पुन्हा एकदा चार दिवस सासूचे
या लॉकडाउनच्या काळात प्रत्येक घराघराचा अविभाज्य भाग असलेल्या, गृहिणींच्या अत्यंत लाडक्या मालिकांवरही टाळे लागले होते. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे मालिकांचे नवीन भाग चित्रित होऊ शकत नव्हते. पण अशातच सगळ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला तो सह्याद्री वाहिनीने आणि दूरदर्शनचा तो काळ गाजवून अजरामर ठरलेल्या रामायण आणि महाभारत या दोन सुप्रसिद्ध मालिका पुन्हा चालू केल्या.यातच भर म्हणून कलर्स मराठी वाहिनीने सुद्धा एक काळ प्रचंड लोकप्रिय ठरलेली, सर्वांच्या घराघरात पोहचलेली सुप्रसिद्ध मालिका पुन्हा सुरू केली आहे. ती म्हणजे “चार दिवस सासूचे”.
रोहिणी हट्टंगडी, कविता लाड, मानसी नाईक, प्रिया मराठे, सुलेखा तळवलकर, आनंद अभ्यंकर, प्रसाद ओक, भार्गवी चिरमुले, राजेश शृंगारपुरे, पल्लवी सुभाष, पंकज विष्णु अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या मालिकेने तब्बल १० वर्ष प्रक्षकांच्या मनावर राज्य केलं.कडक शिस्तीच्या सासूबाई आशालता म्हणजेच रोहिणी हट्टंगडी आणि साधी भोळी गुणी सूनबाई अनुराधा म्हणजेच कविता लाड यांनी अशी काय भूमिका वठवली की कित्येक गृहिणींना त्यात आपले प्रतिबिंब दिसले. मालिकेतील प्रत्येक प्रसंग सगळेजण आपापल्या आयुष्यातील घटनांशी जोडू लागले होते.
दहा वर्षांहून अधिक काळ गाजणाऱ्या या मालिकेने प्रत्येक घरातल्या गृहिणींच्या मनात आपलं जिव्हाळ्याच असं एक स्थान निर्माण केलं होतं आणि ते अजूनही अढळ आहे हे प्रेक्षकांनी दाखवून दिलं आहे. कारण आत्ता मालिकांचे नवीन भाग सुरू होऊन देखील या मालिकेला प्रेक्षक तितकीच पसंती दाखवत आहेत.
बरं या मालिकेसाठी कलर्स च्या PR टीम ने देखील प्रसिद्धीच्या नवीन संकल्पनांची शक्कल लढवली आहे. या मालिकेचा लक्षात राहणारा पैलू म्हणजे मालिकेचं शीर्षक गीत. ही मालिका प्रेक्षकांमध्ये चर्चेत राहावी म्हणून कलर्स मराठीने मालिकेच्या शीर्षक गिताचे स्वतःच्या आवाजातील कव्हर बनवायचे आवाहन प्रेक्षकांना केले. हे आवाहन लोकांपर्यत पोहचविण्यासाठी कलर्स मराठी वरील सध्याच्या कलाकारांनी स्वतःही ह्या शीर्षक गीताचे कव्हर तयार केले.
मालिकेचं शीर्षक गीत हे सगळ्यांच्याच तोंडावर असतं. प्रत्येक जण आपापल्या परीनं ते गुणगुणत असतो. याचं सवईचा फायदा मालिकेच्या प्रसिद्धीसाठी अतिशय उत्तम रित्या करून घेतला आहे. आत्ता १० वर्षांपेक्षा जास्त वेळ चाललेली ही मालिका कलर्स पूर्ण करणार की अर्ध्यावरच बंद करून नवीन मालिकेला स्थान देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
– कल्पिता पावसकर