संगीत जगतातील भारतामधील पहिला रियालिटी शो – मेरी आवाज सुनो
सध्या सर्वच चॅनेल्सवर वेगवेगळ्या प्रकारचे ‘रियालिटी शोज’ सुरु असतात. त्यामध्ये स्पर्धकांचे गुणदर्शन कमी आणि मेलोड्रामा जास्त बघायला मिळतो. पण पूर्वी मात्र असं नव्हतं. मुळात ‘रियालिटी शो’ हा शब्दच तेव्हा प्रसिद्ध नव्हता. सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरांत असे कार्यक्रमही मालिकांप्रमाणेच पहिले जात. त्यांचं स्वरूपही अगदी साधं सरळ होतं. सूत्रधार, स्पर्धक आणि परीक्षक या तिघांभोवतीच हा कार्यक्रम फिरत असे. यापैकी कोणाच्याच वैयक्तिक आयुष्याशी ना चॅनेलला काही देणं घेणं होतं ना प्रेक्षकांना. खरंतर, ही आठवणीतली मालिका म्हणता येणार नाही कारण ही मालिका नव्हती, तर गाण्याचा रियालिटी शो होता. याला भारतामधला संगीत जगतातील पहिला रियालिटी शो म्हणता येईल. हा कार्यक्रम दूरदर्शन वाहिनीवर प्रसारित केला जात असे. कार्यक्रमाचं नाव होतं ‘मेरी आवाज सुनो (Meri Awaz Suno)’.
१९९६ साली सुरु झालेल्या ‘मेरी आवाज सुनो’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं केवळ मनोरंजनच केलं नाही तर, सामान्य जनतेला टेलिव्हिजन स्क्रीनचा भाग व्हायची संधीही उपलब्ध करून दिली. शिवाय इंडस्ट्रीला अन्नू कपूर सारखा गुणी कलाकारही मिळाला. त्यावेळी टेलिव्हिजन स्क्रीन हा विषय सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय होता. त्यामुळे या कार्यक्रमाला स्पर्धक आणि प्रेक्षक दोघांचाही भरभरून प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं अन्नू कपूर यांनी तर, लता मंगेशकर, मन्ना डे, जतीन -ललित, अनुप जलोटा, इ. संगीत जगतातील अनेक नामवंत परीक्षक या कार्यक्रमाला लाभले होते. या मोठ्या मान्यवर व्यक्तींचं दर्शन सुद्धा जिथे दुर्मिळ होतं तिथे त्यांना छोट्या पडद्यावर का होईना, पण पाहता येईल म्हणून सर्वसामान्य प्रेक्षक हा कार्यक्रम आवर्जून बघत असत. शिवाय स्पर्धकांनाही या महान गायकांना भेटायची त्यांच्यासमोर स्वतःची प्रतिभा सिद्ध करायची संधी मिळत असल्यामुळे त्यांच्यामध्येही अत्यंत उत्साहाचं वातावरण होतं.
आजच्या रियालिटी शोच्या तुलनेत या कार्यक्रमाचे स्वरूप थोडं वेगळं होतं. कार्यक्रमाची सुरुवात अन्नू कपूरच्या गाण्याने व्हायची. त्यानंतर तो परीक्षकांची ओळख करून देत असे. यानंतर सहभागी स्पर्धक स्वतः आपली थोडक्यात ओळख करून देत असत. (Memories of Tv show Meri Awaz Suno)
या कार्यक्रमामध्ये एकूण तीन फेऱ्या होत असत. पहिल्या फेरीत प्रत्येक स्पर्धक त्याच्या आवडीचे गाणं म्हणत असे. यामध्ये भावगीत, भक्तीगीत, गझल, शास्त्रीय किंवा कोणत्याही प्रकारातलं गाणं गायची मुभा स्पर्धकांना होती. दुसऱ्या फेरीत गाण्याची क्लिप दाखवून त्यासाठी गाणं म्हणायचं होतं. ‘प्ले बॅक सिंगिंग’ सारखीच ही फेरी होती. यामध्ये कोणत्याही प्रसिद्ध गाण्याची मूव्ही क्लिप दाखवली जात असे आणि त्यावरून गाणं ओळखून ते स्पर्धकांना म्हणावं लागे. यामध्ये स्पर्धकांचा खरा कस लागत असे. तर, तिसऱ्या आणि अंतिम फेरीमध्ये स्पर्धकांना एक विषय दिला जात असे आणि त्यानुसार गाणं म्हणायला सांगण्यात येई. उदा. जर सूत्रसंचालकाने गझल गायला सांगितली, तर स्पर्धकाला गझल गायला लागत असे, जर विरहगीत सांगितलं असेल, तर विरहगीत गायला लागत असे.
या तिन्ही फेऱ्यांनंतर परीक्षक आपला निर्णय देत असत. ‘परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील..’ अशी सूचना न लिहिताही तोच निर्णय अंतिम असे. फोन करून ‘वोटिंग’ करणं, ‘एसएमएस वोटिंग’ हे प्रकारच नव्हते. मुळात तेव्हा मोबाईल फोन अस्तित्वातच नव्हते, तर लँडलाइनही ठराविक लोकांच्या घरी उपलब्ध असे. घरात फोन असणं हे श्रीमंतीचं प्रतीक समजलं जात असे.
परीक्षकांच्या बाबतीत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक भागासाठी वेगळा परीक्षक असत. स्पर्धक कुठे राहतो, काय खातो, काय काम करतो, त्याची स्वप्नं काय आहेत यापैकी कशाचीही माहिती ते घेत नसत. त्यांचा निर्णय फक्त आणि फक्त स्पर्धकाच्या सादरीकरणावर ठरत असे. शिवाय प्रत्येक भागात वेगळे परीक्षक असल्यामुळे प्रत्येकाची वेगवगेळी मतं ऐकायला मिळत असत. (Memories of Tv show Meri Awaz Suno)
===============
हे ही वाचा: किशोरदांच्या तऱ्हेवाईक वागण्यामुळे निर्मात्याने घेतली होती कोर्ट ऑर्डर…
================
कसला आरडाओरडा नाही, रडारड नाही, मेलोड्रामा तर नाहीच नाही. प्रत्येक स्पर्धक फक्त आपल्या सादरीकरणावर लक्ष केंद्रित करत असे. हरल्यावर दुःख होत असे, पण त्याचं भांडवल केलं जात नसे आणि जिंकल्यावरही विजेत्यांचे पाय जमिनीवच राहत असत. चुकून कधी विवादित प्रसंग उद्भवलाच तर अन्नू कपूर प्रसंगावधान दाखवून सांभाळून घेत असे.
सुरेल गाण्यांची नितांतसुंदर मैफिल म्हणजे ‘मेरी आवाज सुनो’ अशी या कार्यक्रमाची एका वाक्यात व्याख्या करता येईल. या संगीत मैफिलीचा आस्वाद मात्र आता पुन्हा घेता येणार नाही कारण हा कार्यक्रम कुठेच उपलब्ध नाहीये.