
Gharat Ganpati Movie: लोकप्रिय मराठी चित्रपट ‘घरत गणपती’ आता पुन्हा चित्रपटगृहात!
काही कलाकृती अशा असतात की त्या काळाच्या ओघातही ताज्याच राहतात. पुन्हा पुन्हा पाहाव्याशा वाटतात, मनात घर करतात आणि प्रत्येक वेळी नव्याने काहीतरी अनुभवायला भाग पाडतात. अशाच कलाकृतींपैकी एक म्हणजे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेला मराठी चित्रपट ‘घरत गणपती’. या लोकप्रिय सिनेमाने आपल्या भावस्पर्शी कथेमुळे, सशक्त अभिनयामुळे आणि संस्कृतीचा गंध असलेल्या सादरीकरणामुळे घराघरात स्थान मिळवले होते. आता याच चित्रपटाचा आनंद प्रेक्षक पुन्हा एकदा चित्रपटगृहात घेऊ शकणार आहेत. लोकाग्रहास्तव ‘घरत गणपती’ हा चित्रपट २९ ऑगस्टपासून पुन्हा प्रदर्शित होत आहे. सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना या चित्रपटाच्या पुनर्प्रदर्शनामुळे उत्सवाचा आनंद अक्षरशः दुप्पट होणार आहे.(Gharat Ganpati Movie)

याबाबत बोलताना दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांनी सांगितले, “प्रेक्षक अनेकदा विचारत होते की ‘घरत गणपती’ मोठ्या पडद्यावर पुन्हा कधी पाहायला मिळणार? अखेर गणरायाच्या कृपेने त्यांची ही इच्छा पूर्ण होतेय. मोठ्या पडद्यावर हा चित्रपट पाहण्याची मजा वेगळीच आहे. भारतीय संस्कृती, कुटुंबातील नाती आणि उत्सवाचे महत्त्व दाखवणारी ही कथा आजही तितकीच भावते.”

चित्रपटाची निर्मिती पॅनोरमा स्टुडिओज आणि नॅविअन्स स्टुडिओ यांनी केली आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर आणि गौरी कालेलकर-चौधरी हे निर्माते आहेत. दमदार कलाकारांमध्ये निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव, संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, परी तेलंग आणि अनेक मान्यवर अभिनेत्यांचा समावेश आहे.(Gharat Ganpati Movie)
================================
=================================
या चित्रपटाच्या लेखन-दिग्दर्शनापासून ते संवाद, अभिनय, गीत-संगीतापर्यंत प्रत्येक घटकाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. कुटुंबातील बंध, श्रद्धा आणि आनंदाचा संदेश देणाऱ्या या कथेला जेवढे कौतुक मिळाले तेवढी मागणीही कायम राहिली.आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘घरत गणपती’ पुन्हा प्रेक्षकांसमोर येतोय. नात्यांचा गोडवा आणि उत्सवाचा आनंद साजरा करण्यासाठी याहून उत्तम संधी असूच शकत नाही. २९ ऑगस्टपासून चित्रपटगृहात झळकणाऱ्या या सिनेमातून प्रेक्षकांना जुन्या आठवणींना उजाळा देतानाच नव्या पिढीला एक अमूल्य अनुभव घेता येणार हे नक्की आहे.