Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Mukesh यांनी गीतकार नक्ष लायलपुरी यांना गुमनाम जिंदगीतून कसे बाहेर काढले!
प्लेबॅक सिंगर मुकेश यांच्या बाबतचे अनेक किस्से सिनेमाच्या दुनियेत आज देखील ऐकायला मिळतात.त्यांची इतरांना मदत करण्याची प्रवृत्ती,स्वतः कायम मागे राहून इतरांना पुढे आणण्याचीउत्कट इच्छा शक्ती आणि अजात शत्रू हे त्यांचे प्रमुख गुण होते. त्यांनी अनेक छोट्या संगीतकारांकडे एकाही पैसा न घेता आवर्जून गायलं. अनेक छोट्या कलाकारांच्या मागे ठाम पणे उभे राहून त्यांना स्थिर स्थावर केले.असं करताना त्यांनी कधीही बडेजाव मिरवला नाही. असाच एक किस्सा गीतकार नक्ष लायलपुरी यांच्या बाबत झाला होता. नक्ष लायलपुरी हे हिंदी सिनेमातील गुणी गीतकार.परंतु त्यांच्या प्रतिभेला साजेसे काम आणि यश फारसं त्यांना कधी मिळालंच नाही. तरी सत्तरच्या दशकामध्ये त्यांच्या अनेक गाण्यांनी लोकप्रियता मिळवली होती पण तरीही एक अंडरटेकर शायर असंच त्यांचं वर्णन करावं लागेल.

नक्ष लायलपुरी यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1928 या दिवशी फैसलाबाद (आता पाकिस्तान) येथे झाला.नक्ष त्यांचे खरे नाव होते जास्वन्त्राय शर्मा .परंतु त्यांनी शायरीसाठी स्वतःचे नाव नक्ष करून घेतले फैसलाबाद या शहराचे पूर्वीचे नाव होते लायलपूर होते. त्यामुळे त्यांनी आपल्या तखल्लुस ‘नक्ष’ च्या पुढे लायनपुरी हे नाव घेतले आणि ते नक्ष लायलपुरी झाले.त्यांचे वडील इंजिनियर होते. आपल्या मुलाने पण उच्च शिक्षण घेवून आय सी एस व्हावे अशी त्यांची इच्छा. पण मुलाचा लहानपणा पासून कल साहित्य आणि शायारीकडे. १६ व्या वर्षी ते लाहोरला जावून एका प्रकाशन संस्थे सोबत काम करू लागले. फाळणी नंतर सर्व जन लखनौ येथे आले. १९५१ साली ते मुंबईत येऊन टाईम्स ऑफ इंडियात प्रुफ रीडर म्हणून काम करू लागले. पण कविता शायरीची आवड त्यांना सिनेमा कडे खेचू लागली. १९५३ साली ‘जग्गू’ या सिनेमा साठी पहिल्यांदा गाणी लिहिली. त्याकाळी सर्व प्रस्थापित गीतकार असल्याने नक्ष यांना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला.

संघर्ष त्यांच्या पाचवीला पुजला होता. प्रचंड प्रतिभा असून देखील त्यांना हवा तसा ब्रेक मिळत नव्हता. आणि एखाद दुसरं गाणं गाजलं तरी नवीन काम लगेच मिळत नव्हतं. सत्तरच्या दशकात तसे ते गुमनाम जिंदगीच जगत होते. मुंबई जवळच्या उपनगरात मुलुंडला ते राहत असे. मुलुंड त्यावेळी आजच्यासारखं प्रगत उपनगर नव्हतं. त्यामुळे तिथे देखील त्यांना कोणीही ओळखत नव्हतं. एकदा पार्श्वगायक मुकेश एका कार्यक्रमासाठी मुलुंड येणार होते. मुकेश त्या काळातील लोकप्रिय गायक होते. १९७२ सालचा हा प्रसंग आहे. मुकेश जेव्हा मुलुंडला पोहोचले तेव्हा त्यांच्या ओळखीचे तिथे कोणी दिसलं नाही. त्यांनी सहज आयोजकांना विचारलं या गावात आमचे मित्र गीतकार नक्ष लायलपुरी राहतात ते या कार्यक्रमाला येणार आहेत का? आयोजकांना याबाबत काही माहिती नव्हती. त्यांनी विचारणा केली आणि कळाले की ते मुलुंड मध्येच राहतात. मुकेश यांनी त्यांना विनंती केली की “त्यांना आपण या कार्यक्रमाला बोलवू शकतो का?” आयोजकांनी होकार दिला आणि काही कार्यकर्त्यांना पाठवून नक्ष लायलपुरी यांना ते कार्यक्रम स्थळी घेऊन आले.
================================
हे देखील वाचा : ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित Amitabh-Jaya Bachchan यांचा हा सिनेमा अर्धवट का राहिला?
=================================
मुकेश यांना बघितल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला. मुकेश म्हणाले,” तुम्हाला मी त्रास दिला इथे बोलावण्याचा.” त्यावर ते म्हणाले,” यात त्रास कसला? आपण माझी आठवण काढली हा माझा सन्मान आहे.” त्यानंतर कार्यक्रम सुरू झाला. या कार्यक्रमात मुकेश यांनी सुरुवातीला राज कपूर यांची तीन गाणी गायली. यानंतर त्यांनी माईक हातात घेऊन सांगितले की,” या पुढचे जे गाणे मी गाणार आहे या गाण्याचे गीतकार तुमच्या या मुलुंड शहरातील आहेत. आणि या कार्यक्रमात देखील उपस्थित आहेत.” लोकांनी टाळ्या वाजवायला. लोकांना कळालं नाही मुकेश जी कोणाचा उल्लेख करताहेत. मुकेश यांनी मोठ्या आदराने नक्ष लायलपुरी यांना स्टेजवर बोलावले आणि सांगितले,” हे प्रतिभावान गीतकार आहेत नक्ष लायलपुरी. हे तुमच्या मुलुंड मध्येच राहतात. यांचे एक गाणे मी आता जाणार आहे. तो चित्रपट तुम्ही पाहिला असेल. पण तुम्हाला माहित नाही की या चित्रपटातील या लोकप्रिय गाण्याचा गीतकार तुमच्या शेजारी राहतो!” लोकांची उत्सुकता आणखी वाढली.
================================
=================================
मुकेश यांनी सांगितले,” ‘चेतना’ या गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील मी गायलेले ‘मै तो हर मोड पर तुझको दूंगा सदा’ हे गाणं नक्ष लायलपुरी साहेबांनी लिहिलं आहे. ते मी आता सादर करतो.” गाणं लोकप्रिय होतच पण गाण्याचा गीतकार आणि गायक आपल्यासमोर आहेत आणि गीतकार आपल्या गावात रहातो हे पाहिल्यानंतर लोकांना प्रचंड आनंद झाला . मोठ्या संख्येने लोकांनी त्या गाण्याचे स्वागत केले. यानंतर मुकेश यांनी सांगितलं आता मी एका आगामी चित्रपटातील गाणं गाणार आहे जे देखील नक्ष लायलपुरी साहेबांनी लिहिले आहे. हा चित्रपट आहे ‘मिलाप’. आणि गाण्याचे बोल आहेत ‘की सदियो से की जन्मो से तेरे प्यार को तरसे मेरा मन आजा आजा आजा के अधुरा है अपना मिलन.” अद्याप रिलीज झालेल्या चित्रपटातील गाणे ऐकून कार्यक्रम स्थळी उपस्थित असलेल्या सर्वांना प्रचंड आनंद झाला. टाळ्यांच्या गजरात गुमनाम जिंदगी जगणाऱ्या नक्ष लायलपुरी यांना त्या दिवशीपासून सर्व मुलुंडवासी ओळखू लागले. या कार्यक्रमाच्या बातम्या वृत्तपत्रातून आल्यामुळे नक्ष यांची लोकप्रियता वाढीस लागले आणि त्यांना अनेक चित्रपट मिळू लागले. नंतर दिल की राहे,घरौंदा, तुम्हारे लिये,खानदान, आहिस्ता आहिस्ता, दर्द,हीना…या चित्रपटांचे ते लोकप्रिय गीतकार बनले!