महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
न्यू एक्सलसियर मिनी थिएटरचा नवीन अनुभव…
ऑक्टोबर १९८३ ची गोष्ट. दिग्दर्शक बी.आर.चोप्रा दिग्दर्शित ‘मजदूर’ या चित्रपटाच्या प्रेस शो चे आमंत्रण माझ्या हाती आले, त्यावर म्हटले होते, स्थळ न्यू एक्सलसियर(New Excelsior) मिनी थिएटर. आतापर्यंत मला न्यू एक्सलसियर थिएटर माहित होते, त्यातील मिनी थिएटर हा नवीन अनुभव होता. लिफ्टने चौथ्या मजल्यावर गेल्यावर साधारण साठ सीटसचे पाहिलेले मिनी थिएटर ही माझी ‘टाॅकीजची गोष्ट संस्कृती’शी नवीन ओळख झाली. आणि मग अनेक मिनी थिएटर्सशी ती ओळख वाढत वाढत गेली.
तत्पूर्वी, न्यू एक्सलसियर(New Excelsior) हे नाव सर्वप्रथम ऐकले ते १२ मार्च १९७५ रोजी राज खोसला दिग्दर्शित ‘प्रेम कहानी’च्या जाहिरातीत. त्यात या चित्रपटाने न्यू एक्सलसियर या चित्रपटगृहाचे उदघाटन होत असल्याचे म्हटले होते. राजेश खन्ना, मुमताज, शशी कपूर व विनोद खन्ना यांच्या नवीन चित्रपटाने नवीन चित्रपटगृहाचे उदघाटन होतेय, हे तेव्हा विशेष होते. आणि माझे ते शालेय वय असल्याने कुतूहल वाढले की, ते नेमके कुठे आहे? आमच्या दक्षिण मुंबईतच ते आहे,असे समजले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून ते जवळच. अधिक तपशीलात जात सांगायचे तर कॅपिटॉल, स्टर्लिंग, न्यू एम्पायर यांच्या सहवासात न्यू एक्सलसियर(New Excelsior). म्हणजेच एका थिएटरला तिकीट मिळाले नाही, तर दुसरे थिएटर असा पर्याय होता. तरी स्टर्लिंगला कायमच विदेशी चित्रपट आणि न्यू एक्सलसियरलाही अधूनमधून असेच विदेशी चित्रपट प्रदर्शित होत. त्याकाळात येथे ‘चुपके चुपके’, ‘शोले’ रिलीज झाले. ‘शोले’चे विशेष म्हणजे संपूर्ण मुंबईत मिनर्व्हासोबत फक्त आणि फक्त न्यू एक्सलसियरला(New Excelsior) तो सत्तर एमएम आणि स्टीरीओफोनिक साऊंड सिस्टीममध्ये होता. पण ‘फक्त काही आठवड्यां’साठीच तो न्यू एक्सलसियरला आहे, असे जाहिरातीतच म्हटले होते.
न्यू एक्सलसियरमध्येच(New Excelsior) ‘टाॅवरिंग इन्फर्मो’ हा विदेशी चित्रपट लोकप्रिय ठरला. यशराज फिल्म्सचा आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ ( १९९५)ने येथेच खणखणीत पन्नास आठवड्यांचा प्रवास केल्याने या थिएटरच्या इतिहासाला महत्त्व प्राप्त झाले. यशाची हीच तर गंमत आहे. ती अनेक गोष्टींची प्रेरणा देते. न्यू एक्सलसियरच्या आताच्या भव्य इमारतीच्या जागेवर फार पूर्वी काय होते? इंग्रजांच्या काळात १८८७ साली तेथे नाॅव्हेल्टी नावाचे नाटकाचे थिएटर होते. कधी जादूचे प्रयोग, वाद्यवृंद वगैरेचे शो होत. मूकपटाच्या काळात त्यांचे आयोजन होऊ लागले. मग ही इमारत पाडून नवीन चित्रपटगृह उभे राहिले. त्याचे नाव एक्सलसियर. ते २१ फेब्रुवारी १९२८ रोजी मूकपटाने सुरु झाले. काही वर्षातच बोलपट निर्माण होत गेले आणि त्या काळातील जुन्या मुंबईत एक्सलसियर स्थिरावले. तेही पाडून सत्तरच्या दशकात वातानुकूलित देखणे भव्य दिमाखदार थिएटर सुरु होताना तळमजल्यावर थिएटर ( त्यात बाल्कनी नाही हे त्या काळात विशेषच ) आणि वर संपूर्ण इमारतीत खाजगी कार्यालये. चौथ्या मजल्यावर मिनी थिएटर. तेथे अनेक मराठी व हिंदी चित्रपटांचे आम्हा समिक्षकांसाठीचे शो रंगले.त्यात माझ्या काही विशेष आठवणी आहेत,अधूनमधून कोणी स्टार यायचा हो.
आपला पहिला चित्रपट ‘अबोध’च्या प्रेस शोच्या मध्यंतराला माधुरी दीक्षित आपल्या आई बाबांसोबत आवर्जून आली आणि आम्हा समिक्षकांना भेटली. अगदीच शाळकरी मुलगी होती हो ती. मला आठवतय, त्या काळात लोकसत्तात चित्रपट समिक्षा लिहिणारे शरद गुर्जर यांची माधुरीच्या आईशी भेट होताच त्याना त्यांचे जुने दिवस आठवले. रत्नागिरीत लहानपणी ते एकाच शाळेत होते हे विशेष होते. ‘अंकुश’च्या येथील प्रेस शोला दिग्दर्शक एन. चंद्रा आवर्जून हजर होतेच पण नाना पाटेकरही आला होता. या चित्रपटाच्या पूर्वप्रसिध्दीवर एन. चंद्रांचे विशेष लक्ष होते हे आठवतेय.सुभाष घई दिग्दर्शित ‘हीरो’च्या प्रेस शोला जॅकी श्राॅफ आम्हा समिक्षकांसोबतच बसला. पण पिक्चर सुरु असतानाच मधूनच येणारी काॅमेन्टस त्याला अपेक्षित नसावी असे मध्यंतरातील त्याच्या एक्स्प्रेशनवरुन मला तरी वाटले.
=======
हे देखील वाचा : ..जेव्हा किशोरकुमार ने निर्माता जी पी सिप्पी यांना विनाकारण पळ पळ पळवले!
======
‘सच्चे का बोलबाला ‘चा प्रेस शो संपल्यावर पाहिले तर चक्क देव आनंद आम्हा समिक्षकांना भेटायला आला होता. पण पिक्चर खास नव्हता हे या ‘देवा’ला कसे सांगणार? तो मात्र आमचे चेहरे वाचण्यात एक्स्पर्ट असो. तेव्हा फक्त मुद्रित माध्यमे होती आणि समिक्षकही सिनेमाचे जाणकार होते.असे हे मिनी थिएटर काही चांगल्या आठवणी देत असतानाच नव्वदच्या दशकात बंद पडले. तर एक्सलसियरचे मेन थिएटर आजही थाटात सुरु आहे. काही वर्षांपूर्वीच सुभाष घई यांच्या मुक्ता आर्टसच्या वतीने त्याचा कारभार सुरु आहे. अतिशय पाॅलिश्ड आणि ऐटदार असे हे थिएटर आहे. येथे काही हिंदी चित्रपटांचे प्रीमियर रंगलेत. अब्बास मुस्तान दिग्दर्शित ‘बाझीगर’चा येथील प्रीमियर अतिशय वैशिष्ट्यपूर्ण. सुभाष घईची त्यास विशेष उपस्थिती होती. न्यू एक्सलसियरची आणखीन एक खासियत. पूर्वी भारताचे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव देशातील चित्रपटसृष्टीचे केंद्र असलेल्या शहरात आलटूनपालटून आयोजित केला जाई. मुंबईत १९८४ आणि १९९५ असे त्यावेळी इफ्फीचे आयोजन केले असता. न्यू एक्सलसियरमध्ये भारतीय पॅनोरमा विभाग आयोजित केला होता. १९९५ च्या भारतीय पॅनोरमाचे उदघाटन डाॅ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘मुक्ता’ ने झाले तेव्हाची सोनाली कुलकर्णीशी झालेली ‘पहिली भेट’ आजही तिच्या एक्स्प्रेशनसह आठवतेय. तेव्हा आपल्या या चित्रपटाचे महोत्सवातील स्क्रीनिंगचे तिला जेवढे कुतूहल होते. त्यापेक्षा तिच्यातील आत्मविश्वास जास्त जाणवला. ‘मुक्ता’ला यावेळी उत्तम प्रतिसाद मिळाला. न्यू एक्सलसियरची माझी ही वेगळी आठवण. मुंबईतील जुन्या काळातील सिंगल स्क्रीन थिएटर्सपैकी हे एक छान मेन्टेन केलेले थिएटर म्हणून त्याची यशस्वी वाटचाल अशा आठवणींसह सुरु आहे.
दिलीप ठाकूर