एकेक करत सिंगल स्क्रीन थिएटर्स “पडद्याआड”… आता माहिमचे पॅराडाईज
सिनेमाचं वेड फिल्म दीवान्याला कोणत्या थेटरात घेऊन जाईल काही सांगता येत नाही याची खास आठवण. “एक दुजे के लिए ” (१९८१) सुपर हिट होतानाच हिंदी चित्रपट शौकीनांत कमल हसनचे चाहते निर्माण झाले, “हिम्मतवाला“ने (१९८३) श्रीदेवीची हिंदी चित्रपटाच्या चाहत्यांत क्रेझ निर्माण झाली. ‘अंधा कानून'(१९८३)ने रजनीकांतचे रुपेरी चातुर्य आणि करामत दाखवली आणि त्यांची भूमिका असलेल्या मूळ तेलगू वा तमिळ भाषेतील चित्रपटाला हिंदीत डब करण्यात येवू लागले. (त्या काळातील दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटांचे हिंदीत डब होणे आणि आजचे तसे डब होणे यात व्यावसायिक दृष्टिकोनातून बराच फरक आहे. आता ते मोठ्याच कॅनव्हासवर होतेय ), आणि असाच एक तमिळ भाषेतील चित्रपट “Thaayillamal Naanllai” हा “आखरी संग्राम” या नावाने हिंदीत डब होऊन मुंबईत रिलीज झाला.
ऐंशीच्या दशकाच्या पूर्वार्धातील ही गोष्ट. त्या काळात अशा डब चित्रपटाच्या जेमतेम दहा प्रिन्ट काढल्या जावून त्याच एकेक आठवडा करत करत देशातील लहान मोठ्या शहरातील सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये प्रदर्शित करीत करीत ग्रामीण भागातील तंबू थिएटर्स, टूरिंग टाॅकीजपर्यंत पोहचत. आणि त्याची पोस्टर्स तेवढी लावली जात. वृत्तपत्रात छोटीशी जाहिरात दिली जाई. तात्पर्य, तुम्ही “पिक्चर एन्जाॅय करणारे किडे असाल” तरच अशा पिक्चर्सचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येई. अशा छोट्या चित्रपटांचा इतिहास दुर्लक्षित असला तरी मोठा आहे. वैशिष्ट्यपूर्ण आहे.
अशातच एके दिवशी एका मराठी वृत्तपत्रात याच “आखरी संग्राम”ची अगदी छोटीशी जाहिरात दिसली, प्रमुख भूमिकेत कमल हसन, श्रीदेवी व रजनीकांत आणि चित्रपटगृह पिला हाऊसचे ताज, माहिमचे पॅराडाईज, पार्ल्यातील लक्ष्मी, मुलुंडचे मेहूल, ठाण्यातील मल्हार अशी मोजकीच. पॅराडाईज थिएटरचे नाव वाचले नि एक नवीन अनुभव घ्यायचे ठरवले. ऑपेरा हाऊसवरुन ८१, ८३, ८४, ८६, ८७ या नंबरपैकी कोणतीही बस पकडून जायचे ठरवले नि दुपारी बारा वाजताच्या खेळास पोहचलो देखिल…. हेच पॅराडाईज चित्रपटगृह बंद होत असल्याचे समजताच मी एकदम जुन्या आठवणीत गेलो देखिल.
हे चित्रपटगृह म्हणजे जणू सर्वधर्मसमभाव हे वैशिष्ट्य जपणारे. एका बाजूस शीतला देवी मंदिर, दुसर्या बाजूस सेंट मायकेल चर्च आणि जवळच माहिम दर्गा. सर्व धर्मियांची सुखासमाधानात राहणारी वस्ती. अतिशय गजबजलेला विभाग. माहिम रेल्वे स्टेशनवरुन चालतही जाता येईल असे स्थळ. धारावीतील चित्रपट रसिकांनाही तसे जवळचेच. फक्त पूर्वेकडून पश्चिमेला जायचे.
पॅराडाईज (paradise mahim) १९४० साली सुरु झाले तेव्हाची मुंबई माहिम, वांद्रा, चेंबूर, मानखुर्द यापर्यंत होती आणि चित्रपट निर्मितीचे प्रमाण सर्वसाधारण असल्यानेच विदेशी चित्रपटही अनेक थिएटर्समध्ये प्रदर्शित होत. (पॅराडाईजजवळच खास इंग्लिश चित्रपटासाठी श्री नावाचे चित्रपटगृह होते. ते सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीस पाडले गेले.) १९५० साली दुभाष कुटुंबियांनी पॅराडाईजचे हक्क घेतले. आता त्यांची तिसरी पिढी हे चित्रपटगृह सांभाळत असे. निलोफर दुभाष हे सगळा कारभार पाहत.
पॅराडाईज, श्री, रिव्होली, सिटीलाईट, प्लाझा ही जुन्या माहिममधील चित्रपटगृह. त्यातील श्री व रिव्होली केव्हाच बंद पडून त्याजागी नवीन इमारती आल्या. सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीस बादल, बरखा, बिजली ही तिळी चित्रपटगृह याच परिसरात सुरु झाली. या काळात राजेश खन्ना आणि मग अमिताभ बच्चन यांची जबरदस्त क्रेझ असल्यानेच ही झालीच पण हिंदी चित्रपट प्रदर्शित करणारी देशभरातील चित्रपटगृहे हाऊसफुल्ल गर्दीत चालत. तो खरा व्यावसायिक चित्रपटांचा सुवर्ण काळ.
थिएटरवर हाऊसफुल्लचा फलक असूनही एक्स्ट्रा तिकीटाच्या आशेने अथवा ब्लॅक मार्केटमध्ये तिकीट घेणारा पब्लिक होता. पॅराडाईज (paradise mahim) ला कधी नवीन चित्रपट प्रदर्शित होत तर अनेकदा तरी रिपीट रनला चित्रपट प्रदर्शित होत. अमिताभ बच्चन, झीनत अमान व नीतू सिंग यांचा द ग्रेट गॅम्बलर काही वर्षानी सबसे बडा जुआरी असे नाव बदलून येथेच रिलीज झाला. अमिताभ व हेमा मालिनीचा “नास्तिक” काही वर्षातच “अधर्मी” या नावाने तर अजय देवगन व उर्मिला मातोंडकरचा कानून हा चित्रपट बेदर्दी नावाने प्रदर्शित झाला. एकेक गंमती असतात हो.
पॅराडाईज (paradise mahim) ला शक्यतो एक आठवड्यासाठी चित्रपट प्रदर्शित होत. धूम आणि धूम २ यांनी चक्क दोन आठवड्यांचा मुक्काम केला. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय तब्बल नऊ आठवडे होता. हा रेकॉर्डच. पॅराडाईजला दे मार ॲक्शनपट ( फूल और पत्थर, मोन्टो, यार मेरा , बेशक), पारंपरिक मसालेदार मनोरंजक (अमर अकबर ॲन्थनी, रावडी राठोड, फूल और कांटे), भयपट ( दरवाजा, सामरी), पौराणिक ( अलख निरंजन), मुस्लिम सामाजिक ( दयारे मदिना), डब ( जवानी की हवा), भोजपुरी ( गंगा मय्या तेरी पियरी चढाईयो), मराठी ( टाईमपास, डबल सीट) असे अनेक प्रकारचे चित्रपट प्रदर्शित होत. हिरोच्या एन्ट्रीला टाळ्या आणि शिट्ट्या हे वैशिष्ट्य.
===========
हे देखील वाचा : बादशाह ओ बादशाह पंचवीस वर्षांचा झाला देखिल…
===========
पडद्यावरच्या जगात हरखून जायचे एवढेच माहीत. याच वर्गाने आपल्या देशात चित्रपट रुजवला, जगवला. २००८ साली मूळ इमारत कायम ठेवून त्याचे नूतनीकरण करण्यात आले. आठशेची आसन क्षमता कमी करुन पाचशेवर आणली. ऐन दिवाळीत गोलमाल रिटर्न आणि फॅशन प्रत्येकी दोन खेळास असे प्रदर्शित झाले. दिवसा चार खेळ हे पॅराडाईजचे वैशिष्ट्य. चित्रपटाची रिळे ही पध्दत मागे पडून डिजिटल वा सॅटेलाईट रिलीज आल्यावर पॅराडाईजला नवीन चित्रपट प्रदर्शित होण्याचे प्रमाण वाढले. दरम्यान मूळ सिटीलाईट पाडून नवीन इमारत आली. रानडे रोडवरील कोहिनूर चित्रपटगृहाच्या जागी नक्षत्र माॅल व त्यात चित्रपटगृह आले. या सगळ्यात प्लाझा दिमाखात उभे आहे.
दुसरीकडे पाह्यचे तर मल्टीप्लेक्स कल्चर स्थिरावले, मोबाईल स्क्रीनवर पिक्चर आला, ओटीटीने जगभरातील अनेक भाषांतील चित्रपट, मालिका, वेबसिरिज यांचा अक्षरश: सुकाळ झालाय. आवडीनिवडीला भरपूर स्कोप आला. चित्रपटगृहात जाणे आवश्यक राहिलेय का असा प्रश्न करणारा चित्रपट रसिक निर्माण झालाय. थिएटरमध्ये मोजक्याच आठ दहा प्रेक्षकांना चित्रपट दाखवण्यात आणि तो पाहण्यात कसला हो उत्साह.
===========
हे देखील वाचा : रामगोपाल वर्माने “दौड” वेगात का बनवला ?
===========
अनेक शहरांतील जुनी सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृहे एकेक करत बंद झाली, काहींचे नूतनीकरण होताना सीटस कमी झाल्या. चित्रपट हा खरं तर हजार बाराशे चौदाशे प्रेक्षकांच्या हाऊसफुल्ल गर्दीतील आपण एक होवून पाहण्याचे झ्याक मनोरंजन. आताची पिढी तो म्हणे एकट्यानेही लॅपटॉपवर पाहते आणि लॅपटॉप बंद करताना आपण काय पाहिले ते विसरतेही…
फार पूर्वीच आमच्या गिरगावातील मॅजेस्टिक चित्रपटगृह बंद पडले तेव्हा आम्ही गिरगावकर हळहळलो. गच्चीत, गॅलरीत, कट्ट्यावरच्या गप्पांत आपण मॅजेस्टिकला लहानपणापासून कोणते मराठी व हिंदी चित्रपट पाहिले याच्या आठवणीत रमलो. त्यानंतर एकेक करत करत अनेक जुनी चित्रपटगृह पडद्याआड गेली. आता पॅराडाईजही…..