मेरे नैना सावन भादो….
भारतीय सिनेमाच्या सत्तरच्या दशकाचा पूर्वार्धावर राजेश खन्ना भाऊ पाध्येंच्या भाषेत सांगायचं तर ’कंप्लिटली छा गया था’. एका पाठोपाठ तब्बल १८ ब्लॉक बस्टर आणि १५ सुवर्ण महोत्सवी सिनेमे देणारा काका ग्रेट च होता. राजेश – किशोर कुमार – आर डी बर्मन या त्रयींचा हंगामा जबरदस्त होता. या त्रयींच्या एका गाण्याचा किस्सा ऐकण्यासारखा आहे. १९७६ साली त्याचा एक सिनेमा आला होता, शक्ती सामंताचा ’महबूबा’. यात पंचमने एक गाणं लताच्या आवाजात रेकॉर्ड केलं जे शिवरंजनी रागावर आधारीत होतं. गीताचे बोल होते ’मेरे नैना सावन भादो फिर भी मेरा मन प्यासा’. सिनेमा पुनर्जन्मावर आधारीत होता त्यामुळे हेच गाणे त्यांना नायकावर देखील चित्रित करावयाचे होते. शिवरंजनी रागावर आधारलेले हे शास्त्रोक्त गाणं गायचं सोपं काम नव्हतं. गाण्यात एका ठिकाणी ’बीते समय की रेखा….’ च्या वेळी स्वर अगदी टिपेला पोचतो आणि लगेच अत्यंत सावध व शांतपणे ’मैने तुमको देखा..’ स्वर स्थिरावतो. स्वरांचा हा खेळ करायला तितकाच ताकतीचा गायक हवा होता. गाणं साहजिकच किशोरदा कडे आलं. किशोरने नम्र पणे गाणं गायला नकार दिला. त्याच्या मते हे गाणं मन्ना डे किंवा रफीने गावं. पण पंचमला हे गाणं त्याच्याकडूनच गाऊन घ्यायचं होतं.
पंचमने लताच्या स्वरातील गाणं किशोरला देवून सराव करायला सांगितले. किशोर नाखुशीनेच गाण्याची प्रॅक्टीस करू लागला. जवळपास पंधरा दिवसांनी रेकॉर्डींग ठरले. किशोर अजूनही नर्व्हसच होता. रेकॉर्डींगला दस्तुर खुद्द शक्ती सामंत उपस्थित होते. किशोरवर आणखी दडपण वाढले! पण काही कारणाने शक्तीदा स्टुडिओ बाहेर पडले. किशोरने बंगालीतून पंचमला विचारले ’दादा चले गये क्या?’ पंचमने बंगालीतूनच उत्तर दिले ’हॉं’. लगेच रेकॉर्डींगला सुरूवात झाली आणि काय आश्चर्य विदाऊट रिटेक गाणं रेकॉर्ड झालं सुध्दा! गंमत म्हणजे हे गाणं लताच्या ’मेरे नैना’ पेक्षा सुपर हिट ठरलं! जे गीत गायला किशोर घाबरत होता ते गाणं त्याच्या ’टॉप टेन’ मध्ये जावून बसलं.
धनंजय कुलकर्णी