Shitti Vajali Re Finale: ‘शिट्टी वाजली रे’ च्या महाअंतिम सोहळ्यात

Happy Birthday Milind Gunaji: ‘भटकंती’मधून अख्खा महाराष्ट्र जगाला दाखवणारा अवलिया ‘मिलिंद गुणाजी’!
आज २३ जुलै, मराठी सिनेमा आणि टीव्ही विश्वातील एक दमदार, हाडाचा कलाकार मिलिंद गुणाजी यांचा वाढदिवस. अनेक चित्रपटांतून आणि भूमिकांतून त्यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं, पण एका खास मालिकेमुळे ते घराघरात पोहोचले ती मालिका म्हणजे ‘भटकंती’. ९०च्या दशकात ‘झी मराठी’ वाहिनीवर वर प्रसारित झालेली ही मालिका म्हणजे केवळ प्रवासवर्णन नव्हे, तर ती एक संवेदनशील, अभ्यासपूर्ण, आणि साक्षर भारतदर्शन होती. त्या काळात इंटरनेट नव्हतं, सोशल मीडिया नव्हता, आणि प्रवासविषयी माहिती मिळवण्याचे स्रोत अत्यंत मर्यादित होते. अशा वेळी ‘भटकंती’ नं महाराष्ट्र, भारत, आणि कधी कधी परदेशातल्या दुर्मीळ स्थळांपर्यंत प्रेक्षकांना घेऊन जाण्याचं कार्य केलं. ‘भटकंती’ ही फक्त प्रवासमालिका नव्हती, ती भाषा, भूगोल, इतिहास आणि संस्कृती यांचा सुरेख संगम होती. मिलिंद गुणाजी यांच्या खर्जातल्या आवाजात, त्यांच्या खास शैलीत, त्या भागाचं वर्णन ऐकताना असं वाटायचं की आपणही त्या ठिकाणी उपस्थित आहोत. त्यांची संवादफेक, प्रत्येक स्थळाशी जोडलेला इतिहास, स्थानिक लोकजीवन, त्या ठिकाणांची लोककथा, श्रद्धा-अंधश्रद्धा… हे सगळं त्यांनी अत्यंत जिव्हाळ्याने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने सादर केलं. आज अनेक YouTube ट्रॅव्हल ब्लॉगर्स किंवा व्हीलॉगर्स जी कामं करतायत, त्याची बीजं भटकंतीनेच त्या काळी रोवली होती.(Milind Gunaji Birthday)

मिलिंद गुणाजी यांनी ‘भटकंती’मधून केवळ स्थानिक स्थळं दाखवली नाहीत, तर त्या स्थळांमागचा इतिहास, भूगोल, संस्कृती आणि तिथली माणसंही समोर आणली. त्यांचा दृष्टिकोन माहितीपूर्ण असतानाच तो आत्मीय ही होता. म्हणूनच ‘भटकंती’ ही मालिका प्रेक्षकांसाठी प्रवासाच्या पुढची गोष्ट ठरली – ती त्यांच्या मनात घर करणारी गोष्ट बनली. आजच्या सोशल मीडियाच्या युगात, जेव्हा व्हिडिओ ब्लॉग, ट्रॅव्हल व्लॉग्स आणि रील्सचा मारा झालाय, तेव्हा ‘भटकंती’सारख्या सिरीयलचा शांत, सुसंस्कृत आणि समर्पक आवाज खरंच खूप मिस करायला होतो. आज जरी YouTube वर हजारो ट्रॅव्हल व्ह्लॉग्स असले, तरी ‘भटकंती’ची ती सुसंस्कृत, सुसंवादात्मक आणि संशोधनाधारित शैली फारशी कुठेच दिसत नाही. त्या मालिकेचं सौंदर्य याच गोष्टीत आहे की तिनं केवळ ठिकाणं दाखवली नाहीत, ती समजून घ्यायला शिकवलं.

ती मालिका आठवली की आठवतं आपण कधी तरी टीव्हीसमोर बसून, एका वेगळ्या जगात प्रवेश केला होता. ज्यात निसर्ग, संस्कृती आणि इतिहास यांचा सुंदर मिलाफ होता.या मालिकेचं यश मुख्यत्वे मिलिंद गुणाजींच्या अभ्यासू वृत्ती, सादरीकरणाच्या शैली, आणि त्यांच्या आवाजातील ठामपणा यावर उभं होतं. त्यांनी प्रवासवर्णन या प्रकाराला दर्जा दिला, आणि ती एक गंभीर, पण तरीही सुलभ अशा पद्धतीने मांडता येते, हे दाखवून दिलं.(Milind Gunaji Birthday)
===============================
हे देखील वाचा: “स्मिता तळवलकर यांनी ‘त्या’ गोष्टीमुळे मला मालिकेतून काढून टाकल,पण नंतर…” Tushar Dalvi यांनी सांगितला किस्सा!
===============================
आजच्या पिढीने जर कधी ‘भटकंती’चे जुने भाग पाहिले, तर त्यांना कळेल की, आता आहे याहीपेक्षा भक्कम, माहितीपूर्ण आणि प्रामाणिक कंटेंट मराठीत तयार होऊ शकतो. फक्त त्यामागे माणूस आणि मिशन दोन्ही असावं लागतं. २३ जुलै या निमित्ताने, आपण ‘भटकंती’च्या रूपात आपल्याला समृद्ध करणाऱ्या मिलिंद गुणाजी यांचे आभार मानायलाच हवेत. मिलिंद गुणाजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं, ‘भटकंती’सारख्या मालिकेची आठवण फक्त नॉस्टॅल्जियापुरती मर्यादित न राहता, ती नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, असा मन:पूर्वक प्रयत्न व्हायला हवा.आणि अशी मराठी मालिका पुन्हा पहायला मिळावी यासाठी इच्छा व्यक्त करूया!