपासून थोडं आत गेल्यावर स्वस्तिक सिनेमा होता. पण मेन गेटवर त्याचं डेकोरेशन होतं. तशी त्यासाठी अन्य थिएटरपेक्षा जागा कमी होती, तरीही तेवढ्या जागेचा सदुपयोग केला जाई. मुख्य गेटच्या दरवाज्यावर मॅटीनी शोचे भले मोठे पोस्टर. स्वस्तिकशी माझे नाते जुळले ते या मॅटीनी शोने. ते दिवसच वेगळे होते. सतत आठवत राहावेत असे! (Memories of Swastik Cinema)
प्रत्येक शुक्रवारी मॅटीनी शो साठी तेथे साठ आणि सत्तरच्या दशकातील जुने चित्रपट एकेका आठवड्यासाठी रिलीज होत. माझ्यासारख्या सिनेमा व्यसनीसाठी तो जणू खुराक होता. कधी दिलीप कुमार, देव आनंद, राज कपूरचे ब्लॅक अँड व्हाईट काळातील चित्रपट, तर कधी राजेन्द्रकुमार, शम्मी कपूर, राजकुमारचे जुने चित्रपट, तर कधी म्युझिकल रहस्यरंजक चित्रपट…. एक प्रकारे मी बॅकलाॅग भरत होतो. स्वस्तिक थिएटर माझ्यासाठी मॅटीनी शोला जुन्या चित्रपटांची खाण उघडत असे. रविवार सकाळी साडेअकरा वाजता स्वस्तिक थिएटरला भेटूया, मी स्टाॅलचे एक रुपया पाच पैशाचे तिकीट काढून आत जाईन, असे माझ्या एखाद्या मित्राला सांगून ठेवायचो. (Memories of Swastik Cinema)
मिडियात आल्यावर मी एकूणच मनोरंजन क्षेत्राचा खोलवर शोध घेण्याच्या स्वभाव आणि सवयीने चित्रपटगृहांच्या इतिहासात डोकावत असे. अनेकांना माझी ही भटकंती, शोधवृत्ती आणि अभ्यासू दृष्टी म्हणजे वेडेपणा वाटला तरी आज तीच माहिती ‘एक्स्युझिव्हज’ ठरतेय.
स्वस्तिक थिएटरचा फ्लॅशबॅक समजताना तो रंजक आणि इंटरेस्टींग वाटू लागला. स्वस्तिक म्हणजे फार पूर्वीचे पाथे (Pathe) थिएटर. इंग्रजांच्या काळात म्हणजे १९३० साली ते सुरु झाले. तेव्हा अगदी जुन्या पठडीतील होतं आणि तसं ते असणं स्वाभाविकच होतं. साठच्या दशकात ते पाडून नवीन इमारत उभी राहिली आणि त्याचं नाव स्वस्तिक असं ठेवलं. तरीही ते काहीसं जुन्या वळणाचंच. जे मी अनुभवलं. (Memories of Swastik Cinema)
समोरच एका बाजूला करंट बुकिंगची खिडकी, तर आतल्या बाजूला ॲडव्हास बुकिंगची खिडकी. थिएटरच्या उजव्या बाजूला स्टाॅलच्या तिकीटासाठी खिडकी. अर्थात स्टाॅलचे तिकीट शोच्या वेळी मिळे. पण पब्लिकने डोक्यावर घेतलेल्या चित्रपटाचे तिकिटं ॲडव्हास बुकिंगलाच काढावी लागत. मॅटीनी शोचा एकूणच मामला करंट बुकिंगचा आणि रविवार म्हणजे मॅटीनी शोला हमखास गर्दी म्हणजे भली मोठी रांग. पण त्याची इतकी आणि अशी सवय लागली की, सिनेमाला रांग नसेल, तर “पिक्चरमध्ये दम नाही” असं मनात येई.
स्वस्तिकचे सर्वात मोठं वेगळेपण म्हणजे बाल्कनी नसलेलं त्या काळातील ते एकमेव थिएटर! स्टाॅल, अप्पर स्टाॅल आणि महत्त्वाचं म्हणजे मागच्या बाजूला आठ बाॅक्स. प्रत्येक बाॅक्स चार सीट्सचा. म्हणजे छोट्या कुटुंबासाठी ते होते. स्वस्तिकमध्येही त्या काळानुसार काचेआडची शोकार्ड्स पाहायला मिळत आणि अमूक फोटो म्हणजे काय बरं दृश्य असेल, याबाबत उत्सुकता वाढे.
स्वस्तिक हे कायमच सामाजिक, पौराणिक आणि मारधाड या तीन प्रकारच्या चित्रपटांसाठी ओळखले जाई. चित्रपती व्ही. शांताराम यांचा ‘शकुंतला’ या चित्रपटाने येथे घवघवीतपणे बावन्न आठवड्यांचा मुक्काम केला होता. स्वस्तिकचे आणखीन काही चित्रपट सांगायचे तर, श्री 420, भाभी, कठपुतली, मनमौजी, अब क्या होगा, मनोकामना, गहरी चाल, आखरी डाव, सुनहरा संसार, एक ही रास्ता, ऑखो ऑखो मे, बंदगी, फिर कब मिलोगी, अतिथी, थोडी सी बेवफाई, मास्टरजी … यातील काही चित्रपट पडले, तर काहींनी खणखणीत रौप्यमहोत्सवी यश संपादन केलं.
राजश्री प्रॉडक्शनच्या हीरेन नाग दिग्दर्शित ‘गीत गाता चल’ हा चित्रपट सुरुवातीला मुंबईत फक्त आणि फक्त मेट्रो थिएटरमध्ये रिलीज केला आणि मग तो लोकप्रिय होऊन दहा आठवड्यांची यशस्वी घौडदौड झाल्यावर याच स्वस्तिक व अन्य थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि रौप्यमहोत्सवी यश संपादले. हा सचिन पिळगावकरचा वयात आल्यावरचा नायक म्हणून पहिला चित्रपट आणि नायिका होती सारीका. (Memories of Swastik Cinema)
स्वस्तिकमध्ये फार पूर्वी मराठी चित्रपटही प्रदर्शित होत. भालजी पेंढारकर दिग्दर्शित छत्रपती शिवाजी, शिलंगणाचे सोने, मीठ भाकर, मी दारु सोडली तसंच दिनकर द. पाटील दिग्दर्शित राम राम पाव्हणं, असे काही मराठी चित्रपट स्वस्तिक थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. गिरगावातील मराठी माणसांना स्वस्तिक अगदी जवळचं होतं. कालांतराने तेथे मराठी चित्रपट प्रदर्शित होणं दुर्मिळ झालं.
अशा वाटचालीत कालांतराने थिएटरचं मूळ रुप कायम ठेवून त्यावर भली मोठी इमारत उभी राहिली, स्वस्तिक चेंबर्स या नावाची! त्यात अनेक प्रकारची कार्यालयं सुरु झाली आणि मूळच्या वातावरणात बदल होत गेला. आता थिएटरच्या गर्दीत या कार्यालयांमध्ये येणाऱ्यांची लगबगही वाढली. त्याची गर्दी कायम राहिली. चित्रपट ‘हाऊसफुल्ल’ होण्याऐवजी आता कार पार्किंग ‘फुल्ल’ होऊ लागले. अर्थात, कालांतराने मुंबईत जागेच्या किंमती वाढल्याने जुन्या सिंगल स्क्रीनवर पहिली नजर पडली आणि एक वेगळे सांस्कृतिक स्थित्यंतर होत गेलं. कालांतराने मल्टीप्लेक्सचे युग आलं, मेन थिएटरचा हुकमी फंडा इतिहासजमा होत गेला आणि स्वस्तिक थिएटर कधी दुर्लक्षित होत गेलं आणि बंद झाले हे समजलेही नाही. माझ्यासारखे अनेक चित्रपट व्यसनी हळहळलो. (Memories of Swastik Cinema)
========
हे देखील वाचा – जेव्हा निर्माते स्वतः विचारतात ‘पिक्चर कैसी हैं….?’
========
आज या स्वस्तिक थिएटरच्या परिसरातून जात असताना जुने दिवस आठवतात. मॅटीनी शोला पाहिलेले ‘नौ दो ग्यारह ‘, ‘मेरा साया ‘, ‘गुमनाम ‘, ‘बीस साल बाद ‘, ‘मेम साब ‘, ‘जंगल मे मंगल ‘ असे अनेक चित्रपट आठवतात. तेवढंच आता शक्य आहे. थिएटर बंद झालं तरी चित्रपट संपत नसतो आणि तीच तर आपल्या देशातील चित्रपट संस्कृतीची मोठीच ताकद आहे आणि ती कायमच राहणार. चित्रपटगृहाचा इतिहास लिहिताना आणि अभ्यासताना हे जास्त महत्वाचे आहे. एकपडदा चित्रपटगृहांचे रसिकांना आणि चित्रपटसृष्टीला खूपच मोठं देणं आहे आणि त्यात स्वस्तिक थिएटरचाही वाटा आहे.
1 Comment
Athi uttam lekh dilip bhau