
Mukesh : जेंव्हा मुकेश यांनी शैलेंद्रसिंग गाताना हार्मोनियमची साथ दिली!
पार्श्वगायक मुकेश (Mukesh) यांचा स्वर जितका सुंदर आणि मधुर तितकंच त्यांचं व्यक्तीमत्व देखील. निष्पाप , निरागस आणि सतत इतरांचा विचार आधी करणार. मदत करायला सदैव तत्पर. एक अजातशत्रू आणि दर्यादिल माणूस. त्यांच्या दिलदार होण्याचे अनेक किस्से आज देखील बॉलीवूडमध्ये सांगितले जातात. एक अत्यंत मनाने शुध्द ,हसतमुख, आणि सहकाऱ्यांच्या प्रगतीसाठी कायम तत्पर असणारा असा मुकेश. हा किस्सा पार्श्वगायक शैलेंद्र सिंग यांनी मध्यंतरी एका उपग्रह वाहिनीच्या मुलाखतीत सांगितला होता. या घटनेतून मुकेश यांच्या याच गुणांचे दर्शन घडते.

हि घटना साधारणतः १९७५ सालची आहे. मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये जायंट्स अवॉर्ड फंक्शन होते. देशभरातील अनेक उद्योगपती या कार्यक्रमाला उपस्थित होते. सर्वच क्षेत्रातील मान्यवरांना या कार्यक्रमात सन्मानित केले जात होते. याच कार्यक्रमात न्यू टॅलेंटेड व्हाईस म्हणून शैलेंद्र सिंग यांना सन्मानित केले जाणार होते. त्या काळात त्यांच्या स्वरातील ‘बॉबी’ या चित्रपटातील गाणी देशभर धुमाकूळ घालत होती. तरुणाईंचे ते आवडते गायक बनले होते. पारितोषिक वितरण समारंभा नंतर संयोजकांनी शैलेंद्रसिंग यांना एक गाणे गाऊन दाखवायची विनंती केली . संयोजकांची ऐन वेळी आणि अनपेक्षित विनंती ऐकून शैलेंद्र सिंग घाबरले कारण तिथे स्टेजवर कुठेही कोणतेही वाद्य नव्हते. वाद्या शिवाय गाणे त्यांना अवघड वाटत होते!

संयोजकांनी जेंव्हा या बाबत विचारले तेंव्हा शैलेंद्र सिंग म्हणाले की “ बिना साज के मे कैसे गा सकता हूं?” पण तरीही प्रेक्षकांमधून आणि संयोजकांकडून गाण्याचा आग्रह होतच राहिला. प्रेक्षकांमध्ये पार्श्वगायक मुकेश उपस्थित होते. त्यांनी तो बाका प्रसंग ओळखला ते शैलंद्रसिंग यांच्या जवळ आले आणि म्हणाले ,” बेटा, काळजी करू नकोस.” लगेच त्यांनी आपल्या ड्रायव्हरला बोलावले आणि सांगितले,” पार्किंग मध्ये माझ्या कार मध्ये हार्मोनियम ठेवलेला आहे. तो घेऊन ये.” ड्रायव्हर लगोलग हार्मोनियम घेऊन आला. त्यानंतर मुकेश शैलेंद्रसिंग यांना म्हणाले,” तुझ्या गाण्यासाठी मी स्वतः हार्मोनियम वाजवतो. तू बिनधास्त गाणे गा. प्रेक्षकांना तुझे गाणे ऐकायचे आहे. त्यांना नाराज करू नकोस.” त्यानंतर हार्मोनियम वर मुकेश यांनी सूर छेडले आणि शैलेंद्रसिंग गाऊन गेले ‘मै शायर तो नही….’ प्रेक्षक संयोजक खूष झाले. वन्स मोअर मिळाला. (Untold story)

मुकेश यांनी ऐनवेळेला केलेली मदत यामुळे शैलेंद्रसिंग गाणे गाऊ शकले. मुकेश यांचा हा दिलदार पणा त्यांच्या कायम लक्षात राहिला. हे सर्व कोणत्या पार्श्वभूमीवर घडत होते हे देखील समजून घेणे गरजेचे आहे. ‘मेरा नाम जोकर’ (१९७०) आणि ‘ कल आज और कल’ (१९७१) हे दोन्ही सिनेमे फ्लॉप ठरले होते. आर के बॅनर चे मोठ मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर राज कपूर यांनी तरुणाईला आवडेल असा विषय निवडून ‘बॉबी’ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटात त्यांनी आपल्या ओरिजनल आर के टीम मधील संगीतकार शंकर जयकिशन यांच्या जागी संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना आणले. तर मुख्य पार्श्वगायक मुकेश यांच्या जागी शैलेंद्रसिंग यांना आणले.

‘बरसात’ या १९४९ साली प्रदर्शित झालेल्या आरकेच्या (RK) चित्रपटापासून पुढची वीस बावीस वर्ष मुकेशचा स्वर वापरणाऱ्या राज कपूर यांनी पहिल्यांदा मुकेश च्या स्वराला बाहेर केले. ‘बॉबी’ हा पहिला चित्रपट होता ज्या मध्ये मुकेश यांचा स्वर नव्हता. मुकेश यांनी मात्र हा सर्व प्रकार खूप खिलाडू वृत्तीने स्वीकारला होता. एवढेच नाही तर संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल जे सुरुवातीला ‘बॉबी’ या चित्रपटाला संगीत द्यायला उत्सुक नव्हते ( त्याचे कारण त्यांच्या मते शंकर जय किशन यांची इतक्या वर्षापासून असलेलं आर के फिल्मचा सोबत असलेले नातं आपण तोडायला नको) पण मुकेश यांनी त्यांना सांगितलं,” हे पहा, ही प्रोफेशनल दुनिया आहे. तिथे भावनेला फारशी किंमत नाही. त्यामुळे तुम्ही हा चित्रपट स्वीकारा. तुम्ही जरा चित्रपट स्वीकारला नाही तर दुसरा कोणीतरी स्वीकारेलच. शो मस्ट गो ऑन हा इथला कायदा आहे.”
==============
हे देखील वाचा : Suresh Wadkar : ‘ही’ गजल गायल्यावर सुरेश वाडकर का अस्वस्थ होते?
==============
मुकेश यांच्या समजावण्याचा परिणाम झाला. एल पी यांनी ‘बॉबी’ स्वीकारला. मुकेश यांचा बॉबी मध्ये स्वर नव्हता पण त्यानंतर आलेल्या आरके च्या दोन चित्रपटात ‘धरम करम’ आणि ‘सत्यम शिवम सुंदरम’ या दोन्ही चित्रपटात मुकेश यांचा स्वर राज कपूर यांनी वापरला होता.
शैलेंद्र सिंग यांनी कायम मुकेशचे हे मोठेपण लक्षात ठेवले. ते म्हणाले,” आज कोण असा दिलदार पणा दाखवतो. मी त्या वेळी मुकेश यांच्या समोर कुणीच नव्हतो. एका नवोदित गायकाला एका प्रस्थापित गायकाने केलेली मदत सर्वार्थाने अनमोल अशीच आहे. माझं दुर्दैव या महान गायकासोबत गायची संधी मला नाही मिळाली.”