ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
“निशांत” पन्नाशीत….
“शोले” (मुंबईत रिलीज १५ ऑगस्ट १९७५) घोंघावू लागले होते. मुंबईनंतर देशातील विविध राज्यांत आता टप्प्याटप्प्याने “शोले” प्रदर्शित होत होत सामाजिक सांस्कृतिक वातावरणात उत्साह निर्माण होत होता. सगळीकडेच थिएटर्सवर हाऊसफुल्लचा फलक मुक्काम करण्यासाठीच लागत होता आणि अशातच श्याम बेनेगल दिग्दर्शित “निशांत” (Nishant) (मुंबईत रिलीज ५ सप्टेंबर १९७५) दाखल झाला. म्हणजेच या चित्रपटाच्या प्रदर्शनास ४९ वर्ष पूर्ण होत असून हा चित्रपट पन्नास वर्षांत प्रवेश करीत आहे. “शोले”च्या अक्राळविक्राळ लाटेसमोर “निशांत”चा निभाव लागणे कठीण. पण “निशांत” हा नवचित्रपट ( समांतर/ न्यू व्हेव/ कलात्मक) पठडीतील बौद्धिक समाधान देणारा चित्रपट होता.
सत्तरच्या दशकात हिंदी चित्रपट कूस बदलत होता. अनेक गोष्टींची घुसळण होत होती. एकिकडे धमाकेदार मसालेदार मनोरंजक चित्रपट हाऊसफुल्ल गर्दीत थेटरात टाळ्या शिट्यांनी एन्जाॅय केले जात होते, त्यातच मृणाल सेन दिग्दर्शित “भुवन शोम” (१९७०) पासून हिंदीत समांतर चित्रपट रुजू लागला. श्याम बेनेगल दिग्दर्शित “अंकूर” ( १९७३)ने त्याला मुख्य प्रवाहात आणले. बासू चटर्जी दिग्दर्शित “रजनीगंधा” (१९७४)ने स्वच्छ मनोरंजक चित्रपट रुजवला. सतराम रोहरा निर्मित “जय संतोषी माँ” ( मुंबईत रिलीज ३० मे १९७५)ने पौराणिक चित्रपटाची क्रेझ वाढवली. मनमोहन देसाई दिग्दर्शित “अमर अकबर ॲन्थनी” ( १९७७)ने मल्टी स्टार कास्ट चित्रपटाची जणू गरज निर्माण केली. सत्तरच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टी भारीच तेजीत होती. त्याचीच फळे आज मिळताहेत.
यात समांतर चित्रपटाला आपलं अस्तित्व राखणे आवश्यक होते आणि त्यातीलच एक चित्रपट “निशांत”(Nishant). या वास्तववादी चित्रपटाचे सगळे चित्रीकरण हैदराबादजवळील एका गावात झाले. या चित्रपटाची पटकथा विजय तेंडुलकर यांची असून संवाद सत्यदेव दुबे यांचे आहेत. या चित्रपटाला वनराज भाटीया यांचे पार्श्वसंगीत आहे (हा चित्रपट गीतविरहित आहे. समांतर चित्रपटात गाणी नसत. प्रसंगानुरुप एखादे नृत्य असे. अपवाद श्याम बेनेगल दिग्दर्शित “भूमिका” या चित्रपटाचा. त्यात गीत संगीत व नृत्य आहे. मराठीतील अष्टपैलू अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या आत्मचरित्रावर आधारित हा चित्रपट आहे.)
“निशांत”(Nishant)चे कथासूत्र असे, खेड्यातील तीन जमीनदार अण्णा (अमरीश पुरी), अंजैय्या (अनंत नाग), प्रसाद (डाॅ. मोहन आगाशे) यांचा काहीसा भाबडा धाकटा भाऊ विश्वम ( नसिरुद्दीन शाह) विवाहित असूनही गावच्या शिक्षकाच्या (गिरीश कर्नाड) बायको सुशीलावर (शबाना आझमी) कमालीचा फिदा होतो. त्याचे लाड करत करत ते जमीनदार भाऊ त्या सुशीलाचे अपहरण करतात. विश्वम आपल्या पत्नी रुक्मिणीकडे (स्मिता पाटील) फारसे लक्ष देत नसतो.
जमीनदार वृत्तीची दहशत, हिंसा आणि ग्रामीण भागातील गरीब स्रिचे शोषण याभोवती हे कथानक आहे. पोलीस पाटील (कुलभूषण खरबंदा) हे प्रकरण हाताळतो ते संशयास्पद ठरते. चित्रपट पाहताना आपण अगदी सुन्न होतो. आणि तीच या चित्रपटाची ताकद आहे. संकलक भानुदास दिवकर यांचाही खास उल्लेख हवाच. दक्षिण मुंबईतील डाॅ. भडकमकर मार्गावरील टोपीवाला लेनमध्ये ते राहत. काही वर्षांनी त्यांच्या भेटीचा योग आला.
नसिरुद्दीन शाह आणि स्मिता पाटील यांची भूमिका असलेला हा पहिला चित्रपट. नसिरुद्दीन शाहने आपले आत्मचरित्र “And Then one Day” मध्ये आपल्या या पहिल्या चित्रपटासाठीची निवड यापासून बरेच काही लिहिले आहे. गिरीश कर्नाड यांनी “झू स्टोरी”मधील काम पाहून श्याम बेनेगल यांना नसिरुद्दीन शाहचे नाव सुचवले. श्याम बेनेगल यांच्या पहिल्या भेटीसाठी नसिरुद्दीन शाह पुण्यावरुन (तेव्हा तो पुण्यातील एफटीआयमध्ये होता) पहाटेच बसने निघाला आणि पेडर रोडवरील त्यांच्या घरी लवकरच पोहचला. आपल्याला चित्रपटात काम मिळतेय याचा त्यात त्याचा आनंद होता. (दिल्लीत एनएसडीमध्ये असताना अमेरिकन कल्चरल सेंटरच्या नाट्य महोत्सवातील “झू स्टोरी” मध्ये नसिरुद्दीन शाहने भूमिका केली होती.) पंचेचाळीस दिवसांच्या चित्रीकरणात “निशांत” (Nishant) पूर्ण झाला.
“निशांत” (Nishant) आपल्या कारकीर्दीतील एक सर्वोत्तम कलाकृती असे नसिरुद्दीन शाह मानतो यातच या चित्रपटाचे मोठेपण अधोरेखित होतेय. विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने नसिरुद्दीन शाहने आयुष्यात एक विमानतळ पाहिले आणि मुंबई ते हैदराबाद (आणि रिटर्न) असा पहिल्यांदाच विमान प्रवास केला तेही विशेष रोमांचित होत.
चित्रपटात गिरीश कर्नाड, अमरिश पुरी, अनंत नाग, स्मिता पाटील, मोहन आगाशे, कुलभूषण खरबंदा, साधु मेहर, सविता बजाज यांच्याही भूमिका. ( या चित्रपटाच्या वेळेस गिरीश घाणेकर श्याम बेनेगल यांचे सहाय्यक दिग्दर्शक होते. काही वर्षातच ते “प्रेम करुया खुल्लम खुल्ला” इत्यादी चित्रपटांनी मराठीतील एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून नावारुपास आले. )
चित्रपटाला कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ( १९७६), लंडन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ( १९७६), मेलबोर्न आणि शिकागो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ( १९७७) यात विशेष गौरविण्यात आले.
==========
हे देखील वाचा : पुन्हा हाऊसफुल्ल गर्दीत “शोले” एन्जाॅय करताना…
==========
ब्लेझ फिल्म एन्टरप्रायझेसच्या वतीने हा चित्रपट निर्माण करण्यात आले. या चित्रपटाच्या निर्मितीच्या काळात श्याम बेनेगल यांचे कार्यालय ग्रॅन्ड रोड येथील ज्योती स्टुडिओत होते. (जेथे भारतातील पहिला हिंदी बोलपट अर्देशीर इराणी दिग्दर्शित “आलम आरा“चे चित्रीकरण झाले. १९३१ सालचा हा चित्रपट आहे.) हिंदीतील समांतर चित्रपट चळवळीतील “निशांत” (Nishant) हा एक उल्लेखनीय चित्रपट. “शोले” च्या वादळातही त्याने आपले अस्तित्व दाखवले. कसदार चित्रपट असा आपली जागा निर्माण करीत असतोच…