महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
पिक्चरच्या पीचवरचे क्रिकेट
पडद्यावरच्या क्रिकेटच्या खेळी सांगायच्या तर सुबोध मुखर्जी दिग्दर्शित ‘लव्ह मॅरेज’ मधील (१९५९) देव आनंदने स्टेडियममध्ये बसलेल्या माला सिन्हाला उद्देशून गायलेल्या ‘एक नजर मे दिल बेचारा हो गया’ एलबीडब्यूपासून ते खुद्द देव आनंद अभिनित, निर्मित व दिग्दर्शित ‘अव्वल नंबर’ (१९९०) मधील त्याचं आणि आमिर खानच्या फिल्मी क्रिकेटपर्यंत अनेक चित्रपट आहेत. ‘लव्ह मॅरेज’मध्ये देव आनंद फलंदाजी करत असतानाची एकाच बाजूची चित्ररचना म्हणजे मोठा विनोदच. (Movie Cricket Shoot)
रुपेरी पडद्यावर क्रिकेटला प्रतिष्ठा मिळाली ती आमिर खान प्राॅडक्शन्सच्या आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान'(२०२१) या चित्रपटापासून. खरं तर ही एक प्रकारची रचलेली गोष्ट. दीडशे वर्षांपूर्वी गुजरातमधील दूरवरच्या गावात तात्कालिक खेडूत इंग्रजांचा ‘लगान’ (शेतसारा) माफ व्हावा म्हणून क्रिकेट सामन्याचा प्रस्ताव ठेवतात. क्रिकेट हा आपला नैसर्गिक खेळ म्हणून इंग्रजांचा इगो भारी असतो तर हे खेडूत शून्यापासून क्रिकेट शिकतात. अनेक अडथळ्यांवर मात करीत मेहनत घेत जिंकतात. एकाच वेळेस या पटकथेत अनेक प्रकारचे नाट्य, गोष्टी गुंफल्यात. म्हणून चित्रपट भारी ठरला. (Movie Cricket Shoot)
नागेश कुकूनर दिग्दर्शित ‘इक्बाल’ (२००५) भारतीय क्रिकेट संघातील एकेकाळचा फिरकी गोलंदाज भागवत चंद्रशेखर यांच्या आयुष्यावर आधारित. श्रेयस तळपदेला प्रत्यक्षातील क्रिकेट वेडाने ही भूमिका मिळाली. नीरज पांडे दिग्दर्शित ‘धोनी द अनटोल्ड स्टोरी’ (२०१६) महेंद्र सिंग धोनी यांच्या आयुष्यावरील चरित्रपट. अतिशय उत्तम कलाकृती, इतरही ‘ऑलराऊंडर’ वगैरे काही चित्रपटात क्रिकेट होते. पडद्यावरच्या याच क्रिकेटमध्ये आता आर. बाल्की दिग्दर्शित ‘घुमर’ (२०२३) ची खेळी. वास्तवाच्या जवळ जाणारी मनोरंजन मूल्य जपत साकारलेली १३४ मिनिटातील गोष्ट. भावनिक पातळीवरील गोष्टींमुळे हा चित्रपट आपल्याला गुंतवून ठेवतो. अर्थात आर. बाल्की दिग्दर्शित कलाकृती असल्यानेच या चित्रपटाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन काही वेगळे चांगले पाहायला मिळेल असा होतो. हे आर. बाल्कीचे यशच. चीनी कम ( २००७), पा (२००९), शमिताभ ( २०१५), की ॲण्ड का (२०१६), पॅडमॅन ( २०१८) इत्यादीं चित्रपटांमुळे आर. बाल्की काही वेगळे घेऊन येतात असा विश्वास वाढत गेला. चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम असल्याने त्याच्या व्हीजनमधून चित्रपट पडद्यावर येतो. ‘घुमर’चे लेखन आर. बाल्की, रिशी वीरमणी व राहुल सेनगुप्ता यांचे आहे. (Movie Cricket Shoot)
‘घुमर’चे मध्यवर्ती सूत्र असे, अनिना (सियामी खेर) लहानपणापासून क्रिकेट प्रेमी आहे. आता वयात येत असताना छान क्रिकेट खेळतयं. तिला तिची आई (शबाना आझमी), वडील (शिवेंद्र सिंग डुंगरपूर), तिचा बालपणापासूनचा मित्र जीत (अंगद बेदी) यांचा सपोर्ट आहे आणि प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यापूर्वीच तिची इंग्लंडला जाणाऱ्या क्रिकेट संघात निवड होते. पण नेट प्रॅक्टिस करत असतानाच एकेकाळचा एक क्रिकेट सामना खेळल्यावर दुर्दैवाने पुन्हा कसोटी क्रिकेट संघात संधी न मिळालेला पद्मसिंग सोधी उर्फ पॅडी (अभिषेक बच्चन) वैफल्यग्रस्त असल्याने सतत दारुच्या नशेत असतो. तो अनिनाच्या खेळण्यातील दोष दाखवून तिच्या या निवडीवर शेरेबाजी करतो. (Movie Cricket Shoot)
अशातच अपघातात तिला उजवा हात गमवावा लागतो. आता तिच्या उत्तम क्रिकेटपटू बनण्याच्या स्वप्नाचे काय? ती व तिचे कुटुंबिय हवालदिल होते, निराश होते. या अवघड परिस्थितीत पॅडी अनिनाकडे मदतीचा हात पुढे करतो. एका हाताने फलंदाजी शक्य नसली तरी गोलंदाजी शक्य आहे. ही जडणघडण अवघड आणि मेहनतीची आहे. दारुच्या नशेतही पॅडीची कठोर शिकवण आणि मेहनती अनिनाची तेवढीच जिद्द यांचा प्रवास म्हणजे ‘घुमर’. लाईफ मॅजिक का खेल नही, लाॅजिक का खेल है अशा संवादांनी रंगत येते. अतिशय कठीण परिस्थितीतूनही जात जात यशस्वी होता येते अशी ही प्रेरणादायक गोष्ट आहे. (Movie Cricket Shoot)
=======
हे देखील वाचा : छय्या छय्याची पंचवीशी…
=======
लेखक व दिग्दर्शकाने अधिक खोलात जाणे टाळले असले तरी चित्रपट पकड घेतो. क्लायमॅक्स प्रभावी ठरलाय. क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडीलाही एकाच डोळ्याने दिसे तरी तो यशस्वी ठरला असे संदर्भ महत्वाचे ठरतात. माजी फिरकी गोलंदाज बिशन सिंग बेदीही एका प्रसंगात आहे. अखेरीस अमिताभ बच्चनने काॅमेन्टटर साकारलाय. संदेश कुलकर्णी व पंकज विष्णु हेही काॅमेन्टटर आहेत. पण पंकज विष्णु दिसतो इतकेच. त्याला आणखीन थोडे तरी फुटेज हवे होते. क्रिकेटवरील चित्रपटात ‘घुमर ‘ थोडा वेगळा. खेळावरील चित्रपट म्हणजे कधी एक प्रकारची संघर्ष गाथा असते. पण त्यातील इमोशनल भाग जमून यायला हवा. ‘घुमर’ नेमके तेच करतो.