महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
पिक्चर हिट है तो दिवाली है!
आपल्या फिल्मवाल्यांचा एक सरळ, साधा, सोपा नियम आहे, फर्स्ट डे फर्स्ट शोलाच पब्लिक रिपोर्ट एकदम भारी अथवा भारी आला की, उस शुक्रवार दिवाली! जवळपास नव्वद टक्के हिंदी चित्रपटाच्या यशोगाथेत हा पहिल्या दिवसाचा फंडा त्याचे भवितव्य स्पष्ट करतो. यह पब्लिक है पब्लिक. दहा टक्के चित्रपट मिक्स रिपोर्टवर हेलकावत असतात आणि आठवडाभराने त्याची यशअपयशाची कुंडली स्पष्ट होते. हा एकूणच रिॲलिटी शो आहे. पिक्चर हिट है तो दीवाली है, अगर फ्लाॅप हो तो दीवालीया निकल गया अशी थेट भावना. पूर्वीच्या पिक्चर्सवाल्यांचे सगळे कसे मोकळेढाकळे. यशअपयशाचा स्वीकार करण्यात कसलीच कंजूसी नाही.(Diwali Movies)
आपल्या देशातील चित्रपट संस्कृती अनेक स्तरांवर जनसामान्यांच्या आयुष्याशी थेट जोडली गेली आहे. फार पूर्वी तर श्रावण भाद्रपद महिन्यात हमखास पौराणिक चित्रपट प्रदर्शित होणार प्रेक्षक त्यांचे स्वागत भक्तीभावनेने करणार हे नाते अगदी घट्ट होते. तोच फंडा दिवाळीत. पूर्वापार हा ‘दिवाळीतील चित्रपट ‘(Diwali Movies) ही धमाकेदार गोष्ट राहिलीय. सिनेमावाल्यांच्या व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिलेत तर लक्षात येईल, दिवाळीचा आनंदाचा फिल गुड, गाडीपासून बरेच काही खरेदीची भावना, बोनस झाल्याने पैसे खर्च करण्याची वृत्ती, आणि अशातच एकादा चित्रपट सहकुटुंब सहपरीवार पहावा असे वाटावे असे वातावरण या सगळ्याची बेरीज करुन दिवाळीत नवीन चित्रपट(Diwali Movies) प्रदर्शित करण्याची परंपराच रुजली. घरचा फराळ, नातेवाईकांकडे जाणे येणे, फटाके वाजवणे, रांगोळी काढणे, एकाद्या प्रदर्शनास भेट देणे ( महाराष्ट्रीयन असल्यास दिवाळी अंक वाचणे) अशा गोष्टी सोडून सिनेमा पाह्यला कोण येणार असा काहीजण पूर्वी प्रश्न करायचा. पण दिवाळीत रिलीज म्हणजे सेफ गेम असे अनेक वर्षे ‘दिसून ‘ आले आहे. फरक इतकाच की, यशराज फिल्म्सचा आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ ( प्रदर्शन २० ऑक्टोबर १९९५) ऐन दिवाळीत पडद्यावर आला तोच त्याने जणू या ट्रेण्डला ग्लॅमर आणले आणि ऐन दिवाळीत शाहरूखचा पिक्चर असे समिकरण घट्ट केले. अब्बास मुस्तान दिग्दर्शित ‘बाजीगर’ ( प्रदर्शन १२ नोव्हेंबर १९९३) हादेखील ऐन दिवाळीत पडद्यावर येत सुपर हिट झाला. या चित्रपटात अवघे दोनच वर्षांचे अंतर आहे, तसेच एक प्रकारचा भिन्न काळही आहे. ‘बाजीगर ‘ पारंपरिक दिवाळीत आला तर ‘डीडीएलजे’ खुली अर्थव्यवस्था/ उदारीकरण हे आपल्याकडे रुजत असताना, कार्पोरेट युग मूळ धरत असताना आला. आता दिवाळीत शाहरुख खानचा चित्रपट असे समिकरण फोकस करताना त्यात मार्केटिंगचा फंडा होता. ऐन दिवाळीत तुम्ही शाहरूख खानचा चित्रपट पहा ( दिल तो पागल है, कुछ कुछ होता है, ओम शांती ओम इत्यादी) असे प्रमोशन करीत एक मानसिकता, एक दृष्टिकोन एस्टॅब्लिज केला गेला आणि तो पथ्यावर असा पडला की आता आठ दहा महिने अगोदरच ‘यंदाच्या दिवाळीत अमूकतमूक चित्रपट’ (Diwali Movies) असे जणू बुकिंग होत सोशल मिडियात पोस्ट केली जाते.
तात्पर्य, ‘डीडीएलजे’पूर्वीची चित्रपट रिलीजची दिवाळी (Diwali Movies) वेगळी होती. तेव्हा तो सण होता अथवा दिवाळी सणाचा एक भाग म्हणून त्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शित होत. मल्टीप्लेक्स युगात तो जणू इव्हेन्टसचा भाग झाला. सगळेच बदललयं म्हटल्यावर हे देखील बदलणारच हो. आपण हाही बदल स्वीकारलाय.दिवाळीत चित्रपट याची नावे निवडक द्यायची तरी तिसरी मंझिल ( १९६६), ज्वेल थीफ ( १९६७), जहा प्यार मिले ( १९६९), राजा जानी ( १९७२), यादों की बारात (१९७३), लैला मजनू( १९७६), परवरीश ( १९७७), मुकद्दर का सिकंदर ( १९७८), मांग भरो सजना( १९८०), मर्द ( १९८५), परिंदा ( १९८९) वगैरे वगैरे. अनेक सुपर हिट आणि अर्थातच काही फ्लाॅप.
माझ्या मते, बंपर दिवाळी हिट चित्रपट एन. चंद्रा दिग्दर्शित “तेजाब ” ( रिलीज ११ नोव्हेंबर १९८८). पिक्चर रिलीज होण्यापूर्वीच एक दोन तीन चार…. गाणे कानोकानी आणि गुणगुणत असे पोहचले आणि गाण्याच्या कॅसेटची अशी काही तडाखेबंद विक्री वाढली की कधी एकदा पिक्चर रिलीज होतोय असे वातावरण तयार झाले. ‘तेजाब ‘ दिवाळी गाजवणार याचे ‘पिक्चर ‘ एकदम ‘ओक्के’ होते आणि मुंबईतील मेन थिएटर ड्रीमलॅन्डला सोमवार दिनांक ७ नोव्हेंबरला आगाऊ तिकीट विक्रीला पहाटेपासूनच लांबच लांब रांग लागली आणि रांग हळूहळू पुढे सरकत असतानाच फर्स्ट डे फर्स्ट शोपासूनचे अनेक शो हाऊसफुल्ल होत गेले. मला आठवतय ड्रीमलॅन्डला तेव्हा बाल्कनी पंधरा रुपये तिकीट होते. दिवाळीचा दिवस आणि ग्रॅन्ट रोड परिसरात फटाके वाजत आहेत, मिश्र वस्ती असल्याने अनेक प्रकारचे कंदील लागलेत, रोषणाई झालीय आणि त्यात ड्रीमलॅन्डलाही ‘तेजाब ‘चे आकर्षक डेकोरेशन आणि ब्लॅकमार्केटमधील दरही चढे. पिक्चर फर्स्ट शोपासूनच पिक्चर सुपर हिट. नेमकी तेव्हा माधुरी दीक्षित मुंबईत नव्हती. अमेरिकेत बहिणीकडे गेली होती. काही दिवसांनी परतल्यावर सहार विमानतळावर मोहीनी…. मोहीनी असे तिच्या कानावर आले. काही टॅक्सीवाले तसे ओरडत होते. तेव्हा तिच्या लक्षात आले, ‘तेजाब ‘ सुपर हिट झाल्याची ही पावती आहे. त्या काळात माधुरी अंधेरी पूर्वला जे. बी. नगरमध्ये राह्यची आणि आम्हा सिनेपत्रकारांना तेव्हाचे स्टार मुलाखतीसाठी आपल्या घरी बोलवत ( हे आजच्या स्टार्सना माहित नसावे.) तेव्हा माधुरी हा अनुभव अतिशय खुलवून, रंगवून रंगवून सांगे.
=======
हे देखील वाचा : स्टर्लिंगची पर्सनॅलिटी लयच भारी…
=======
दिवाळीत चित्रपट प्रदर्शित होण्याच्या संस्कृतीत असा अनुभव मोलाचा. दिवाळीमुळे एकाद्या पिक्चरचा(Diwali Movies) किती कोटीचा व्यवसाय वाढला अशा आकडेमोडीच्या प्रमोशनच्या छापील बातम्या रसिकांपर्यंत लाईव्हपणे चित्रपट पोहचवत नाहीत. हे म्हणजे, दुकानातून आणलेल्या फराळासारखे आहे. त्यात कौटुंबिक, भावनिक स्पर्श नाही. दिवाळीत चित्रपट प्रदर्शितची परंपराही सिंगल स्क्रीन थिएटर्सवरच्या हाऊसफुल्लच्या फलकाला हार यापासून ते ऑनलाईन बुकिंगवर दृष्टीक्षेप असा आहे.
दिलीप ठाकूर