ब्लॉग: चित्रपटाची ‘उंची’ ठरवताना लांबी रुंदी नव्हे, तर चित्रपटाची ‘खोली’ बघा….!
मराठी, हिंदी तर झालेच पण देशातील अनेक प्रादेशिक भाषेतील चित्रपट आणि अगदी विदेशातील चित्रपट पाहताना सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर अथवा डोक्यात कोण हवा? तर त्या चित्रपटाचा दिग्दर्शक!
त्या दिग्दर्शकाने त्या थीमला दृश्य माध्यमातून कसे पडद्यावर मांडले आहे आणि त्यात तो आपल्याला बाहेरच्या जगाचा विसर पडू देण्यात यशस्वी ठरला आहे का, हे पाहायचे असते. आजच्या ग्लोबल युगात हातातील मोबाईलचा विसर पाडू देण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरायला हवा. (पडद्यावर सिनेमा सुरु असताना काही प्रेक्षकांना मोबाईल फार प्रिय वाटतो त्याला दिग्दर्शक काय करणार?) पण काहींना ‘चित्रपटाचा कालावधी’ महत्वाचे वाटतो. का बरे? (Preferred length of movies)
संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘गंगुबाई काठीयावाडी’ १५६ मिनिटे असे सेन्सॉर प्रमाणपत्रावर वाचताच काहींना हा अवधी फार मोठा वाटला. अरे बापरे असेही काहींना वाटलं. नागराज पोपटराव मंजुळे दिग्दर्शित “झुंड “चा कालावधी १७८ मिनिटे इतका असल्याने काहींना, अरे बापरे तीन तास? एवढे काय बरे चित्रपटात मांडलंय असा प्रश्न पडला. पण एखाद्या थीमची गरजच जर ती मांडण्यास असा बराच अवधी हवा अशी असेल तर? या दोन्ही चित्रपटात एक गोष्ट काॅमन आहे, ती म्हणजे दोन्हीत अनेक छोट्या छोट्या व्यक्तिरेखा आणि तपशील आहेत. आणि ते गरजेचे वाटतात. त्यामुळे वेळ वाढत वाढत जाणारच.
कबीर खान दिग्दर्शित ’83’ देखिल असाच सविस्तर मांडणीने पडद्यावर आला तेव्हाही काहींना प्रश्न पडला, अरे बापरे, इतका वेळ?
फार पूर्वी सेन्सॉर प्रमाणपत्रावर तो चित्रपट किती रिळांचा आहे हे दिले जाई आणि त्यात एखादा मसालेदार मनोरंजक चित्रपट तब्बल अठरा अथवा एकोणीस रिळांचा असेल, तर हाऊसफुल्ल गर्दीतून हमखास जोरदार स्वागत होत शिट्टी येई. नेहमीच्या तिकीट दरात नेहमीपेक्षा जास्त पिक्चर पाहायला मिळणार अशी त्यामागे खुशी असे.
तेव्हा एक रिळ म्हणजे दहा मिनिटे असे सर्वसाधारण गणित असे. त्यातही मृणाल सेन (भुवन शोम, मृगया इत्यादी), श्याम बेनेगल (अंकूर इत्यादी), गोविंद निहलानी (अर्धसत्य इत्यादी) यांचे समांतर अथवा कलात्मक चित्रपट चौदा रिळांचे असणार, तर रमेश सिप्पी (शोले इत्यादी), प्रकाश मेहरा (मुकद्दर का सिकंदर इत्यादी), मनमोहन देसाई (अमर अकबर ॲन्थनी इत्यादी), राजकुमार कोहली (जानी दुश्मन इत्यादी), एन. चंद्रा (तेजाब वगैरे) यांचे चित्रपट सतरा, अठरा रिळांचे असणार; हे तेव्हा पब्लिकला माहित असे. अशा गोष्टीना मास अपील असे. तर ह्रषिकेश मुखर्जी (आनंद वगैरे), गुलजार (परिचय वगैरे), बासू चटर्जी (छोटी सी बात वगैरे), बासू भट्टाचार्य (आविष्कार वगैरे) यांचे स्वच्छ मनोरंजक चित्रपट चौदा ते सोळा रिळांचे असणार, हे तेव्हा रसिकांच्या मनात जणू फिट्ट असे.
खरं तर नेमके किती शूटिंग होईल हे अनेकदा ठामपणे सांगता येत नाही. अनेकदा तरी “शूटिंगची एकेक प्रक्रिया सुरु असताना” काही दिग्दर्शकांना काही आवश्यक बदल सुचतात. कलात्मक फिल्डमध्ये ते अगदी स्वाभाविक आहे, तर कधी एखाद्या दिग्दर्शकाला ऐन पटकथेत वेगवेगळे पर्याय सुचतात आणि शूटिंग वाढते. विशेषतः क्लायमॅक्सच्या बाबतीत तसे होते. मणी रत्नम दिग्दर्शित ‘सपने’चे तमिळ, तेलुगू आणि हिंदी या तीनही चित्रपटातील क्लायमॅक्स भिन्न आहेत.
आपल्याकडचा पहिला दोन मध्यंतरचा चित्रपट अर्थात राज कपूर दिग्दर्शित ‘संगम’चा अवधी तीन तास अठ्ठावन्न मिनिटे इतका होता. तरी तो रसिकांनी विनातक्रार स्वीकारला. याउलट याच राज कपूरचा ‘मेरा नाम जोकर’ मूळात चार तास त्रेचाळीस मिनिटे इतका होता. तो दोन मध्यंतरसह चार तास नऊ मिनिटे असा प्रदर्शित केला असताना रसिकांनी नाकारला आणि त्याचा पहिला आठवडा संपताच त्याची लांबी कमी करुन तो १७८ मिनिटाचा केला गेला. तरीही तो फ्लाॅपच राहिला. (Preferred length of movies)
एक कलात्मकता आणि व्यावसायिकता यांची उत्तम केमिस्ट्री असणारा हा चित्रपट नंतर रिपिट रनला आणि मॅटीनी शोला झक्कास चालला तरीही तो मूळचा फ्लाॅपच आणि तेव्हा त्याच्या दृश्य सौंदर्याचे कौतुक होण्यापेक्षा लांबीची चर्चा रंगली. अरेरे! एका चांगल्या दिग्दर्शकावर हा अन्यायच.
=====
हे देखील वाचा: म्हणून झुंड चालायला हवा!
=====
मोठ्या लांबीचे अनेक चित्रपट रसिकांना आवडले आहेत हे आवर्जून सांगायला हवे. ‘येथे दिग्दर्शक दिसतो’ असे म्हणता येईल. आवारा (तीन तास पंधरा मिनिटे), शोले (तीन तास एकोणीस मिनिटं), कभी खुशी कभी गम (तीन तास बारा मिनिटे), गदर एक प्रेमकथा (तीन तास दहा मिनिटे), लगान (तीन तास चौवेचाळीस मिनिटे), गांधी (चार तास), हम आपके है कौन (तीन तास सव्वीस मिनिटे), हम दिल दे चुके सनम (तीन तास आठ मिनिटे), वगैरे वगैरे हे सगळे चित्रपट किती रिळांचे आहेत असे सेन्सॉर प्रमाणपत्रावर म्हटले आहे, त्यानुसार वेळ दिली आहे. (Preferred length of movies)
पूर्वी रसिकांकडे पाच दिवसाचा कसोटी क्रिकेट सामना आणि तीन तासाचा चित्रपट यात भरपूर आनंद मिळे. ती तेव्हाची जगण्याची रित होती. आता व्हाॅटसअपवर मेसेजने गप्पा होतात, त्यात वेळ वाचतो. आता मोबाईलवर अनेक प्रकारचे माहिती आणि मनोरंजनाचे विश्व उपलब्ध आहे. कुठेही जायची यायची गरज नाही.
ऑनलाईन चित्रपट पाहताना गाणी फाॅरवर्ड करता येतात. जगण्याची एकूणच रित बदलली आहे त्यामुळे एकशेवीस मिनिटापेक्षा जास्त मोठा चित्रपट म्हणजे अनेकांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल. एकदाचा चित्रपट पाहून आपली बाकीची कामे, ऑनलाईन मिटींग, मेसेजेस कधी करतोय असं आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला वाटतेय. (Preferred length of movies)
=====
हे देखील वाचा: मार्चमध्ये प्रदर्शित होणार ‘हे’ 4 बहुचर्चित चित्रपट!
=====
चित्रपट असा घाईघाईत अथवा इतर गोष्टींना डोक्यात ठेवून पाहायचा नसतो. आपल्या देशात चित्रपट रुजवला तो स्वप्नवेड्या, भाबड्या आणि आशावादी रसिकांनी वाढवला. त्यांनी कधीच अशा वेळेची गणिते आणि उत्तरे मांडली नाहीत. पडद्यावरचा चित्रपट आपल्याला भरभरुन आनंद देतोय हे त्यांना महत्वाचे वाटले. त्यातच त्यांना त्या चित्रपटातील खोली दिसली. विशेष म्हणजे त्यांना कधीच ‘चित्रपट कसा पहावा’ हे सांगावे लागले नाही.
तात्पर्य, चित्रपट कसा आहे ते पहा, त्याचा अवधी (अर्थात त्याची वेळ) किती आहे, हे पाहणे रसिकता नव्हे…