नेटफ्लिक्स: आमची सगळीकडे शाखा आहे!
नेटफ्लिक्स लाँच होऊन आता २४ वर्षं झाली आहेत. नेटफ्लिक्सची कमाई ही पूर्णपणे सबस्क्रायबर्स वर अवलंबून आहे, नेटफ्लिक्सवर कोणत्याही जाहिराती नसतात आणि त्यामुळेच नेटफ्लिक्स भारतासारख्या देशात किती काळ तग धरू शकेल? नेटफ्लिक्स तोट्यात सुरु आहे का? अशा अनेक चर्चा आपल्याकडे सुरु असतात. पण खरी परिस्थिती वेगळीच आहे.
नेटफ्लिक्सचा पसारा जगभर पसरलेला आहे आणि दिवसेंदिवस तो वाढतोच आहे. सध्या जगभरात नेटफ्लिक्सचे २२ कोटीपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत. सबस्क्रायबर्सचं हे जाळं आणखी वाढवण्यासाठी आता नेटफ्लिक्स विविध प्रादेशिक कंटेंटमध्ये जोरदार गुंतवणूक करत आहे.
‘नेटफ्लिक्स’ने दक्षिण कोरियामध्ये २०२२ या एकाच वर्षासाठी तब्बल ५०० मिलियन डॉलर्स म्हणजेच ३७ अब्ज ५२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यापूर्वी खर्च केलेल्या ५२ अब्ज रुपये गुंतवणुकीतून ८० कोरियन सिरीजची निर्मिती झाली, ज्यात स्क्विड गेम, हेलबाऊंड अशा गाजलेल्या सिरीजचा समावेश आहे.
नेटफ्लिक्सने आता आपलं लक्ष युरोप आणि दक्षिण आफ्रिकेकडे वळवलं आहे. फुरीओझा, साईन्स या पोलिश भाषेतील सिरीजना जगभरात मिळालेला प्रतिसाद बघून आता याच भाषेत ९ सिरीज आणि ९ चित्रपटांच्या निर्मितीची घोषणा नेटफ्लिक्सने केली आहे.
२०१९ मध्ये खरंतर पोलंडमधील सरकार नेटफ्लिक्सवर नाराज होतं. दुसऱ्या महायुद्धावर आधारित एका माहितीपटात ज्यूंच्या हत्याकांडाला जर्मनीसोबत पोलंडचाही हात होता, अशा अर्थाचा उल्लेख होता. नेटफ्लिक्सवरील या माहितीपटातून सदर उल्लेख अखेर वगळण्यात आला, त्यानंतर पोलंड सरकार आणि नेटफ्लिक्समध्ये दिलजमाई झाली.
पोलिश कलाकृतींच्या निर्मितीबरोबरच पोलंडची राजधानी वॉर्सा (Warsaw) येथे कार्यालयही थाटणार आहे. हे कार्यालय म्हणजे मध्य आणि पूर्व युरोपमधील नेटफ्लिक्सचं महत्त्वाचं केंद्र ठरेल, असं सांगण्यात येत आहे.
२०२० आणि २०२१ या दोन वर्षात नेटफ्लिक्सने पोलंडमध्ये ८ अब्ज ७५ कोटी रुपये गुंतवले. यातून काही चित्रपट तसंच सिरीजची निर्मिती झाली, ज्यामधून ३००० पेक्षा अधिक स्थानिक लोकांना रोजगार मिळाला.
सातत्याने अशी निर्मिती होत राहिली, तर रोजगाराच्या आणखी संधी वाढतील आणि अर्थकारणालाही हातभार लागेल, या उद्देशाने पोलंड सरकारनेही नेटफ्लिक्सच्या निर्णयाचं स्वागतच केलंय.
गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, नेटफ्लिक्सवर सध्या उपलब्ध असलेल्या आफ्रिकन भाषेतील शोज पाहिल्यानंतर जर्मनी, अमेरिका, इंग्लंड, ब्राझील, फ्रान्स, कॅनडा मधील प्रेक्षकांनी पुढील सफरीसाठी दक्षिण आफ्रिकेची निवड केली, अशी आकडेवारी समोर आली.
आफ्रिकन कंटेंटची ही वाढती लोकप्रियता लक्षात घेता नेटफ्लिक्सने येत्या वर्षात दक्षिण आफ्रिकेत ६३ मिलियन डॉलर्स म्हणजेच ४ अब्ज ८१ कोटी रुपये गुंतवणूक जाहीर केली आहे. स्थानिक निर्मितीसंस्थांसोबत चित्रपट आणि सिरीजच्या निर्मितीवर जोरात काम सुरु आहे. यात ‘प्रोजेक्ट पांडा’चाही समावेश आहे.
‘प्रोजेक्ट पांडा’ म्हणजे गाजलेल्या ‘वन पीस’ या ॲनिमेशन सिरीजवर आधारित लाईव्ह ॲक्शन ड्रामा सिरीज आहे आणि ही नेटफ्लिक्सची दक्षिण आफ्रिकेतील सर्वात खर्चिक निर्मिती असणार आहे. निर्मितीबरोबरच स्थानिक टॅलेंटसाठी नेटफ्लिक्सकडून ‘मेंटॉरशिप प्रोग्रॅम’ही राबवला जाणार आहे.
उदयोन्मुख लेखक-दिग्दर्शक-तंत्रज्ञ यांना या कार्यक्रमाचा चांगलाच फायदा होणार आहे. दक्षिण आफ्रिकेत चित्रपट वितरणाची व्यवस्था थोडी कमजोरच आहे, म्हणूनच नेटफ्लिक्स सारखे ओटीटी प्लॅटफॉर्म तेथील फिल्ममेकर्सना आणि एकंदरीत स्थानिक मनोरंजन क्षेत्राला खूपच लाभदायक ठरतात.
कंटेंट लोकप्रिय होण्यासाठी बडे स्टार्स हवेत, हा समज स्क्विड गेम सारख्या सिरीजनी खोटा ठरवला आहे. त्यामुळेच बजेटमध्ये हात आखडता न घेता विविध प्रदेश, तेथील संस्कृती, तेथील लोककथा, यावर आधारित कंटेंट तयार करणं आणि १९० देशांमध्ये पसरलेल्या सबस्क्रायबर्सपर्यंत पोचवणं, यावर नेटफ्लिक्सने लक्ष केंद्रित केलेलं आहे.
=====
हे देखील वाचा: हॉलिवूडच्या चित्रपटांना बसतोय चीनमधील सेन्सॉरशिपचा विळखा
=====
रशियामध्ये नेटफ्लिक्सविरोधात खटला
रशियाने युक्रेनवर हल्ला चढवल्यानंतर नेटफ्लिक्सने रशियामधील प्रसारण त्वरित थांबवलं होतं. रशियामध्ये नेटफ्लिक्सचे जवळपास १० लाख सबस्क्रायबर्स आहेत. प्रसारण थांबल्यानंतर आता या सबस्क्रायबर्सकडून नेटफ्लिक्सला कोर्टात खेचण्यात आलंय.
दर महिन्याला फी भरत असूनही नेटफ्लिक्सने अचानक प्रसारण थांबवणं हे आमच्या हक्कांचं उल्लंघन आहे असं म्हणत नेटफ्लिक्सविरोधात मॉस्कोमधील कोर्टात दावा ठोकण्यात आलाय आणि साडेपाच कोटी रुपयांची भरपाई मागण्यात आली आहे.
नेटफ्लिक्सकडून अजून यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. एवढ्यात तरी नेटफ्लिक्सकडून प्रसारण पूर्ववत होण्याची शक्यता नाहीच. प्रसारण बंद करून नेटफ्लिक्स थांबलं नाही, तर युक्रेनच्या स्वातंत्र्य लढ्यावर आधारित ‘विंटर ऑफ फायर’ हा नेटफ्लिक्सची निर्मिती असलेला माहितीपट युट्यूब वर मोफत उपलब्ध करून देण्यात आला.
=====
हे देखील वाचा: हे आहेत भारतामधील विवादित टॉप १० चित्रपट ज्यांच्यावर सेन्सॉरने बंदी घातली…
=====