आगामी वर्ष स्टारकिडचं….
आगामी वर्ष कसं असेल याची उत्सुकता सर्वानाच असते. चित्रपटसृष्टीमध्येही आगामी वर्ष कसं असेल आणि या नव्या वर्षात कोणते नवे चित्रपट मोठ्या पडद्यावर येत आहेत, याबाबत उत्सुकता आहे. अर्थात 2023 हे नवं वर्ष स्टारकिडचं असणार आहे. कारण शाहरुख खान, अमिर खान, अजय देवगण यांच्यापासून अमिताभ बच्चन यांच्या घरातीलही तरुण पिढी नव्या वर्षात मोठ्या पडद्यावर येणार आहे. आधीच सोशल मिडीयावर या स्टारकीडची मोठी क्रेझ आहे. आता ही तरुण मंडळी मोठ्या पडद्यावर डेब्यू करणार आहे. त्या चित्रपटात त्यांची भूमिका कशी असणार आणि त्यांचा लूक कसा असेल याची उत्सुकता चित्रपटप्रेमींना आहे.
स्टारकीडमध्ये (Starkid)सर्वात वरचा नंबर लागतो तो शाहरुख खानच्या लाडक्या लेकीचा, सुहाना खानचा. शाहरुख खानची ही लाडकी लेक सोशल मिडीयावर सर्वाधिक चर्चेत असते. सुहानाचा तिचे फोटो अनेकवेळा शेअर करत असते. परदेशात शिक्षण घेणारी सुहाना तिच्या होमप्रोडक्शनमधून चित्रपटात प्रवेश करेल असं वाटत होतं. रेड चिलिज या शाहरुखच्या होम प्रोडक्शनचा कारभार सध्या त्याची पत्नी गौरी खान पाहत आहे. याच होम प्रॉडक्शनच्या माध्यमातून शाहरुखची मुलगी सुहाना आणि मुलगा आर्यन खान बॉलिवूडमध्ये दाखल होतील अशी खळबळ होती. त्याशिवाय स्टारकिडना पहिली संधी देणारा करण जोहरही सुहानाला घेऊन चित्रपट करण्यासाठी उत्सुक होता. मात्र शाहरुखनं आपल्या लेकीच्या पहिल्या चित्रपटासाठी कुठलाही वाद होणार नाही, यावर भर दिला आहे. सध्या करण जोहर आणि शाहरुख या दोघांविरोधातही सोशल मिडीयात फारसे चांगले वातावरण नाही, याचा तोटा आपल्या मुलीला बसू नये, यासाठी शाहरुख जागरुक आहे. म्हणूनच त्यांनी सुहानासाठी झोया अख्तरला पसंती दिली आहे. झोया अख्तरच्या ‘द आर्चिज’ हा चित्रपट सर्व स्टारकिडसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
‘द आर्चिज’ चित्रपट असाच चर्चेत आला आहे. कारण या चित्रपटामधून सुहाना खान पासून अगस्त्य नंदा यांचा डेब्यू होत आहे. अगस्त्य नंदा म्हणजे अमिताभ बच्चनचा नातू आणि श्वेता बच्चनचा मुलगा. अगस्त्य नंदा झोयाच्या चित्रपटात आर्चीची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी झोया अख्तरने अनेक तरुणांचे ऑडीशन घेतले होते. त्यातून अगस्त्याची निवड झाली आहे.
सुहाना आणि अगस्त्य सोबत ‘द आर्चिज’मध्ये आणखी एक स्टारकिड(Starkid) चमकणार आहे. ती म्हणजे खुशी कपूर. जान्हवी कपूरची बहिण, श्रीदेवी आणि बोनी कपूरची धाकटी मुलगी. जान्हवी पाठोपाठ खुशीही मोठ्या पडद्यावर येणार आहे. यासाठी खुशीनंही होम प्रोडक्शनचा पर्याय नाकारला. बोनी कपूर यांच्यासारखा दिग्दर्शक असताना खुशीनं झोया अख्तरच्या चित्रपटासाठी ऑडीशन दिली. यात ती यशस्वी झाली. मात्र द आर्चिजची ही स्टारकिड कास्ट बघता झोयानं बरीच गुप्तता पाळली आहे. या चित्रपटाचे बरेचसे शुटींग परदेशात पार पडले आहे आणि काही शुटींग दार्जिलिंग आणि सिमला येथेही झाले आहे. ‘द आर्चिज’ पुढच्यावर्षी प्रदर्शित होणा-या चित्रपटांच्या यादीमध्ये सर्वात वरच्या स्थानावर आहे.
======
हे देखील वाचा : देवेंद्र दोडकेंनी गाजविला ‘मोनिका ओ माय डार्लिंग’
=====
छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगीही नव्या वर्षात मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. पलक तिवारीचे सोशल मिडीयावर लाखो फॉलोअर्स आहेत. पलक सलमान खानच्या ”किसी का भाई, किसी की जान’ या चित्रपटात दिसणार आहे. पलक तिच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर करत असते आणि त्यातून तिला लाखो लाईक मिळत आहेत. स्टारकिडमधील(Starkid) आणखी एक चर्चित नाव म्हणजे शनाया कपूर. संजय आणि महीप कपूर यांची सुंदर मुलगी शनाया देखील पुढील वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शनायाचे बोल्ड फोटोशुट गाजले होते. शनाया करण जोहरच्या बेधडक चित्रपटात दिसणार आहे. यासाठी शनाया बरीच मेहनत घेत आहे. ती सध्या अभिनयाचे प्रशिक्षण घेत असून नृत्याचाही सराव करीत आहे. बॉलिवूडमध्ये रोशन कुटुंबाचे स्वतंत्र स्थान आहे. याच रोशन कुटुंबातील आणखी एक व्यक्ती बॉलिवूडमध्ये दाखल होत आहे. नव्या वर्षात पश्मिना रोशन मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. ऋतिक रोशनची बहीण असलेली पश्मिनाही अत्यंत सुंदर आहे. पश्मीना तिच्या करिअरची सुरुवात इश्क विश्क या चित्रपटाच्या पुढच्या भागातून करणार आहे. स्टारकिडमधले पुढचे नाव आहे, इब्राहिम अली खानचे. सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानही बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. काजोलही त्याच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय आमिर खानचा मुलगा जुनैद खानचाही या यादीत समावेश आहे. जुनैद महाराजा या चित्रपटातून डेब्यू करणार आहे. यामध्ये जुनैद पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. एकूण नवं वर्ष स्टारकिडचं वर्ष ठरणार आहे.
सई बने