बहुगुणसंपन्न असा हा अभिनयाचा राजा: दिलीप कुमार
अभिनय हा शब्द ज्याच्या नावाशी पूर्णत: एकरूप झाला होता असा प्रतिभासंपन्न कलावंत कोण अस जर प्रश्न कुणी केला तर दिलीपकुमार हे नाव मागच्या तीन पिढ्या चटकन सांगतील. आज ११ डिसेंबर, महान अभिनेता दिलीपकुमारचा ९८ वा वाढदिवस. त्याच्या अभिनयाची यात्रा पाहून आजही डोळे दिपून जातात.
अभिनय आणि आवाजाचे अचूक मर्म त्याने ओळखले होते. ज्या काळात साधे संवाद देखील पृथ्वीराज, सोहराब मोदी सारखे कलाकार नाटकी ढंगात आणि उच्चरत सादर करायचे त्या काळात दिलीपकुमारने संवादांना सहज सुलभ नैसर्गिकता दिली आणि रंगमंचीय उच्चारांची शैली मोडून काढली. शब्दांच्या ओघातील स्तब्धतेचे महत्व त्याने पटवून दिले. अलंकारीक पल्लेदार भाषेच्या ऐवजी तुटक, व्याकरण रहीत भाषा आणली. त्याने शब्दाला भाव दिला, रंग दिला आणि सिनेमातील चित्रप्रतिमेला केंद्र स्थानी आणले.
हे देखील वाचा: बी आर चोप्रांनी निर्देशित केलेला हा प्रथम चित्रपट तुम्ही पाहिला आहे का ?
‘शोकात्म भूमिकांचा राजा’ ही त्याला मिळालेली बिरूदावली त्याने पन्नासच्या दशकात जाणीवपूर्वक जोपासली. प्रेमभंग आणि दु:खाला कुरवाळण्याची त्याची अदा बेफाम लोकप्रिय ठरली. रूपेरी पडद्यावरील सदाबहार त्रिकूटापैकी तो एक. त्याचा रूपेरी प्रवेश अगदी योग्य वेळेला झाला.
स्वातंत्र्यानंतर रोमॅंटीसिझम्चं प्रतिबिंब माध्यमात उमटलं होतं. त्याच वेळी पाश्चात्य साहित्यातून झिरपत आलेल्या करूण रसाच्या कलाकृतीला रसिक दाद देत होते. दिलीपने रसिकांच्या या बदललेल्या ‘टेस्ट’ ला आपल्या अभिनयातून पुढे आणले. अंतर्मुख नायकाच्या त्याच्या शिकस्त, फुटपाथ, संगदिल, तराना, दिदार, शहीद आणि या सार्यांचा कळसाध्याय म्हणजे ‘देवदास’! प्रेमभंगाच्या गहिर्या दु:खात त्याने आख्खी पिढी नादवली अभिनयातील अतिशय संवेदनशील बारकावे व्यक्त करतानाचा त्याचा फिकट गुलाबी चेहरा पडद्यावरील भूषण ठरला. हनुवटीवर हात ठेवून शून्यात नजर लावून वैचारीक पोझ देणारा दिलीप ‘आयडॉल’ ठरला.
भग्न दिलाचा कवी साकारतानाची त्याच्यावर चित्रीत झालेल्या गीतांनी देखील रसिकांच्या मनात कायमचं घर केलं. ‘ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल जहां कोई न हो’ (आरजू), ‘मेरा जीवनसाथी बिछड गया’ (बाबुल), ‘कोई नही मेरा इस दुनिया मे आशियां बरबाद है’ (दाग) या तलतच्या गीतांनी त्याचं दु:ख आणखी गहिरं केलं. ’देवदास’ च्या अनपेक्षीत अपयशाने मात्र तो आतून खचला आणि त्याने ट्रॅक बदलला.
हे वाचलंत का: सेक्रेड गेम्स आधी ‘या’ नावाची इंडियन सिरीज नेटफ्लिक्स वर होती…
आता तो बंडखोर नायकाच्या भूमिका करू लागला. ’नया दौर’, ‘गंगा जमना’ या चित्रपटातून तो व्यवस्थेच्या विरूध्द लढू लागला. मधुमती, यहुदी, कोहिनूर, लिडर, राम और शाम या सिनेमातून तो रसिकांचे रंजन करू लागला.
मुगल-ए आजम सारखे सिनेमे तर आपण दिलीप वजा करून विचारही करू शकत नाही. वयाची हाफ सेंचुरी पूर्ण केल्यावर चरीत्र भूमिकांच्या माध्यमातून क्रांती, शक्ती, विधाता, मजदूर, मशाल, सौदागर या सिनेमातून त्याने नव्या पिढीला आपलेसे केले. त्याची प्रत्येक कृती ही न्यूज होत होती. मग त्याचे सायरा सोबतचे लग्न असो, ’लॉरेन्स ऑफ अरेबीया’ या हॉलीवूडपटाला त्याने दिलेला नकार असो, लता सोबतचे त्याचे गाणे असो, निशान-ए- पाकिस्तान हा पुरस्कार असो किंवा अस्मा सोबत त्याने केलेला अल्पकालीन निकाह असो. असो त्याच्या आत्मचरीत्राच्या निमित्ताने फार दिवसांनी त्याचे दर्शन घडले.
वाढदिवसाच्या त्याला लक्ष लक्ष शुभेच्छा. सोबतच पहा दिलीप वर चित्रित हे गाणे!