
पन्नासच्या दशकातील पार्श्वगायिका Asha Bholse यांचा संघर्ष!
पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या निधनानंतर (२४ एप्रिल १९४२) मंगेशकर कुटुंबीयांना मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागला. लता मंगेशकर यांनी तर वयाच्या तेराव्या वर्षी घराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आणि अर्थार्जनासाठी चित्रपटात अभिनय आणि गायन सुरू केले. धाकटी बहीण आशा भोसले यांचा देखील संघर्ष तितकाच मोठा होता. लता मंगेशकर यांना तरी भारतीय सिनेमा संगीतकारांनी लवकर एक्सेप्ट केलं परंतु आशा भोसले यांना मात्र इथे देखील स्वत:ला सिद्ध करण्यासाठी झगडावे लागले. एकतर त्या काळात शमशाद बेगम, गीता रॉय, सुरैय्या या प्रस्थापित गायिका होत्या. लता मंगेशकर देखील होत्या. त्यामुळे आशा भोसले यांना जी गाणी मिळत होती ती बी किंवा सी ग्रेड सिनेमे आणि छोट्या संगीतकारांकडची होती.

परंतु आशाने कधीच मोठा संगीतकार छोटा संगीतकार असा भेदाभेद केला नाही. मिळेल ते गाणं ती गात होती. मोठ्या संगीतकारांचे तिच्याकडे लक्षच नव्हते. १९४८ साली आशाने हिंदी सिनेमात गायला सुरुवात केली. पहिली चार पाच वर्ष फार मोठ्या संघर्षाची होती. १९५२ साली मदनमोहन(खूबसूरत), ओ पी नय्यर(छम छमा छम), सचिन देव बर्मन (जीवन ज्योती) यांच्याकडे पहिल्यांदा ती गायली. याच काळात आशाच्या जीवनामध्ये गणपतराव भोसले ही व्यक्ती आली. ते मोठी बहिण लता मंगेशकरचे सेक्रेटरी होते. आशा आणि गणपतराव यांच्यामध्ये तब्बल सोळा वर्षाचे अंतर होते. पण आशाचे त्यांच्यावर प्रेम जडले आणि त्यांच्यासोबतच लग्न करण्याचा निर्णय घेतला. या लग्नाला अर्थातच मंगेशकर कुटुंबीयांचा प्रचंड विरोध होता.
कारण गणपतराव भोसले आणि आशाच्या वयात खूप अंतर होते. गणपतराव भोसले यांचे घर जुन्या विचारांचे होते त्यांचे उत्पन्न देखील खूप कमी होते. परंतु आशाने कुणाचेही न ऐकता घरातून चक्क पळून जाऊन १९४९ साली वयाच्या सोळाव्या वर्षी गणपतराव भोसले यांच्याशी लग्न केले. या लग्ना नंतर मंगेशकर कुटुंबीयांच्या सोबतचा संवाद थांबला. लता मंगेशकर तर बरेच वर्ष तिच्या सोबत बोलत नव्हती. गणपतराव भोसले आणि त्यांचे आई वडील हे जुन्या पारंपारिक विचारांचे होते. त्यांना आशाचे गाणे खटकत होते. घरची आर्थिक परिस्थिती देखील बेतास बात होती. त्यामुळे आशाला गाणं गाणे भाग होते. आशाचा प्रचंड मानसिक कोंडमारा होत होता. आशा त्या काळात प्रेग्नेंट असताना लोकल ट्रेन मधून प्रवास करत होती लांब लांबच्या स्टुडिओमध्ये जाऊन गाणं जात होती.घरासाठी अर्थाजन करत होती. पण भोसले कुटुंबीयांना तिच्याबद्दल काडीचीही सहानुभूती नव्हती. त्या काळात आशा भोसले एकाच वेळी प्रोफेशनल आणि पर्सनल बॅकग्राऊंड वर लढा देत होती.

याच काळात तिची तीन बाळंतपण झाली. वर्षा, हेमंत आणि आनंद ही तीन अपत्य गणपतराव भोसले यांच्यापासून तिला झाली. आनंद च्या वेळेला ती प्रेग्नेंट असताना तिला त्या अवघडलेल्या अवस्थेत गणपतराव भोसले यांनी घराबाहेर काढले. ती पुन्हा मंगेशकर कुटुंबियाकडेकडे आली. आनंदच्या जन्मानंतर ते दोघे सेपरेट झाले. गणपतराव भोसले यांचा मृत्यू १९६६ साली मृत्यू झाला. त्यानंतर मात्र आशा भोसले यांनी त्यांच्या वृध्द आई-वडिलांची सांभाळ केला त्यांची खूप सेवा केली. या संघर्षाच्या काळातच १९५२ साली आशा भोसले यांना ओ पी नय्यर यांच्याकडे गायची संधी मिळाली आणि आशा करीता हा खरा ब्रेक थ्रू होता.
================================
================================
ओपी यांनी यांनी आपल्या संपूर्ण संगीतमय कारकिर्दीत लताचा स्वर वापरला नाही पण आशाच स्वर मात्र मुबलक वापरला. बिमल रॉय यांनी १९५४ साली ‘परिणीता’ या सिनेमात आशा भोसले यांना गायची संधी दिली. आशाला पहिल्यांदाच मोठ्या बॅनर च्या सिनेमात गायला मिळाले. शंकर जयकिशन यांनी ‘बूट पॉलिश’ या आर के फिल्म च्या सिनेमात आशाला गायची संधी दिली.या सिनेमातील सात पैकी सहा गाण्यात आशाचा स्वर होता. याच वर्षी नौशाद यांनी ‘अमर’ मध्ये आशाला गायची संधी दिली. १९५६ सालच्या ‘सीआयडी’ या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेली गाणी खूप गाजली. बी आर चोप्रा यांच्या ‘नया दौर’ या चित्रपटात ओ पी नय्यर आशा भोसले यांचा स्वर वापरला. यानंतर सर्वच संगीतकारांचे लक्ष आशाच्या गायकीकडे आले आणि त्यांना मेन स्ट्रीम सिनेमातील गाणे गायला मिळू लागली. पन्नास च्या दशकात आशाने परिस्थिती सोबत झगडून स्वत: सिद्ध केले.