प्रेम नाम है मेरा, प्रेम चोपडा..!
हिंदी सिनेमाच्या इतिहासात प्रत्येक कलाकारांचे असे एक स्वतःचे आयकॉनिक डायलॉग असतात, ज्यामुळे त्यांची ओळख निर्माण होते. शोले चित्रपटातील ‘अरे ओ सांबा..’ सारखा अमजद खानचा डायलॉग असेल किंवा अमरीश पुरीचा ‘मोगैंबो खुश हुआ’ असेल. राजेश खन्नाचा ‘रो मत पुष्पा आय हेट टीअर्स’ किंवा अमिताभ बच्चनचा ‘पीटर, तुम मुझे बाहर ढूंढ रा हो और मै तुम्हारा इंतजार यहां इंतजार कर रहा हू’ असे अनेक डायलॉग भारतीय चित्रपट सृष्टीत आयकॉनिक डायलॉग म्हणून लोकप्रिय झालेले आहेत. खलनायक प्रेम चोप्रा (Prem Chopra) यांचा ‘बॉबी’ चित्रपटातील ‘प्रेम नाम है मेरा, प्रेम चोप्रा’ हा डायलॉग असाच जबरदस्त हिट झाला आहे.
केवळ एक डायलॉग असून देखील ही व्यक्तिरेखा चित्रपटात उठून दिसते ही, कमाल होती राज कपूरसारख्या दिग्दर्शकाची. चित्रपटातील प्रत्येक कॅरेक्टरला एक स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्याची! राज कपूरला मिडास टच म्हणतात, ते खोटे नाही. पण तुम्हाला माहिती आहे का? प्रेम चोपडाला (Prem Chopra) हा डायलॉग मुळीच आवडला नव्हता. या चित्रपटातील भूमिकेवर देखील ते खुश नव्हते. ही भूमिका करताना आपण ही उगाच भूमिका स्वीकारली असे देखील त्यांना वारंवार वाटत होतं. पण चित्रपटाचे दिग्दर्शक राजकपूर हे त्यांचे साडू होते.( राज कपूरची बायको कृष्णा आणि प्रेम चोपडाची बायको उमा या सख्ख्या बहिणी! ) त्यामुळे नकार देणे देखील अवघड होते. या डायलॉगची कथा देखील तितकीच भन्नाट आहे. बॉबी हा चित्रपट १९७३ साली प्रदर्शित झाला. हा चित्रपट बनवताना राज कपूर यांची फायनान्शियल कंडिशन फारशी बरी नव्हती. कारण मेरा नाम जोकर हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला होता आणि त्यानंतर आलेला ‘कल आज और कल’ या चित्रपटाला देखील फारसे यश मिळाले नव्हते. लागोपाठ दोन चित्रपट फ्लॉप होणे, त्यात पुन्हा शंकर जयकिशन मधील जयकिशनचे निधन, १९७२ साली वडील पृथ्वीराज कपूर यांचे निधन. असे एकामागून एक धक्के राज कपूरला बसत होते. त्यामुळे त्यांनी ‘बॉबी’ चित्रपट निर्माण करताना फारसा खर्च होणार नाही याची काळजी घेतली.
या सिनेमाचा नायक त्यांनी स्वतःचा मुलगा ऋषी कपूरला घेतले. न्यू कमर डिंपल कपाडियाला नायिका म्हणून घेतले. आपले मेव्हणे प्रेमनाथ (राजकपूरची बायको कृष्णा प्रेमनाथची बहिण होती) यांना चित्रपटात घेतले. तसेच प्राण यांनी अतिशय अत्यल्प दरामध्ये चित्रपटात भूमिका केली. त्याचप्रमाणे साडू प्रेम चोपडा यांना या चित्रपटात छोटी भूमिका दिली. पण प्रेम चोपडा (Prem Chopra) यांना याची कल्पना नव्हती. कारण तोपर्यंत ते एक इस्टॅबलिस्ट व्हिलन झाले होते. त्यांना फक्त एवढेच राज कपूर यांनी सांगितले की,” बॉबी चित्रपटांमध्ये तुम्हाला खलनायक करायचा आहे. त्यासाठी शूटिंग ला पुण्याला या!” प्रेम चोपडा खुश झाले. कारण पहिल्यांदाच त्यांना आर के बॅनरच्या चित्रपटात भूमिका करायला मिळत होती. त्यांना असे वाटले, राज कपूरने त्यांच्यासाठी मोठी भूमिका लिहिली असेल. चांगले डायलॉग असतील. त्यामुळे ते खुश होते. त्या आनंदात ते शूटिंग लोकेशनवर पुण्याला पोहोचले. तिथे गेल्यानंतर त्यांनी राजकपूरला विचारले,” माझी भूमिका काय आहे?” त्यावर राज कपूर यांनी,” या चित्रपटात तुम्हाला गेस्ट अपिअरन्स करायचा आहे!” प्रेम चोपडावर (Prem Chopra) जणू बॉम्बस पडला. ते म्हणाले, गेस्ट अपिअरन्स?” त्यावर राज कपूर म्हणाले,” हो”. त्यावर प्रेम चोपडा म्हणाले,” मी सध्या फुल फ्लेज व्हिलनच्या भूमिका करत आहे. त्यामुळे ही गेस्ट अपिअरन्सची भूमिका माझ्या इमेजला मारक ठरेल.” त्यावर राज कपूर म्हणाले,” सध्या तरी या चित्रपटात माझ्याकडे हीच भूमिका शिल्लक आहे. पुढच्या चित्रपटात मी नक्की तुम्हाला चांगली भूमिका देईल.”
प्रेम चोपडा (Prem Chopra) नाराज झाले. पण राजकपूरला नकार कसा देणार? एक तर नातं होतच. शिवाय राज कपूरचं नाव सिने इंडस्ट्रीत खूप मोठे होते. ते म्हणाले,” ठीक आहे. माझे डायलॉग मला द्या.” त्यावर राज कपूर म्हणाले,” नाही. या सिनेमात तुम्हाला फक्त एकच डायलॉग म्हणायचा आहे, प्रेम नाम है मेरा, प्रेम चोपडा…”
===========
हे देखील वाचा : तब्बल १४ वर्षांनी शत्रुघ्न सिन्हाने आपल्या प्रेयसीसोबत लग्न केले!
===========
आता मात्र प्रेम चोपडा (Prem Chopra) हतबुद्ध झाले. एकतर गॅस गेस्ट अपिअरन्स त्यात पुन्हा एकच डॉयलॉग. ते प्रचंड नाराज झाले. पण सांगता कुणाला? तरी त्यांनी आपले दुःख आपले मेहुणे प्रेमनाथ यांना यांच्याकडे व्यक्त केले. ते म्हणाले,” बघा ना. एक तर रोल छोटा आणि एकच डॉयलॉग. काय करू?” त्यावर प्रेमनाथ म्हणाले,” भूमिकेच्या लांबी रुंदीवर जाऊ नका. खात्री बाळगा हा सिनेमा सुपरहिट होणार आहे आणि तुमचा डायलॉग देखील सुपरहिट होईल! प्रेक्षकांच्या तोंडावर तुमचा हा डायलॉग कायम येत राहील तुमच्यासाठी ही भूमिका छोटी असली, तरी खूप मेमोरेबल होणार आहे!” त्या दिवशी प्रेमनाथ यांच्या जीभेवर जणू सरस्वतीच वास करत होती. चित्रपटाचे शूटिंग झाले. प्रेम चोपडाने आपले शूटिंग संपवले आणि ते मुंबईला निघून गेले. पुढे चित्रपट प्रदर्शित झाला आणि डे वन पासून सुपरहिट झाला. चित्रपटातील गाणी, संगीत, कलावंत, डायलॉग सगळेच सुपरहिट झाले. प्रेम चोपडा यांची भूमिका सर्वत्र चर्चिली गेली. प्रेम चोपडा (Prem Chopra) यांनी आयुष्यात पुढे अनेक खलनायक रंगवले. खूप मोठे मोठे डायलॉग बोलले. परंतु आज देखील ते कुठल्याही कार्यक्रमाला गेले, तरी प्रेक्षकांचा एकच आग्रह असतो बॉबीमधील त्यांचा डायलॉग ‘प्रेम नाम है मेरा, प्रेम चोपडा…’