‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
पेपर कटिंग ते मोबाईल स्क्रीन
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी झालेच, पण दक्षिणेकडील प्रादेशिक चित्रपट, उत्तरेकडील भोजपुरी चित्रपट, पूर्वेकडील बंगाली चित्रपट, वगैरे वगैरे भाषिक चित्रपट करता करता जगभरातील अनेक भाषांतील अगदी कोणत्याही आवडत्या सेलिब्रेटिजचा फोटो आजच्या ग्लोबल युगात अगदी झटक्यात आपल्या मोबाईल स्क्रीनवर आपण पाहू शकतोय, त्यात केवढी तरी व्हरायटी आहे. अगदीच त्या सेलिब्रेटिजचे जबरा फॅन असू तर त्याचे अथवा तिचे अनेक फोटो सहज सेव्ह करुन ठेवतोय. काहींचा तर आपल्या आवडत्या स्टारचा फोटो डीपी असतो. कोणी कायमचा ठेवतो तर कोणी त्या स्टारच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तसे कर्तव्य करतो. अर्थात, हे फिल्म वेड्यांचे एक आवडते वेड असते.
आपल्या देशात क्रिकेट आणि सिनेमा यांची समाजाच्या सर्वच स्तरांत जबरा क्रेझ आहे. अगदी महानगरांपासून ते खेड्यापाड्यापर्यंत या दोन्हीवर अफाट प्रेम करणारा खूपच मोठा वर्ग होता, आहे आणि यापुढेही राहिल हे निश्चित. स्टार बदलत राहिले, सिनेमा बदलत राहिला, फॅन्सची पिढीही बदलत राहिली.
हे देखील वाचा: चित्रपट क्षेत्रातील फोटोंचा विकसित होणारा एक अनोखा प्रवास
पण ‘आपल्या आवडता एखादा स्टार असणे, आणि त्याच्या अनेक गोष्टींचे आकर्षण असणे’ हे कायमस्वरुपी आहे.
आणि याच रिॲलिटी शोचा एक सही भाग म्हणजे, आवडत्या सेलिब्रेटिजच्या फोटोचे आणि माहितीचे कलेक्शन करणे. आपल्या फेवरिट सेलिब्रेटिजच्या छोट्या छोट्या आवडीनिवडीचे तपशील माहित असणे, हादेखील एक मानसिक आनंद असतो. खरं तर जनसामान्यांच्या आनंदाच्या कल्पना अगदी छोट्या छोट्या असतात आणि त्या मान्यही कराव्या. उगाच आपलं त्यांना ‘फिल्मी क्रेझी ‘अथवा’ फिल्म दीवाने’ असे म्हणणे योग्य नाही. चित्रपटाचा आनंद घेत असलेल्या अश्यांचे प्रमाण एक दोन टक्केच असेल पण त्यांची आपल्या आवडत्या सेलिब्रेटिजशी असलेली कनेटीव्हीटी खूप खरी आहे.
या क्रेझची सुरुवात कशी झाली असेल हो? आपला पहिला चित्रपट दादासाहेब फाळके यांच्या ‘राजा हरिश्चंद्र’ (रिलीज ३ मे १९१३) ची टाईम्स ऑफ इंडियातील जाहिरात आजही आपल्याला सोशल मिडियात ३ मे रोजी व्हायरल होताना दिसते, याचाच अर्थ ती त्या काळात अशाच कोणी चित्रपटप्रेमीने प्राणपणाने संग्रही जपली असणार. मग हळूहळू वृत्तपत्रात प्रसिद्ध होत असलेल्या चित्रपटांचे फोटो कापून ठेवायला कोणाला तरी सुचले असेल. काळ जस जसा पुढे सरकला तस तशी ‘पेपर कटिंग’ संस्कृती वाढली, रुजली. अगदी तेव्हा न्यूज प्रिन्टवर छपाई होई. काही वर्षात हा कागद पिवळा पडतो. तरी अशी जपणूक हवीहवीशी वाटते.
त्यातील काही जण संग्राहक म्हणून नावाजले गेले तर काही जण चित्रपट प्रेमी म्हणून आनंदीत राहिले. आपल्याकडे सिनेमाचे वेड असे इतरही गोष्टीत पसरत जाते. वृत्तपत्र, साप्ताहिक, मासिक, दिवाळी अंक यांच्या मुखपृष्ठावर आणि आत प्रसिद्ध होत असलेल्या ‘सिनेमाचे विश्व’ (फोटो, माहिती, गाणी, लेख) संग्राह्य करणे हे तसे सोपे वाटते. पण ते अतिशय निष्ठेने व मेहनतीने करणारे प्रत्येक पिढीत आहेत. खरं तर हा एक अनमोल खजिनाच आहे, आजच्या मिडियात जे जे काही प्रसिद्ध होतेय ते उद्या असे एकत्रितपणे मिळणे म्हणजे एक प्रकारचे ते ‘सिनेमाच्या इतिहासाचे जतन’ आहे.
काही फिल्म दीवाने चक्क रद्दीवाल्याकडून फिल्मी मासिके विकत घेतात आणि त्यातील महत्वाचे लेख आणि फोटोचे कटिंग करतात. असे काही संग्राहक एकाद्या सेलिब्रेटिजला त्याच्याबाबतची ही पेपर कटिंग आवर्जून दाखवतात. तेव्हा त्या सेलिब्रेटिजने ‘ही कसली रद्दी जमवली आहे’ अशा दृष्टीने न पाहता त्या फॅन्सच्या प्रेमाची आणि श्रमाची कदर करावी अशी अपेक्षा असते. या पेपर कटिंगमध्ये अनेक स्टार्सच्या ‘बंद पडलेल्या चित्रपटाचे चक्क पुरावेही सापडतात’.
खरं तर निर्मितीच्या कोणत्याही स्थितीवर अनेक चित्रपट बंद पडत असतातच आणि हे कोणत्याही स्टारला टाळता येत नाही. राजेश खन्नाचे अनेक चित्रपट असेच बंद पडले, त्यातील कमाल अमरोही दिग्दर्शित ‘मजजून’, ‘नरेन्द्र बेदी दिग्दर्शित 007’, मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘बाजीराव मस्तानी’ यांच्या जाहिरातींची पेपर कटिंग एक मोठा ठेवाच तर आहे. अमिताभ बच्चनचेही अगणित चित्रपट असेच बंद पडले, त्यांची आठवण अशा पेपर कटिंग्जनी ठेवलीय. रुद्र, शिनाख्त, डायनॅमिट, राॅकी, लंबू दादा, आलिशान वगैरे वगैरे.
स्टारच्या फोटो कलेक्शनमधे टाॅप फाईव्ह नावे घ्यायची तर मधुबाला, हेमा मालिनी, रेखा, श्रीदेवी, माधुरी दीक्षित यांची घ्यायला हवीच. अनेकांच्या घरी मधुबालाचा भला मोठा फोटो हमखास पहायला मिळतो. नायकात हे चार्ली चॅप्लिनच्या बाबतीत घडलयं. सत्तरच्या दशकात ‘भल्या मोठ्या फोटोची विक्री सुरु झाली आणि त्यात हे दोन लोकप्रिय स्टार अनेकांच्या घरात भिंतीवर आले’. पोस्ट कार्ड फोटोचेही युग सहज रुजले. फार पूर्वी असे फोटो पाच पैशात मिळत. राजेश खन्नाच्या क्रेझच्या काळात याचा दूरवर संचार झाला. प्रत्येक पिढीत शालेय वयात ही अशी पेपर कटिंग जमा करण्याची सवय लागते. वेगळ्या भाषेत सांगायचे तर ‘ही त्या वयातील एक गोष्ट असते’. काही जण हे वेड आयुष्याच्या पुढील पावलांवरही कायम राहताना, काही आठवणी जुन्या होत जातात.
‘अबोध’ची माधुरी आणि आजच्या सोशल मिडियात आपले नवीन फोटो सतत शेअर करीत असलेली माधुरी यातील फरक अचंबित करणारा असतो.
पेपर कटिंगची जागा कॉम्प्युटर, मोबाईलने घेतली. आता फिल्मी क्रेझची शैली बदलली. आता स्टारची पर्सनालीटी, स्टाईल यांना जास्त पसंती आली. स्टारचा फिटनेस, लूक, फॅशन यानुसार फोटो सिलेक्शन होऊ लागले. यात रेखा दीर्घकालीन स्टार आहे. तिच्यात पन्नास वर्षात होत गेलेला बदल आणि तरीही तिचे राहिलेले आकर्षण यांचे हे फोटोच्या माध्यमातून दिसून येते ते खूपच रंजक आणि उत्सुकता वाढवणारे आहे.
मराठी कलाकारांनाही असे पेपर कटिंग ते मोबाईल स्क्रीन असे चाहते आणि संग्रहकांचे प्रेम अतिशय आपुलकीने लाभले, आजही लाभतेय. अभिनेत्रींबाबत सांगायचे तर, सुलोचनादीदी, सीमा देव, जयश्री गडकर यांच्या जुन्या पेपर कटिंगचे संग्राहक खूप आहेत. वर्षा उसगावकरपासून मराठीत ग्लॅमरस अभिनेत्रींचे नवीन पर्व सुरु झाले आणि या पिढीतील चाहत्यांनीही विविध माध्यमातून मिळत असलेल्या फोटोंच्या कलेक्शनला प्राधान्य दिले. आजच्या ग्लोबल युगातील अभिनेत्रीना सोशल मिडियात लाईक्स मिळताहेत.
हे वाचलंत का: डीडीएलजेची २५ वर्षे आणि मराठा मंदिरचे दहा सुपर हिट…
सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर, पूजा सावंत, श्रृती मराठे, सई ताह्मणकर यांना फॅन्स आणि फाॅलोअर्स खूप आहेत. फरक इतकाच की, फार पूर्वी आठवड्यातून फक्त एकच दिवस वृत्तपत्रात ‘सिनेमाचे पेज’ असे. सिनेमाची साप्ताहिके मोजकी होती. सत्तरच्या दशकात गाॅसिप्स मॅगझिनचे पीक आले, त्यात मराठीला स्थान नव्हते. वर्षा, अश्विनी भावे, किशोरी शहाणे यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले आणि त्या ग्लाॅसी पेपर्सवरील इंग्रजी मिडियात मराठी सेलिब्रेटिजना स्कोप वाढत गेला.
फॅन्सचे पेपर कटिंग कलेक्शन आणि आजच्या डिजिटल पिढीची फोटो क्रेझ हादेखील एक महत्त्वाचा भाग आहे हो. आजचे फोटो आणि मुलाखती/माहिती/लेख हा उद्याचा खूप मोठा ठेवा आहे आणि हे चक्र कायमच सुरु असते. पण या पेपर कटिंग संस्कृतीला अधिकाधिक सिरियसली घेतलं तर बरेच काही ‘सिनेमाचे दुर्मिळ मटेरियल मिळत जाईल हे निश्चित. हे सगळे इतके आणि असे दुर्मिळ की, एका चांगल्या चरित्रपटासाठी, आत्मचरित्रासाठी, माहितीपटासाठी हा खूपच मोठा खजिना आहे.
‘जे कोणत्याही पुस्तकात कदाचित मिळणार नाही’ ते या पेपर कटिंगमधून मिळेल. विशेषतः पडद्यावर न आलेल्या, घडायचे राहून गेलेल्या अनेक आश्चर्यचकित आणि धक्कादायक गोष्टीत यात समोर येतील. राज कपूर दिग्दर्शित ‘बाॅबी’ (१९७३) पुढे ढकलण्यात आला हे अशाच एका पेपर कटिंगने आज समजते तर आजच्या ग्लोबल युगातील सेलिब्रेटिजचा फोटो सेशनमधील उत्साह आणि सातत्य अश्या फॅन्स फाॅलोअर्समुळेच वाढतोय आणि त्यांना फिल गुड वाटतेय.
देव आनंद या पेपर कटिंगमधेही कायमच तरुण राहिल्याचे दिसेल. आपण देव आनंद आहोत हे तो कधीच विसरत नसे, म्हणूनच तर कालांतराने त्याच्या फिल्मी मुलाखतीत ‘अभी तो मै जवान हू’ असा सूर असे आणि नंतर काळ जस जसा पुढे सरकला तसा तो नवीन पिढीतील अभिनेत्रींसोबत चित्रपटात भूमिका आणि दिग्दर्शन करु लागल्याचे दिसे.
पेपर कटिंग ते मोबाईल स्क्रीन एका लाईव्ह गोष्टींचा जणू खजानाच. तोही फॅन्सनी प्रेमाने जपलेला. काहीनी त्याच्या फाईली केल्या तर काहीनी त्याची वेडीवाकडी जपणूक केली. खरं तर हे फिल्मी वेडच वेडेवाकडे आहे म्हणा.. जो जे करतो त्याचा आनंद घेतो…