‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
प्रयाग राज; बहुअंगी फिल्मवाला !
एक छोटी भूमिका एखाद्या कलाकाराला ओळख मिळवून देते आणि त्याच्या कारकिर्दीला मार्ग सापडतो. मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘सच्चा झूठा’ (१९७०) या चित्रपटातील चायवाला या छोट्याश्या भूमिकेने प्रयाग राजला (Prayag Raj) अशीच एक चांगली संधी दिली. राजेश खन्नाची दुहेरी भूमिका असलेल्या या चित्रपटातील सच्चा भोला ग्रामीण भागातून मुंबईत येतो तेव्हा हा चायवालाच त्याला वेळोवेळी मदत करतो. तेव्हा पब्लिकने या चायवालाला उत्फूर्त दाद दिली. प्रयाग राजच्या निधनाचे वृत्त (२३ सप्टेंबर २०२३) समजताच पटकन ‘सच्चा झूठा’तील हा चायवाला आठवला. तसा तो अवलिया. चित्रपटसृष्टीत काही अवलिया असे असतात की ते एकाच वेळेस अनेक गोष्टीत रस घेतात.
विशेष म्हणजे त्या प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत घेत त्यांची वाटचाल सुरु असते. प्रयाग राज (Prayag Raj) असेच होते. ते पटकथालेखक होते, त्यांनी चित्रपट दिग्दर्शनही केले. ते अधूनमधून छोट्या छोट्या भूमिकाही साकारत. ते संवाद लेखनही करी. एखादे गीत लिहिण्याचीही त्यांची हातोटी होती. इतकेच नव्हे तर त्यांनी गाण्यात ठोकलेली आरोळी हिट झालीय.
मला आठवतय, अंधेरीतील नटराज स्टुडिओत ‘गंगा जमुना सरस्वती’ या चित्रपटाचा अमिताभ बच्चन, ऋषि कपूर व मिथुन चक्रवर्ती यांच्यावर मुहूर्त दृश्य चित्रीत झाल्यानंतर स्टुडिओच्या आवारातच मनमोहन देसाई, एस. रामनाथन, कादर खान व प्रयाग राज (Prayag Raj) यांच्यात दिलखुलास गप्पा रंगल्या होत्या आणि त्यात प्रयाग राज अतिशय फाॅर्मात आले होते. यामागचं कारण म्हणजे, प्रयाग राज मनमोहन देसाईंच्या खास मर्जीतील होते आणि एस. रामनाथन यांच्याशीही त्यांचे आता सूर जुळत होते. गंमत म्हणजे, मुहूर्तानंतर ऋषि कपूरने हा चित्रपट सोडला.
प्रयाग राज शर्मा (Prayag Raj) हे त्यांचे पूर्ण नाव. जन्म उत्तर प्रदेशातील इलाहाबाद येथील. वडील रामदास आजाद कवी होते. त्यांच्या निधनानंतर प्रयाग राजने मुंबईला येण्याचा निर्णय घेतला. पृथ्वी थिएटर या नाट्य संस्थेत कलाकार म्हणून काम करत असतानाच शशी कपूर, शम्मी कपूर यांच्याशी निर्माण झालेल्या संबंधातून प्रयाग राजचा चित्रपटसृष्टीतील वावर वाढला. छोट्या छोट्या भूमिका मिळत राहिल्या. अशातच दोन गोष्टी घडल्या. सुबोध मुखर्जी दिग्दर्शित ‘जंगली'( १९६१) मोहम्मद रफी यांनी गायलेल्या चाहे कोई मुझे जंगली कहे या गाण्याच्या सुरुवातीस या….हू ! अशी आरोळी ठोकण्यासाठी गीतकार शैलेंद्र आणि संगीतकार शंकर जयकिशन यांना एक आवाज हवा होता. नेमकी हीच संधी प्रयाग राजना मिळाली. त्याने अशी काही आरोळी ठोकली की, शम्मी कपूरला ‘उछलकूद, धसमुसळा प्रेमिक हीरो’ अशी इमेज मिळाली आणि आजही या… हू ! सुपर हिट आहे. १९६३ साली प्रयाग राजना ‘फूल बने अंगारे’ या चित्रपटाच्या संवाद लेखनाची संधी मिळाली.
एका बाजूला प्रयाग राज (Prayag Raj) यांनी पटकथा लेखनात कारकीर्द केली. के. के. शुक्ला, प्रयाग राज व कादर खान असे ते एकत्र येऊन रोटी, धरमवीर, अमर अकबर ॲन्थनी, सुहाग, देशप्रेमी, कुली असे दिग्दर्शक मनमोहन देसाई यांचे चित्रपट लिहिले. मनजींच्या मसालेदार मनोरंजक ‘पिक्चर्सची शैली’ या तिघांनी छान रुळवली. चित्रपटसृष्टीत ‘तिकडी ‘ म्हणूनच ते ओळखले जात. दिग्दर्शक म्हणून प्रयाग राजने शत्रुघ्न सिन्हा, मधुश्री, रणजीत यांची भूमिका असलेल्या ‘कुंदन’ ( १९७२) चोर सिपाही, पाप और पुण्य, इन्सानियत, पोंगा पंडित, हिफाजत, गिरफ्तार, गैरकानूनी इत्यादी चित्रपट दिले. यातील काहींचे लेखन त्यांचेच. अमिताभ बच्चनची भूमिका असलेला ‘जमानत ‘ मात्र तयार असूनही प्रदर्शित झाला नाही. कलाकार म्हणून प्रयाग राजनी (Prayag Raj) आ गले लग जा, धरम करम, प्रोफेसर प्यारेलाल इत्यादी चित्रपटात भूमिका साकारल्या.
===========
हे देखील वाचा : गोष्ट लक्ष्याच्या पहिल्या बायकोची- रुही बेर्डेची !
===========
मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘गंगा जमुना सरस्वती ‘ या चित्रपटासाठी अतिशय तत्परतेने एक गाणे लिहून हवे होते. प्रयाग राजने (Prayag Raj) लगेचच डिस्को भांगडा गाणे लिहिले. ‘या… हू…’ प्रमाणेच प्रयाग राजने अफ्फू खुदा ( जब जब फूल खिले), अल्लारखा ( कुली) या आरोळ्याही हिट झाल्या. प्रयाग राजच्या आवाजाची ही विशिष्ट शैली म्हणता येईल. पण कधी काय घडेल हे सांगता येत नसते हे प्रयाग राजच्या बाबतीतही घडले. तिकडी वेगळी झाली. कादर खानने आपली स्वतंत्र वाटचाल सुरु केली. के. के. शुक्ला अगोदरपासून आपलं वेगळेपण राखून होताच. ज्या मनजींवर प्रयाग राजची (Prayag Raj) भिस्त होती त्यांचे १ मार्च १९९४ रोजी निधन झाले. आणि प्रयाग राजना आता एस. रामनाथन हाच आधार होता. नवीन शतकात चित्रपटसृष्टीत नवीन पिढी आल्यावर प्रयाग राज हळूहळू मागे पडले. हिट चित्रपटांनी त्यांचं अस्तित्व कायम असले तरी प्रत्यक्षातील वावर व काम ही जास्त महत्वाची गोष्ट असते. ते आता त्यांच्याकडे नव्हते. कसं दुर्दैव असते ते बघा, त्यांच्या अतिशय बहुस्तरीय कारकिर्दीची दखल फार पूर्वीच घेतली जायला हवी होती, त्यात अनेक वैशिष्ट्य दिसताहेत.