फॅब्युलस लाईफ ऑफ बॉलीवूड वाईफ्स: करमणुकीसाठी भातुकलीचा रंगलेला खेळ
फॅब्युलस लाईफ ऑफ बॉलीवूड वाईफ्स (Fabulous Lives of Bollywood Wives)
ऑनलाईन ॲप : नेटफ्लिक्स (Netflix)
समजा, तुमच्या घरामध्ये एकेदिवशी कोणीतरी ढीगभर कॅमेरे लावले आणि तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये अख्खं जग डोकावू लागलं तर? सीसीटीव्ही, छोट्या कॅमेराच्या उदयानंतर काहीशा अशाच संकल्पनेवर अमेरिकन टीव्हीवर निरनिराळे कार्यक्रम यायला लागले. एखादं घर निवडायचं, त्यामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये कॅमेरा लावायचा आणि मग कॅमेरा घरामध्ये जे घडत आहे, त्याचं आपसूक चित्रिकरण करत असे. हा पण त्यासाठी लागणारं कुटुंब हे तितकचं खमंग मालमसाला देणारं हवं. कधीतरी घरी एखादी खास डिश बनवताना बाजारातून एखादा स्पेशल मसाला आणून त्याची चव वाढवली जाते, तसचं या कार्यक्रमांमध्येसुद्धा बाहेरचा मिर्चमसाला टाकला जाऊ लागला. मग त्यासाठी खास दिग्दर्शक, लेखकांची फौज तयार होऊ लागली. ‘किपिंग विथ कार्डाशीअन’ हा कार्यक्रम म्हणजे या स्वरूपाचे शो किती लोकप्रिय होऊ शकतात याच जातिवंत उदाहरण. क्रिस कार्डाशीअन आणि तिच्या मुली या विसाव्या शतकामध्ये अमेरिकेतील सगळ्यात लोकप्रिय कुटुंब होण्यासाठी तसं काहीच कारण नव्हतं.
पण आपल्या खाजगी आयुष्यात अख्ख्या अमेरिकन प्रेक्षकांना डोकावण्याची संधी देण्याची सुपिक कल्पना क्रिसच्या डोक्यात आली, आणि या सगळ्यांना दगडालाही सोनं करणाऱ्या परिस सापडला. आज हे कुटुंब जगातील सगळ्यात लोकप्रिय कुटुंबातील एक आहे, असं म्हणण्यास हरकत नाही. याचं कार्यक्रमाचं भारतीय स्वरूप आणण्याचा प्रयत्न म्हणजे नेटफ्लिक्सवरचा फॅब्युलस लाईफ ऑफ बॉलीवूड वाईफ्स हा शो. महिप कपुर (संजय कपुची बायको), सीमा खान (सोहेब खानची बायको), भावना पांडे (चंकी पांडेची बायको) आणि निलम कोठारी यांच्याभोवती हा शो फिरतो आहे. गेली २५ वर्षे एकाच इंडस्ट्रीमध्ये राहिल्यामुळे त्यांनी एकमेकांची चढतेउतरते आलेख प्रत्यक्ष पहिले आहेत. त्यांच्या नवऱ्यांची कारकीर्द आणि आता त्यांच्या मुलांची घडणारी कारकीर्द यांच्या त्या साक्षिकार आहेत. यांच्याशिवाय या शोमध्ये थेट शाहरुख खानपर्यंत बॉलीवूडमधील अनेक स्टार्सनी हजेरी लावली आहे.
हे देखील वाचा: बंदिश बँडीट्स: सुरमयी कौटुंबिक ड्रामा
अर्थात बॉलीवूडमधील घराण्यांना घेऊन असा शो करायचा म्हणजे त्यात फक्त करण जोहरच हात घालू शकतो. त्याला कुठल्याच तर्कही गरज नाही. अर्थात, शो पाहताना करण जोहरच अस्तित्व इतक प्रकर्षाने जाणवतं की शो या चार स्त्रियांबद्दल आहे की करणबद्दल हाही प्रश्न पडू शकतो. मध्यंतरी घराणेशाही असो किंवा बॉलीवूडमधील पार्टी कल्चर करण जोहर आणि त्याच्या मित्रपरिवारावर बरीच टीकास्त्र सोडण्यात आली होती. या सगळ्यांवर पडद्याआडून बोट ठेवून स्वतःची बाजू मांडण्याची संधी या शोमधून करणला मिळाली आहे, असं म्हटल्यास हरकत नाही. शोमध्ये मुलगी संजनाला समाजमाध्यमांवर ट्रोल केल्यावर नाराज झालेली महिप ‘याच क्षेत्राचा भाग असल्यामुळे आमच्या मुलांना जादाचा फायदा होतो, त्यात त्यांची काय चुकी? या मिळणाऱ्या फायद्याचा लाभ घेऊ नये असं तर करता येणार नाही ना.’ किंवा ‘माझ्या या क्षेत्रातील ओळखींचा विचार केला असता, तर मी आज आघाडीचा नायक असतो,’ हे उद्गार संजय कपुरच्या मुखातून येणं, यातून घराणेशाहीबद्दलची त्यांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न जाणवून येतो.
अनन्या पांडे, जान्हवी कपुर यांना नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाल्यावर झालेल्या वादंगामुळे त्यांच्या शोमधील हजेरीतून त्यांची मेहनत, ऐन विशीमध्ये त्यांचं आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणं हे अधोरेखित केलं गेलय. बॉलिवूड म्हटलं की भांडणं, गॉसिप हे समीकरण सहाजिकच आहे. पण या विरुद्ध सगळे एकमेकांना कसे घट्ट पकडून आहेत, कितीतरी वर्षे एकमेकांच्या आयुष्याचे साक्षीदार असल्यामुळे ही सगळीच मंडळी म्हणजे एक कुटुंब आहे, हे सगळं दाखविण्याचा आटोकाट प्रयत्न शोमध्ये होतो. त्यात पॅरीस ‘द बॉल’ सोहळा, मुंबईतील फाईस्टार हॉटेल्स आणि दोहा टुरिझमची जाहिरात ही जबाबदारीसुद्धा पेलायची होती. हे सगळं करताना शो अपेक्षेपेक्षा कृत्रिम होतो. त्यामुळे शोची मजा निघून जाते.
मुळात या शोंमध्ये काय बोलायचं, कुठे भांडणं करायची, कसं वागायचं हे सगळं ठरलेलं असतं, हे प्रेक्षकांनासुद्धा ठावूक असतं. पण त्यांची खोटी भांडणं, आदळआपट, हेवेदावे हेच चवीने बघितले जातात. आठ भागांच्या या शोमध्ये नेमकं हेच कुठेतरी निसटल्यासारखं वाटतं. सीमा आणि भावनामधील रंगलेला वाद, जेवणाच्या टेबलावर अडल्ट विषयांमुळे संजय कपूरच्या मनातील नाराजी आणि समीर कोठारीच अचानकपणे निघून जाणं, अशा प्रसंगांमध्ये खरतर प्रेक्षकांची उत्सुकता वाढायला सुरवात होते, पण आग लागलेली जाणवतच त्यावर पाणी टाकून ती शांत करण्याच्या प्रयत्नाने हे बार फुसके ठरतात.
हे वाचलंत का: फोर मोर शॉर्ट्स प्लिज : पांढरपेशी समाजात गुंतलेला स्त्रीवाद
घर, कुटुंब, मुलं यामध्येच स्वतःला वाहून घेतलेल्या स्त्रियांना वयाच्या एका टप्प्यावर एकटेपणाची जाणीव व्हायला सुरवात होते. मुलं मोठी झाल्याने त्यांना आईची गरज उरलेली नसते, घर-नवरा या कामातून फुरसत मिळायला लागते मग रिकाम्या वेळेच करायचं काय? हे जाणवायला लागत. या चौघीही आयुष्याच्या या टप्प्यावर आहेत. खरतर प्रत्येकीचा स्वतःचा व्यवसाय आहे, पण त्याकडे पूर्ण वेळ लक्ष देण्याचं धैर्य त्यांच्यात अजून आलेलं नाही. आयुष्याच्या या टप्प्याबद्दल मैत्रिणीच्या नात्याने त्यांच्यात परिपक्व संवाद घडवला असता, तरी शोचं वेगळेपण जाणवलं असतं. पण ही चर्चासुद्धा टाळली जाते. त्यात शेवटच्या भागामध्ये शाहरुख आणि गौरी खानच्यानिमित्ताने शोचं स्वरूप आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमात होतं. त्यामुळे हे सगळं पाहताना शोची मूळ संकल्पना बाजूला पडलेली जाणवत राहते. अर्थात हे सगळं होतं असताना बॉलीवूडचं ग्लॅमर, श्रीमंतांचे शौक, लाइफस्टाइल, कलाकारमंडळीचं खाजगी आयुष्य याची पुरेपूर झलक प्रेक्षकांना मिळते. त्यामुळे टाळेबंदीच्या काळामध्ये वर्तमानपत्रातील पेज ३ पान दुरावल्याची खंत वाटत असेल, तर हा शो ती कसर भरून काढेल.