नेटफ्लिक्सची खुशखबर: अशी असणार २०२१ची ‘चित्रपट’ मेजवानी..
हजरात! हजरात!! हजरात!!!
गेल्या लॉकडाऊनमध्ये मनोरंजनाची कसर भरून काढणारे सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म्स सध्या येनकेनप्रकारेण प्रेक्षकांना आपल्याकडे वळवण्यासाठी नवनव्या क्लृप्त्या लढवत आहेत. त्यासाठी कोणी मेंबरशिपची मुदत वाढवतंय तर कोणी आधीपेक्षा निम्म्या रकमेत मेंबरशिप देऊ पाहतंय. भारतातील आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सपैकी एक असलेल्या नेटफ्लिक्सने (Netflix) नुकतीच ट्विटरवरून एक खुशखबर भारतीय प्रेक्षकांना दिली आहे. त्यांच्या गेल्या काही ट्विट्सनुसार, या वर्षी नेटफ्लिक्सवर झळकणाऱ्या चित्रपट आणि वेबसिरीजेसची अनोखी मेजवानी भारतीय प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. चला तर, जाणून घेऊयात चित्रपटांच्या या आगामी मेजवानीविषयी.
द डिसायपल्: (The Disciple) आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठीचं नाव उंचावणारा हा २०२० मधील सिनेमा. चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित या चित्रपटाने कैक फिल्म फेस्टीव्हल्समध्ये रसिकांना मंत्रमुग्ध केलं. याअगोदरही चैतन्यने ‘कोर्ट’ सारखी दर्जेदार कलाकृती देऊन ऑस्करपर्यंत मजल मारली होती. ७७व्या व्हेनिस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दोन महत्त्वपूर्ण पुरस्कारांनी गौरवला गेलेला हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर उपलब्ध होईल.
अजीब दास्तान्स: (AJEEB DAASTAANS) राज मेहता, नीरज घायवान, शशांक खैतन, कायोझी इराणी या चार दिग्दर्शकांची ही अँथॉलजी फिल्म आहे. नात्यांचे विविध कंगोरे उलगडणाऱ्या कथा प्रेक्षकांसमोर मांडायचा प्रयत्न या चारही दिग्दर्शकांनी केला असून, कायोझीचं हे दिग्दर्शकीय पदार्पण ठरणार आहे. आदिती राव हैदरी, कोंकणा सेन शर्मा, जयदीप अहलावत, अभिषेक बॅनर्जी, नुसरत भरूचा, फातिमा सना शेख, शेफाली शाह, मानव कौल, अरमान रलहान इत्यादी कलाकारांचा भरणा असलेली ही फिल्म लवकरच नेटफ्लिक्सवर उपलब्ध होईल.
धमाका: (Dhamaka) कार्तिक आर्यन, अमृता सुभाष यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘धमाका’चा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज केला गेला. राम माधवानी दिग्दर्शित हा चित्रपट ‘द टेरर लाईव्ह’ या कोरियन सिनेमाचा रिमेक असून, पत्रकारिता आणि त्यातील छुप्या दहशतवादावर हा चित्रपट भाष्य करतो. चित्रपटाचं पोस्ट प्रोडक्शन अंतिम टप्प्यात आलं असून, मे किंवा जून मध्ये हा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जादूगर: (Jaadugar) तरुणाईचा लाडका अभिनेता, जितेंद्र कुमार उर्फ जितूभैय्याचा हा पहिलाच नेटफ्लिक्स डेब्यु आहे. एका जादूगाराची प्रेमकहाणी सांगणारा हा चित्रपट समीर सक्सेना यांनी दिग्दर्शित केलेला आहे तर बिस्वापती सरकार हे या चित्रपटाचे पटकथालेखक आहेत. कुमार, सक्सेना व सरकार हे The Viral Fever (TVF) या युट्युब चॅनलचं सुपरहिट त्रिकुट आहे. या चित्रपटात सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते जावेद जाफरी आणि आरुषी शर्मा यांच्याही भूमिका आहेत.
जगमे तंदीरम्: (Jagame Thandhiram) तामिळ अभिनेता धनुषची प्रमुख भूमिका असलेला ‘जगमे तंदीरम्’ जूनमध्ये रिलीज होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कार्तिक सुब्बाराज दिग्दर्शित या चित्रपटाला संतोष नारायणनचं संगीत लाभलेलं असून, ‘रकीटा रकीटा रकीटा’ आणि ‘बुज्जी’ या गाण्यांना नेटकऱ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटात धनुष एका गँगस्टरची भूमिका साकारत असून, ‘मारी’नंतर त्याला पुन्हा एकदा अश्या भूमिकेत बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
पेंटहाऊस: (Penthouse) अब्बास-मस्तान या दिग्दर्शकद्वयीच्या ‘पेंटहाऊस’मध्ये बॉबी देओल, शर्मन जोशी, अर्जुन रामपाल, मौनी रॉय, टिस्का चोप्रा अशी कलाकारांची तगडी फौज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा एक थ्रिलर चित्रपट असून पेंटहाऊसमध्ये घडलेल्या खुनाभोवती या चित्रपटाची कथा फिरते. बॉबी देओल आणि अब्बास-मस्तान हा कॉम्बो ‘हमराज’, ‘सोल्जर’, ‘नकाब’ आणि ‘अजनबी’ नंतर या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा पाहायला मिळणार आहे.
हसीन दिलरुबा: (Haseen Dillruba) विक्रांत मेस्सी, तापसी पन्नू, हर्षवर्धन राणे आणि हंसिका मोटवानी यांच्या अभिनयाचा जलवा प्रेक्षकांना या चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे. विनील मथ्यू दिग्दर्शित ही मर्डर मिस्ट्री १८ सप्टेंबर २०२०ला थिएटर्समध्ये रिलीज होणार होती आणि याच आशयाचं ट्विटही तापसीने डिसेंबर २०१९मध्ये केलं होतं पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
पगलाईत: (Pagglait) ‘दंगल’ आणि ‘लुडो’फेम सान्या मल्होत्राचा ‘पगलाईत’ उमेश बिस्त यांनी दिग्दर्शित केला असून हा चित्रपट २६ मार्चला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. एक विधवा आपल्या अस्तित्वाचा शोध कसा घेते, हे या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या टीझरलाही चांगला प्रतिसाद मिळाला असून, सान्यासोबतच सयानी गुप्ता आणि आशुतोष राणा यांच्याही भूमिका या चित्रपटात प्रेक्षकांना पाहता येतील.
बुलबुल तरंग: (Bulbul Tarang) ‘बत्ती गुल मीटर चालू’ आणि ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’नंतर दिग्दर्शक श्री नारायण सिंग हे आणखी एका सत्यकथेवरून प्रेरित असा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहेत. सोनाक्षी सिन्हा आणि ताहीर राज भसीन ही जोडी प्रमुख भूमिकेत तर दिग्गज अभिनेते राज बब्बर हे एका महत्त्वपूर्ण भूमिकेत या चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपटाची कथा कळू शकलेली नसली तरी काही प्राचीन चालीरीतींचा आढावा सिंग या चित्रपटातून घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरदार का ग्रँडसन: (Sardar Ka Grandson) काशवी नायर दिग्दर्शित ‘सरदार का ग्रँडसन’ हा एक फॅमिली ड्रामा असून तो ऑगस्टमध्ये रिलीज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चित्रपटाच्या टीझरवरून ही गोष्ट परदेशी राहणाऱ्या नातवंडांच्या मायदेशात आजोळी परत येण्याबद्दल असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अर्जुन कपूर, नीना गुप्ता, जॉन अब्राहम आणि रकुल प्रीत सिंग यांची प्रमुख भूमिका असलेली ही आगळीवेगळी ‘घरवापसी’ सध्या सर्वांच्याच कुतुहलाचा विषय ठरत आहे.
माईलस्टोन: (Milestone) आयव्हन आयर या गुणवंत दिग्दर्शकाचा हा नवा प्रोजेक्ट. व्हेनिस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये कौतुकास पात्र ठरलेली ही फिल्म लवकरच नेटफ्लिक्सवर रिलीज होणार असून, ती ‘मील पत्थर’ या हिंदी नावाने प्रदर्शित होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आपल्या बायकोच्या मृत्यूचं दुःख पचवत परिस्थितीचा सामना करणाऱ्या ट्रक ड्रायव्हरची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार असून सुविंदर विकी आणि लक्षवीर सरन हे दोघे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
मीनाक्षी सुंदरेश्वर: (Meenakshi Sundareshwar) लाँग डिस्टन्स अरेंज मरेज आणि त्यातून उद्भवणाऱ्या अडचणी, वादविवादांवर बोट ठेवणारा हा चित्रपट विवेक सोनी यांनी दिग्दर्शित केला आहे. अभिमन्यू दास्सानी आणि सान्या मल्होत्रा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.
तर हे सुजाण प्रेक्षकांनो, हा आहे नेटफ्लिक्सचा या वर्षीचा खास तुमच्यासाठी तयार केलेला फिल्म मेनू! या मेनूकार्डवरील वेबसिरीजेसबद्दलही आपण लवकरच जाणून घेऊयात!!