रिमेक नको, मूळ चित्रपटच पुन्हा पुन्हा पाहू…
ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘बावर्ची’ व ‘मिली’, गुलजार दिग्दर्शित ‘कोशिश’ या चित्रपटांच्या रिमेकची बातमी माझ्यापर्यंत पोहचेपर्यंत माझे मन सत्तरच्या दशकात म्हणजे माझ्या शाळा काॅलेजच्या वयात गेले. ते दिवसच वेगळे होते. तेव्हाचे सांस्कृतिक वातावरण वेगळे होते. (Original Movie)
सत्तरच्या दशकात सर्वच क्षेत्रात बहुस्तरीय उलाढाल झाली. घुसळण झाली. हिंदी चित्रपटात बरेच काही घडताना अमिताभ बच्चनच्या रुपाने ॲन्ग्री यंग मॅनचं वादळ आलं, ‘शोले’पासून मल्टी स्टारर चित्रपटाचा धमाका सुरु झाला, ‘जय संतोषी माँ’च्या (रिलीज ३० मे १९७५) यशाने सामाजिक, कौटुंबिक वातावरण ढवळून काढले. पौराणिक चित्रपटांची लाट आली. मृणाल सेन दिग्दर्शित ‘भुवन शोम’ (१९७०) पासून आलेल्या समांतर अथवा न्यू वेव्ह चित्रपटाच्या वाटचालीला सुपीक वातावरण निर्माण होत गेले. अशातच क्वालिटी चित्रपट अर्थात स्वच्छ मनोरंजनाचे चित्रपट हा एक मार्ग आकाराला आला. (Original Movie)
माझ्या मते ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘आनंद ‘ने याचा पाया रचला. आणि मग ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित गुड्डी, बावर्ची, अभिमान ( रिलीज २७ जुलै १९७३. म्हणजेच पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत.), नमक हराम, मिली, चुपके चुपके,.गोलमाल, खुबसुरत, नरम गरम, रंगबिरंगी हे चित्रपट, गुलजार दिग्दर्शित अचानक , कोशिश, आंधी, मौसम, खुशबू, किनारा हे चित्रपट, बी. आर. चोप्रा दिग्दर्शित पती पत्नी और वो, बासू भट्टाचार्य दिग्दर्शित आविष्कार, बासू चॅटर्जी दिग्दर्शित रजनीगंधा, पिया का घर, छोटी सी बात, चितचोर, खट्टा मिठ्ठा, बातो बातों मे, खुशबू, किनारा, सई परांजपे दिग्दर्शित स्पर्श, चश्मे बद्दूर, कथा, रजत रक्षित दिग्दर्शित मेरे बिवी की शादी, दामाद अशा चित्रपटांनी ती एक वाट निर्माण केली. एस्टॅब्लिश झाली. मसालेदार मनोरंजक चित्रपट ( ज्यात अतिशयोक्तीपूर्ण गोष्ट, संवाद यांचा भरणा) आणि नवप्रवाहातील चित्रपट ( जे बोजड वा क्लिष्ट वाटत. ते सहज समजण्यापलिकडचे आहेत असाच समज होता आणि तो योग्यही होता.) या सगळ्यातून एक अतिशय स्वच्छ आणि सोपे मनोरंजन हवे होते. ती गरज या बावर्ची, आनंद, आविष्कार अशा मध्यमवर्गीय चित्रपटांनी पूर्ण केली आणि या चित्रपटांना सेन्सॉरने ‘क्वालिटी चित्रपट’ असे एक नवीन प्रमाणपत्र द्यावे, यामुळे अशा चित्रपटांच्या निर्मितीस प्रोत्साहन मिळेल, याच पठडीतील म्हणजेच ‘छोटे बजेट आणि आपल्या आसपासचा विषय’ अशा चित्रपटांची निर्मिती वाढेल असा सकारात्मक दृष्टिकोन होता. पण ही गोष्ट फक्त चर्चेच्या फेऱ्यात राहिली. अंमलबजावणी झाली नाही. (Original Movie)
आता याच क्वालिटी चित्रपटांच्या रिमेकच्या बातम्या येत आहेत. पण खरंच या रिमेकना मूळ चित्रपटाची अस्सल सर येईल ? आज ‘आनंद ‘ कोण साकारणार? राजेश खन्नाने त्या भूमिकेत भरलेला रंग आजचा कोणता कलाकार भरणार आणि रसिकांची सहानुभूती मिळवणार? असा यातील प्रत्येक चित्रपटाबाबत प्रश्न आहे. मुळात लेखनापासून प्रश्न निर्माण होतात. मग आज त्या दर्जाचे दिग्दर्शक व कलाकार आहेत का आणि असले तरी तशी बांधिलकी आहे का असे अनेक प्रश्न आहेत. महत्वाचे म्हणजे यातील बरेच चित्रपट यू ट्यूबवर, काही ओटीटीवर तर काही उपग्रह वाहिनीवर पाहता येताहेत तर मग रिमेक कशाला? या मूळ चित्रपटातील गोडवा आज चाळीस पंचेचाळीस वर्षांनंतरही कायम आहे. मूळ चित्रपटातील आशय, अभिनय, गीत संगीत व नृत्य, त्यांचे पोस्टर हे काही कालबाह्य झालेले नाहीत. (Original Movie)
=====
हे देखील वाचा : हिटच्या ट्राॅफिज राहिल्या फक्त आठवणीत…
=====
बरं हे चित्रपट पडद्यावर आले त्या काळाशी त्यातील गोष्टी सुसंगत आहेत. आज काॅन्ट्रॅक्ट मॅरेज, लिव्ह इन रिलेशनशीप, घटस्फोट यांच्या वाढत्या संख्येच्या युगात ‘अभिमान ‘ची गोष्ट कनेक्ट होऊ शकेल का ? आज कलाकार वा गायक पत्नीने देश विदेशात शो करावेत मी व्यवहार सांभाळतो असा एखादा गायक पती व्यावसायिक ॲप्रोच ठेवू शकतो. तो आपलं गायकीतील करियर पैशापुढे बाजूला ठेवू शकतो. पन्नास वर्षांपूर्वीचा पती असे काही करु शकतो अशी साधी कल्पनाही करता येत नव्हती.
जगभरात रिमेकची दीर्घकालीन परंपरा आहे. एका भाषेतील चित्रपटाची कधी त्याच भाषेत तर कधी अन्य भाषेत रिमेक होतच असते. पूर्वी एका भाषेतील चित्रपट अन्य भाषिक रसिकांपर्यंत पोहचत नसत आणि अगदी जुने चित्रपट पुन्हा पाहण्याची माध्यमे फार नसत. आज सगळ कम्युनिकेशन सोपे व सहज झालयं. त्यात रिमेक कोणत्या चित्रपटाचा करायचा याचा नीट विचार व्हावा. उगाच, पूर्वीच्या क्लासिक चित्रपटाची जोडाजोड अजिबात नकोच. अनेक सच्चे चित्रपट भक्त माझ्या मताशी नक्कीच सहमत होतील.