‘कर्मा’ सिनेमातील नसिरुद्दीन शहाची रशियन प्रेयसी
तुम्हाला अगदी सुरुवातीलाच मी म्हटलं की, सुभाष घईच्या ‘कर्मा’ (१९८६) मध्ये किशोरी शहाणेचीही भूमिका आहे, तर क्षणभर तुम्ही विचारात पडाल. तुम्हाला दिलीपकुमार, नूतन, नसिरुद्दीन शहा, अनिल कपूर, श्रीदेवी, जॅकी श्रॉफ, पूनम ढिल्लों आणि अनुपम खेर असे त्या चित्रपटातील सगळेच आठवतील. पण त्यात किशोरी शहाणे कुठे बरे होती असा प्रश्नही पडेल. तुम्हाला आठवते, या चित्रपटात नसिरुद्दीन शहाचा एक फ्लॅशबॅक आहे. त्यात त्याची प्रेयसी त्याला आठवते, बिलगते. आठवलं का? तिच ती किशोरी शहाणे होय. तिच्या महाकालीच्या घराजवळच्या कमालीस्थान स्टुडिओत ती अभ्यासातून वेळ काढून आपल्या मित्र अथवा नातेवाईकांसोबत ती शूटिंग पहायला जाई, तेव्हा तिला ही छोट्याश्या भूमिकेत संधी मिळाली होती.
बरं तिला कौतुकाने ‘रशियन अॅक्ट्रेस’ म्हणायचे हे माहित्येय? तिचा चेहरा, तिचं ग्लॅमर यात रशियन लेडीचा भास होतो म्हणून तसे म्हटले जाई. आणि त्याचे तिला विशेष वाटे. त्यात ती लहानपणापासून शशी कपूरची फॅन, त्याचीही पर्सनालीटी काहीशी रशियनसारखीच हा निव्वळ योगायोग. पण कॉलेजमध्ये असताना याच शशी कपूरच्या हस्ते तिने एक पुरस्कार स्वीकारलाय.
ती पार्ल्याच्या मिठीबाई कॉलेजमध्ये शिकत असतानाच ती मराठी चित्रपटात भूमिका साकारु लागली. कधी अभ्यास, तर कधी शूटिंग, तर कधी त्या काळातील मराठी चित्रपटात भूमिका साकारताना काही निर्माते चक्क कलाकारांनाच सांगत की तुमच्याकडचेच चांगले कपडे घालून शूटिंगला या! आपलेच कपडे आपल्या चित्रपटात दिसणार यासाठी ती आनंदे. (त्या काळात ते अजिबात गैर मानले जात नसे, हे जास्त महत्वाचे) असे करत करत किशोरी शहाणेचा मनोरंजन क्षेत्रातील प्रवास सुरू झाला आणि पहिल्याच स्टेशनवर दोन मोठे सहप्रवाशी भेटले. ते म्हणजे, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे. आणि चित्रपट होता ‘प्रेम करुया खुल्लम खुल्ला’ (१९८७). दिग्दर्शक गिरीश घाणेकर यांनी इचलकरंजीच्या गार्डनमध्ये शूटिंग आयोजिले होते आणि आपल्या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील हुकमी प्रेक्षकवर्ग असलेली अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे अशी जोडी असल्याने मुंबईतील आम्हा काही निवडक सिनेपत्रकारांचा दौरा आयोजित केला. असा दोन दिवसांचा दौरा भरपूर गप्पांसाठी उपयुक्त ठरे. ओळखी आणखीन घट्ट होत. या चित्रपटात रेखा रावसोबत एक नवतारका किशोरी शहाणे नावाची अभिनेत्री आहे असे महालक्ष्मी एक्सप्रेसने प्रवास सुरू करताना समजले. आपल्या पहिल्याच चित्रपटात अशोक-लक्ष्यासोबत भूमिका साकारायला मिळालेली अभिनेत्री नशिबवानच म्हणायला हवे असे वाटणे अगदी स्वाभाविक होतेच.
किशोरी शहाणेशी माझी पहिली भेट ही या चित्रपटाच्या सेटवर अशोक आणि लक्ष्याशी छान गप्पा सुरु असताना झाली. रेखा रावशी अगोदरपासूनच मैत्री होती. किशोरीसोबत तिची आई होती (त्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीतही अभिनेत्री आणि आई सेटवर एकत्र दिसत. उदा. श्रीदेवी) आणि त्या दिवसापासून अनेकदा तरी अनेक चित्रपटांच्या सेटवर किशोरीला आईसोबत पाहतोय. पहिल्या भेटीतच किशोरी ‘आपल्या मार्गाने पुढे जाताना, इकडे तिकडे आवश्यक इतपतच पाहणारी’ आहे याची कल्पना आली आणि ते खरंच ठरले. आणि तेच लॉंग इनिंगसाठी महत्वाचे असते. गोष्ट छोटी वाटते, पण तीच महत्वाची आहे.
मराठी चित्रपटात भूमिका साकारताना हिंदी चित्रपटसृष्टीतही गेली, तिकडे काही चित्रपटात छोट्या मोठ्या भूमिका साकारत असतानाच दिग्दर्शक दीपक बलराज वीज याच्या ‘बॉम्ब ब्लास्ट’ (१९९३) या चित्रपटात नायिका साकारत असतानाच दोन गोष्टी घडल्या. किशोरीने आपलं नेहमीपेक्षा जास्त केअरफुली कलरफुल फोटो सेशन केले, मला तर अगदी घरी बोलावून त्यातील अनेक फोटो दिले (कुठे कव्हर पेजला जमतयं का बघ हे तिने ज्या पद्धतीने आणि व्यावसायिक दृष्टीने सांगितले की लोकप्रभाच्या कव्हरवर ती आलीदेखिल. त्या काळातील मराठी अभिनेत्रींचा हा मैत्रीचा फंडा आपलासा वाटणारा होता) तर हा चित्रपट पूर्ण होता होता दीपक बलराज आणि किशोरी यांच्या मधुर नातेसंबंधाची वीण घट्ट झाली होती. लग्नानंतर किशोरी जुहूला राह्यला गेली. आता दीपकजींच्या ‘जान तेरे नाम’ वगैरे हिंदी चित्रपटाच्या शूटिंगपूर्वीची तयारी कशी असते याचा तिला पहिल्यांदा अनुभव येत गेला (आतापर्यंत ती सेटवर यायची, काम करायची आणि निघून जाई).
निर्माता आणि दिग्दर्शकाची पत्नी म्हणून किशोरी आता वावरु लागली, मग मुलाचा जन्म (मुलगा होवो अथवा मुलगी त्याचे नाव बॉबीच ठेवायचे हे त्यांनी अगोदरच ठरवले आणि तसेच केले)…. या सगळ्या प्रवासात किशोरीच्या प्रत्यक्षात अथवा फोनवर असंख्य भेटी सुरु आहेत.
चित्रपट, मालिका, वेबसिरिज अशी चौफेर वाटचाल आणि देशविदेशातील अनेक दौरे यात किशोरीने काही व्यावसायिक पथ्ये पाळलीत. भूमिका विचारपूर्वक स्वीकारणे (वेबसिरिजमध्ये धाडसी दृश्ये मस्ट असली तरी तसे काम नको), आणि उगाच व्यावसायिक आणि व्यक्तिगत वादात पडायचे नाही…. आपला फिटनेस आणि लूकवर तिचे कायमच लक्ष असतेच. यावरही आमच्या गप्पा होतात.
तिचा हा प्रवास खूपच मोठा आहे. जेथे काम करावेसे वाटते तेथे ती नक्कीच करते. हे मी स्वानुभवाने सांगू शकतो. पण अशातच आयुष्यात कधी तरी एकादा अवघड क्षण येतो. मनावर संयम ठेवावाच लागतो. ११ मार्च २०१६ रोजी तसेच दुर्दैवाने घडले. सकाळी दहा वाजता तिच्या वडिलांचे निधन झाले. किशोरीची एक एअर होस्टेस बहिण लंडन फ्लाईटवर होती. ती दोन दिवसांनी परतणार होती. त्यानंतर अंत्यसंस्कार होणार होते. दीपकजी लोणावळ्याच्या पुढे फार्म हाऊसवर होते. ते निघाले. वडिलांना देहदान करण्याची इच्छा होती. नेत्रदान केले गेले आणि शवगारात त्यांचा देह ठेवण्यात आला. हे सगळे दुःख विसरून किशोरीला संध्याकाळी वांद्रा कुर्ला संकुलात एका इव्हेन्टसमध्ये नृत्य करायचे होते. तिला वाटलं आपल्या दुःखाची कोणालाही कल्पना नसेल, पण बातमी पसरली होती. तिचे गप्प गप्प राहणे सचिन पिळगावकरनी ओळखले आणि जवळ येऊन विचारणा केली. त्यानी धीर तर दिलाच पण आपला पुरस्कार स्वीकारताना याचा उल्लेख करुन किशोरीच्या “आपल्या कामाशी असलेल्या घट्ट बांधिलकी” चा उल्लेखही केला. काही वेळाने किशोरीने आपला परफॉर्मन्स केला आणि आपले “कर्तव्य” पार पाडून ती निघाली…..
दिलीप ठाकूर