Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Mumbai’s Single Screen Theatres : नॉव्हेल्टी… पडद्याआड, आठवणी मात्र पडद्यावरच्या
एकेक करत करत मुंबई तर झालेच पण राज्यातील, देशभरातील अनेक एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्स काळाच्या पडद्याआड जाताहेत. काहींचे नूतनीकरण होतेय इतकेच. तर काही केवळ आठवणीत राहताहेत. आता ग्रॅन्ड रोड पूर्वेकडील नॉव्हेल्टी चित्रपटगृहाची इमारत पाडण्यात येत असून अनेक फिल्म दीवाने त्यावरुन सोशल मिडियात व्यक्त होत आहेत. तसे हे चित्रपटगृहातील खेळ काही वर्षांपूर्वीच बंद झाला.

जवळपास ६१ वर्षांपूर्वी १९ जून १९६४ रोजी बिमल रॉय दिग्दर्शित ‘बेनझीर’ या चित्रपटाने नॉव्हेल्टी चित्रपटगृहाचे उदघाटन झाले. त्याच्या पुढच्याच शुक्रवारी म्हणजे २६ जून १९६४ रोजी येथून जवळच्याच अप्सरा चित्रपटगृहाचे उदघाटन झाले. ही तशी नॉव्हेल्टी चित्रपटगृहाची नवीन इमारत. तत्पूर्वी १९२१\२२ साली जुने नॉव्हेल्टी थिएटर उभे राहिले. एका पारशी माणसाच्या मालकीचे ते होते. त्यात सुरुवातीची काही वर्ष ललितकलादर्श या नाट्यसंस्थेचे नाट्य प्रयोग येथे होत. तसेच संगीत, नृत्याचेही कार्यक्रम येथे होत. इंग्रजकालीन थिएटरमध्ये सुरुवातीस नाट्य प्रयोग, संगीत , नृत्य असेच कार्यक्रम होत.
बाबूराव पेंटर यांचा ‘सिंहगड’ (१९२३) हा मूकपट येथे प्रदर्शित करण्यात आला आणि मग हळूहळू ते चित्रपटासाठीचे थिएटर झाले. त्यानंतर या नॉव्हेल्टीत अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. ‘भक्तीचा मळा’ (१९४४) या चित्रपटाने येथे तब्बल अठ्ठावीस आठवडे मुक्काम केला. फिल्मीस्तान निर्मित ‘दो भाई’, ‘सफर’, ‘शबनम’, ‘साजन’, ‘लीला’, ‘शहीद’ इत्यादी अनेक चित्रपट येथेच प्रदर्शित झाले. याच जुन्या नॉव्हेल्टीत ‘सरगम’, ‘अनारकली’, ‘हावडा ब्रिज’, ‘चलती का नाम गाडी’ असे काही कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट यशस्वी ठरले. ‘शिरी फरहाद’ (१९५६) हा जुन्या नॉव्हेल्टीत प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट. त्यानंतर ती इमारत पाडण्यात आली. आणि नवीन भव्य दिमाखदार इमारत उभी राहिली. तळ व पहिल्या मजल्यावर चित्रपटगृह आणि बाल्कनीच्या शेजारीच एक मिनी थिएटर असे स्वरुप. त्यावर विविध कार्यालये.
================================
हे देखील वाचा: अगदी खरं खरं सांगा, Saiyaara पाहून रडलात की नाही?
=================================
आजही माझे दक्षिण मुंबईत परिसरात जाणे झाले की, अनेक जुन्या सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृहांची आठवण येतेच. आणि यायलाही हवीच. याच सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये एन्जाॅय केलेल्या अनेक चित्रपटांच्या आठवणी माझ्या कारकिर्दीचा एक भाग ठरल्यात. नॉव्हेल्टी थिएटरवरुन जाताना अगदी तेच होत असते. एकेकाळी रविवार म्हणजे, अशा जवळपास सर्वच सिंगल स्क्रीन थिएटरवर हमखास हाऊसफुल्लचा फलक असणारच आणि कोणी ब्लॅक मार्केटमध्ये तिकीट काढून तर कोणी एक्स्ट्रा तिकीट मिळतेय का या आशेवर गर्दीत उभा राही. आता अनेकदा तरी रविवार असूनही नॉव्हेल्टीबाहेर शुकशुकाट तर असे पण बंद असलेले मेन गेट, त्याला आलेले जुनाटपण, जाणवणारी एक प्रकारची उदासीनता, हटवले गेलेला मेन शोचे डिझाईन बोर्ड हे सगळेच पाहताना सगळेच मला तरी निराशाजनक वाटे. कारण कोणत्याही प्रकारच्या सुखदुःखात हीच सिंगल स्क्रीन थिएटर्स माझा आधार होती. माझी निराशा ओळखूनच एकाने म्हटले, येथील शेवटचा चित्रपट नसिरुद्दीन शाहचा कोणता तरी होता, आता नाव आठवत नाही….
हे ऐकत असतानाच माझे मन फ्लॅशबॅकमध्ये जाते. नॉव्हेल्टी चित्रपटगृह हे सर्वप्रथम मी ऐकले ते माझ्या अगदीच लहानपणी येथे ‘मेरा नाम जोकर’ (१९७०) प्रदर्शित झाला तेव्हा! कोणत्याही क्षेत्रातील एकादी गोष्ट प्रचंड गाजत असते तेव्हा समाजातील सर्वच स्तरांत ती कमी अधिक प्रमाणात पोहचते. आणि तसे व्हायलाही हवेच. लोकसत्तामधील ‘मेरा नाम जोकर’च्या जाहिरातीतील दोन गोष्टी माझ्या चांगल्याच लक्षात आहेत (लहानपणी वृत्तपत्र वाचनात मुलांच्या गोष्टींबरोबरच चित्रपट व क्रिकेट यावर थोडेफार वाचन होई.) जोकरची नॉव्हेल्टी थिएटरमधील शोची वेळ होती सकाळी दहा, दुपारी साडेतीन आणि रात्री आठ वाजता.
या चित्रपटाला दोन मध्यंतर असून तिकीट दर अप्पर स्टॉल सात रुपये आणि बाल्कनी आठ रुपये. (आमच्या खोताची वाडीच्या समोरच असलेल्या मॅजेस्टीक थिएटरला त्या काळात स्टॉलचे तिकीट एक रुपया होते हे माहीत असल्याने सात व आठ रुपये फारच जास्त होते.) फर्स्ट शोपासूनच जोकर पडला पडल्याची आरडाओरड झाल्याने (की पध्दतशीरपणे केल्याने?) ‘जोकर ‘ची लांबी कमी करुन तिकीट दर एक व दोन रुपये केल्याचे जाहिरातीत म्हटल्याचे आठवतेय. पाहिलतं, माझं वाचन किती दांडगे आणि छोट्या छोट्या गोष्टींतून माहिती मिळवत असते…चित्रपट हा विषय वरकरणी सोपा वाटतो. पण त्यात अनेक रंग मिसळलेत. ही बहुस्तरीय वाटचाल आहे. तोदेखील एक सामाजिक सांस्कृतिक माध्यम क्षेत्रासोबतचा प्रवास आहे.
================================
हे देखील वाचा : Shole : ‘शोले’ १९५३ सालीही पडद्यावर आला होता…
=================================
नॉव्हेल्टी थिएटरची मला झालेली ही पहिली ओळख. कधी कुटुंबासह ग्रॅन्ट रोड परिसरात गेलो की नाॅव्हेल्टीचे दर्शन होतानाच त्याच्या समोरच असलेल्या ट्रामचे रुळ दिसत. गवालिया टॅन्क ते माझगाव अशी ट्राम नॉव्हेल्टीच्या समोरुन जात असे. पण आता ती बंद झाली होती आणि फक्त हे रुळ होते. मुंबई हळूहळू बदलत होती. ते रुळही काही वर्षांनी काढले गेले. आज वयाच्या पासष्टीच्या आतबाहेरचे जुन्या आठवणीत रमतात तेव्हा त्यांना जुने नॉव्हेल्टी थिएटर आणि साठच्या दशकाच्या उत्तरार्धात उत्तुंग इमारतीसह बांधलेले नवीन नॉव्हेल्टी थिएटर व समोरुनच जाणारी ट्राम नक्कीच आठवते. आपल्या आयुष्यातील फ्लॅशबॅक चित्रपट व चित्रपटगृह यांच्याशी चांगलाच निगडित असतो.
नॉव्हेल्टीच्या काही वेगळ्या आठवणी सांगतो. २३ नोव्हेंबर १९७३ रोजी येथे ‘नमक हराम ‘ प्रदर्शित व्हायच्या आदल्या रात्री याच नॉव्हेल्टीत त्याचा भव्य दिमाखदार प्रीमियर रंगला. (स्क्रीनमधील जाहिरातीत या प्रीमियरचा उल्लेख होता आणि विशेष म्हणजे ती आजही सोशल मिडियात पाह्यला मिळतेय.) तो संपल्यावर कुलाबा येथील एका पंचतारांकित हॉटेलमधील पार्टीसाठी जात असतानाच सिनेपत्रकार देवयानी चौबळने राजेश खन्नाला कल्पना दिली की, एक नवा सुपर स्टार जन्माला आलाय (अर्थात अमिताभ बच्चन), राजेश खन्नाला या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेसच याची जाणीव होत गेली होती व आता प्रीमियरनंतरच्या पार्टीला तो जाणीवपूर्वक उशिरा पोहचला. दरम्यान दक्षिण मुंबईत गाडी फिरवत राहिला…. त्या काळातील हा सर्वाधिक वाचला गेलेला किस्सा आहे. अनेक गॉसिप्स मॅगझिनमधून हे रंगवून खुलवून प्रसिद्ध होत गेले. सत्तरच्या दशकात नॉव्हेल्टीत अप्पर स्टॉचे दोन रुपये वीस पैसे असा दर असलेल्या तिकीटासाठी कार पार्किंगमधून जावे लागे आणि ते तिकीट शोपूर्वीच मिळे, ते घेतल्यावर थेट आतच जा असा मामला होता.
मिडियात आल्यावर मला नॉव्हेल्टीची आणखीन ओळख होत गेली. त्यात एक गोष्ट म्हणजे, यात बाल्कनीच्या शेजारीच असलेल्या मिनी थिएटरमध्ये आम्हा चित्रपट समीक्षकांसाठीचे अनेक शोज आयोजित केले गेले. तर कधी मेन थिएटरमध्ये एकादा चित्रपट दाखवत. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ (१९९५) चे मुंबईतील मेन थिएटर न्यू एक्सलसियर होते. पण आम्हाला मात्र याच नाॅव्हेल्टीत यशराज फिल्म्सच्या वतीने त्यांच्या पाहुण्यांसह डीडीएलजे दाखवला. मला आठवतय दिवाळीचा दिवस होता तो. आणि हा गेस्ट व प्रेस अशा दोघांसाठी मेन हॉलमध्ये शो आहे म्हणून चक्क आदित्य चोप्राने दुपारीच येऊन अतिशय छान डेकोरेशन केले होते… नॉव्हेल्टीच्या यशापयशाचा स्कोर कार्ड रंजक आहे. काही चित्रपट प्रचंड हिट (रौप्यमहोत्सवी) तर काही दणदणीत फल्प झाल्याचे दिसेल.
================================
हे देखील वाचा: Sholay : स्पर्धेत टिकले कोण? गळपटले कोण
=================================
सुपर हिट चित्रपट असे, ‘जीने की राह’, ‘हाथी मेरे साथी’, ‘जैसे को तैसा’, ‘नमक हराम’, ‘मजबूर’, ‘स्वर्ग से सुंदर’, ‘नागिन’, ‘मोहरा’, ‘ नगिना’, ‘प्यार झुकता नहीं’, ‘बडे मियां छोटे मियां’, वगैरे. सुपर फ्लॉप असे, ‘मेरा नाम जोकर’, ‘दास्तान’, ‘मेहबूबा’, ‘शरीफ बदमाश’, ‘मेहबूब की मेहंदी’, ‘आशिक हू बहारों का’, ‘इमान धरम’, ‘साहिब बहादूर’, ‘डार्लिंग डार्लिंग’, ‘चांदी सोना’, ‘दो और दो पांच’, ‘शालिमार’, ‘दर्द’, ‘यतिम’, ‘सगिना’, ‘परंपरा’ वगैरे.
नॉव्हेल्टीतील विशेष उल्लेखनीय प्रदर्शित चित्रपट बासू भट्टाचार्य दिग्दर्शित ‘आविष्कार ‘ (१९७४). या चित्रपटात राजेश खन्ना व शर्मिला टागोर यांनी वेगळ्या अनुभवासाठी आवर्जून भूमिका साकारलीय. नॉव्हेल्टीत विशेष उल्लेखनीय यश गोविंद निहलानी दिग्दर्शित ‘अर्धसत्य’ (१९८३) या चित्रपटाचे. या चित्रपटापासून समांतर चित्रपट आणि व्यावसायिक चित्रपट यामधील अंतर कमी होत गेली.. दोन्ही चित्रपटांच्या हुकमी प्रेक्षकांनी हा चित्रपट स्वीकारला. या थिएटर संस्कृतीत तो फिट बसला… साधारण यशस्वी असे, ‘राज’ (राजेश खन्ना व बबिताचा पहिला चित्रपट), ‘आदमी और इन्सान’, ‘कल आज और कल’, ‘ मिली’, ‘जुर्माना’, ‘ घर’,’ लव्ह 86’, ‘आयना’, ‘यह दिल्लगी’ वगैरे…
नॉव्हेल्टीत अनेकदा तरी नवीन चित्रपट मॅटीनी शोला रिलीज होत. अरुणा विकास दिग्दर्शित ‘गहराई’ असाच मॅटीनी शोला यशस्वी ठरला. पद्मिनी कोल्हापूरेच्या पाठमोर्या दृश्याने गाजलेला पण तार्किकदृष्ट्या समतोल म्हणून हा चित्रपट गाजला. पद्मनाभ दिग्दर्शित ‘दो चोर ‘, के. विश्वनाथ दिग्दर्शित ‘कामचोर ‘, प्रकाश झा दिग्दर्शित ‘मृत्युदंड’, येथेच मॅटीनी शोला यशस्वी ठरले. एन. चंद्रा दिग्दर्शित ‘अंकुश’ही हिट ठरला. शंभर दिवसांची उत्तम घौडदौड झाल्यावर कसलीही कल्पना न देता थिएटर मॅनेजमेंटने ‘अंकुश’ काढल्याचे समजताच एन.चंद्रा थेट मातोश्रीवर गेले आणि बाळासाहेबांना ही गोष्ट सांगितली. त्यांनी लगेचच प्रमोद नवलकरांना फोन करुन या सगळ्याची कल्पना देताच प्रमोद नवलकरांनी सूत्रे हलवली आणि ‘अंकुश’चा रौप्य महोत्सवी आठवड्यापर्यंतचा मार्ग मोकळा करुन दिला….
नॉव्हेल्टीच्या मिनी थिएटरमधील आम्हा समिक्षकांसाठीचे शोज हाही एक प्रवास. अशा अनेक आठवणी आहेत. आता त्या फक्त आणि फक्त आठवणीच तेवढ्या राहिल्यात. अन्यथा याही थिएटरचे शो केव्हाच थांबलेत. अगदी कार पार्किंगमधून स्टॉ लच्या तिकीटसाठी जाण्याचा रस्ताही उदास उदास वाटतो…याच नॉव्हेल्टीच्या समोरच्या फूटपाथवर हुसेनवाली बुकलेटवाला याची टपरी होती. येता जाताना मी तेथील तीस/चाळीस/पन्नासच्या दशकातील ब्लॅक अँड व्हाईट काळातील हिंदी चित्रपटांचे दुर्मिळ फोटो, पोस्टर, एखादे वृत्तपत्र अथवा मासिक पाह्यचो. मग मीही त्याच्याकडून जुने फोटो विकत घेऊ लागलो (मोठ्या वृत्तपत्रात असलेल्या ‘ए ग्रेड’ च्या सुविधा मला कधीच नव्हत्या त्यामुळेच मी अशा अनेक गोष्टींचे शोध घेऊ लागलो. तशी सवय लावून घेतली.) त्यातून त्याची मी दोनदा सविस्तर मुलाखत प्रसिद्ध केली. असे संबंध वाढल्यावर त्याने नॉव्हेल्टीच्या अगदी शेजारच्याच गल्लीत असलेले त्याचे जबरा कलेक्शन पाहिले आणि थक्क झालो. संपूर्ण खोलीभर चित्रपटविषयक मटेरियल होते. अनेक फोटो, पोस्टर वगैरे वगैरे त्यात होते. नॉव्हेल्टीत जाण्यापूर्वी मी या हुसेनीला भेटायचो..अतिशय नॉर्मल वागणूक होती त्याची. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाने हा सगळा डोलारा सांभाळला. कालांतराने हे सगळेच मागे पडत गेले. आणि आज ते नाॅव्हेल्टीच्या निमित्ताने आठवतेय.
आणखीन एक विशेष, नॉव्हेल्टीच्या मागच्या पारशी वसाहतीत माणेक इराणी राहायचा (हिंदी चित्रपटातील फायटर आणि कधी अमिताभ बच्चनचा डमी ही त्याची ओळख होती.) तर गोल्डन वेफर्स बेकरीत बोमन इराणी नोकरी करत शनिवार व रविवार हिंदी, इंग्लिश नाटकात भूमिका साकारत असे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘मुन्नाभाई एमबीबीएस ‘पासून तो चित्रपटात आला आणि स्टार होताच त्याने गोल्डन बेकरीतील काम सोडले. तर जवळच व्हीनस कॅसेट कंपनीचे ऑफिस होते..अप्सरा चित्रपटगृहाच्या हा मागचा परिसर ही आणखीन एक ओळख.
================================
हे देखील वाचा : आणीबाणी उठली आणि Dada Kondke यांनी आपल्या पिक्चरचे नाव ठेवले ‘रामराम गंगाराम’
=================================
‘टॉकीजची गोष्ट ‘ असे अनेक रंग असणारी.. आज दक्षिण मुंबईत जातो तेव्हा आता इमारतच अस्तित्वात नसलेल्या अशा मॅजेस्टिक, मिनर्व्हा, गंगा जमुना, रेडिओ, रेक्स, ड्रीमलॅन्ड अशी अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्स डोळ्यासमोर येतात, तसेच आता नाॅव्हेल्टी थिएटरही नक्कीच येईल. चित्रपटावर भरभरुन प्रेम करणारे आपण कोणत्या चित्रपटगृहात कोणता चित्रपट पाहिला यावरही मनापासून प्रेम करत असे… त्याच प्रेम, आत्मियता, असोशीने आपल्या देशात चित्रपट रुजवला, वाढवला, टिकवला….चित्रपट माध्यम व व्यवसायात प्रेक्षक हा घटक खूपच महत्वाचा. फार पूर्वीपासून अशाच चित्रपटगृह माध्यमातून त्यांच्यापर्यंत चित्रपट पोहचला.