नासिर हुसैन यांची सुंदर कलाकृती म्हणजे ‘फिर वही दिल लाया हूं’
साठच्या दशकात हिंदी सिनेमा सप्तरंगात न्हावून निघत होता. त्यामुळे पृथ्वीवरील नंदनवनात अर्थात काश्मीरच्या निसर्गरम्य वातावरणात चित्रीकरणासाठी सर्वांची चढाओढ लागली होती. साहजिकच म्युझिकल रोमॅंटीक चित्रपटांची संख्या वर्षागणित वाढू लागली. या लाटेतला एक चित्रपट होता १९६३ साली आलेला ’फिर वही दिल लाया हूं’. या सिनेमाचे निर्माता दिग्दर्शक होते नासिर हुसैन. असं म्हणतात, नासिर भाईं एकच सिनेमाची कथा घेवून मायानगरीत आले होते व त्यांनी या एकाच कथानकावर तब्बल १२ सुपर हिट सिनेमे दिले ! १९४८ साली ते सिनेमाच्या दुनियेत आले एक लेखक म्हणून ए आर कारदार यांच्याकडे उमेदवारी केल्यावर ते फिल्मिस्तानमध्ये रूजू झाले.
इथे त्यांनी अनारकली, मुनीमजी, पेईंग गेस्ट या सिनेमाच्या कथा लिहिल्या. १९५७ साली ’तुमसा नही देखा’ पासून दिग्दर्शकाच्या खुर्चीवर बसले. या सिनेमापासून त्यांच्या ठराविक फॉर्म्युलाच्या सिनेमाची सुरूवात झाली. १९६० साली ’दिल देके देखो’ पासून त्यांच्या सिनेमात आशा पारेख आली जी पुढे त्यांच्या अनेक यशस्वी सिनेमाची नायिका ठरली. हे सारे सिनेमे शशधर मुखर्जी यांनी निर्मिलेले होते.
१९६१ साली त्यांनी स्वत:ची नासिर हुसैन (Nasir Hussain) प्रॉडक्शन्स ही चित्र संस्था निर्मिली व पहिला सिनेमा बनवला ’जब प्यार किसीसे होता है’.ओपी, उषा खन्ना, शंकर जयकिशन असे त्यांचे पहिल्या तीन सिनेमांचे संगीतकार होते. तीनही सिनेमे सुपर हीट ठरले. नासिर हुसैन यांच्या करीयरच्या सुरूवातीला शशधर मुखर्जींनी केलेली मदत ते विसरले नाहीत. मुखर्जी यांच्या मुलाला जॉय मुखर्जीला घेवून त्यांनी सिनेमा बनविण्याचे ठरवले. हा त्यांचा पहिला रंगीत चित्रपट होता. कथा व नायिका ठरली होती. साइड किक म्हणून राजेंद्रनाथ होता. खलनायकाचे रंग दाखवायला प्राण होता. सिनेमाचे नामकरण झाले ’फिर वही दिल लाया हूं’.
त्यांच्या सिनेमाचे कथानक प्रेक्षकांनाही ठाऊक असल्याने या सिनेमात ते फक्त कसे फिरवले आहे याकडे त्यांचे लक्ष असायचे. सिनेमाचे संगीत अतिशय महत्वाची भूमिका पार पाडत असते. प्रस्तुत सिनेमात मजरूहच्या गीतांना ओपीचे संगीत होते. कश्मीरच्या नयन रम्य वातावरणात ही प्रेमकथा बहरत जाते. नेहमीचेच रूसवे फुगवे, नायिकेनं नायकाच्या ऐवजी त्याच्या बावळट मित्राशी मुद्दाम त्याला जळवण्यासाठी प्रेमाचे नाटक करायचे, प्रेमाच्या खेळात बिब्बा घालायला खलनायकाचा प्रयत्न आणि शेवटी सारं काही गोड गोड. (Nasir Hussain)
===========
हे देखील वाचा : ‘या’ गायकाच्या एका ‘धुंद’ गीताचा रसिला किस्सा !
===========
रसिकांना देखील प्रीतीचा तोच खेळ पुन्हा पुन्हा पाहवा वाटे. या सिनेमात ओपींच्या खास घोड्याच्या टापांच्या स्टाईलचे ’बंदा परवर थाम लो जिगर बनके प्यार मै आया हूं’ या गाण्यासोबतच गळ्यात गिटार घेवून जॉयने साकारलेले ’लाखो है निगाह में जिंदगी के राह में’ ही दोन्ही रफीची गाणी बेफाम होती. आशाच्या धारदार स्वरातील ’आंखो से जो उतरी है दिल मे तस्वीर है एक अंजानी सी खुद ढूंढ रही है शम्मा जिसे क्या बात उस परवानेकी’ आजही आशाच्या टॉप टेन पैकी एक आहे. यात रफीने गायलेली एक नितांत सुंदर गजल होती’ आंखो में सजा लेना कलीया जुल्फो मे सितारे भर लेना’ या चे चित्रीकरण आजही डोळ्याला सुखावून जाते. रफी-आशाची तीन अप्रतिम युगल गीते यात होती.’हम दम मेरे खेल न जानो चाहत के इकरार का’ आणि ’जुल्फ की छांमे में चेहरे का उजाला लेकर तेरी वीरान सी रातोंको सजाया हमने’ आशा-उषाचे ’देखो बिजली डोले बिन बादलकी’ हे नृत्य गीत जमून आले होते. सिनेमाची गाणी इतकी सुंदर होती; सिनेमा सुपर हिट होता तरीही या सिनेमाला एकही पारितोषिक मिळाले नाही गेला बाजार बिनाका गीतमालाच्या वार्षिक कार्यक्रमात तब्बल २४ व्या क्रमांकावर यातील शीर्षक गीताची वर्णी लागली ! पण आजही सिनेमा पाहताना तितकाच ताजा टवटवीत वाटतो.