Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित, हा खेळ खूपच जुना
वीर जारा, गॅन्ग्स ऑफ वासेपूर, रहना है तेरे दिल में वगैरे अनेक चित्रपट मल्टीप्लेक्समध्ये पुन्हा प्रदर्शित झाल्याने त्यावर केवढा तरी “फोकस” टाकला जातोय, जणू काही भारी exclusive गोष्ट घडलीय असा काहीसा सूर उमटलाय. पण “फ्लॅशबॅक”मध्ये डोकावल्यास लक्षात येईल, “हा खेळ आहे खूपच जुना.” इतका की त्याची पाळेमुळे साठ आणि सत्तरच्या दशकात खोलवर रुजलीत, त्यांना रिपीट रनचा चित्रपट व मॅटीनी शो (matinee show)चे कल्चर मानले जाई. इतकेच नव्हे तर, मुंबईतील काही चित्रपटगृहे खास अशा रिपीट रन चित्रपटाची म्हणून ओळखली जात आणि मॅटीनी शो कल्चरशी त्या काळातील युवा पिढीच्या अनेक आठवणी निगडीत आहेत…. काॅलेजचे लेक्चर बुडवून मित्रांसोबत मॅटीनी शो एन्जाॅय करण्यात वेगळेच थ्रिल असे.

दूरदर्शनचे आगमन होण्याअगोदर एखादा जुना चित्रपट पहावासा वाटला तर त्यासाठी मार्ग असा नव्हता. त्यातूनच जुने चित्रपट दिवसा तीन खेळ याप्रमाणे नियमित खेळास म्हणा अथवा सकाळी साडेअकरा वाजता मॅटीनी शो (matinee show)ला म्हणा प्रदर्शित होवू लागले आणि असे “जुने चित्रपट पाहता पाहता” ही रिपीट रन आणि मॅटीनी शोची संस्कृती कमालीची रुजली. या खेळाचा प्रेक्षकवर्ग वाढत वाढत गेला. तो प्रेक्षकवर्ग कोण? तर तो चित्रपट पुन्हा पुन्हा पाहू इच्छिणारा मागील पिढीतील प्रेक्षक आणि त्याच मागील पिढीतील चित्रपट रसिकांकडून जुन्या चित्रपटाच्या गोष्टी ऐकणारा नवीन पिढीतील चित्रपट रसिक. असे दोन तीन पिढीत पुढे पुढे चालत राहिले… चित्रपट संस्कृतीतील ही वेगळीच गोष्ट.
रसिकांची एक पिढी चित्रपती व्ही.शांताराम यांचे दो आंखें बारह हाथ, झनक झनक पायल बाजे, नवरंग, मेहबूब खान दिग्दर्शित अंदाज, मदर इंडिया, के. असिफ दिग्दर्शित मुगल ए आझम, गुरुदत्त दिग्दर्शित प्यासा, कागज के फूल, राज कपूर दिग्दर्शित बरसात, श्री 420, संगम, विजय आनंद दिग्दर्शित नौ दो ग्यारह, तेरे घर के सामने, गाईड, ज्वेल थीफ, तिसरी मंझिल, बी. आर. चोप्रा दिग्दर्शित नया दौर, गुमराह, बिमल रॉय दिग्दर्शित दो बीघा जमीन, मधुमती, परख, सुजाता असे अनेक चित्रपट पुन्हा पुन्हा पाहून मोठी होतानाच त्यांनी अनेक चित्रपट आपल्या डोक्यात/ ह्रदयात ठेवले.

त्याच्या कथा तसेच अभिनय, गीत संगीत व नृत्याच्या आठवणी ते पुढील पिढीला सांगत सांगत स्वतः जुन्या आठवणीत रमले. त्यातूनच नवीन पिढीला वाटले हे चित्रपट आपण कधी बरे पाहतोय? असे अनेक चित्रपट रिपीट रनला प्रदर्शित होताना जुन्या आणि नवीन पिढीतील चित्रपट रसिकांचा त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत राहिला.
मॅटीनी शो (matinee show)ची संस्कृती म्हणजे याच रिपीट रन चित्रपटाचा जणू धाकटा भाऊ. सकाळी साडेअकराचा हा खास कमी केलेल्या तिकीट दरात खेळ. मी गिरगावात लहानाचा मोठा होताना याच मॅटीनी शोचा जणू मी हुकमी प्रेक्षक होतो. सेन्ट्रल थिएटर, इंपिरियल सिनेमा, स्वस्तिक सिनेमा, सुपर थिएटर येथे त्या काळात मॅटीनी शोला स्टाॅलचे तिकीट एक रुपया पाच पैसे, अप्पर स्टाॅल एक रुपया पासष्ट पैसे आणि बाल्कनी दोन रुपये वीस पैसे असा तिकीट दर असे आणि स्टाॅलच्या तिकीटाला लांबलचक रांग असे. खिशात तेवढेच पैसे असत.

मॅटीनी शो (matinee show)चे कल्चर म्हणजे जुने म्युझिकल रहस्यरंजक चित्रपट तसेच देव आनंद, शम्मी कपूरचे जुने म्युझिकल चित्रपट यांचा हुकमी संचार. एक प्रकारे जुने चित्रपट पाहण्याची आणि बॅकलॉग भरुन काढण्याची हुकमी संधी म्हणजे रिपीट रन चित्रपट व मॅटीनी शो. पुन्हा पुन्हा आणि कितीही वेळा पहावेत असे अनेक चित्रपट त्या काळात पडद्यावर येत. फार तात्विक विचार वगैरे न करुन ते एन्जाॅय केले जात. चित्रपट म्हणजे मनोरंजन मनोरंजन मनोरंजन अशी व्याख्या व वस्तुस्थिती त्याच काळात रुजली.
आणखीन एक विशेष, त्या काळात रिपीट रनचे चित्रपट प्रदर्शित करणारी काही हुकमी चित्रपटगृहे होती. काही नावे सांगायची तर धोबीतलावाचे एडवर्ड, सॅन्डहर्स रोडचे डर्बी, ताडदेवचे डायना, सात रस्ताचे न्यू शिरीन, प्ले हाऊसची ताज, निशात, दौलत, ऑल्फ्रेड, गुलशन वगैरे, माहिमचे पॅराडाईज, माझगावचे स्टार, विलेपार्लेचे लक्ष्मी इत्यादी. या चित्रपटगृहात अधूनमधून नवीन चित्रपटही प्रदर्शित होत.

पण त्याचे प्रमाण अत्यल्प असे. एडवर्ड थिएटरला जय संतोषी माँ (मुंबईत रिलीज ३० मे १९७५) ने खणखणीत पन्नास आठवड्यांचा मुक्काम केला. एडवर्डलाच रोड टू सिक्कीम, सोलह शुक्रवार वगैरे नवीन चित्रपट प्रदर्शित झाले. अन्यथा जुना चित्रपट पहावासा वाटला की एडवर्डला जायचे आणि पिक्चर संपल्यावर इराणी हाॅटेलमध्ये ब्रून मस्का आणि चहाचा आस्वाद घ्यायचा हे नाते घट्ट.
===========
हे देखील वाचा : “निशांत” पन्नाशीत….
===========
ऐंशीच्या दशकात व्हिडिओ कॅसेटच्या युगात हे रिपीट रन व मॅटीनी शो (matinee show)चे भन्नाट कल्चर मागे मागे पडत गेले. चित्रपट कसा आहे? कसा पाह्यचा? कोणता चित्रपट पाह्यचा? याबरोबरच तो चित्रपट प्रेक्षकांपर्यंत कसा पोहचला, प्रेक्षकांनी तो कसा स्वीकारला (अथवा नाकारला?) या गोष्टीही खूप महत्वाच्या (पण काहीश्या दुर्लक्षित).
आज जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित होत असतानाच हे सगळेच सांगणे आवश्यक आहे. अनेक गोष्टींचा आपला एक इतिहास असतो, चित्रपट जगताचा तर आहेच आहे आणि तो असा बहुरंगी, बहुढंगी आहे. रिपीट रन व मॅटीनी शोचे ते दिवस परत येणार नाहीत पण मी ते भरभरुन, मनसोक्त मनमुराद आनंद घेत घेत अनुभवलेत. माझ्या एका पुस्तकाचे नाव “मॅटीनी शो” (matinee show) आहे, यात बरेच काही नक्कीच आले…