
Mithun Chakraborty यांचा पहिला म्युझिकल सिनेमा ‘तराना’
आजची पिढी मिथुन चक्रवर्तीला ओळखते ती टीव्ही वरील एखाद्या नृत्य स्पर्धेचा जज म्हणून किंवा एखाद्या आजच्या सिनेमातील चरित्र अभिनेता म्हणून. पण याच मिथुन ने १९८० ते २००० या काळात अपार लोकप्रियता मिळवली होती. गरीबांचा अमिताभ हि त्याची त्या काळातील प्रतिमा होती. अर्थात त्याचे ऐंशी टक्के सिनेमे हे ब किंवा क दर्जाच्या पातळीचे होते पण आपल्या भारतासारख्या प्रचंड विविधता असलेल्या देशात विशेषत: निमशहरी आणि ग्रामीण भागात मिथुनचा एक प्रचंड मोठा चाहतावर्ग होता, आहे हे नाकबूल करून चालणार नाही.

Action and Music हा त्याच्या यशाचा फंडा होता. नव्वदच्या दशकात तर मिथुन इतका बेफाम सुटला होता प्रदर्शित होणाऱ्या दर पाच चित्रपटात त्याचा सिनेमा असायचा त्यामुळे ‘इथून तिथून मिथुन’ अशी अवस्था झाली होती! आजवर त्याचे तब्बल ३५६ चित्रपट प्रदर्शित झाले असून नायक म्हणून त्याचे ३०० चित्रपट आहेत! त्याचा पहिला चित्रपट ‘मृगया’ (दि मृणाल सेन) १९७६ साली आला होता.या सिनेमाकरीता त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. मिथुनचा पहिला म्युझिकल हिट सिनेमा १९७९ सालचा राजश्री या चित्र संस्थेचा ‘तराना ‘ होता.ज्या Action and Music या दोन जॉनरवर त्याने एवढी प्रदीर्घ कारकीर्द उभारली त्यातील संगीतप्रधान सिनेमाचा पाया ‘तराना’ ने रचला. राजश्रीचा हा सिनेमा त्यांच्या मूळ पठडीतला असला तरी या चित्रपटाचे दिग्दर्शन दीपक बाहरी यांचे होते. हा चित्रपट १९७९ च्या सुपर हिट दहा मध्ये समाविष्ट होता.

सिनेमाचे कथानक संगीताला पोषक असे होते.ठाकूर रतन सिंग (ओम शिवपुरी) आणि त्यांची पत्नी (उर्मिला भट) एका यात्रेत त्यांच्या दुसऱ्या ठाकूर मित्राला भेटतात. रतन सिंग यांची छोटी मुलगी असते तर मित्राचा छोटा मुलगा. दोघे ठाकूर मित्र ‘अपनी ये दोस्ती रिश्ते में बदलने के लिये’ त्या लहान मुला-मुलीचे लग्न ठरवून टाकतात. जे लग्न आणखी पंधरा वर्षानी करायचे निश्चित होते. दोघे ठाकूर आनंदात असतात.सर्व जण देवदर्शनाला जातात. वाटेत येताना त्यांचा नावेतून प्रवास सुरु असतो.तितक्यात मोठे वादळ येते, नाव हेलकावे खावू लागते गोंधळाची स्थिती होते. नाव पाण्यात बुडते. ठाकूर त्याची पत्नी आणि मित्राचा मुलगा एवढेच वाचतात. एकुलती एक मुलगी वाहून जाते. काही क्षणापूर्वी असणारे आनंदाचे वातावरण दु:खात बदलते. मित्राच्या मुलाला घेवून ते घरी येतात. मुलीच्या वियोगाच्या दु:खाचे घोट घेत आता हाच आपला मुलगा म्हणून त्याला वाढवू लागतात.
====================================
हे देखील वाचा : Varsha Usgoankar : “खुदको बडी….”; मिथुन चक्रवर्ती का डाफरलेले?
====================================
इकडे मुलगी पाण्यातून वहात वहात पुढे जाते तिला राणा (डॉ श्रीराम लागू) जे एका बंजारा कबील्याचे प्रमुख असतात वाचवतात. हातात बाहुली घेतलेली ती चिमुरड्या राधाला आपल्या तांड्यावर घेऊन जातात. राधा तिथेच मोठी होऊ लागते. काळ पुढे जातो बंजारा संस्कृतीत वाढत ती नृत्य शिकते आणि त्याचे सादरीकरण शहरातल्या रस्त्यावर करू लागते.आता ती वयात आलेली तरुणी राधा (रंजिता) असते. इकडे श्याम (मिथुन चक्रवर्ती ) देखील उमदा जवान बनतो.
एकदा रस्त्यावर राधा ‘सुलताना सुलताना मेरा नाम है सुलताना’ या गाण्यावर नाचत असते तेव्हा तिची गाठ श्याम सोबत पडते. नजरानजर होते आणि Love at first sight होते. प्रेम आंधळं असतं. (आणि त्या काळात तर ते ठार आंधळे असयाचे!!) ते जात पात, उच नीच, गरीब श्रीमंत काही काही पहात नाही. दोन जीव प्रेमात पडतात. पण ‘खानदान कि इज्जत’ चा प्रश्न उपस्थित होतो. आणि ते सुध्दा ‘जिनकी रगो में ठाकूरोंका खून दौड रहा है’ अशा या ठाकूर घराण्याला हा ‘रिश्ता’ कसा मंजूर होणार? राणा, ठाकूरच्या घरी आपल्या ‘मुलीचा’ रिश्ता घेवून जातो तेव्हा ठाकूर त्याला अपमानित करून परत पाठवतो. आणि श्यामचे लग्न आपल्या तोलामोलाच्या घराण्यातील मुलीशी ठरवतो.

शेवटी ‘सच्चे प्यार को कौन रोक सकता है?’ श्याम राधाच्या बंजारा तांड्यात जातो. तिथे त्याचा एक प्रतिस्पर्धी (शरत सक्सेना) असतो. त्याच्या सोबत झगडा मारामारी. शेवटी राणा राधाचे लग्न श्याम सोबत लावायला निघतो.मंदिरात लग्नाची तयारी चालू असते. ‘शादी ब्याह का मुहुरत’ याने की ‘लग्न घटिका ‘ जवळ येते. ठाकूर त्याच्या साथीदारासह हे लग्न मोडून काढण्यासाठी आक्रमण करतो. पुन्हा हाणामारी. आता climax येतो. राधाकडे लग्नाच्या वेळी तीच बाहुली असते जी लहानपणी पाण्यातून वाहून जाताना तिच्या हाती असते! ठाकूर आणि त्याची पत्नी बाहुलीला बघतात …जन्मोजन्मीची ओळख पटते. राधा आपलीच मुलगी आहे याचा साक्षात्कार होतो. नियती ने आपले काम चोख केलेले असते. ज्यांचा विवाह बालपणीच ठरवलेले असतात तोच विवाह इतक्या twist and turns नंतर बरोब्बर होतो! गोड शेवट हा राजश्रीचा मूलमंत्र होता तो विवाह पार पडतो.
या सिनेमाची कथा पटकथा आणि संवाद खालिद नरवी यांचे होते तर छाया चित्रण आपल्या अरविंद लाड यांचे होते. सिनेमाच्या हिट होण्या मागे त्याचे संगीत होते जे राम लक्ष्मण यांचे होते. शैलेंद्र सिंग आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरात ही गाणी होती. उषा च्या स्वराने गाजलेला सिनेमा म्हणून देखील ‘तराना’ ची नोंद करावी लागेल. ‘सुलताना सुलताना ‘,’ गुंचे लागे है कहने फुलोसे गीत सुना है तराना प्यार का ‘,’मेरी आंख फडकती है’,’ हम तुम दोनो साथ भिग जायेंगे बरसात में’,’मेरी दिलरुबा तुझको आना पडेगा रस्मे वफा को निभाना पडेगा ‘,कैसी ये जुदाई है’,’होने दो फैसला जीत का हार का ‘ हि गाणी खूप गाजली. मिथुनचा हा पहिलाच म्युझिकल हिट सिनेमा होता. त्याच्या हाती असलेला पोर्टेबल व्हिडीओ प्लेयर पहिल्यांदाच हिंदी सिनेमात दिसला.
====================================
हे देखील वाचा : Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!
====================================
रंजिता बंजारन म्हणून छान शोभली. घागरा चोली या अटायर मध्ये रसिकांनी तिला स्वीकारले. जगदीप आणि जयश्री टी यांचा पडद्यावरचा वावर नेहमीच्या पठडीतला होता. डॉ लागू, उर्मिला भट, ओम शिवपुरी चरित्र भूमिकात शोभले.छोट्या भूमिकेत मा भगवान ने मजा आणली. बंजारा समाज, त्यांची संस्कृती, त्याची नाच गाणी दिग्दर्शक दीपक बाहरी यांनी चांगली दाखवली. १९७९ हे वर्ष अमिताभचे होते. सुहाग, मि नटवरलाल,काला पत्थर, द ग्रेट गम्बलर या सिनेमा सोबतच जानी दुश्मन हा मल्टी स्टारर आणि सरगम हा संगीतप्रधान सिनेमा देखील प्रदर्शित झाला होता.या शिवाय राजश्री या चित्र संस्थेचे तब्बल आठ सिनेमे या वर्षी प्रदर्शित झाले होते. या सगळ्या भाऊ गर्दीत ‘तराना‘ला सांभाळले त्याच्या संगीताने.