Prasad Oak : प्रसाद-मंजिरीच्या लग्नात सासूबाई ‘या’ कारणामुळे रडल्या!

श्रिया पिळगांवकर: ‘स्टार’किड नव्हे; ‘स्टार’!
नेपोटीझमकडे अनेकजण त्या त्या क्षेत्राला मिळालेला शाप म्हणून बघतात; मग ते राजकारण असो वा चित्रपटविश्व! नेपो किड्स असले तरीही अश्या सर्व प्रस्थापितांच्या मुलांचं त्यांच्या पदार्पणात एक नवा बदल, नवा विचार म्हणून सगळ्यांकडूनच जंगी स्वागत केलं जातं. कालांतराने सगळेच राजकारणी एकाच माळेचे मणी असल्याचं पदोपदी जाणवतं पण चित्रपटसृष्टीच्या बाबतीत कधीकधी हा शापही वरदान ठरतो आणि काही मौल्यवान हिरे प्रेक्षकांच्या पदरी पडतात. ‘वशिलेबाजीचं प्रोडक्ट’ ही ओळख पुसून आपली नवी ओळख बनवणारी अशीच एक अभिनेत्री- श्रिया पिळगांवकर! (Shriya Pilgaonkar)
सचिन पिळगांवकर, अशोक सराफ, महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी किशोरी शहाणे, निवेदिता सराफ, सुप्रिया पिळगांवकर, आश्विनी भावे आणि प्रिया बेर्डे यांच्यासमवेत मिळून मराठी चित्रपटसृष्टीच्या भरभराटीच्या काळात प्रेक्षकांना चित्रपटरुपी मनोरंजनाची समृद्ध देणगी दिली. लक्ष्मीकांत-प्रिया, अशोक-निवेदिता आणि सचिन-सुप्रिया या रील आणि रिअल लाईफ जोड्यांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं. यांपैकीच एक एव्हरग्रीन जोडी- सचिन आणि सुप्रिया! २५ एप्रिल १९८९ रोजी सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर यांच्या संसारवेलीवर ‘श्रिया’ नावाचं फूल उमललं.

अभ्यास आणि खेळात नेहमीच पुढं असणाऱ्या श्रियाला फिल्मी दुनियेत काडीचाही इंटरेस्ट नव्हता. नाही म्हणायला वयाच्या ५व्या वर्षी वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या ‘तू तू मैं मैं’मध्ये एक छोटीशी भूमिका वगळता लहानपणी आज्जीच्या गोष्टींऐवजी आईवडिलांचे फिल्मी किस्से ऐकणं हाच काय तो फिल्मलाईनशी असलेला तिचा संबंध! तिचं ध्येय आधीच ठरलं होतं. तिने स्विमिंगमध्येच करिअर करायचं ठरवलं होतं आणि जर तेही शक्य झालं नसतं तर विविध भाषांवरील तिचं असलेलं प्रेम हे तिच्यासाठी कित्येक चांगले करिअर ऑप्शन्स घेऊन तिच्यासमोर उभंच होतं. त्यातच तिला एका टप्प्यावर इंग्रजी नाटकांनी भुरळ घातली आणि तिने फिल्ममेकिंग करायचं ठरवलं. आता तिला आईवडिलांकडून ऐकलेल्या किश्श्यांमध्ये नाविन्य वाटू लागलं होतं. पण फक्त किस्से ऐकण्यापेक्षा फिल्ममेकिंगचं तंत्रशुद्ध शिक्षण घ्यायचं तिने ठरवलं आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी हार्वर्ड युनिव्हार्सिटीमध्ये स्क्रीनप्ले अॅडॅप्टेशनच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला.
२०१२ला आलेल्या करण शेट्टी दिग्दर्शित ‘फ्रीडम टू लव्ह’ या नाटकामधून श्रियाने पदार्पण केले आणि या नाटकातलं तिचं कामच तिच्या पहिल्या फिल्मचं ऑडीशन ठरलं. पुढच्याच वर्षी आलेला सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘एकुलती एक’ हा तिचा पहिला मराठी चित्रपट ठरला. वडील दिग्दर्शक असल्यामुळे रोल मिळालाय वगैरे बाजारगप्पांना तिने आपल्या सहजसुंदर अभिनयाने सणसणीत उत्तर दिले. तिने साकारलेल्या स्वराच्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (पदार्पण) हा राज्य पुरस्कारही मिळाला. त्यानंतर तिने एका फ्रेंच चित्रपटातही भारतीय नृत्यांगनेची भूमिका साकारली. या फिल्ममध्ये तिच्या अभिनयाला तिच्या भाषाप्रेमाची आणि कथक नृत्याच्या प्रशिक्षणाची साथ लाभली.

मनीष शर्मा दिग्दर्शित ‘फॅन’मधून तिची बॉलीवूडमध्ये एंट्री झाली. शाहरूख खानच्या या बहुचर्चित चित्रपटात तिची भूमिका छोटी असली तरीही लक्षात राहण्याजोगी होती. तिने साकारलेल्या नेहाच्या भूमिकेचं सर्वांकडूनच कौतुक करण्यात आलं. इंग्लिश नाटकांमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवत असतानाच तिला ‘मिर्झापूर’ या नव्या वेबसिरीजमध्ये काम करण्याची संधी चालून आली. या वेबसिरीजमध्ये श्रियाचा वेगळाच अंदाज सर्वांना दिसला. तिने साकारलेली स्वीटी गुप्ता प्रेक्षकांना विशेष भावली. पहिल्याच सिझनमध्ये जरी हे पात्र प्रेक्षकांचा निरोप घेत असलं तरी ते सहजासहजी प्रेक्षकांच्या मनातून बाहेर निघत नाही.
‘मिर्झापूर’नंतरही श्रिया बऱ्याच वेगवेगळ्या शॉर्ट व्हिडीओजमधून आणि वेबसिरिजेसमधून प्रेक्षकांना भेटत राहिली. त्यापैकी विशेष उल्लेखनीय सिरीजेस म्हणजे ‘हाऊस अरेस्ट’, ‘द गॉन गेम’ आणि ‘क्रॅकडाऊन’. ‘हाऊस अरेस्ट’च्या निमित्ताने प्रेक्षकांना ‘मिर्झापूर’नंतर पुन्हा एकदा श्रिया आणि अली फजलची केमिस्ट्री पाहता आली. ‘द गॉन गेम’मध्ये तिने साकारलेली सुहानी गुजराल ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरली. आपल्यावर सतत कोणीतरी पाळत ठेवून आहे, हा आभास तिने आपल्या अभिनयातून तंतोतंत निर्माण केला. ‘क्रॅकडाऊन’मध्ये तिने पहिल्यांदाच दुहेरी भूमिका साकारली. यात ती जबरदस्त अॅक्शन करतानाही दिसली. दिव्या आणि मरीयमच्या व्यक्तिरेखांना असलेल्या वेगवेगळ्या छटा तिने उत्तम रंगवल्या.

नागेश कुकनूर दिग्दर्शित ‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या प्रमोशनसाठी जेव्हा सचिन पिळगांवकर आणि प्रिया बापट एका इव्हेंटमध्ये गेले, तेव्हा तिथे त्यांना एक अमराठी चाहता भेटला. सचिनजींसोबत सेल्फी काढताना त्या चाहत्याने अचानक त्यांना विचारलं, “आप स्वीटी गुप्ता के पापा हो ना?” अचानक आलेल्या या प्रश्नाने क्षणभर सचिनजी गोंधळूनच गेले पण त्यानंतर त्यांना हा चाहता श्रियाच्या ‘मिर्झापूर’मधल्या भूमिकेविषयी बोलत असल्याचं ध्यानात आलं. इतकी वर्षं या फिल्मी दुनियेत काम करत असूनही अगदी काल परवा या इंडस्ट्रीत आलेल्या आपल्या मुलीच्या नावाने आपली ओळख निर्माण होतेय, ही सचीनजींसाठी खऱ्या अर्थाने अभिमानास्पद बाब ठरली. त्या क्षणाला त्यांना निश्चितच म्हणावं वाटलं असेल, “बाप से बेटी सवाई!”
तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये ‘आर्टिकल 15’फेम अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ आणि प्रभू सोलोमोन दिग्दर्शित ‘हाथी मेरे साथी’चा समावेश आहे. ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ मध्ये ती पंकज त्रिपाठी आणि रिचा चढ्ढा सोबत स्क्रीन शेअर करणार असून, ‘कादन्’ या तमिळ चित्रपटाचा रिमेक असलेल्या ‘हाथी मेरे साथी’मध्ये राणा दग्गुबती, विष्णू विशाल, पुलकित सम्राट, झोया हुसेन इत्यादी कलाकारांसोबत ती झळकणार आहे. ‘हाथी मेरे साथी’मध्ये ती एका महिला पत्रकाराची भूमिका साकारत आहे. श्रियाला तिच्या पुढील देदीप्यमान कारकिर्दीसाठी कलाकृती मिडियाकडून खूप खूप सदिच्छा!!
=====
हे वाचलंत का: सचिन पिळगावकर यांचे महागुरू कोण ?
=====