प्रेक्षकांना भावतोय प्रेमाचा त्रिकोण!
मालिकांमधील नायक नायिकेच्या प्रेम कहाण्या तर आपल्याला नवीन नाहीत, याच प्रेम कहाण्या अजून रंजक दाखवण्यासाठी दोघात तिसरा असं चित्र हल्ली दिसायला लागलंय… मालिकेत सध्या दोन हिरो दाखवण्याचा नवा ट्रेंड सुरू झालाय असं म्हणायला हरकत नाही… त्यातील एक सोज्वळ चॉकलेट boy तर दुसरा व्हिलन दाखवल्याने कथानक मात्र उत्कंठावर्धक होतंय.
‘पाहिले न मी तुला’ (Pahile Na Mi Tula) मध्ये नायिकेचा (मनूचा) बॉस समर प्रताप विक्षिप्त, स्वार्थी असून मनूचं प्रेम हिसकावून मिळवण्याच्या मागे लागलाय तर दुसरीकडे मनूवर मनापासून प्रेम करणारा अनिकेत हा मनूचा उमदा प्रियकर पहायला मिळतोय… समरने मनूच्या कुटुंबाच्या मनात आदराचं स्थान मिळवून आपल्या खोट्या नाट्या वागण्याने मनूच्या आईबाबांना पुरतं आपल्या जाळयात ओढलंय… यात मनूचा अक्षरशः कोंडमारा होतोय कारण तिचं अनिकेतवर मनापासून प्रेम आहे आता समरच्या छुप्या वारापासून वाचून मनू अनिकेतची प्रेम कहाणी फुलेल का आणि निरागस भाबडया मनूला तिचा अनिकेत भेटेल का हे पाहणं रंजक ठरेल.
माझा होशील ना (Majha Hoshil Na) मध्ये आदित्य आणि सईची मिस मॅच पण परफेक्ट जोडीची केमिस्ट्री सर्वांना अतिशय आवडते. बिनधास्त मनमोकळी सई आणि कर्तव्यदक्ष बुजरा आदित्य यांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोकयावर घेतलं…कधी चाफा – रातराणी तर कधी समशेर सिंग – लज्जो असं म्हणत त्यांनी आपली वेगळी ओळख बनवली… पण त्यांच्या लग्नाआधी सईच्या आयुष्यात कसंही कुठेही केव्हाही असं म्हणत हवी ती गोष्ट मिळवणाऱ्या डॉक्टर सुयश पटवर्धनची एंट्री झाली आणि त्यांच्या लव्ह स्टोरी मध्ये अनेक चढ उतार आले. अनेक संकटांना त्यांना सामोरं जावं लागलं पण फायनली आदित्य सईला माझी होशील ना म्हणाल्या नंतर सर्व प्रेक्षकांच्या जीवात जीव आला. सुयशशी ठरलेल्या लग्नात भर मांडवातून आदित्यने सईला पळवून आणलं पण सईच्या आयुष्यात आलेल्या डॉक्टर सुयशमुळे मालिकेतील सई आदित्यची प्रेम कहाणी चांगलीच हिट झाली.
नुकत्याच संपलेल्या माझ्या नवऱ्याची बायको (Majhya Navryachi Bayko) मध्ये राधिका गुरूनाथच्या संसारात सौमित्रचं आगमन झालं आणि राधिकाचं संपूर्ण जीवनच पालटलेलं पाहायला मिळालं… गुरूनाथचा बेजबाबदार स्वभाव, वाईट वागणूक, व्यसनीपणा, असभ्य वागणूक यामुळे राधिका पुरती डबघाईला आली. त्यानंतर तिने धीर करत राधिका मसाले नावाचा स्वतंत्र उद्योग सुरू केला आणि अचानक तिची भेट सौमित्र नावाच्या तिच्या जुन्या मित्राशी झाली आणि सौमित्रच्या यशस्वी साथीमुळे एक यशस्वी उद्योजिका बनली. गुरूनाथचे डावपेच चालूच होते त्यावर राधिका मात करत राहिली आणि पुढे जाऊन आपल्यावर खरं प्रेम करणाऱ्या आणि प्रोत्साहन देणाऱ्या सौमित्रची साथ द्यायची ठरवलं आणि त्याच्यासोबत विवाहबंधनात अडकली. सौमित्र राधिकाची मॅच्युअर्ड लव्ह स्टोरी या मालिकेच्या कथेतून पाहायला मिळाली आणि अनेक महिलांना राधिकामुळे एक प्रेरणा मिळाली. एक चांगली साथ सहवास आणि आत्मविश्वास व्यक्तीला आयुष्यात समृद्ध आणि सुंदर बनवतो हाच संदेश या मालिकेने दिला.
सध्या अशा ट्रॅक मधून खरं प्रेम आणि फसवं प्रेम मालिकेतून अधोरेखीत होतांना दिसतंय. मालिकेतील नायिकेचे दोन्ही हिरो अतिशय उत्तम प्रकारे ग्रे शेड आणि चांगुलपणा यातील फरक अभिनयाद्वारे साकारत आहेत त्यामुळे दोन हिरोंचा ट्रॅक प्रेक्षकांच्या चांगला पसंतीस पडतोय. थोडक्यात काय तर, प्रेमाचा हा त्रिकोण प्रेक्षकांना चांगला भावतोय असं म्हणायला हरकत नाही.
– सिध्दी सुभाष कदम.