‘संगीत देवबाभळी’ फेम Shubhangi Sadavarte पुन्हा अडकणार लग्नबंधनात; 3 महिन्यांआधीच झाला

Natraj Studio : चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा घटक
आज मी लोकल ट्रेनने अंधेरीतील पूर्व बाजूला उतरुन पश्चिम एक्स्प्रेस हायवेकडे निघालो अथवा मेट्रो ट्रेनने गुंदवली स्टेशनवर उतरलो की माझी नजर कार्नरवरील अतिशय उंच इमारतीवरील ‘नटराज’ हे वाचण्याकडे जातेच जाते आणि मी जुन्या आठवणीत रमतो. ती उत्तुंग इमारत नटराज स्टुडिओ पाडून उभीं राहिलीय. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात या नटराज स्टुडिओचे खूपच मोठें व महत्त्वाचे स्थान आहे. या नटराज स्टुडिओत पाऊल टाकताच उजव्या हाताला गेल्यावर असलेल्या पंचवीस प्रशस्त खुर्च्याचे एक मिनी थिएटर होते, तेथील ऑपरेटर विलास जोशीला भेटल्यावर चित्रपटसृष्टीतील अनेक लहान मोठ्या घडामोडी, गॉसिप गप्पा रंगत ( मी माझ्या यशस्वी व चौफेर वाटचालीत चित्रपट स्टूडिओतील अशा अनेकांशी छान दोस्तांना केला. त्यातून बरीच माहिती मिळत राहीलीय
नटराज स्टुडिओतील चित्रीकरणासाठीच्या चार पाच मोठ्या फ्लोअरवर अनेक मराठी व हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण रिपोर्टिग आणि अनेक चित्रपटांचे मुहूर्त यासाठी माझे सातत्याने जाणे झाल्याने ही वास्तू माझ्या अधिकाधिक जवळची होत होत गेली.१९८२ साली मिडियात आल्यावर मी आपण प्रत्यक्ष फिल्डवर्कवर काम करण्याचा फोकस कायम ठेवला. मुळातच आपण चित्रपट रसिक आहोत ( एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्समधील स्टॉलचा पब्लिक आहोत) ही भावना कायम ठेवली.

नटराज स्टुडिओतील माझ्या आवडत्या आठवणी सांगायलाच हव्यात. एन. चंद्रा दिग्दर्शित ‘तेजाब’ चा २७ फेब्रुवारी १९८७ रोजी सकाळी झालेला मुहूर्त. आजही माझ्या कलेक्शनमध्ये “तेजाब”च्या मुहूर्ताचे आमंत्रण मी जपून ठेवलेय. (त्यात प्रमुख कलाकारात नाना पाटेकरचेही नाव आहे. पण चित्रीकरण सुरू झाल्यावर त्याच्या जागी सुरेशं ओबेरॉय आला. ) अमिताभ बच्चनच्या शुभ हस्ते झालेल्या या मुहूर्त दृश्यात मुन्नाच्या रुपातील अनिल कपूरची रावडेगिरी आणि मोहिनी माधुरी दीक्षितने त्याला दिलेली विश्वासाने साथ हे पाह्यला मिळाले. हा मुहूर्त बरेच दिवस चर्चेत होता. माधुरी दीक्षित त़ोपर्यत स्टार झाली नव्हती. आणि भेटणं बोलणं सोपं होतं. तेव्हा ती अंधेरीतील जे. बी. नगर येथे राह्यची. हिंदी चित्रपटाच्या सेटवर आम्हा महाराष्ट्रीयन सिनेपत्रकाराशी मराठीत बोले.
================================
हे देखील वाचा : Agnipath ते ‘मुनवली’; अमिताभ अलिबागकर झाला…
================================
नटराज स्टुडिओतील आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण व आठवणीतील मुहूर्त गुलशन रॉय निर्मित व राजीव रॉय दिग्दर्शित त्रिदेव या चित्रपटाचा! गुलशन रॉय हे चित्रपटसृष्टीतील बडे प्रस्थ, त्यामुळे हा मुहूर्त अतिशय ग्लॅमरस ह़ोईल अशी असलेली माझी अपेक्षा पूर्ण झाली. विशेष उल्लेखनीय गोष्ट, या मुहूर्ताच्या वेळी नसिरुद्दीन शाह, सनी देओल, जॅकी श्रॉफ हे “त्रिदेव” काही वेगळेच वाटले. नसिरुद्दीन शाह समांतर प्रवाहातील चित्रपट अथवा कलात्मक चित्रपटातील बुद्धिवादी कलाकार या मसालेदार मनोरंजक चित्रपटात कसा असा माझ्या मनात प्रश्न होता. मुहूर्त दृश्यात माधुरी दीक्षितही होती. तोपर्यंत सोनमची निवड झाली नव्हती. त्या काळात नवीन चित्रपटाचा मुहूर्त म्हणजे एक सकारात्मक वातावरणातील सेलिब्रेशन असे. नवीन ऊर्जा मिळत असे. म्हणूनच अशा मुहूर्ताना हजर राहण्यात विशेष आनंद मिळत होता.
नटराज स्टुडिओतील जे. पी. दत्ता दिग्दर्शित ‘बन्धुआ’ या चित्रपटाचा अतिशय भव्य दिव्य दिमाखदार मुहूर्त आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. धर्मेंद्रने मुहूर्त दृश्याला फटमार केली आणि अमिताभ बच्चनने एक जोरदार संवाद म्हटला. अमिताभ बच्चन आपल्या चित्रपटाच्या मुहूर्त दृश्यातही कमालीच्या आत्मियतेने डायलॉग बोलणार हा माझा लाईव्ह अनुभव. या चित्रपटात वहिदा रेहमान नायिका होती. जवळपास अर्धा दिवस हा मुहूर्त स़ोहळा चालला होता. पण चित्रपट मुहूर्तालाच बंद पडला.

एस. रामनाथन निर्मित आणि मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘गंगा यमुना सरस्वती’ या चित्रपटाच्या मुहूर्ताची आठवण अगदी वेगळीच. मला आठवतंय, नटराज स्टुडिओच्या वॉचमनने न ओळखण्याने पुनीत इस्सारला बराच वेळ ताटकळत उभे राहून ओळख पटवावी लागली. चित्रपटाच्या मुहूर्त दृश्यात अमिताभ बच्चन, रिशी कपूर आणि मिथुन चक्रवर्ती यांनी भाग तर घेतला पण या मुहूर्तावरचा आम्हा सिनेपत्रकाराचा मजकूर प्रसिद्ध ह़ोण्यापूर्वीच ऋषि कपूर चित्रपटातून बाहेर पडलादेखिल.
नटराज स्टुडिओत सुधाकर बोकाडे यांनी प्रस्तुत केलेल्या आणि राजेंद्र घोगरे निर्मित व विनय लाड दिग्दर्शित ‘पटली रे पटली’ या चित्रपटासाठी लागलेल्या सेटवर शूटींग रिपोर्टीगसाठी आम्हा सिनेपत्रकाराना आमंत्रित केले असता सेटवर पाऊल टाकताचा ज्योती स्वरूप दिग्दर्शित सर्वकालीन सुपरहिट मजेशीर चित्रपट ‘पडोसन’ ची पटकन आठवण आली. अगदी तशीच खिडकी दिसताच पडोसन आठवला. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, वर्षा उसगावकर, निळू फुले, विजय चव्हाण, सूर्यकांत इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. आजही माझ्या डोळ्यासमोर तो सेट आहे.
नटराज स्टुडिओतील अशा अनेक आठवणी आहेत. रमेश सिप्पी दिग्दर्शित राम की सीता श्याम की गीता या चित्रपटाचा मुहूर्त आठवतोय. अमिताभ बच्चन आणि अजय वढावकर यांच्यावर मुहूर्त दृश्य झाल्यावर अजय वढावकर प्रचंड सुखावला. अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी या दोघांच्याही दुहेरी भूमिका असलेला हा चित्रपट मुहूर्तालाच बंद पडायला नको होता.
नटराज स्टुडिओतील मिनी थिएटरमध्ये अनेक चित्रपट पाह्यचा योग आला हे वेगळे सांगायला नकोच. त्यात एक विशेष उल्लेखनीय चित्रपट प्रेरणा चित्र निर्मित ‘महानदीच्या तीरावर’ हा मराठी चित्रपट. या चित्रपटाची निर्मिती श्रीकांतजी ठाकरे आणि प्रभाकर निकळऺकर यांची आहे. दिग्दर्शन प्रभाकर निकळऺकर यांचे आहे. श्रीमती दुर्गा भागवत यांच्या कथेवर आधारित या चित्रपटाची पटकथा राकेश कुबल आणि दत्त कुमार यांची आहे. चित्रपटाची गीते वंदना विटणकर व विलास जैतापकर यांची असून संगीत श्रीकांतजी ठाकरे यांचें आहे. छायाचित्रण प्रभाकर निकळऺकर यांचे आहे. या चित्रपटात प्रमोद शेलार, दीप्ती समेळ, नीता शेंडे, योगेश महाजन इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. हा एक अतिशय वेगळा चित्रपट आहे. नटराज स्टुडिओतील माझी ही वेगळीच आठवण.
असा हा नटराज स्टुडिओ म्हणजे मुळचा मॉडर्न स्टुडिओ. हा स्टुडिओ १९६८ साली हिंदी चित्रपटसृष्टीतील पाच निर्मात्यांनी भागिदारीत घेतला. हे निर्माते होते, रामानंद सागर (.आखे, गीत, ललकार, चरस इत्यादी चित्रपट ), शक्ती सामंता ( आराधना , कटी पतंग, अमर प्रेम, अनुरोध, अनुराग इत्यादी चित्रपट), प्रमोद चक्रवर्ती (नया जमाना , जुगनू , आझाद इत्यादी चित्रपट ), एफ. सी. मेहरा (ऐलान, लाल पत्थर , मनोरंजन इत्यादी चित्रपट ) आणि आत्माराम ( उमंग,आरोप इत्यादी चित्रपट ). या प्रत्येक निर्मात्यांची याच नटराज स्टुडिओत कार्यालये होती आणि या प्रत्येक कार्यालयात आम्हा चित्रपट पत्रकारांचे कायमच स्वागत होई. त्यावेळी एकादा निर्माता नसेल तर कार्यालयातील कर्मचारी आवर्जून चहा देणार हे हुकमी. रामानंद सागर यांच्या सागर आर्ट्स या बॅनरखालील कार्यालयात दहीवडा किती वेळा खाल्ला याची गणतीच नाही. आणि असे मोजून मापून खा कशाला,,याच पाच निर्मात्यांच्या कार्यालयातून मला त्यांच्या अनेक जुन्या चित्रपटातील भरपेट माहिती व फोटोग्राफ मिळत राहीले. पत्रकार हा माझ्यासारखा भटक्या विमुक्त असावा असे मी म्हणतो ते याचसाठी. एक उत्तम अनुभव.
================================
हे देखील वाचा : कल्पक आणि वेगळी दृष्टी असलेले Piyush Pandey!
================================
नटराज स्टुडिओतील कॅन्टीन एक स्वतंत्र प्रकरण होईल. नटराज स्टुडिओत नवीन चित्रपटाचा मुहूर्त अथवा शूटींग रिपोर्टीगसाठी सेटवर गेल्यावर याच कॅन्टीनमध्ये आम्ही सिनेपत्रकार हमखास जाणार. तेथूनच जुहू, वर्सोवा येथील अनेक बंगल्यातील चित्रीकरणाच्या वेळी दुपारचे जेवण जात असे आणि त्यांवरुन कोणत्या बंगल्यात कोणत्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे आणि तेथे कलाकार कोण आहेत हे समजत असे. आणि मग त्यानुसार रिक्षा पकडून तिकडे जाणं ह़ोई. चित्रपटाच्या जगात कुठे कोणता रस्ता सापडेल हे सांगता येत नाही. फक्त आणि फक्त मनस़ोक्त मनमुराद फिरण्याची आवड हवी. नव्वदच्या दशकात विधु विनोद चोप्रा याचेही याच स्टुडिओत प्रशस्त कार्यालय सुरु झाले.त्याचा चित्रपट विश्लेषक अमोद मेहरा यांच्याशी झालेल्या वादातून आम्ही सिनेपत्रकारानी या कार्यालयावर काढलेल्या मोर्चाचे वृत्त लोकसत्तासह अनेक वृत्तपत्रांमध्ये फोट़सह प्रसिद्ध झाले.
याच नटराज स्टुडिओतून मागील बाजूने सेठ स्टुडिओत जाण्यासाठी रस्ता होता. तो मुंबईतील पहिला वातानुकूलित स्टुडिओ होता. तो असाच आता आठवणींत राहिलाय. नटराज स्टुडिओची २००० साली विक्री झाल्याची बातमी आली आणि धक्का बसला. अतिशय मोक्याच्या जागी हा चित्रपट स्टूडिओ होता. तो २०१३ पर्यंत कार्यरत होता. तोपर्यंत चित्रपटसृष्टीत बरेच बदल होत होत गेले. आणि एक दिवस हाही स्टुडिओ पाडला गेला. जुन्या काळातील चित्रपटाच्या श्रेयनामावलीत आपण वाचायचे, नटराज स्टुडिओ. या नटराज स्टुडिओतील माझ्या लाईव्ह आणवणी केवढ्या तरी….