दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
संगीतकार नौशाद आणि मदन मोहन: निर्व्याज्य मैत्रीची भावस्पर्शी कथा!
हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळातील एक प्रतिभावान संगीतकार म्हणजे संगीतकार मदन मोहन(madan mohan). अतिशय भावोत्कट चाली देणारा हा संगीतकार गझल प्रांतातील बादशहा होता. लता मंगेशकर– राजा मेहंदी अली खान आणि मदन मोहन या त्रिकूटाने हिंदी चित्रपट संगीतातील गजलांचे एक दालन अतिशय समृद्ध करून ठेवले आहे.
संगीतकार मदन मोहन(madan mohan) हा अतिशय प्रतिभावान संगीतकार होता पण तितकाच दुर्दैवी देखील होता. त्या बिचाराच्या वाट्याला कधीच चांगले बॅनर, चांगले नायक आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या चित्रपटाचे संगीत जरी चांगले असले तरी ते सिनेमे अक्षरश: फ्लॉप होत होते. त्यामुळे संगीतकार मदन मोहन यांना ‘फ्लॉप चित्रपटांचा हिट संगीतकार’ असे देखील म्हटले जाते. अर्थात त्यामुळे मदन मोहनच्या संगीताचे महत्त्व अजिबात कमी होत नाही.
१९६२ साली मोहन कुमार यांनी एक चित्रपट दिग्दर्शित केला होता ‘अनपढ’. या चित्रपटातील सर्वच गाणी अतिशय गोड आणि भावस्पर्शी बनली होती. यात लता मंगेशकर यांची पाच बेहतरीन गाणी होती. ‘आपकी नजरोने समझा प्यार के काबिल मुझे’, ‘वो देखो जला घर किसी का’. ‘जिया ले गये हो मोरा सावरिया’, ‘है इसी मे प्यार की आबरू वो जफा करे मै वफा करू’, आणि ‘रंग बिरंगी राखी लेके आयी’. मदन मोहन(madan mohan) यांना या चित्रपटाकडून खूप काही अपेक्षा होत्या. पण नेहमीप्रमाणे चित्रपट चालला नाही. निदान या चित्रपटाच्या संगीतासाठी फिल्मफेअर अवार्ड मिळेल अशी अपेक्षा मदन मोहन यांना होती. ‘अनपढ’ या चित्रपटाला संगीतासाठी फिल्मफेअरचे नामांकन मिळाले पण पारितोषिक नाही मिळाले!
पण या चित्रपटातील एका गझले बाबत संगीतकार नौशाद यांनी फार मोठे विधान मदन मोहन यांचे कार्य कर्तृत्व सिद्ध करणारे असे केले होते. या चित्रपटात एक गझल होती ‘है इसी मे प्यार की आबरू वो जफा करे में वफा करू’ ही गझल ऐकल्यानंतर संगीतकार नौशाद यांना खूप आवडली. रात्रभर ती तबकडी नौशाद ऐकत बसले. सकाळी उठल्यानंतर ते तडक मदन मोहन(madan mohan) यांच्या घरी गेले आणि त्यांना सांगितलं “आपने ‘अनपढ’ में जो गजल बनाई है वो वाकइ में काबिले तारीफ है. उस पर मेरा सारा संगीत कुर्बान है. अगर मै भी इस गझल को संगीत देता तो यकीनन आपके जैसा नही बना सकता. मदन मोहन जी मेरे सारे गाने आप ले लिजिये और आपका ये गाना मेरे नाम कर दीजिये! यह गाना कोई दुसरा मोसिकार इतना सुंदर बना ही नही सकता!”
संगीतकार नौशाद यांचे हे उद्गार ऐकून मदन मोहन अक्षरशः सद्गतीत झाले. त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. ते म्हणाले ‘नौशाद जी आप कितने सीनियर हो. हम तो आपके शागीर्द है.” त्यावर नौशाद म्हणाले, ”ये ज्युनिअर सीनियर का सवाल नही है. क्वालिटी का सवाल है और जिस अंदाज से आपने एक गझल बनाई है वो काबील तारीफ है!” हे ऐकताच मदन मोहन यांनी नौशाद यांना मिठीच मारली.
========
हे देखील वाचा : महात्मा गांधींनी आयुष्यभरात पाहिला एकच हिंदी चित्रपट!
========
त्यावर नौशाद म्हणाले, ”मै ये मेरी ये राय सिर्फ आपको देख के नही बता रहा हु. मै किसी मजने मे भी यही बताऊंगा.” नंतर काही दिवसांनी एका कार्यक्रमात नौशाद यांनी मदन मोहनच्या(madan mohan) या गझलचे आणि मदन मोहनच्या संगीताचे मनापासून कौतुक केले. तो काळ निरोगी स्पर्धेचा होता. प्रत्येकाला दुसऱ्याच्या कलेबाबत आदर होता. याच संगीतकार नौशाद यांनी ‘आजाद’ (१९५५) या चित्रपटाचे संगीत जे त्यांच्या स्वतःकडे आले होते त्यांनी स्वतःहून संगीतकार सी रामचंद्र यांच्याकडे दिले होते!
आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये हे सर्व अजब आणि न पटणारे आहे पण त्या काळातील सर्वांमध्येच एक भावनिक ओलावा होता एक दुसऱ्याची कदर होती आणि जाणीव होती. त्यामुळेच त्या काळात बनलेल्या कलाकृती आज देखील तितक्याच ताज्या आणि टवटवीत वाटतात. आज ६०-७० वर्षे झाली तरी ती गाणी आपल्याला आजही मनाला मोहून टाकतात.