ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
‘ही’ भूमिका केल्याचा मुकेश ऋषी यांना पश्चाताप…
खलनायकाच्या भूमिकेने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या मुकेश ऋषी यांचा चित्रपटाच्या दुनियेतील प्रवेश फारसा सोपा नव्हता. खूप स्ट्रगल त्यांना करावा लागला. आज मुकेश ऋषी हिंदी सोबतच तेलुगु, मल्याळम, कन्नड, पंजाबी, मराठी, तमिळ या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत आहेत. अल्पावधीतच त्यांनी अमरीश पुरी, पुनीत इस्सार, परेश रावल, शरद सक्सेना, प्रदीप रावत, नरेंद्र झा, राहुल देव, मुकुंद देव, सोनू सूद, आशुतोष राणा, सचिन खेडकर, बोमन इराणी, सयाजी शिंदे यांच्याप्रमाणे आपली राष्ट्रभाषा सोडून इतर भाषेतील चित्रपटांमध्ये देखील काम करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. (Mukesh Rishi)
खरंतर मुकेश ऋषी (Mukesh Rishi) यांचा चित्रपटात येण्याचा कुठलाही इरादा नव्हता. त्यांचा जन्म १९ एप्रिल १९५६ रोजी जम्मू येथे झाला. शासकीय महाविद्यालय चंदिगड येथे शिक्षण घेतल्यानंतर ते मुंबईला आले आणि तिथून आपल्या प्रेयसी सोबत ते चक्क फिजी या देशात गेले. पुढे त्यांनी तिच्यासोबत लग्न केले आणि न्यूझीलंडला आपले बस्तान बसवले. काही वर्ष न्यूझीलंडला बिझनेस केल्यानंतर ते भारतात परत आले. न्यूझीलंडला असताना त्यांनी मॉडेलिंग सुरू केलं होतं. ही कदाचित त्यांच्या रुपेरी प्रवेशाची नांदी होती.
मुंबईत आल्यानंतर अभिनयाचे शिक्षण घेतले नंतर त्यांनी टॅलेंट सर्च या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला. या स्पर्धेचे एक जज होते शेखर कपूर. त्यांनी लगेच आपल्या आगामी ‘चॅम्पियन’ या सिनेमात त्यांना प्रमुख खलनायकाची भूमिका दिली. बलदंड शरीर यष्टी आणि भेदक डोळे यामुळे शेखर कपूर यांना मुकेश ऋषी पहिल्या भेटीतच आवडले पण दुर्दैवाने हा चित्रपट सुरूच झालाच नाही आणि इथून त्यांचा स्ट्रगल सुरू झाला.
नंतर दिग्दर्शक रवी नगाईच यांनी ‘सुचना’ या चित्रपटासाठी मिथुन चक्रवर्तीच्या सोबत त्यांना चित्रपटात घेतले. या सिनेमात देखील त्यांची खलनायकाची भूमिका होती. पण इथे देखील दुर्दैव आडवे आले. हा चित्रपट निर्मिती अवस्थेत असतानाच दिग्दर्शक रवी नगाईच यांचे निधन झाले आणि हा चित्रपट डब्यात गेला.
त्यावेळी दूरदर्शनवर ‘टिपू सुलतान’ ही संजय खान यांची मालिका सुरू होणार होती. या सिरीयलसाठी संजय खान यांनी मुकेश ऋषी यांना हैदर अलीच्या भूमिकेसाठी सिलेक्ट केले. परंतु पुन्हा दुर्दैव असे आडवे आले, की ज्यावेळी हे सिरीयल सुरू झाले त्यावेळी त्यांच्या मुकेश ऋषीच्या जागी शादाब खान यांची निवड झाली ! यानंतर शेखर कपूर यांनी पुन्हा त्यांना बॉबी देवलचा पहिला चित्रपट ‘बरसात’ या सिनेमात मुख्य खलनायकाच्या भूमिकेसाठी घेतले. (त्यावेळी शेखर कपूर या सिनेमाचे दिग्दर्शन करीत होते !) परंतु नंतर अशा काही गोष्टी घडल्या, की या ‘बरसात’चे दिग्दर्शन शेखर कपूर यांच्याकडून काढून त्यांच्या जागी राजकुमार संतोषी यांची वर्णी लागली. (हा सिनेमा बराच काळ निर्मिती अवस्थेत राहिला आणि १९९५ साली प्रदर्शित झाला.) त्यामुळे साहजिकच शेखर कपूरच्या पाठोपाठ मुकेश ऋषी यांना देखील सिनेमातून बाहेर पडावे लागले. प्रत्येक वेळी मुकेश ऋषी यांची निवड होत होती पण ते सिनेमे एक तर हातातून जात होते किंवा बंद पडत होते.
मुकेश ऋषी (Mukesh Rishi) निराश होऊन त्यांनी पुन्हा काश्मीरला जाण्याचा निर्णय घेतला पण एक आशेचा किरण चमकला. त्यांचा एक मित्र प्रोडक्शन लाईन मध्ये होता. दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या युनिटमध्ये होता. ‘गर्दिश’ या चित्रपटाची त्यावेळेला जुळवाजुळव चालू होती. या मित्राने मुकेश ऋषी यांना दिग्दर्शकाला भेटायला सांगितले. प्रियदर्शन यांना पहिल्याच भेटीमध्ये मुकेश ऋषी पसंत पडला आणि त्यांनी या सिनेमातील बिल्ला जिलानी या भूमिकेसाठी त्यांची निवड केली. आणि इथूनच त्यांची कारकीर्द सुरु झाली.
===========
हे देखील वाचा : अमिताभ बच्चन आणि सुभाष घई आजवर एकत्र आले नाहीत ?
===========
मुकेश ऋषी (Mukesh Rishi) यांची खऱ्या अर्थाने ओळख रसिकांना झाली ते आमिर खानच्या १९९९ साली आलेल्या ‘सरफरोश’ या चित्रपटापासून ! त्यापूर्वी १९९७ साली आलेल्या ‘गुंडा’ या चित्रपटातील मुकेश ऋषी यांची वादग्रस्त भूमिका प्रचंड गाजली होती. पण त्या भूमीकडे समीक्षक वर्गाने दुर्लक्ष केले होते! गुंडा हा चित्रपट त्याकाळात अश्लील म्हणून बॅन करण्यात आला पण चित्रपट प्रदर्शित झाला होता, सात-आठ वर्षांनी पुन्हा डीव्हीडीच्या रूपाने तो बाहेर आला आणि कल्ट क्लासिक म्हणून प्रचंड हिट झाला.
पण हा सिनेमा तसा अश्लीलच होता मुकेश ऋषी याने देखील एका मुलाखतीमध्ये यातील डायलॉग अतिशय खालच्या पातळीवरचे होते असे सांगितले मला कधी कधी ही भूमिका केल्याचा पश्चाताप होतो असे देखील तो म्हणाला होता. ‘सरफरोश’ या चित्रपटानंतर मात्र मुकेश ऋषी (Mukesh Rishi) यांची गाडी वेगात सुरू झाली! या सिनेमातील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेयरचे नामांकन मिळाले होते. पण अथक संघर्ष नंतर प्रियदर्शन यांच्या ‘गर्दिश’ या चित्रपटातील भूमिके नंतर मुकेश ऋषी यांचे ‘गर्दिश में’ असलेले ‘तारे’ चमकू लागले हे नक्की !