संगीतकार मदनमोहन यांना ट्राफिक पोलीसांनी अडवले…
हिंदी सिनेमाच्या दुनियेत काही कलावंतांना खरोखर कम नशीबी म्हणावे लागते. कारण यांच्याकडे प्रतिभा प्रचंड होती, काम करण्याची जिद्द मोठी होती, कष्ट करण्याची तयारी होती. हे सर्व असून देखील त्यांना त्यांच्या कर्तुत्वाला साजेसे असे यश कधीच मिळाले नाही. अर्थात हिंदी सिनेमा यशापयशाची गणितं वेगळी असतात. इथे कधी काय ‘क्लिक’ होईल कोणाला सांगता येत नाही. त्यामुळेच प्रचंड महत्त्वकांक्षेने बनवलेला ‘कागज के फूल’ येथे फ्लॉप होतो तर इन्कम टॅक्स वाचावा, नुकसान व्हावे म्हणून फ्लॉप सिनेमा म्हणून काढायला गेलेला ‘चलती का नाम गाडी’ सुपरहिट होतो ! त्यामुळे इथे कधी काय होईल हे कोणाला सांगता येत नाही. तरी देखील काही प्रतिभावंत कलाकारांचे कर्तृत्व आणि त्यांना मिळालेल्या यशाचे व्यस्त प्रमाण पाहून नक्कीच वाईट वाटते.
संगीतकार मदन मोहन यांना फ्लॉप चित्रपटांचा हिट संगीतकार असे म्हटले जाते ! कारण त्यांनी अतिशय सुमधुर संगीत देऊन देखील त्यांच्या बोटावर मोजण्या इतपत चित्रपटांना यश मिळाले. घवघवीत यशा पासून ते कायम वंचित राहिले. अर्थात याने काही फरक पडत नाही. आज पन्नास वर्षे उलटून गेल्यानंतर देखील मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेली गाणी रसिक अतिशय आवडीने ऐकतात ही गोष्ट निर्विवादपणे सत्य आहे. पण उभ्या हयातीत त्यांना यशापासून कायम दूरच राहावे लागले. याची त्यांना कायम खंत वाटत असे. हा किस्सा आहे १९६२ सालचा. (Madan Mohan)
यावर्षी त्यांचा ‘अनपढ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. माला सिन्हा आणि धर्मेंद्र यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटातील प्रत्येक गाणं अतिशय मेलोडीयस बनलं होतं. राजा मेहंदी अली खान यांची गाणी होती. है इसी में प्यार की आबरू, जिया ले गयो जी मोरा सावरिया, वो देखो जला घर किसीका,रंग बिरंगी राखी लेके, आणि सर्वात अप्रतिम असे आपकी नजरोने समझा… यातील ‘आपकी नजरोने समझा प्यार के काबिल मुझे’ या गाण्यावर तर रसिक आज देखील प्रचंड प्रेम करतात. (Madan Mohan)
मदन मोहनच्या(Madan Mohan) या चित्रपटाला त्या वर्षाच्या फिल्मफेअर साठी तीन नामांकन मिळाली होती. सर्वोत्कृष्ट चित्रपट संगीतासाठी मदन मोहन यांना , सर्वोत्कृष्ट गायना साठी लता मंगेशकर यांनी गायलेल्या ‘आपकी नजरोने समझा प्यार के’ ला आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून राजा मेहंदी आली खान यांना याच गाण्यासाठी नामांकन मिळाले होते. मदन मोहन यांना खात्री होती यातील किमान दोन पारितोषिके तरी आपल्याला हमखास मिळतील. पण दुर्दैव मदन मोहन यांचे यातील एकही परितोषिक मिळाले नाही. सर्वोत्कृष्ट चित्रपट संगीताचे पारितोषिक शंकर जयकिशन (प्रोफेसर) सर्वोत्कृष्ट पार्श्वगायानचे फिल्मफेयर लताला मिळाले पण ‘बीस साल बाद ‘ च्या ‘कही दीप जले कही दिल’ साठी तर सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून शकील बदायुनी यांना ‘बीस साल बाद ‘ च्या ‘कही दीप जले कही दिल साठी मिळाले!
मदन मोहन यांचा ‘अनपढ’ निरंक राहिला. मदन मोहन (Madan Mohan) यांना खूप विश्वास होता किमान दोन पुरस्कार त्यांना मिळतील. मोठ्या अपेक्षेने ते या कार्यक्रमाला गेले होते. मदन मोहन खूप नाराज झाले त्यांच्यापेक्षा नाराज झाले त्यांचे कुटुंबीय. त्यांना देखील आपल्या मदन मोहन यांच्या संगीताला नक्की फिल्म पुरस्कार मिळेल असे वाटत होते. पण नाही मिळाला.
घरातील कुटुंबियांची ही नाराजी दूर करण्यासाठी मदन मोहन यांनी दुसऱ्या दिवशी सर्व कुटुंबाला घेऊन लॉंग ड्राईव्हला जाण्याचे ठरवले आपल्या मुलांना आणि पत्नीला गाडीत बसून स्वतः ड्राईव्ह करत ते लॉंग ड्राईव्हला निघाले. बाहेरील वातावरणात मुले आनंदी झाली आणि पप्पांना “आणखी जोरात गाडी चालवा” असा आग्रह करू लागली. रोड मोकळा होता मदन मोहन यांनी देखील आपल्या गाडीची स्पीड वाढवली ते पाहून मुलांचा चेव आणखी वाढला “और फास्ट और फास्ट” असं म्हणून ते मदन मोहन यांना आग्रह करू लागले. मदन मोहन हे देखील गाडीची स्पीड वाढू लागले. पण त्याचवेळी मदन मोहन यांना पाठीमागून ट्राफिक पोलीस च्या सायरन चा आवाज ऐकू आला. मदन मोहन यांच्या लक्षात आले आपण जास्त स्पीडने गाडी चालवत आहोत आणि त्यामुळेच पोलिसांची गाडी आपल्या मागे येत आहे. मदन मोहन यांनी आपल्या गाडीची स्पीड कमी केली आणि गाडी साईडला घेतली.
===========
हे देखील वाचा : जेव्हा अभिनेत्री मधुबालाने संपूर्ण युनिटसाठी चक्क जेवण बनवले !
===========
आरशातूनच त्यांनी ट्रॅफिक ऑफिसरला त्यांच्याकडे येताना पाहिले. आता काय करायचे? मदन मोहन (Madan Mohan) यांनी विचार केला ‘सरळ माफी मागावी आणि जो काही फाईन असेल तो भरून टाकावा’ अशी त्यांनी मानसिक तयारी केली. ऑफिसर त्यांच्या जवळ आला. मदन मोहन यांनी गाडीचे दार उघडले आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्या ऑफिसरने झुकून मदन मोहन यांना हस्तांदोलन केले आणि म्हणाले ,”मदन जी आपके गाने सुनकर मेरा जी बहल जाता है. बडा सुकुन मिलता ही… तुमच्या संगीताने माझं आयुष्य समृद्ध केलं आहे. तुमच्या ‘आपकी नजरोने समझा प्यार के काबिल मुझे हे गाणं ऐकून मी कित्येकदा समाधी अवस्थेत गेलो आहे!” मदन मोहन यांना सुरुवातीला काही कळालेच नाही.
पण ते देखील भानावर आले आणि त्यांनी ऑफिसरला विचारले ,”यामुळे तुम्ही आमच्या गाडीचा पाठलाग करत होता का?” त्यावर ऑफिसर म्हणाले,” हो ना, मी सिग्नलला तुम्हाला पाहिले आणि राहवले नाही. लगेच तुमच्या पाठीमागे येऊन तुम्हाला भेटावे असे वाटले आणि त्यामुळे मी तुमच्या पाठीमागे धावत आलो!” मदन मोहन (Madan Mohan) यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना काल रात्रीचा प्रसंग आठवला . ‘अनपढ’ या चित्रपटाला एकही पारितोषिक मिळालं नव्हतं पण एक पोलिस ऑफिसर मोठ्या स्पीडने त्यांच्या गाडीचा पाठलाग करून त्यांना येऊन भेटत होता आणि त्यांचा संगीत आवडत आहे असं त्यांना सांगत होता. त्यांनी बायकोला खाली उतरून ओळख करून दिली आणि तिला म्हणाला ‘हे खरं माझं अवार्ड आहे…!”