गेल्या वर्षी हुकलेलं यश यावर्षी दिल्ली क्राईमनं खेचून आणलं.
दिल्लीमध्ये 2012 झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरण अनेक वर्ष गाजलं. याच प्रकरणावर दिल्ली क्राईम नावाची वेबसिरीजही आली. निर्भया बलात्कार प्रकरणाचा तत्परतेनं दिल्ली पोलीसांनी केलेला तपास, त्या दरम्यानचे राजकारण, जनमताची भूमिका आदी सर्व बाबी या वेबसिरीजमध्ये मांडण्यात आल्या होत्या. रिची मेहता दिग्दर्शित या वेब सीरीजचा आता 48 व्या इंटरनॅशनल एमी अवॉर्डसनं सन्मान करण्यात आला आहे. नेटफिक्सवर प्रदर्शित झालेली दिल्ली क्राईम ही वेब सीरीज एमी अवॉर्ड जिंकणारी पहिली भारतीय वेब सीरीज ठरली आहे. बेस्ट ड्रामा सीरीज या भागात या वेबसीरीजचा गौरव करण्यात आला आहे. शेफाली शहानं यात डेप्युटी कमिशनरची भूमिका केली आहे. शेफालीच्या या भूमिकेचे अनेक मान्यवरांनी कौतुकही केले होते. आता या वेबसीरीजचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव झाल्यामुळे शेफालीवर पुन्हा कौतुकाचा वर्षाव होतोय.
यावर्षीच्या एमी अवॉर्डसाठी भारताकडून तीन विभागांसाठी नॉमिनेशन होते. दिल्ली क्राईम वगळता अमेझॉन प्राइम व्हीडीओवरील वेब सीरीज मेड इन हैवनमध्ये मुख्य भूमिकेत झळकलेला अर्जुन माथूरचे नावही एमी अवॉर्डच्या बेस्ट अॅक्टर विभागासाठी जाहीर झाले होते. हा पुरस्कार युकेमधील वेब सीरीज रिस्पॉंसिबल चाईल्डमधील बिली बैरैट यांना मिळाला. याशिवाय बेस्ट कॉमेडी सीरीज साठी प्राइम व्हिडीओची फोर मोर शॉट्स प्लीजलाही नॉमिनेशन मिळाले होते. मात्र हा पुरस्कार ब्राजीलियन सिरीज नो-बॉडी लुकींगला मिळाला.
23 नोव्हेबर रोजी न्युयॉर्क मधील हैमरस्टीन बॉलरुममध्ये एमी अवॉर्डचा सोहळा पहिल्यांदाच व्हर्चुअली झाली. रिचर्ड काईंड यांनी रिकाम्या हॉलमध्ये सूत्रसंचालन करीत हे पुरस्कार जाहीर केले. कोरोनामुळे 1973 मध्ये सुरु झालेले हे पुरस्कार पहिल्यांदा व्हर्चुअली जाहीर करण्यात आले. टीव्ही आणि वेब इंडस्ट्रीमधील मालिकांची दखल घेण्यासाठी या एमी अवॉर्डची सुरुवात करण्यात आली. यात गेल्यावर्षीही भारताकडून राधिका आपटेला लस्ट स्टोरीज या वेबसीरीजसाठी उत्कृष्ठ अभिनेत्री म्हणून नॉमिनेशन मिळाले होते. मात्र गेल्या वर्षी हुकलेलं यश यावर्षी दिल्ली क्राईमनं खेचून आणलं. दिल्ली क्राईमला, बेटर कॉल सोल, द किलिंग ईव्ह, द क्राऊन, स्ट्रेंजर थिंग्ज यांसारख्या अनेक सुपरहिट वेब सीरीजबरोबर स्पर्धा करावी लागली.
हे हि वाचा : फोर्ब्स मासिकात अक्षयचा डंका….
केवळ सात एपिसोडच्या दिल्ली क्राईम या वेब सीरीजला IMDb कडून 8.5 रेटिंग मिळाली होती. दिल्ली क्राईममध्ये शेफाली शहा ही वर्तिका चतुर्वेदी या पोलीस कमिशनरच्या भूमिकेत होती. तर रसिका दुग्गल, आकाश दहीया, अदिल हुसेन, राजेश तेलंग, डेनझिल स्मिथ, यशस्विनी दायमा, गोपाल दत्त आदींच्याही प्रमुख भूमिका आहेत.
वेब सिरीजला एमी अवॉर्ड मिळाल्यावर दिग्दर्शिक रिची मेहता यांनी वेब सिरीज बनवतांना आलेला अनुभव शेअर केला आहे. दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांचे यासाठी मोठे सहाय्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पिडीतेच्या नातेवाईकांचीही भेट घेतली. त्यांची मानसिकता समजून घेतली. मेहता यांनी या प्रकरणावर चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र वेब सीरीजमधून या पिडीतेला योग्य आणि लवकर न्याय देऊ असे स्पष्ट झाल्याने त्यांनी वेब सिरिज बनवण्याचा निर्णय घेतला. आता या वेबसीरीजवर आंतराष्ट्रीय पुरस्काराची मोहोर उमटल्यावर त्यांचा हा निर्णय योग्यच होता हे स्पष्ट झालंय.