Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

प्रेमा नारायण सत्तरीत
सिनेमाच्या जगाबद्दलचे प्रश्न कसेही असू शकतात…. उपग्रह वाहिनीवर म्हणा वा यू ट्यूबवर म्हणा एखादे जुने सुपरहिट गाणे पाहताना आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला अनेकदा तरी प्रश्न पडतो, हा कलाकार कोण? ही अभिनेत्री कोण? आज कुठे असते?
रंभा हो हो…संभा हो हो हो हे पब्लिकच्या प्रचंड गर्दीतील धमाकेदार गाणे पाहताना हा प्रश्न हमखास पडतो. हा आवाज उषा उत्थपचा आहे. संगीत बप्पी लहिरीचे आहे. चित्रपटाचे नाव ‘अरमान’ आहे, या क्रमाने उत्तरे मिळत जातात. पण सार्वजनिक ठिकाणी असंख्य बघ्यांमध्ये गाडीवर नृत्य सादर करताना हे गाणे साकारणारी अभिनेत्री कोण हा प्रश्न कायम असतो.(Prema Narayan)

तिचं नाव प्रेमा नारायण.(Prema Narayan) ४ एप्रिल १९५५ हा तिचा जन्म दिवस. म्हणजेच वयाच्या सत्तरीत तिने प्रवेश केला आहे. आजच्या नोरा फतेही, तृप्ती डिमरीवर फिदा असलेल्या पिढीला प्रेमा नारायण हे नाव माहित असण्याची शक्यता जवळपास नाहीच. बरं, जुन्या पिढीतील कलाकारांवर सतत ‘फ्लॅशबॅक’मध्ये जात फोकस टाकला जातो तेव्हा प्रमुख नायक, नायिका, काही विनोदवीर व खलनायक यांचीच ओळख होत राहते. माहिती मिळत राहते. सहनायक, सहनायिका, व्हीलनचे उजवे व डावे हात यांची फारशी ओळख करुन दिली जात नाही. अनेक तर ‘दुर्लक्षित चेहरे राहतात’, तर बरेच ‘अनोळखी चेहरे ‘ म्हणून ओळखले जातात.
प्रेमा नारायण (Prema Narayan) तशी कायमच दुर्लक्षित. पश्चिम बंगालमधील कोलकता ( पूर्वीचे कलकत्ता) शहरात तिचा जन्म झाला. ( गुगलवर कलिमपाॅन्ग हे दिलेले स्थळ चुकीचे आहे असे खुद्द प्रेमा नारायणनेच एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे) लहान वयातच ती मुंबईत आपली अभिनेत्री मावशी अनिता गुहाकडे राहण्यास मुंबईत आली (अनिता गुहाने साठ व सत्तरच्या दशकात अनेक चित्रपटांत नायिका व सहनायिकेच्या भूमिका साकारल्यात. ‘जय संतोषी मा’ ही शीर्षक भूमिका तिनेच साकारलीय.) मावशीकडे राहत असतानाच तिने बोरिवलीतील काॅन्व्हेन्ट स्कूलमध्ये शिक्षण घेण्यास सुरुवात केली, शाळेत कडक शिस्त होती आणि जेव्हा शक्य तेव्हा ती मावशीसोबत शूटिंग पाह्यला जाई. ते करत असतानाच गोपीकृष्ण यांच्याकडे ती कथ्थक, भरतनाट्यम नृत्य शिकली.

वयात येताच तिने पुन्हा दोन गोष्टी केल्या. टीचर ट्रेनिंग स्कूलमध्ये शिक्षिकेचे शिक्षण घेतले. आणि आपण शिक्षण घेतलेल्या काॅन्व्हेन्ट स्कूलमध्येच ती इंग्लिशची टीचर झाली. आणि त्याच वेळेस तिने मिस इंडिया स्पर्धेत भाग घेत विजेतेपद पटकावले. १९७१ ची ही गोष्ट. या मुकुटामुळे ती विश्व सुंदरी स्पर्धेत भाग घेऊ शकली. त्यात ती जिंकली नाही तरी तिला सर्वोत्तम पातळीवरील स्पर्धेचा अनुभव आला. ऑस्ट्रेलियात क्वीन ऑफ पॅसिफिक स्पर्धेत ती उपविजेती ठरली. हे सगळेच घडत असतानाच तिला चित्रपट व माॅडेलिंगच्या ऑफर येतच होत्या. हे वय व वेळ अशी असते की ग्लॅमर क्षेत्र खुणावत असते आणि काय तो निर्णय घेणे भाग असते. मावशीची वाटचाल पाहून प्रेमा नारायणनेही (Prema Narayan) हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकायचे ठरवले. महेश भट्ट दिग्दर्शित ‘मंझिले और भी है’ हा तिने स्वीकारलेला पहिला चित्रपट. थीम धाडसी होती. कबीर बेदी व गुलशन अरोरा नायक होते. सेन्सॉरने चांगलाच कैचीत पकडला. त्यात बराच काळ रखडत रखडत मग एकदाचा तो प्रदर्शित झाला. तोपर्यंत रहेमान दिग्दर्शित “माय फ्रेन्ड” हा तिने स्वीकारलेला चित्रपट १९७४ साली सर्वप्रथम प्रदर्शित झाला.
राजीव नावाचा तिचा नायक होता. असे अनेक राजीव चित्रपटसृष्टीत आले, दोन चार चित्रपटांत भूमिका साकारल्या नि गायब झाले. अनेक अभिनेत्रींबद्दलही असेच होत असते. याचं कारण, या चित्रपटसृष्टीत यश हेच चलनी नाणे आहे. पहिलं पिक्चर हिट तर नवीन चित्रपट मिळणार अथवा सहभूमिकांकडे लक्ष द्या. त्यातही भरपूर स्कोप असतो. आणि त्यातही प्रेमा नारायण (Prema Narayan) नृत्य शिकली होतीच. नृत्य येणे हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक हुकमी नाणे. सत्तरच्या दशकातील हिंदी चित्रपटात सहनायिकेला एकादे गीत नृत्य सादर करण्याची संधी मिळे. कधी मुजरा तर कधी क्लब डान्स ( त्यालाच कॅब्रे म्हणत), साकारायला मिळे. प्रेमा नारायणने एकूणच वस्तुस्थिती स्वीकारली यामागे एक कारण, अनिता गुहाचा कारकिर्दीबाबतचा सल्ला. तोच मोलाचा असतो.

प्रेमा नारायणने (Prema Narayan) मग अनेक चित्रपटांत लहान मोठ्या भूमिका साकारत छान वाटचाल केली. कधी काही चांगली गाणीही अभिनित करायला मिळाली. शक्ती सामंता दिग्दर्शित ‘अमानुष ‘मध्ये ( १९७५) तिने गम की दवा तो प्यार है हे उत्तमकुमारची समजूत काढणारे गाणे साकारले. बंगालच्या एका गावातील ही गोष्ट. हा चित्रपट एकाच वेळेस हिंदी व बंगाली अशा दोन भाषेत होता. शर्मिला टागोर नायिका होती. म्हणजेच प्रेमा नारायणला चांगली संधी मिळाली.
अशीच उल्लेखनीय संधी तिला शक्ती सामंता यांच्याच दिग्दर्शनातील ‘बरसात की एक रात’मध्ये अमिताभ बच्चन व राखीसोबत, तसेच बी. आर. चोप्रा दिग्दर्शित ‘कर्म’मध्ये राजेश खन्ना, शबाना आझमी व विद्या सिन्हासोबत, रामानंद सागर दिग्दर्शित ‘प्रेम बंधन’मध्ये राजेश खन्ना, रेखा व मौशमी चटर्जीसोबत, माणिक चटर्जी दिग्दर्शित ‘घर’ मध्ये विनोद मेहरा व रेखासोबत, मुजफ्फर अली दिग्दर्शित ‘उमराव जान ‘मध्ये रेखासोबत, राज एन. सिप्पी दिग्दर्शित ‘सत्ते पे सत्ता ‘मध्ये अमिताभ, हेमा मालिनीसोबत, बासू चटर्जी दिग्दर्शित ‘रत्नदीप’मध्ये गिरीश कर्नाड व हेमा मालिनीसोबत, के. विश्वनाथ दिग्दर्शित ‘सागर संगमम’मध्ये गिरीश कर्नाड व जयाप्रदासोबत, राहुल रवैल दिग्दर्शित ‘बिवी ओ बिवी’मध्ये रणधीर कपूर व पूनम धिल्लासोबत, प्रयाग राज दिग्दर्शित ‘पोंगा पंडित ‘मध्ये रणधीर कपूर व नीता मेहतासोबत ( हिच्या मैत्रिणीच्या भूमिकेत),तिला संधी मिळाली. ही मिळकतही कमी नाही. कारकीर्द स्थिर राहिली. मोठ्या बॅनरखालील चित्रपटांत मान्यवर दिग्दर्शकांच्या चित्रपटातून तिने ही कामे केली. चित्रपटसृष्टीतील आपली मागणी व प्रतिमा कायम जपली.
========
हे देखील वाचा : ‘इंटरनॅशनल खिलाडी’ पंचवीशीचा !
========
यासह तिने मंगळसूत्र, स्वीकार किया मैने, सात साल बाद, फुलनदेवी, हाॅटेल, मजाल, जुम्बिश, अंगारे, रिश्ते, परम धरम, पाताल भैरवी, रिश्ते, बात बन जाये, धोखेबाज, कराटे, रोमान्स, जाल, सुरक्षा अशा अनेक चित्रपटांतून भूमिका साकारत साकारत बरीच वाटचाल केली. अनेक प्रकारच्या चित्रपटांत तिने भूमिका साकारली. कधी तिला पडद्यावर गाणीही साकारण्याची संधी मिळालीय. जिंदगी का मजा प्यार मे तो है (जब अंधेरा होता है), आप क्या आये (काला सूरज), मनचली हो मनचली (बरसात की एक रात), आखरी वक्त कोई दुवा मांग ले (चोरों की बारात), मेरे पाव के घुंघरु ( आफत) वगैरे वगैरे अनेक. यातील काही गाणी त्या काळात लोकप्रिय झाली होती. मसाला मिक्स चित्रपटांत अनेक प्रकारची नृत्ये असतातच. प्रेमा नारायणने भोजपुरी (दंगल), बंगाली (एक जे छील्लो देश, कबिला) या भाषेतील चित्रपटांतही भूमिका साकारली. या सगळ्यात देश विदेशातील सातत्याचे इव्हेन्टस, त्याचे लहान मोठे दौरे, नृत्य अदा होतेच. आर्थिकदृष्ट्या उत्तम वाटचाल होती. (Prema Narayan)
अशा वाटचालीत एक तर कधी तरी थांबायचा अतिशय अवघड निर्णय घेण्याचे धाडस करावे लागते, जे फार कमी जणांनाच जमते. पुरे झाले ग्लॅमरचं जग, आता लग्न करुन या मनोरंजन क्षेत्रापासून शक्य तितके दूर जाऊयात असा निर्णय घ्यावा लागतो. ‘ये बस्ती बदमाशों की ‘ (१९९९) या चित्रपटानंतर प्रेमा नारायणने खरोखरच या क्षेत्रापासून दूर व्हायचा निर्णय घेऊन राजीव सिंग याच्याशी लग्न करुन ती संसारात रमली. दोन मुलांना जन्म, त्यांचे पालनपोषण यात तिचे मन लागले. आज ही दोन्ही मुले वयात आली आहेत. चित्रपटसृष्टीपासून असे आणि इतके दूर जाणे जमणारे चेहरे मोहरे अगदीच थोडे. म्हणूनच आज ‘रंभा हो हो हो ‘ अथवा ‘गम की दवा तो प्यार है ‘ ही गाणी आठवली अथवा पाहिली तरी पटकन डोळ्यासमोर प्रेमा नारायण (Prema Narayan) येते व प्रश्न पडतो, आज ती आहे कुठे? हा प्रश्नच तिचे यश आहे असे म्हणता येईल….